वेद नित्य आहेत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

narasimha saraswati swami maharaj

अध्यात्मक्षेत्रातल्या व्यक्तीच्या हातून काही लिहून होण्यामागं एक वेगळीच शक्ती कार्यरत असते अशी एक साधक म्हणून माझी धारणा आहे, भूमिका आहे.

वेद नित्य आहेत!

- श्रीकृष्ण पुराणिक shriguru.charan.rajaanand.sevak@gmail.com

अध्यात्मक्षेत्रातल्या व्यक्तीच्या हातून काही लिहून होण्यामागं एक वेगळीच शक्ती कार्यरत असते अशी एक साधक म्हणून माझी धारणा आहे, भूमिका आहे. त्या भूमिकेच्या अंगानं काही मुद्द्यांचा ऊहापोह गेल्या वेळच्या लेखातून करण्यात आला. आता या भागापासून, एकेक करून, वेदोपनिषदांच्या थेट परिचयाकडे वळू या.

धर्मप्राप्य: ज्याद्वारे अलौकिक उन्नती आणि पारलौकिक कल्याणप्राप्ती होते तो धर्म. धर्माद्वारेच लोकांचं आणि समाजाचं निर्धारण होत असतं. आपली सत्कर्मेच प्रारब्ध बनतात आणि तीच दुसऱ्या जन्माचं ऐश्वर्य, वैभव व सुखाचं कारण होतात. याच्या विरुद्ध स्थिती म्हणजे अधर्म धारण करणाऱ्यांना दु:ख, पीडा मिळते. धर्माचरणानं भोगवृत्तीचा नाश होतो. हृदयशुद्धी होते. अशा प्रकारे कर्मात असंगताप्राप्ती होते. जिथं कर्मात असंगतासिद्धी होते, तिथं मोक्ष स्वयंसिद्ध होत जातो.

हिंदू धर्मग्रंथ म्हणजेच वेद. वेदनियमानुसार, जीवननिर्वाह हाच मनुष्यधर्म आहे. वेदांची उत्पत्ती सृष्टीच्या उत्पत्तीबरोबरच झाली, असा एक मतप्रवाह आहे. धर्माचा जो नाश करेल, त्याचा धर्म विनाश करेल आणि जो धर्माचं रक्षण करेल त्याचं रक्षण धर्म करेल, असं म्हणणं अनुचित ठरणार नाही.

एका ग्रंथानुसार, ब्रह्मदेवांच्या चारी मुखांतून वेदांची उत्पत्ती झाली. शास्त्र दोन भागांत विभागलं गेलं आहे. श्रुती आणि स्मृती. श्रुतींच्या अंतर्गत धर्मग्रंथ वेद येतात आणि स्मृतींच्या अंतर्गत इतिहास आणि वेदांची व्याख्‍या सांगणारे ग्रंथ, म्हणजे पुराणं-महाभारत-रामायण-स्मृती, आदी येतात.

वेद : वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ. ‘सर्वं वेदमयं जगत्’ आणि ‘मंत्र ब्राह्मणयोर् वेदानाम् अधेयम्’ अशी वेदाची व्याख्या करता येईल. जगातील पहिलं साहित्य म्हणजे वेद. वेद हे मानवी सृष्टीच्या आधी परमेश्वरानं मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिक धारणा आहे.

हिंदू धर्मात चार वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांना ‘वेद’ अथवा ‘संहिता’ असं म्हटलं जातं. यावेदांचे ‘संहिता’, ‘आरण्यके’, ‘ब्राह्मणे’ आणि ‘उपनिषदे’ असे चार उपविभाग आहेत. यांपैकी उपनिषदं ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असं म्हटलं जातं.

