

- शोभा नाखरे
‘करंजमाळ’मधील लेख वास्तव अनुभवाच्या ऊर्मीने भारलेले आहेत. नैसर्गिक व्यक्ततेचा त्यात गोडवा आहे.
आनंदिता या नावाने कविता लिहिणाऱ्या निर्मला रणजीत शेवाळे यांचा नवा ललित लेखसंग्रह ‘करंजमाळ’ अष्टगंध प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला. या संग्रहातील लेखांमध्ये करंजमाळच्या मातीचा जणू गंध आणि गोडवाच मिसळला आहे.
निसर्गाच्या नानाविध रूपांबरोबर मानवी स्वभावातले अलवार कंगोरे निर्मला शेवाळे नकळत उलगडत जातात. हे ललित लेख अंतर्मुख करतात; शिवाय लेखिकेच्या मनाचा तळ त्यात अधोरेखित होताना दिसतो.
शहरातल्या गजबजाटातही गावाकडची शांतता स्वतःत रुजवलेली लेखिका मातीत चिंब गंधाळलेले अनुभव आत्म्याच्या प्रामाणिकतेतून तरलपणे मांडत जाते. बावीस ललित लेख असलेला हा संग्रह करंजमाळ! कोल्हापूर जिल्ह्यातलं हे एक गाव. करंज ही कडवट बियांची औषधी वनस्पती. करंज वृक्ष असलेला माळ तो करंजमाळ!
तेथील करंज देवाची दगडाची मूर्ती, वडाचा पार, चिंचेचे आकडे मिरवणारे भलेथोरले झाड, त्यावर वस्तीला असणारे हजारो लहान-मोठे जीव, ज्यात फांद्यावर उड्या मारणारी माकडं, ढोलीत राहणारे पोपट, त्यांची इवलाली बाळं, शुभदर्शी भारद्वाज, पिसारा फुलवून नाचणारे, लांडोरींना साद घालणारे मोर, त्यांच्या सवयी, लकबी हे सारं वाचताना आपण रंगून जातो.
यातील प्रत्येक लेख वास्तवाच्या अनुभवाच्या ऊर्मीने भारलेला आहे. जगण्याची ही असोशी निसर्गाच्या पार्श्वभूमीच्या छायेत संपृक्त झाली असल्याने त्यात व्यक्ततेचा गोडवा आहे, कृत्रिम बेगडीपणा नाही. डोंगरकपारीतल्या गावाकडच्या आठवणींनी व्याकूळ झाल्यावर लेखनातून व्यक्त होत लेखिकेने मनाचे भावबंध मोकळे केले आहेत.
संग्रहात पावसाची नानाविध रूपं लेखिकेने रेखाटली आहेत. कधी जीवलगासारखा भावूक, हळवा पाऊस, पावसाचा कहर, पावसाची काळीजओल, प्रणयातला धुंद करणारा पाऊस, अवेळी कातरवेळी आलेला वळिवाचा पाऊस, तर कधी ममतेने आणि वात्सल्याने न्हाऊ घालत कुशीत घेणारा पाऊस, कधी अवखळपणे धिटाई करणारा पाऊस, पावसाची अनिवार ओढ!
ऋतूंची सृजनशीलता मांडताना उन्हाची तळतळती काहिली असो, वाचकाच्या मनात तरल भाववृत्तीच्या सरी शिंपत लेखिकेने ऋतुमग्न केले आहे. ढगाळलेलं आभाळ, वळीव, मधमाशांचं पोळं, पाऊलवाटा अशा निसर्गरूपे! इवल्याशा सुईपासून खुरपं, चुंबळ, हरवलेलं गाव असेही विषय सहजपणे संग्रहात चितारलेले आहेत.
लेखिकेच्या लेखनात भवतालचे असंख्य प्रश्न मांडताना, बालपणी अनुभवलेले कटू-गोड प्रसंग तितक्याच निरागसतेने लिहिताना जगण्यातली अनिवार ओढ, प्रांजळपणे व्यक्त होत राहते. ‘लहानपणी पायात चप्पल नाही मिळाली, पण त्यामुळेच पाय खंबीर झाले आहेत.
