क्रोशाच्या छंदातून उभारला व्यवसाय!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

घरच्या घरी - श्रद्धा मराठे, चिंचवड
लहानपणी शाळेमध्ये चित्रकला, हस्तकला हे विषय होते. घरामध्ये आई-बाबांनीही आमच्यातील कलागुण जाणून प्रोत्साहन दिले. यातूनच कलेची आवड निर्माण झाली. लग्नानंतर मी चिंचवडला आले. शेजारी राहणारी एक मैत्रीण क्रोशाचे विणकाम करायची. गप्पा मारताना तिच्याकडून विणकाम शिकून घेतले. तोपर्यंत मला विणकाम आणि क्रोशाची सुईची ओळखही नव्हती. घरातील कामे आटोपल्यावर भरपूर रिकामा वेळ मिळायचा. मला सुचत गेल्या तशा नवनवीन वस्तू तयार करून पाहिल्या. लोकरीपासून कमळ, मोदकांचा सेट, राजहंस, जेवणाचे केळीचे पान, स्वेटर, फ्रॉक, ताटावरचे रुमाल, तोरण, बसण्यासाठी आसन अशा अनेक वस्तू तयार केल्या. 

माझी एक मामी प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून छोट्या चटया तयार करायची. तशा मलाही काही वस्तू कराव्याशा वाटल्या. मी त्या करून पाहिल्या. या वस्तूही क्रोशाच्या सुईने विणूनच करत होते. यामध्ये फुलांची परडी, पेनस्टॅंड, आले-मिरच्या फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी झाकणाची परडी बनवून पाहिल्या. वस्तूंसाठी दुधाच्या आणि इतरही काही पिशव्या वापरल्या. तेलांच्या पिशव्यांचे हार आणि तोरण केले. मैत्रिणींच्या आग्रहाखातर राजहंस आणि कमळही करून पाहिले. हळूहळू या वस्तूंना लग्नाच्या रुखवतासाठी, गौरी-गणपतीच्या सजावटीसाठी मागणी वाढू लागली. घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून मिळणारा वेळ मजेत जात होता. काहीतरी करण्याचा आनंद मिळत होता आणि अर्थार्जनही होत होते. गेली २० ते २५ वर्षे मी हा आनंद घेत आहे. गणपती उत्सवात पिंपरी-चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या ‘टाकऊपासून टिकाऊ़’ या स्पर्धेत मला प्रथम पारितोषिकही मिळाले.

एका हॉटेलमध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्या वस्तू पाहून हॉटेलच्या मॅनेजमेंटने कौतुकाची दाद देणारे पत्रसुद्धा दिले. पण खरेतर या कौतुक किंवा बक्षिसापेक्षाही वस्तू तयार करताना मिळणारा आनंद आणि समाधान खूप मोलाचे वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shraddha Marathe maitrin supplement sakal pune today