नृसिंह सरस्वती स्वामीमहाराजांनी श्रीगुरुचरित्राच्या सव्विसाव्या अध्यायात, २४२ श्लोकांत वेदवर्णनमांडणी अतिशय सुरेखरीत्या समजावून सांगितली आहे. अभ्यासकांनी चिंतन-मनन करून ती जरूर समजून घ्यावी. वेद हा संस्कृत शब्द असून तो ‘विद्’ या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. वेद या शब्दाचा अर्थ ‘ज्ञान’ असासुद्धा घेतला जातो. वेदभक्तांच्या दृष्टीनं हे ज्ञान पवित्र आणि दैवी ज्ञान आहे; परंतु मूळ रूपामध्ये हा शब्द साहित्यग्रंथामध्ये एक विशाल

राशि-विशेषाचा बोधक आहे. प्राचीन काळी ऋषींना वेद ‘दिसले’ म्हणून त्यांना ‘वेद’ असं नाव मिळालं आहे. ‘सत्’, ‘चित्’ आणि ‘आनंद’ असं ब्रह्माचं स्वरूप असल्याचं वेदामध्ये म्हटलं आहे; म्हणून वेदाला ‘ब्रह्म’ असंही म्हणतात. जो ग्रंथ ईप्सित फलाची प्राप्ती आणि अनिष्ट गोष्ट दूर करण्याचा - मानवी बुद्धीला अगम्य असा - उपाय दाखवून देतो त्याला ‘वेद’ असं म्हणावं.

वेद हे आर्यधर्माच्या मूलस्थानी आहेत. ‘वेदोऽअखिलो धर्ममूलम्’ असं वचनच आहे. वेदांमधून तत्कालीन आर्यजनांच्या भौतिक उन्नतीची कल्पना येते. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तीन गोष्टींच्या माध्यमांतून आर्यांनी भौतिक उत्कर्ष साधला होता. वेद, स्मृती, सदाचार आणि स्वतःच्या अंतःकरणाला जे बरं वाटेल ते, अशी धर्माची चार प्रकारची लक्षणं आहेत. भारतीय ‘आस्तिकदर्शनां’नी आपापलं तत्त्वज्ञान मांडताना वेदांचा आधार घेतला आहे. ख्रिस्ती शतकापूर्वी एक हजार वर्षांपलीकडच्या काळात वेदरूप काव्ये रचली असावीत असा एक विचारप्रवाह आहे. काही विद्वानांचं असं मत आहे की, छंदांचा काल ख्रिस्ती शकापूर्वी दोन किंवा तीन हजार वर्षांपूर्वीचा असावा.

लोकमान्य टिळकांनी ‘ओरायन’ हा ग्रंथ लिहून वेदकालासंबंधी आपलं मत सविस्तरपणे मांडलं आहे. ‘वेदकालाचा निर्णय करण्यासाठी वेदवाक्यांचाच आधार घेतला पाहिजे,’ असं त्यांनी नोंदवून ठेवलं आहे. डॉ. भांडारकर हे ऋग्वेदाचा काल इसवीसनपूर्व २५०० मानतात, तर अविनाशचंद्र दास यांच्या मते तो इसवीसनपूर्व २५००० इतका मागं जातो. वेदांमध्ये अग्नी, इंद्र, वरुण, उषा, मरुत अशा विविध देवतांची स्तुतिपर सूक्तं आहेत. वैदिक ऋषींनी निसर्गातील वेगवेगळ्या शक्तींना उद्देशून रचलेली ही स्तोत्रंच आहेत. वैदिक काळातील कुटुंबव्यवस्था, लोकजीवन, संस्कृती, आश्रमव्यवस्था, शिक्षणपद्धती, राष्ट्रदर्शन, तत्त्वज्ञानविषयक संकल्पना अशा विविध मुद्द्यांची माहिती वेदांमध्ये अभ्यासायला मिळते.

वेदपरिचय : वेद हेच हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मग्रंथ आहेत. भारतात वेदांचं महत्त्वपूर्ण स्थान आहे. ते प्राचीन ज्ञानाचे स्रोत आहेत. असं मानलं जातं की, ईश्वरानं ऋषी-मुनींना जे ज्ञान दिलं ते ज्ञान ऋषी-मुनी लिपीबद्ध करत गेले. तेच पुढच्या काळात वेदरूपानं जाणलं गेलं. वेद हा सृष्टीचा सर्वात प्राचीन लिखित दस्तावेज आहे.