अंगावर घालायला वेळेवर पुरेसे कपडे नाही मिळाले किंवा कधी-कधी वेळेवर पुरेसं खाणं-जेवण त्या वयात परिस्थितीअभावी नाही मिळालं, तरी देवानं शरीर खणखणीत नाण्यासारखं ठेवलं आहे.’ अनेक नकारात्मक प्रसंग, खडतर आयुष्य वाट्याला आलेलं असूनही त्यातही सकारात्मकतेचं हितगूज लेखिका करीत राहते.
‘इवलीशी सुई’ लेखातून गजरे, हार बनवणारी सुई, गोधडी, पोती शिवणारी सुई, तिचा मोठा भाऊ दाभण या रूपकांतून जगण्याचा व्यापक परिघ मांडला आहे. गरिबाच्या झोपडीत सुई-दोऱ्याच्या धाग्याइतकेच कौटुंबिक नातेही अखंड आहे, ही लेखिकेची धारणा खूप काही सांगणारी आहे.
विशेष म्हणजे ‘आपल्यातल्या लेखिकेला घडवणाऱ्या आणि माणसं वाचायला शिकवणाऱ्या अंतर्देशीय पत्रास!’ अशी आगळीवेगळी अर्पणपत्रिका असून, अंतर्देशीय पत्र ः एक भक्कम साकव या लेखात वडिलांच्या व आपल्या नात्यातील भावबंध लेखिका उलगडते.
एकंदरीत ‘करंजमाळ’मधील सर्वच लेख ग्रामजीवनाचा हुंकार, निसर्गाच्या पाऊलखुणा शब्दबद्ध करणारे आहेत. ज्यातून जाणिवांची विविधता, गद्यपद्यमय आविष्कार यातून गावाकडील एक उत्तम सैर करता येते. ज्यातून गाव आणि शहर यांच्यातील तुटकपण, श्रमजीवी माणसांची गाथा, जगण्याची ऊर्मी, सभोवतालच्या बदलांचा स्वीकार असे सारे काही वाचायला मिळते.
‘अलीकडे गाव-खेड्यातही माणसं माणसाला ओळखेनाशी झाली आहेत. आता आधीसारखी सुख-दुःखही वाटली जात नाहीत. उरलीसुरली पिढी शहर आणि गाव यातच विभागली गेली. बांधाला बांध असून शेजाऱ्याची ओळख नाही. सगळी नाती जीर्ण होऊन संपू लागली,’ ही अगतिकता कोणत्याही संवेदनशील माणसाला अंतर्मुख करणारी आहे.
सभोवतालच्या बदलांचा स्वीकार करत, ग्रामीण जीवनातील नजाकत अधोरेखित करणारा ‘करंजमाळ’ लेखिकेच्या काव्यात्म वृत्तीला जागवणारा आहे. विशेष म्हणजे आईच्या पुस्तकाला मुलाचे मुखपृष्ठ असावे, हा अनोखा भावबंध यानिमित्ताने उजळून निघाला आहे.
मयुराची अनोखी भावमुद्रा टिपणारे प्रथमेश शेवाळे याचे मुखपृष्ठ आशयाला पुष्टी देणारेच आहे. सोपी पण काळजाला भिडणारी भाषा, काव्यात्मकता हे या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. देखणेपण जपणाऱ्या ‘अष्टगंध’च्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवणारे हे पुस्तक आहे.
सभोवतालच्या बदलांचा स्वीकार करत, ग्रामीण जीवनातील नजाकत अधोरेखित करणारा ‘करंजमाळ’ हा ललित लेखसंग्रह लेखिका निर्मला रणजीत शेवाळे यांच्या काव्यात्म वृत्तीला जागवणारा आहे. सोपी पण काळजाला भिडणारी भाषा, काव्यात्मकता हे या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.