esakal | तौक्ते: पुढं काय?
sakal

बोलून बातमी शोधा

Tauktae Storm

तौक्ते: पुढं काय?

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

मान्सून आगमनाच्या तोंडावर तौक्ते चक्रीवादळाने कोकण, मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात दिलेला तडाखा हादरवून सोडणारा होता. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाने केलेल्या जखमा भरायच्या आतच आलेले हे नवे संकट कोकणवासियांच्या मनात भीतीची वावटळ निर्माण करणारे ठरले आहे. त्यामुळे ‘तौक्ते’ नंतर काय याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कृषी व नागरी क्षेत्रावरच्या परिणामांचा वेध व त्यावरील उपाययोजना...

तौक्ते चक्रीवादळाने गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हाहाकार माजवला. राज्यात कोकण आणि मुंबई या किनारपट्टीवरील भागापुरताच नाही तर पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक भागात याचा तडाखा बसला; पण आता तौक्तेनंतर काय हा प्रश्‍न आणखी प्रकर्षाने उपस्थित झाला आहे. कारण अरबी समुद्रात अधिक तीव्रतेची आणि जास्त संख्येने चक्रीवादळे तयार होण्याचा अभ्यासकांचा इशारा खरा ठरू लागला आहे. अरबी समुद्र आता वादळांबाबत पूर्वी इतका सुरक्षित राहिलेला नाही.

मुळात चक्रीवादळ निर्मितीचा थेट संबंध समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि वार्‍याची दिशा याच्याशी असतो. पाण्याच्या वरच्या भागाचे तापमान वाढले की त्याची वाफ होवून वर सरकते. साहजिकच तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आजूबाजूची थंड हवा या दिशेने गोलाकार फिरून चक्रीवादळ जन्माला घालते. आत्तापर्यंत उत्तर हिंद महासागरात अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्मितीचे आणि तीव्रतेचे प्रमाण जास्त आहे. याचे मुख्य कारणही अर्थात पाण्याच्या तापमानाशी जोडलेले आहे. बंगालचा उपसागर बर्‍याच ठिकाणी उथळ आहे. त्याच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमानही जास्त असते. तुलनेत अरबी समुद्र खोल आणि थंड आहे. त्यामुळे इथे वादळे तयार होण्याचे आणि तीव्रतेचे प्रमाण कमी आहे; मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे ही स्थिती बदलत आहे. कारण अरबी समुद्राचे तापमानही वाढत आहे. त्यामुळे यात तयार होणार्‍या चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रताही वाढत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार गेल्या दशकात अरबी समुद्रातील तापमान वाढ लक्षणीय आहे. १९८१ ते २०१० च्या तुलनेत २०१९ पर्यंत या समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान ०.३६ अंश सेल्सिअसने वाढले आहे. याचे दृश्य परिणाम वादळ निर्मिती आणि तीव्रतेवरही दिसत आहेत. उत्तर हिंद महासागरात गेल्या दशकाच्या तुलनेत या दशकात वादळांची संख्या तीन पटीने वाढली आहे.

संपूर्ण जगाचा विचार करता १० टक्के वादळे उत्तर हिंद महासागरात होतात. यापैकी एक तृतीयांश भारताच्या पश्‍चिम किनार्‍यावर येतात. १८९१ ते २००० पर्यंतचा विचार करता बंगालच्या उपसागरातून पूर्व किनारपट्टीवर ३०८ वादळ तयार झाली. यात १०३ तीव्र होती. अरबी समुद्रात ४८ वादळे तयार झाली; पण त्यातली २४ तीव्र होती. गेल्या तीन वर्षात अरबी समुद्रात तब्बल अकरा वादळे तयार झाली. यात तौक्तेसह निसर्ग ही दोन तीव्र होती. हे वादळांचे वाढलेले प्रमाण आणि तीव्रता हिच आता चिंतेचा विषय बनला आहे.