प्राचीन भारतीय ऋषी - ज्यांना मंत्रद्रष्टे असंही म्हटलं जातं - त्यांनी मंत्रांचं गूढ रहस्य जाणून, समजून, मनन करून, त्याची अनुभूती घेऊन, ते ज्ञान ज्या ग्रंथांत संकलित करून विश्वासमोर प्रस्तुत केलं ते प्राचीन ग्रंथ म्हणजे ‘वेद.’

सामान्य भाषेत वेद म्हणजे ‘ज्ञान.’ वस्तुत:, ज्ञान असा प्रकाश आहे, जो मानवी मनाचा अज्ञानरूपी अंधकार नष्ट करतो. वेद हे प्राचीन ज्ञानविज्ञानाचं अथांग भांडार आहे. यात मानवाच्या प्रत्येक समस्येचं उत्तर आहे, अशी धारणा आहे. ‘विद्’ या अनेकार्थी धातूपासून ‘वेद’ हा शब्द तयार झाला. दुसऱ्या गणातील विद् म्हणजे वेत्ति, वेद म्हणजे जाणणं, चवथ्या गणातील विद् म्हणजे विद्यते; असणं, सहाव्या गणातील विद् म्हणजे विन्दति, विन्दते म्हणजे लाभ होणं, सातव्या गणातील विद् म्हणजे विन्ते, विचार करणं, दहाव्या गणातील विद् म्हणजे वेदयते, म्हणजे इतरांना ज्ञान करून देणं.

प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष वस्तूविषयी ज्ञान प्राप्त करून घेणं, ते अनुभवणं, तो अनुभव दुसऱ्यांना प्राप्त होण्यासाठी विशद करणं हा मनुष्याचा स्थायी स्वभाव. आणि, असा अनुभव जेव्हा पराकाष्ठेच्या उच्च प्रतीचा असतो, निर्भेळ असतो, अवर्णनीय असतो त्याला ‘आनंद’ म्हटलं गेलं आहे. आनंद ही एक स्थिती आहे. या आनंदालाच ब्रह्मप्राप्ती, आत्मविद्या, आत्मज्ञान, साक्षात्कार, दर्शन, ज्ञान इत्यादी उपाधी आहेत.

स्वाध्याय, कर्म, प्रार्थना, भक्ती, तपाचरण इत्यादींच्या मार्गे ‘पूर्ण ज्ञान’ अनुभवणं व अशा अनुभवाची इतरांनाही प्रचीती यावी यासाठी झटणं हेही मानवी स्वभावाला अनुसरून आहे; पण असं ज्ञान कुणी कुणाला ‘देऊ’ शकत नाही अथवा कुण्या विशिष्ट ‘कृती’नं ते प्राप्त होईलच असंही म्हणता येत नाही. कारण ‘ते’ फक्त अनुभवता येतं; पण काय अनुभवलं हे सांगता येत नाही. त्याचं कारण एकच आहे व ते म्हणजे, मानवाला उपलब्ध असलेल्या मन-बुद्धी-इंद्रियं या सर्वांच्या ते पलीकडचं आहे. ते केवळ ईश्वरी कृपेनंच मिळण्यासारखं आहे. अशी ईश्वरी कृपा होते तीही फक्त मानवाला उपलब्ध असलेली मन-बुद्धी- इंद्रियं जेव्हा शुद्ध व पावन होतात तेव्हाच.

