मुलांची शाळा इंग्रजी असावी की मराठी?

Marathi Education
Marathi Education

हा-पंधरा वर्षांपूर्वी शहरांपुरते मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळा पाहता पाहता छोट्या छोट्या गावांतही सुरू झाल्या. इंग्रजी शाळांचे पेव आत्ता खेड्यापाड्यातही पसरले आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम सरकारी मराठी शाळांवर झाला. कारण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना या इंग्रजी शाळांना पळवून नेत आहेत. पालकांची इच्छा नसेल, तरीही त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून, त्यांच्या मुलांना मोफत दप्तर, वह्या, पुस्तके आणि येण्या-जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून पालकांना आकर्षित करण्याचे काम केले जात आहे. याउलट, सरकारी शाळेत शासन सर्व सुविधा अगदी मोफत देत असते. तरीही ग्रामीण भागांतील पालकों इंग्रजी शाळांवरील लक्ष अजूनही कमी झालेले नाही. 

'दुरुन डोंगर साजरे' या म्हणीनुसार इंग्रजी शाळा पालकांना आकर्षित करतात. पण त्यांचे आकर्षण फार काळ टिकत नाही. विविध कारणांमुळे एक-दोन वर्षांत ही मुले पुन्हा सरकारी शाळेत प्रवेश घेतात. काही पालकांना या शाळेचा खर्च झेपत नाही. त्यांच्या शाळेचा गणवेष, वह्या आणि इतर खर्च आणि त्याचबरोबर न झेपणारा अभ्यास या सर्व बाबींना कंटाळून पालक आपल्या मुलांना जवळच्या शाळेत घालतात. इंग्रजी शाळेतील अभ्यास मुलांना समजण्यास अवघड जाते. घरात बोलली जाणारी भाषा एक, शाळेत बोलली जाणारी भाषा दुसरीच! त्यामुळे मुले गोंधळून जातात. 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी मुलांची अवस्था होते. 

दोन वर्षे इंग्रजी शाळेत शिकलेली मुले जेव्हा मराठी शाळांत प्रवेश घेतात, तेव्हा ते गोंधळून जातात. 'सेमी इंग्लिश' हा त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पालकांनी आपल्या मुलांची क्षमता लक्षात घेत त्यांना शाळेत प्रवेश घेऊन द्यायला हवा. काही मुले खूप हुशार असतात. काहीही सांगितले, तरीही त्याचा लगेच स्वीकार करतात आणि त्यात प्रगतीही करतात. ज्या प्रकारे हाताची पाचही बोटे सारखी नसतात. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक मूलही वेगळे असते. 

'शेजाऱ्यांचा मुलगा ज्या शाळेत जातो, त्याच शाळेत आपलाही मुलगा जावा' असा विचार करणे साफ चुकीचे आहे. जे पालक आपल्या पाल्यांच्या भवितव्याची काळजी करतात, ते विचारपूर्वक पाऊल उचलतात. 'फाडफाड इंग्रजी बोलता आले, की आयुष्यात यश मिळते' हा साफ चुकीचा समज आहे. पण सध्या असा समज प्रत्येक घरात आहे. घरातलं मूल 'रेन रेन, कम अगेन' म्हणालं, की आई-वडिलांची छाती अभिमानाने भरून येते. 'लेकरू इंग्रजी गाणे म्हणत आहे' म्हणून कौतुक करतात. पण खरोखर त्याचा अर्थ त्याला कळतो का? तर उत्तर आहे 'नाही'! त्याच्या शाळेतील 'मिस'ने ज्या हावभावाने ते गीत शिकवलेले असते, त्याच हावभावाने ते मूल गाणे म्हणते. त्याचा अर्थ त्याला माहीत नसतो. याउलट मराठीत, म्हणजे आपल्या मातृभाषेत 'येरे येरे पावसा' म्हणताना त्याला हावभाव पाठ करण्याची गरज नसते. त्या ओळीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असतो आणि हावभाव करताना ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. असेच काही अनुभव इतर विषयाच्या बाबतींतही घडत असते. त्यामुळे मुलांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून होणे प्रगतीसाठी आवश्‍यक आहे. 