मुंबई हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) संचालक डॉ. शुभांगी भुते याबाबत सांगतात, “ग्लोबल वॉर्मिंगचा हा सगळा परिणाम आहे. विविध अभ्यासातून अरबी समुद्राचे तापमान वाढत असल्याचे समोर आले आहे. यामुळे वादळांची संख्या आणि तीव्रता वाढणार आहे. गेल्या तीन वर्षात हाच अभ्यासकांचा अंदाज खरा होताना दिसत आहे. मान्सून निर्मितीच्या आधीचा काही काळ अशा चक्रीवादळांच्या निर्मितीला पोषक असतो. तौक्ते हे याचेच उदाहरण म्हणता येईल. त्यामुळे भविष्यात अशा स्थितीला सामोरे जायला यंत्रणा उभी करावी लागेल. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अशी व्यवस्था उभी केलेली दिसते. तिथे चक्रीवादळापासून बचावाची निवारा केंद्र (सायक्लोन शेल्टर्स) आहेत. एनडीआरएफची यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनात काय करायला हव हे प्रभावीपणे सांगते. तशीच तयारी आपल्याला करणे गरजेचे आहे. लोकांमध्ये सुध्दा जागरूकता वाढवायला हवी. भारतीय हवामान विभागाने इशारा दिल्यानंतर त्यांचे गांभीर्य समजून त्या दिशेने तयारी करण्यात इतकी साक्षरता लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी. वादळाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाकडून तयारीही तितकीच प्रभावी व्हायला हवी. यासाठी यंत्रणेला भौगोलिक स्थितीचा अभ्यास हवा आणि त्या इशार्‍याशी जोडून संबंधित सर्व भागात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारायला हवी.

गेल्यावर्षी पूर्व मोसमी पावसाच्या काळातच निसर्ग चक्रीवादळाने हजेरी लावली. त्यानंतर गेले वर्षभर मधून मधून पाऊस होत आहे. मान्सून असमान झाला किंवा त्याचा तोल गेला तर कृषीचे सगळे चक्रच बिघडून जाते. याबाबत डॉ. भुते म्हणाल्या, “मान्सूनच्या प्रवासावर चक्रीवादळ प्रभाव टाकू शकते. मान्सूनच्या आधी आलेले चक्रीवादळ अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रवासासाठी आवश्यक ऊर्जा घेवून जाते. मान्सूनचे वारे वाहण्यासाठी उष्णतेची गरज असते. चक्रीवादळानंतर समुद्र शांत, थंड होतो. उष्णता नसल्यामुळे मग पुष्कळदा मान्सूनचे चक्र बिघडते.”

निसर्गाच्या वाढत्या लहरीपणाचा कोकणातील कृषी क्षेत्राला आधीच खूप मोठा फटका बसत आहे. किडरोगाचा वाढता प्रादुर्भाव, उत्पादनात झालेली घट, फळांच्या दर्जावर झालेला परिणाम आणि महत्त्वाचे म्हणजे उत्पादन खर्चात झालेली वाढ हे यातले काही प्रमुख दुष्परिणाम आहेत. त्यातच तौक्ते सारख्या वादळाने शेवटच्या टप्प्यातील हापूस हिरावून घेतला. आंबा, कापूस, सुपारी, नारळ व इतर फळपिकांची लागती झाडे उद्ध्वस्त झाली. अनेकांच्या तर अख्ख्या बागा आडव्या झाल्या. एकट्या सिंधुदुर्गात ३३७५ हेक्टरवरील बागायतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बर एकदा कोसळलेले झाड पुन्हा उभे करायला १० ते १५ वर्षांचा काळ लागतो. त्यासाठीचा पैसा कुठून आणायचा आणि हे नुकसान कसे सोसायचे असे खूप मोठे प्रश्‍नचिन्ह कोकणच्या शेतकर्‍यांसमोर आहे.

सर्वाधिक फटका कोकणातील वीज, दूरध्वनी, रस्ते आदी पायाभूत व्यवस्थेवर झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील महावितरणचे जवळपास अख्खे नेटवर्कच ठप्प झाले. आजही ते पूर्वपदावर आलेले नाही. यामुळे सगळीकडची पाणी व्यवस्था कोलमडली आहे. दूरसंचारचे नेटवर्क विस्कळीत झाल्याने कोकणचा जगाशी असलेला संपर्क तुटला. अनेक भागात झाडे पडून रस्ते ठप्प झाले. नद्यांना पूर येवून हानी झाली.