मन-बुद्धी यांच्या अती-शुद्धावस्थेत ‘ज्ञाना’चं दर्शन होतं. अव्यक्त ज्ञान बुद्धीद्वारे व्यक्त होतं. आणि, बुद्धीत व्यक्त व्हायचं एक साधन आहे, त्याला म्हणतात शब्द-वाक्-वाणी. व्यवहारदशेत जाणणं, उमजणं हे होतच असतं; पण शाश्वत, नित्यतत्त्वांचं दिव्य स्फुरण होऊन जे वाक्‌द्वारा बाहेर पडतं त्याला ‘दर्शनशास्त्र’ म्हणण्याचा प्रघात आहे. ज्यांना नित्यतत्त्वांचं दिव्य दर्शन घडतं त्यांना ‘द्रष्टा’ वा ‘ऋषी’ असं म्हणतात. असं दर्शन मनाच्या उत्थानदशेत, समाधी-दशेतच होऊ शकतं. ‘ऋग्वेद १३२४.३’ या ऋचेत म्हटलं आहे की, ऋषींना आपल्या अंतःकरणात ज्या ‘वाक्’ची (वेदवाणी) प्राप्ती झाली, ती त्यांनी सर्व मनुष्यजातीला शिकवली. अशी वेदवाणी ज्यांना ज्या स्वरूपात प्राप्त झाली त्याला ‘मंत्र’ असं म्हटलं गेलं आहे.

मंत्र ऋषिगणांना वाक्‌रूपे ‘दिसले’. ऋग्वेदाच्या ‘ब्राह्मण’ ग्रंथापैकी ‘कौषितकी ब्राह्मण’ (१०.३०) व ‘ऐतरेय ब्राह्मण’ (३.९) यांनुसार ‘ऋषींना वेदमंत्र दिसले’ असाच अभिप्राय आहे. म्हणून वैदिक संहितेच्या सूक्त, ऋचा यासंबंधी ज्या ऋषींच्या नावांचा उल्लेख केला जातो त्यांना त्या मंत्राचे ‘प्रणेते’ न मानता त्या त्या मंत्रांचे ‘मंत्रद्रष्टे’ मानलं जातं. ‘निरुक्त’कार यास्काचार्य एके ठिकाणी म्हणतात : ‘ऋषिर्दर्शनात् स्तोमान ददर्श.’ म्हणजे - त्यांनी मंत्र ‘पाहिले’ म्हणून त्यांचं नाव ‘ऋषी’ असं पडलं. आणखी एके ठिकाणी उल्लेख आढळतो की, ‘द्रष्टारः ऋषयः स्मर्तारः’; ‘स्रष्टारः’ वा ‘कर्तारः’ नव्हेत. ऋषी हा मंत्राचा ‘द्रष्टा’ आहे, त्यांचा ‘कर्ता’ नव्हे. अशा श्रृतिकवनांचा संग्रह म्हणजे वेद. मंत्रांचं असं दर्शन कुण्या विशिष्ट कालमर्यादेतच होणं संभवनीय नाही. फार मोठ्या कालगणनेत, अनेकानेक जणांना अशा मंत्रांचं स्फुरण झालेलं आहे. स्फुरण झालं म्हणजे जे आधीच आहे ते अवतरलं, व्यक्त झालं.

कारण, आदिचैतन्य ब्रह्मदेवाची निर्मितीच वेदांपासून असल्यानं ते मुळात ‘आहेत’. आकाशात व्याप्त असलेले अव्यक्त स्वरूपातील नित्य शब्द जसे ‘कण्ठ’, ‘तालु’, ‘जिव्हा’ यांद्वारे अभिव्यक्त केले जातात, अगदी त्याचप्रमाणे शब्दमय नित्यवेद ऋषींच्या माध्यमातून समाधी-अवस्थेत अभिव्यक्त वा प्रकट झाले. आद्यशंकराचार्यांनी आपल्या ‘शारीरक भाष्य २.३.१’ मध्ये याचं जोरदार समर्थन केलं आहे. ‘बृहदारण्यक’ उपनिषदात वेदांना परमेश्वराचा ‘श्वास’ मानलं गेलं आहे. नित्य परमेश्वराचा श्वासही नित्यच असणार, तर वेददेखील नित्यच आहेत. या ‘श्वासा’चा अर्थ ‘ज्ञान’ असाही केला जातो म्हणून ‘ज्ञान’ही नित्य आहे. असं हे नित्य ज्ञान तपाचरणाच्या अत्युच्च अवस्थेत अंतःकरणात ईश्वरीय प्रेरणेनं अवतरित होतं.

(लेखक अध्यात्मक्षेत्राचे गाढे अभ्यासक आहेत.)

टॅग्स :Hindu religionsaptarang