esakal | नवे रचनावादी शिक्षण 
sakal

बोलून बातमी शोधा

new constructivist learning

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील "EDU" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून.

नवे रचनावादी शिक्षण 

sakal_logo
By
शिवराज गोर्ले

बालक-पालक
आपल्या मुलांचं शिक्षण योग्य पद्धतीनं होतंय की नाही, हे पाहणं ही अर्थातच पालकांची जबाबदारी असते. ती पार पाडायची तर पालकांनी शिक्षणाची नवी दिशा समजून घ्यायला हवी. शिक्षण क्षेत्रात आता रचनावाद अवतरला आहे. ज्ञानरचनावाद तो सर्वांगानं समजून घेतला, तरच पालक मुलांच्या विकासात डोळसपणे व सक्रिय सहभागी होऊ शकतील. तीच आता काळाची गरज आहे. रचनावादाची काही साधी, सोपी सूत्रं आपण पाहिली. ती फक्त या नव्या दृष्टिकोनाची तोंडओळख होती. आता यापुढील काही भागांमध्ये आपण रचनावादी शिक्षणाची मूलतत्त्वे समजून घेणार आहोत. त्यातूनच आपले फन्डाज्‌ क्लीअर होऊ शकतील. शिक्षणतज्ज्ञ प्रा. रमेश पानसे यांनी ही मूलतत्त्वे सुसूत्रपणे शब्दांकित केली आहेत. वाचकांसाठी मी ती थोडी सोपी करून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

   शिकणं ही मुळात एक प्रक्रिया असते. ती कृतिशील असते. कृती कुठली तर बाह्यजगाची ओळख करून घेण्याची, ते समजून घेण्याची. ती कशी करून घेतली जाते? तर व्यक्ती (जगाबाबतच्या) आपल्या खास प्रतिमा मनःपटलावर उमटवीत जाते. या प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या, विशिष्ट असतात. त्यातून तिला बाह्यजगाची होणारी नवी ओळख आणि तिच्या मनःपटलावर अगोदरच निर्माण झालेल्या प्रतिमा यांच्या परस्पर जोडणीतून एक तर नव्या प्रतिमा तयार होतात किंवा जुन्या प्रतिमांच्या नव्या रचना निर्माण होत जातात. हीच ती व्यक्तिनिष्ठ ज्ञानरचना. 

   शिकण्याची प्रक्रिया ही ज्ञानेंद्रिये यांच्याद्वारे ज्ञानग्रहण साधणारी आकलन प्रक्रिया असते. ती मूलतः नैसर्गिक स्वरूपाची असून, तिचा मेंदूमधील घटनांशी संबंध आहे. हा संबंध कसा आहे, हे मज्जा-मानसशास्त्रातील सिद्धांतांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. 

इथं या वास्तवाचं भान ठेवणं आवश्‍यक आहे, की ही मेंदूप्रणीत शिकण्याची प्रक्रिया मनुष्यांतर्गत घडणारी प्रक्रिया असली, तरी शिकण्याची गरज ही एक सामाजिक स्वरूपाची घटना आहे. मनुष्य हा जेवढा नैसर्गिक, तेवढाच तो सामाजिक प्राणी आहे. त्याचं निखळ जगणं, चांगलं जगणं, आनंदानं जगणं या साऱ्या बाबी समाजावर अवलंबून असतात. त्याच्या विविधांगी गरजा या  समाजसंस्कृतीच्या कोंदणात प्रामुख्याने ठरत जातात. 

loading image
go to top