गंभीर आणि गमतीदार (विजय तरवडे)

गंभीर आणि गमतीदार (विजय तरवडे)

अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे त्यांच्या पिढीतले गाजलेले स्त्रीपार्टी कलाकार. "यशवंत संगीत मंडळी' ही त्यांची नाटक कंपनी. "मौज' साप्ताहिकाचे संपादक अनंत हरी गद्रे हे शंकररावांचे चाहते होते. शंकररावांच्या नाटकांवर ते कौतुकपर लेख लिहीत. त्याच वेळी मुंबईहून "विनोद' नावाचं साप्ताहिक प्रकाशित होत असे. "विनोद'चे संपादक घुमे आणि स्तंभलेखक ना. सी. फडके हे बालगंधर्वांचे चाहते. त्यामुळे "विनोद'मध्ये फडके हे शंकररावांवर टीका करणारे आणि प्रसंगी टर उडवणारे लेख लिहू लागले. गद्रे यांनी त्यावर प्रत्युत्तर देताना ‘फडक्‍यातला विंचू’ असा शब्दप्रयोग करायला सुरवात केली. 

*** 

सवाई गंधर्वांची तिसरी किंवा चौथी पुण्यतिथी पुण्याला नानावाड्यात झाली. त्यानिमित्त पहिल्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तान्त शरच्चंद्र वासुदेव चिरमुले आणि स. शि. भावे या दोघांनी मिळून "बी. सी. शिवचंद्र' या टोपणनावानं लिहिला. दुसऱ्या दिवशी आयोजकांनी या वृत्तान्ताचा खास उल्लेख केला. नंतर या टोपणनावानं दोघांनी अधूनमधून लेखन केलं. एका उपनगरीय साहित्य संमेलनाचा वृत्तान्त लिहिताना पुलंच्या विनोदाची "पौलिक विनोद' अशी थट्टा त्यांनी केली. पुलंनी त्या लेखाचा "शैवचांद्रिक विचार' असा उल्लेख करून प्रत्युत्तर दिलं. 

*** 

मास्टर कृष्णराव "संगीत सौभद्र'मध्ये श्रीकृष्णाची भूमिका करत. एकदा "भानुविलास'मध्ये प्रयोग होता. प्रयोग संपल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपले नेहमीचे कपडे हरवले आहेत किंवा चोरीला गेले आहेत. मग डोक्‍यावर छत्री धरून श्रीकृष्णाच्या वेशातच त्यांना घरी जावं लागलं. 

*** 

स्वातंत्र्योत्तर काळाच्या आरंभी महाराष्ट्र सरकारनं "तमाशा सुधारणा समिती' स्थापन केली होती. समितीनं प्रेक्षकांसाठी एक फर्मान काढून त्याचा फलक रंगमंचावर मध्यभागी लावणं सक्तीचं केलं होतं. फर्मान असं होतं ः "प्रेक्षकांनी एखादी फर्माईश केल्यावर नर्तकीला बिदागी देताना हस्तस्पर्श होणार नाही याची दक्षता घ्यावी. बिदागीची रक्कम हात उंच करून तिच्या उजव्या हातात टाकावी. नर्तकीनंदेखील प्रेक्षकाच्या हाताचा स्पर्श होऊ न देता ती रक्कम झेलावी.' या समितीचे अध्यक्ष होते महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार! 

*** 

ग. दि. माडगूळकर यांची अनेक पुस्तकं प्रकाशित करणारे प्रकाशक म्हणजे "कुलकर्णी ग्रंथागार'चे पंडित अनंत कुलकर्णी. शिवाजी सावंत यांनी "मृत्युंजय' ही त्यांची पहिली कादंबरी लिहिल्यावर गदिमांचा सल्ला मागितला तेव्हा गदिमांनी त्यांना पंडित अनंत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्यास सुचवलं. सावंतांचा समज झाला की पंडित ही पदवी असून प्रकाशकाचं नाव अनंत कुलकर्णी आहे. त्यानुसार ते"कॉंटिनेंटल प्रकाशन'चे अनंतराव कुलकर्णी यांना भेटले आणि पुढं त्यांच्या कादंबऱ्या "कॉंटिनेंटल प्रकाशन'च्या वतीनं प्रकाशित झाल्या. 