तौक्तेच्या तडाखातून कोकणला पूर्वपदावर यायला काही दिवस लागतील; पण यानंतर काय हा प्रश्‍न अधिक गंभीर आहे. पुढच्या काळात अशी किंवा यापेक्षा गंभीर स्थिती वारंवार निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभी करावी लागणार आहे. ही व्यवस्था आपत्कालीन स्थिती सांभाळण्यासाठीची यंत्रणा, लोकांमधील जागरूकतेपासून अगदी पायाभूत सुविधांमध्ये, पिक पध्दतीत बदलापर्यंत करावी लागणार आहे. या वादळाने सगळ्यात जास्त तडाखा दिलेला वीज यंत्रणेमध्ये आमुलाग्र बदल करावा लागेल. यासाठी भुयारी वीजवाहिन्यांसारखा पर्याय तातडीने स्वीकारावा लागेल. कारण वीज नसल्याने त्यावर आधारीत बर्‍याच व्यवस्था कोलमडून जातात. यात प्रामुख्याने पाणी योजनांचा समावेश असतो. आपत्कालीन स्थितीत काम करण्यासाठी स्वयंसेवकांचे नेटवर्क उभे करावे लागणार आहे. हवामान विभागाच्या इशार्‍याचा योग्य अर्थ लावून त्या दृष्टीने कमी काळात आपत्ती निवारण यंत्रणा उभी करणारी व्यवस्था प्रशासन स्तरावर तयार व्हायला हवी.

अशा वादळाचा थेट परिणाम मासेमारीवर होतो. वेळीच सुचना न मिळाल्यास जीवित हानीचा धोका वाढतो. समाधानाची बाब म्हणजे ‘निसर्ग’च्या तुलनेत ‘तौक्ते’च्यावेळी कोकणाच्या थेट किनारपट्टीवर आपत्ती व्यवस्थापनाचे चांगले काम झाले. यामुळे मासेमारी क्षेत्राच्या नुकसानाची तीव्रता कमी करता आली. किनार्‍यावर आपत्ती निवारणासाठी आधुनिक यंत्रणा, मच्छीमारांमध्ये जागृती आदी स्तरावर खूप काम करावे लागणार आहे. पूर्व किनारपट्टीच्या धर्तीवर वादळप्रवणक्षेत्र निश्‍चित करून तेथे कायमस्वरूपी निवारा केंद्र उभी करावी लागणार आहेत.

अशा वादळाचा दूरगामी परिणाम कृषी क्षेत्रावर होतो. त्यामुळे कोकणच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. सध्या बागायतदार आंबा, काजू आदीच्या एकपीक पध्दतच (मोनो क्रॉप्ट) स्वीकारत असल्याचे दिसते. कोकणात जवळपास ४ लाख हेक्टरवर बागा आहेत. अशा वादळाने या क्षेत्राचे होणारे नुकसान परवडणारे नाही. यासाठी बागायतदारांनी बहुपिक पद्धत स्वीकारायला हवी. जेणेकरून एका पिकाचे नुकसान झाल्यास दुसरा पर्याय उभा राहू शकेल. फॉरेस्ट क्रॉप्ट हा आणखी एक पर्याय कोकणात फायदेशीर ठरू शकतो. कारण ही पिके अशा प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्यात अधिक सक्षम असतात. याही पलीकडे जावून वातावरणातील नेमके बदल आणि त्याचे परिणाम यावर प्रभावी संशोधना होण्याची गरज आहे. कोकणची भौगोलिक रचना, पीक पध्दत वेगळी आहे. यामुळे कोकणसाठी वातावरण बदलाबाबत वेगळे संशोधन आवश्यक आहे. पारंपारिक पीक पध्दत टिकवण्याबरोबरच पर्यायी पिकांवरही संशोधन आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात येणारी चक्रीवादळे विशेषतः कोकण किनारपट्टी हळूहळू पोखरून टाकण्याची भीती आहे.

अरबी समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत आहे. त्यामुळे अधिक तीव्रतेची आणि जास्त संख्येने चक्रीवादळे येतील असा अंदाज अनेक अभ्यासातून पुढे आला आहे. त्यामुळे अशा स्थितीला सामोरे जाणारी प्रभावी आणि कायमस्वरूपी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.”

- डॉ. शुभांगी भुते, संचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग, मुंबई

निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम कोकणातील पिकांवर दिसत आहे. बहुपिक पध्दत हा यावरचा मार्ग ठरू शकेल. जेणेकरून एका पिकाचे नुकसान झाले तर दुसरे आर्थिक गणित सावरु शकेल. इतर कृषी पूरक उद्योगांचीही याला जोड द्यायला हवी.

- डॉ. वाय. सी. मुठाळ, तांत्रिक अधिकारी, ग्रामीण कृषी हवामान सेवा, कोकण कृषी विद्यापीठ.

loading image