एखाद्या विषयाचा गाभा किंवा मूळ संकल्पना कळाली, तर त्याचा अभ्यास करून कोणत्याही भाषेत व्यक्त होता येते. पण मूळ संकल्पनाच कळाली नाही, तर पोपटपंची करून इतर भाषेत व्यक्त करता येत नाही. मातृभाषेतून शिकल्याने वाचनाची आवड निर्माण होऊन उत्तम ज्ञान, संशोधक वृत्ती व उच्च अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व तयार होते. आकलन शक्तीस भरपूर चालना मिळते. तसेच, स्वयंअध्ययन करण्यास मदत मिळते. सभोवती मराठीचे वातावरण असल्याने पाठांतर करण्याची गरज भासत नाही. तसेच, मराठीत जे बोलले, तसेच लिहिले जाते; पण इंग्रजी बोलणे वेगळे आणि लिहिणे वेगळे असते. त्यामुळेही मुलांना गोंधळून जायला होते. त्यांना शब्दार्थ पाठ केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याचमुळे इंग्रजी शाळेत शिकणारी मुले नेहमी घोकंपट्टी करताना दिसून येतात. कधी कधी काही पाठ झाले नाही, तर वैतागतात, निराश होतात; तर काही मुले व्यसनाधीन होतात. 

इंग्रजी शाळेतील बहुतांश शिक्षक प्रशिक्षित व तज्ज्ञ नसतात, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यांना तुटपुंजा पगार असतो. तोही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ते खासगी शिकवणी घेण्याकडे वळतात, त्याचा खर्च वेगळाच! काही इंग्रजी शाळा याला अपवाद असतीलही; पण हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतक्‍याच.. 

विस्मृती ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे. ती चांगलीही आहे आणि वाईटही! चांगली एवढ्यासाठी, की काही दु:खद गोष्टी विसरून गेलो, तर माणूस जिवंत राहू शकतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट स्मृतीत राहिली असती, तर माणूस नक्कीच पागल झाला असता; म्हणून विस्मृती चांगली बाब आहे. मात्र, जे स्मृतीत राहावे म्हणून शालेय जीवनात पाठांतर करतो, ते मात्र काही काळानंतर विसरून जातो, हे आपल्यासाठी वाईट आहे. पोपटपंची केलेल्या गोष्टी चिरकाल लक्षात राहत नाही; मात्र समजून घेतलेल्या अनेक गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहतात. म्हणून मातृभाषेतील शिक्षण आवश्‍यक आहे. कारण मातृभाषेतील शिक्षणासाठी पोपटपंची करण्याची गरज राहत नाही. समजून घेऊन अभ्यास करू शकतात. घरातील इतर मंडळीही अभ्यासात मदत करू शकतात, काही चुकले असेल तर मार्गदर्शनही करत असतात. मात्र, इंग्रजी शाळेतील मुलांच्या बाबतीत उलटे घडते. मुलांना शाळा आणि ट्युशन याच गोष्टींवर अवलंबून राहावे लागते. सहसा ग्रामीण भागातील पालकांना इंग्रजी वाचता येत नाही, तर ते मुलांना काय सांगू शकतील? 'तुझ्या शिक्षकांनाच विचार' असे उत्तर त्यांना मुलांना द्यावे लागते. येथूनच मग मुलांचा-पालकांचा संवाद कमी होतो. मुले इंग्रजी खाडखाड बोलतील; पण मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांसारखे आपले स्वत:चे मनोगत व्यक्त करू शकणार नाही. त्यांना अनेक अडचणी येऊ शकतात. यास शंभरातून एखादा अपवाद असू शकतो. 

सध्या सगळीकडे शाळांच्या प्रवेशाचे काम सुरू झाले आहे. एकदा प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, की पालकांना नंतर काहीही करता येत नाही. म्हणून 'आपल्या पाल्याला कोठे प्रवेश द्यावा' याविषयी पालकांचे आताच प्रबोधन होणे आवश्‍यक आहे. हातातून गेलेली वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांविषयी डोळसपणे विचार करून निर्णय घ्यावे. अन्यथा आपल्या मुलांचे आयुष्य उध्वस्त होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' या उक्तीनुसार काम केल्यास आपणास पश्‍चाताप होणार नाही. पालकांनी मातृभाषेचे महत्त्व प्रथम जाणून घ्यावे; मगच योग्य वाटेल, तिथे मुलांना प्रवेश द्यावा..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com