मोबाईलची कार्यक्षमता (शिवानी खोरगडे)

shiwani khorgade
shiwani khorgade

मोबाईल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, अनेकदा तो चुकीच्या पद्धतीमुळं वापरल्यामुळं तोटेही सहन करावे लागतात. मोबाईलची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायच्या याविषयीचे कानमंत्र...

हल्लीच्या जमान्यात अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारची कामं करतो. मात्र, मोबाईलसंदर्भात काही गोष्टी टाळायला हव्यात. या गोष्टी काय आहेत ते जाणून घेऊया.

- नवीन मोबाईल खरेदी करण्याची नवलाई आता उरलेली नाही. बाजारात एखाद्या मोबाईलचं नवीन व्हर्जन आलं, की आपण जुन्याला सोडून नवीन फोन खरेदी करतो. विशेषतः तरुणांमध्ये ही क्रेझ आहे. नवीन मोबाईल खरेदी केल्यानंतर आपल्याला त्यात हवी असतात आपल्या सोयीची ऍप्स. बरेच जण गूगल किंवा इतर तत्सम स्रोतांवर शोधून ही ऍप्स इन्स्टॉल करतात. असं सर्च केल्यास काही "पेड ऍप्स' आपल्याला मोफतसुद्धा उपलब्ध होतात; पण हे अगदी चुकीचं आहे. ऍप्स इन्स्टॉल करण्यासाठी नेहमी प्ले-स्टोअरचाच उपयोग करा. प्ले-स्टोअरशिवाय ऍप्स इन्स्टॉल करणं म्हणजे पायरसी करण्याला प्रोत्साहन देण्यासारखंच आहे. असे ऍप्सचे कोड आपल्या फोनमधल्या डेटावर कंट्रोल करण्यासाठी वापरले जाऊ शकतात किंवा आपला खासगी डेटा लीक होऊ शकतो.
- आपल्या मोबाईल फोनची गती मंदावली असेल, तर बहुतेक वेळा आपण एक गोष्ट अनेकदा करतो, ती म्हणजे नुकतेच वापरलेल्या ऍप्सची (रिसेंट ऍप्स) लिस्ट उघडतो आणि राईट-लेफ्ट स्वाइप करतो. असं केल्यानं आपल्याला वाटतं, की आपण फोनची मेमरी क्‍लीन केली. मात्र, असं होत नाही. जेव्हा आपण अशा पद्धतीनं त्या ऍप्सना "क्‍लीन' करतो, त्याचा प्रत्यक्षात तसा काहीच उपयोग होत नसतो. त्यामुळं ते टाळणंच योग्य.
- अँड्रॉइड फोनमध्ये अँटी-व्हायरस असावाच हा गैरसमज आहे. अँड्रॉइड फोनसाठी कोणत्याही अँटी-व्हायरसची तशी गरज नसते. उलट अँटी-व्हायरसमुळंही फोनच्या बॅटरीवर लोड येतो. जर आपण ऍप्स प्ले-स्टोअरवरून आणि पाहिजे असलेली माहिती अधिकृत साइटवरूनच डाऊनलोड करत असू, तर आपल्या अँड्रॉइड फोनला अँटी-व्हायरसची काहीएक गरज नाही.
- आपल्याला अजून एक गोष्ट फोनमध्ये हवी असते, ती म्हणजे बॅटरी सेव्हर. मुळात बॅटरी सेव्हर हे फार काही काम करत नाही. जे काम आपण मॅन्युअली करू शकतो, तेच काम हे ऍप करतं. वेगळा काहीही फायदा बॅटरी सेव्हरमुळं होत नाही, फोनची जागा मात्र व्यापून राहते.
- काही अशी ऍप्स आहेत, की जी हार्डवेअरवर अवलंबून असणारी कामं आपण करू शकतो, असं भासवतात. उदाहरणार्थ, आपल्या फोनचं चार्जिंग वेगानं होईल अशी ऍप्स, आपल्या फोनमध्ये आयरस स्कॅनर नसतानाही फोनच्या कॅमेरात आयरस स्कॅनर आणण्याचा दावा करणारी ऍप्स. खरं तर ही "फेक' ऍप्स असतात. त्यामुळं हार्डवेअरवर अवलंबून असणारी कामं एखादं ऍप करत असेल, तर त्यावर विश्वास ठेवू नका.
- फोन स्टोरेजबद्दल आणखी महत्त्वाचं म्हणजे "कॅश मेमरी'च्या नादात आपण फोनमध्ये "क्‍लीनर' ऍप्स डाऊनलोड करतो. समजा आपण गूगल मॅपवर काही सर्च केलं असेल, काही नोंदवून ठेवलं असेल, डाऊनलोड केलं असेल, तर "क्‍लीनर ऍप्स'मुळं अनेकदा तेही स्टोरेज डिलिट होईल. आपल्याला फोन मेमरीमध्ये जागा उपलब्ध करून घ्यायची असेल, तर फोन सेटिंगमधून ती मॅन्युअलीच करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com