*** 

ना. सी. फडके यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं तेव्हाचा हा किस्सा. कर्वे रस्त्यावर डॉक्‍टर देवल यांच्या रुग्णालयात ऑपरेशन होणार होतं. देवलांनी एक भला मोठा कुत्रा पाळला होता. कुत्रा रुग्णालयातच ठेवला जात असे. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी फडके रुग्णालयात ऍडमिट झाले. रात्री डॉक्‍टर आले आणि फडके यांना म्हणाले ः ""उद्या सकाळी सात वाजता ऑपरेशन करू. रात्रभर छान झोप काढा. झोप आली नाही तर ही गोळी घ्या''. 

‘‘नको, नको, मला झोप छान येईल’’. 

‘‘तसं नाही हो...त्याचं काय आहे, आमचा कुत्रा हॉस्पिटलमध्येच असतो. तो रात्रभर भुंकत राहतो. त्यामुळे पेशंट्‌सना झोप येत नाही म्हणून सर्व पेशंट्‌सना झोपेसाठी मी एक गोळी देऊन ठेवतो’’. 

‘‘डॉक्‍टर, मग असं का करीत नाही''? 

‘‘काय’’? 

‘‘सर्व पेशंट्‌सना गोळ्या देण्यापेक्षा त्या तुमच्या कुत्र्यालाच का नाही झोपेची गोळी देत?’’ - फडके म्हणाले. 

*** 

अनेक लेखक दैनिकात सदरलेखन करत असतात. अशा सदरांचं सर्वसाधारण आयुष्य एक वर्ष असतं. क्वचित एखादं सदर लोकप्रिय झालं तर एका वर्षाऐवजी दोन किंवा तीन वर्षंदेखील ते सदर सुरू राहतं; पण असे प्रसंग विरळा. जी गोष्ट सदरलेखनाची तीच अग्रलेखांची. स्वतःच्या दैनिकात संपादक सलग अनेक वर्षं अग्रलेख लिहू शकतात किंवा नोकरी करत असतील तर नोकरीच्या कालखंडात अग्रलेख लिहू शकतात; पण हा कालखंड फार प्रदीर्घ नसतो. मात्र, याबाबतीत एका मराठी लेखकाच्या नावावर अभूतपूर्व विक्रमाची नोंद आहे. धुळ्याच्या "विद्यावर्धिनी महाविद्यालया'चे माजी प्राचार्य जे. जी. खैरनार यांनी एका दैनिकात सलग अडतीस वर्षं अग्रलेख आणि त्याच दैनिकात "लक्षवेध' नावाचं दैनंदिन सदरदेखील सलग 38 वर्षं लिहून एक विक्रम केला होता. "लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस' या संस्थेनं या विक्रमाची नोंद केली आहे. 

*** 

नोकरीत असताना वरिष्ठांशी मतभेद होणं हा अगदी सार्वत्रिक अनुभव. नोकरी खासगी असेल तर या मतभेदांची परिणती नोकरी जाण्यात किंवा नोकरी सोडण्यात होते. लेखकमंडळी संवेदनशील असल्यानं हे मतभेद अधिक तीव्रतेनं होणंदेखील नैसर्गिकच. याबाबतीत भालचंद्र नेमाडे आणि (कै) ह. मो. मराठे यांच्या लेखनकारकीर्दीतलं एक छोटं साम्यस्थळ मजेदार वाटतं. नेमाडे यांची "कोसला' आणि हमोंची "निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' या दोन्ही कादंबऱ्या ढोबळमानानं तरुणांच्या भावविश्वाशी निगडित होत्या. नेमाडे यांनी नंतर नोकऱ्या करत आणि सोडत ‘बिढार’, ‘जरीला’, ‘झूल’ वगैरे कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्याशी समांतर कालावधीत हमोंनीदेखील नोकऱ्या करत आणि सोडत ‘किर्लोस्कर’चे दिवस ते ‘घरदार’चे दिवस’ चितारले. दोघांची नोकऱ्या सोडण्याची किंवा सुटण्याची कारणं निराळी असावीत असं वाटतं! सरतेशेवटी, नेमाडे यांनी ‘टीकास्वयंवर’ लिहिलं आणि हमोंनी "ब्राह्मणांना किती झोडपणार?' असं विचारणारी पुस्तिका लिहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com