हरवली लावणीची अदाकारी (श्रीकांत कात्रे)

श्रीकांत कात्रे
मंगळवार, 15 मे 2018

गाणं ऐकायला सर्वांनाच आवडते. शब्दांना सूर, लय आणि ताल मिळाला की त्यात मन गुंतून जाते. यमुनाबाई वाईकर यांची लावणी अशाच ताकदीची होती. म्हणूनच त्यांचा आवाज आणि अदाकारीला भरभरुन दाद मिळत गेली.

गाणं ऐकायला सर्वांनाच आवडते. शब्दांना सूर, लय आणि ताल मिळाला की त्यात मन गुंतून जाते. यमुनाबाई वाईकर यांची लावणी अशाच ताकदीची होती. म्हणूनच त्यांचा आवाज आणि अदाकारीला भरभरुन दाद मिळत गेली.

रगेल आणि रंगेल लावण्यांना मराठी मनाने नेहमीच दाद दिली. लावणीचे नुसते शब्द वाचून आनंद मिळत नाही. सूर आणि तालांच्या संगतीत लावणी खुलते. यमुनाबाईंनी वयाच्या आठव्या वर्षापासून लावणी खुलविण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यांनी आयुष्यभर लावणी जिवंत ठेवली. त्यांच्याकडून ऐकलेल्या दुर्मिळ लावण्यांमुळे रसिकांनी त्यांना लावणीसम्राज्ञी किताब कधीच बहाल करुन टाकला होता. लावणीसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. सामान्य माणसाला लावणी वेड लावत होती तरीही समाजाच्या.सर्व स्तरातून लावणीला पाठिंबा मिळत नव्हता अशा काळात लावणीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम यमुनाबाईंनी केले.मराठी लोककलेचा आविष्कार त्यांनी सतत पुढे नेला.

यमुना विक्रम जावळीकर हे त्यांचे मूळ नाव. अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या कोल्हाटी (डोंबारी) या समाजातील कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दारिद्रयाच्या झळा सोसतच त्यांचा प्रवास सुरु झाला. लहानपणापासून डोंबारयाचे खेळ करीत त्यांची गावोगावी भटकंती सुरु झाली. आई तुणतुणं वाजवायची आणि छोटी यमुना पायात चाळ बांधून नाचायची. ही कला सादर केल्यावर भिक्षा म्हणून मापटंभर जोंधळं, तांदूळ मिळायचे. त्यावर कुटुंब चालायचे. त्याचवेळी आईकडून त्यांना लावणी गाण्याचे व अदाकारीचे धडे मिळाले.वयाच्या दहाव्या वर्षापासून त्या लावणी सादर करु लागल्या. तमाशाचे कार्यक्रम करु लागल्या. दहाव्या वर्षी मुंबईतील रंगू- गंगू सातारकर पार्टीत त्यांना काम मिळाले. या संगीत बारीत असतानि त्यांनुआपल्या कानामनात लावणी साठवली. संगीत व अदाकारी आत्मसात केली. मुंबईतील गल्लीबोळातील रस्त्यांवर त्या तमाशा सादर करु लागल्या. गाणं,.नाच आणि भाव सादर करण्याची कला शिकल्या.

वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी स्वतःची यमुना- हिरा- तारा या नावाने संगीत पार्टी काढली. मुंबई गाजवली. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील तमाशा थिएटरांतून कार्यक्रम सादर केले. प्राथमिक शास्त्रीय संगीताबरोबर ख्याल गायकी, गजल, ठुमरी शिकली. संगीत नाटकांत कामे केली. संगीत पार्टी बहरत गेली. आर्थिक मिळकत वाढत गेली. लावणीच्या परंपरागत चालीत त्यांनी स्वतःचे रंग भरले. सुरेल आवाज व जोडीला अदाकारी यामुळे त्यांची लावणी खुलत गेली. बालेघाटी, छक्कड, चौकाची लावणी, बैठकीची लावणी असे लावणीचे प्रकिर सादर करीत त्यांचे कलाविश्व बहरले. पंचकल्याणी घोडा अबलख, तुम्ही माझे सावकार या यमुनाबाईंच्या लावण्या अनेकांच्या ओठावर आल्या.

चौकाची लावणी सादर करणे ही यमुनाबाईंची खासियत होती. बैठकीच्या लावणीत संगीत आणि शब्दांचा भाव, अदाकारी ही महत्वाची स्थाने. या लावणीच्या एकेका ओळीवर यमुनाबाईंची अदाकारी म्हणजे मूळ लावणीचा भावार्थ आपल्या अदाकारीने समोरच्या माणसाला पटविण्याची ताकद ठरली. यमुनाबाईंचे हे सामर्थ्य मोठे ठरले.

यमुनाबाईंनी १९४० मध्ये मुंबई जिंकली. त्यानंतर महाराष्ट्रभर दौरे केले. १९६८ मध्ये स्वतःचा लता लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने फड सुरु केला. दोन ट्रक, दोनपोली तंबू, साठ-पासष्ट कलाकारांचा संच अशा फडाद्वारे बारा वर्षे त्यांनी कला सादर केली. लोकरंजनातून लोकजाग्रुती साधली. बघता बघता यमुनाबाईंचे नाव महाराष्ट्रभर गाजत राहिलं. मान, मरातब, पैसा सर्व काही आपोआप चालून आलं.

कला जोपासण्यासाठी व वाढवण्यासाठी त्यानी प्रयत्न केले. नवोदितांना शिकवले. लावणीच्या अभ्यासकांना.खूप काही दिले. राज्य शासनाने १९७७-७८ मध्ये पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. दिल्ली, कोलकाता, भोपाळ, रायपूर बिलासपूर अशा शहरातून कार्यक्रम झाले. महाराष्ट्र गौरव, सातारा गौरव, विविध पालिकांचे पुरस्कार त्यांना मिळाले. १९९५ मध्ये तत्कालिन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्याहस्ते संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार यमुनाबाईंना मिळाला. त्यावेळी लावणीसाठी घेतलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले. जे हात एकेकाळी भिक्षेसाठी पुढे येत होते, त्या हातांनी विविध पुरस्कार स्वीकारले. या क्षेत्रातील उच्च स्थान त्यांनी मिळवले, पण लावणीचा सूर सामान्य माणसासाठी असतो, हेत्या विसरल्या नाहीत.

त्यांच्या अदाकारीला रसिकांनी भरभरून दिद दिली.कारण त्यांची अदाकारी म्हणजे केवळ नखरेलपणा किंवा रंगेलपणा नव्हता. तोजिवंत अभिनय होता. शब्दांचा अर्थ मनाच्या गाभारयापर्यंत पोचवण्याचे सामर्थ्य त्यांच्या अदाकारीत होते. कलावंत म्हणून त्यांचे मोठेपण होतेच. पोटासाठी त्यांनी. संघर्ष केला. मेहनत घेतली. कलेला दाद मिळवली. नाव कमावले, पैसा कमावला. सारं केलं ते लावणीच्या जगण्यासाठी. म्हणूनच वाईतील क्रुष्णा नदीच्या तीरावर त्यांच्या छोट्या घरात यमुनाबाईंचा सुरेल आवाज अजूनही घुमत राहिल.

Web Title: shrikant katre write about lavani samradni yamunabai waikar