

Marathi Book Review
esakal
आपल्या पूर्वजांनी भारतीय संस्कृतीच्या संचिताची जी रत्नजडित मंजूषा आपल्या हाती सोपवली, त्या मंजूषेमधले एक लखलखते रत्न म्हणजे ‘श्रीसूक्त’. काही धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात या सूक्ताचे घराघरात पठण केले जाते. लक्ष्मीपूजनासारख्या सणाच्या दिवशी या सूक्ताचे पठण करून लक्ष्मीला आवाहन केले जाते. ऋग्वेदाच्या परिशिष्टातील २५ ऋचांचे ‘श्रीसूक्त’ सामान्यपणे प्रचलित असले, तरी यजुर्वेद आणि सामवेदातही श्रीसूक्त आढळते. फक्त ते फारसे प्रचलित नाही.
‘श्री’ हा एक अर्थभारित शब्द असून, वैदिक ऋषींची अलौकिक देणगी आहे. ज्या शब्दाला आरंभी ‘श्री’ जोडला जातो, त्या त्या शब्दाच्या अर्थावर मांगल्याचे तेज चढते. ‘श्री’ म्हणजे संपत्ती, वैभव, समृद्धी, सुख-समाधान, शांती, लीनता आणि ‘श्री’ म्हणजे या सर्व अर्थांना सामावून घेत त्यांना पावित्र्याचे अधिष्ठान देणारी देवता.