टीव्ही टाळता येत नसेल तर...

शिवराज गोर्ले
शुक्रवार, 12 जुलै 2019

शिक्षण, पालकत्व  बद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा  शिवराज गोर्ले यांचा लेख 

बालक-पालक
टीव्हीमुळे मुलांच्या संदर्भात निर्माण होणारे प्रश्‍न गंभीर असले, तरी बहुसंख्य पालकांच्या मते त्यावर ‘टीव्ही बंद’ इतकं सोपं उत्तर शक्‍य नाही. तसं करणं त्यांना योग्यही वाटत नाही. घरी टीव्ही बंद केला, तर मुलं शेजारी, मित्रांकडे जाऊन तो बघू शकतात. शिवाय कसाही असला तरी हा टीव्ही नावाचा ‘इडियट बॉक्‍स’ सर्वांना हवा आहे. टीव्हीवर डिस्कव्हरी, ॲनिमल प्लॅनेट, नॅशनल जिऑग्राफी असे चांगले चॅनेल्सही असतातच. इतर चॅनेल्सवरही काही चांगले कार्यक्रम असतात. मुलांना टीव्हीपासून पूर्णतः तोडणं हे त्यांना केवळ एका मनोरंजनाच्या नव्हे तर माहिती व ज्ञानाच्या प्रभावी माध्यमापासूनही वंचित करण्यासारखं आहे. 

कोणतीही गोष्ट पूर्णपणे चांगली किंवा वाईट नसते. टीव्हीचे असंख्य फायदेही आहेत. हवं तेवढं सामान्य ज्ञान मिळवता येतं. अनेक कार्यक्रमांतून मुलांच्या सुप्त शक्तींना उत्तेजनही मिळू शकतं. म्हणूनच शक्‍यतो असे फायदे मिळवून देणारे कार्यक्रमच मुलं बघतील ही जबाबदारी पालकांची आहे. 

आता परिस्थिती अशी आहे की, माहितीचे स्रोत आपण थांबवू शकत नाही. या ना त्या मार्गाने चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी मुलांपर्यंत पोचतच राहणार आहेत. त्यामुळे टीव्ही बघायचाच नाही, ही टोकाची भूमिका घेण्यापेक्षा काय बघायचं, कसं बघायचं हे सांगायला हवं. टीव्हीवर इतके चॅनेल्स आहेत की काय बघायचं याचे पर्यायही भरपूर उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे, पालक स्वतः टीव्हीवर काय बघतात याचा परिणाम मुलांवर होत असतो. पालकांनी चांगल्या कार्यक्रमांसाठी टीव्ही चालू ठेवला म्हणजे नको त्या गोष्टी आपोआपच बाजूला पडतात. पालक जे बघतात तेच बघण्याची सवय मुलांना लागू शकते. असे एकत्र चांगले कार्यक्रम पाहिल्यावर पालकांनी त्याविषयी मुलांशी संवाद साधायला हवा. म्हणजे त्या कार्यक्रमातून नेमकं काय घ्यायला हवं हे सुचवता येतं. अनिल झणकर म्हणतात त्याप्रमाणे, ‘मुलांना कार्यक्रमातलं, जाहिरातीतलं बरं-वाईट समजून घेण्याची सवय लागणं हा जबाबदार पालकत्वाचा भाग असतो. टीव्ही पूर्णतः टाळता येत नसेल, तर त्याला जाणतेपणानं सामोरं जाणं हाच पर्याय राहतो.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivraj gorle article useful information about parents