

Shri Samarth Spiritual Karmayog book
sakal
रोहित वाळिंबे - rohit.walimbe@esakal.com
उत्कट भव्य तेचि घ्यावे.... असा उपदेश करणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचे उत्कट व भव्य-दिव्य चरित्र आणि लोककल्याणासाठी त्यांनी निर्माण केलेले वाङ्मय हे आज साडेतीनशे-चारशे वर्षांनंतरही तितकेच प्रासंगिक आणि मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी उपयुक्त आहे; याचेच प्रत्यंतर घडविणारे पुस्तक म्हणजे प्रा. प्रभाकर नानकर आणि प्रा. संगीता शिरोडे लिखित श्री समर्थांचा आध्यात्मिक कर्मयोग. या लेखकद्वयींनी प्रस्तुत पुस्तकात समर्थ रामदास स्वामींच्या जीवनकार्याचा, तत्त्वचिंतनाचा आणि समाजाभिमुख आध्यात्मिकतेचा विस्तृत वेध घेतला आहे. हे पुस्तक केवळ चरित्रात्मक नसून, आध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष व्यावहारिक आचरण यांचा समन्वय साधणाऱ्या समर्थांच्या भूमिकेचे सखोल विश्लेषण यात केले गेले आहे.
लेखकाने समर्थांच्या जीवनप्रवासाची मांडणी करताना पारंपरिक भक्तिभावासह त्यांच्या कर्मप्रधान दृष्टिकोनालाही मध्यवर्ती स्थान दिले आहे. ‘आधी केले मग सांगितले’ या समर्थांच्या बाण्यानुसार समर्थांनी त्यांच्या व्यक्तिगत, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनात कर्मयोग कसा जगून दाखवला याचे त्यांच्याच साहित्यातून उद्धृत केलेल्या ओव्या आणि श्लोकांच्या आधारे पुस्तकात नेमकेपणे दाखवण्यात आले आहे. समर्थांचा आध्यात्मिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पलायनवादी नसून कर्मयोगप्रधान आणि राष्ट्रधर्माचे जागरण करणारा होता,’ हे लेखकाने ठळकपणे मांडले आहे.