सामवेद आणि अथर्ववेद

साम म्हणजे रूपांतरण आणि संगीत; सौम्यता आणि उपासना. या वेदात ऋग्वेदाच्या ऋचांचं संगीतमय रूप आहे. सामवेद गीतात्मक, गीतरूप आहे.
samved and atharvaveda
samved and atharvavedasakal
Summary

साम म्हणजे रूपांतरण आणि संगीत; सौम्यता आणि उपासना. या वेदात ऋग्वेदाच्या ऋचांचं संगीतमय रूप आहे. सामवेद गीतात्मक, गीतरूप आहे.

- श्रीकृष्ण पुराणिक, saptrang@esakal.com

साम म्हणजे रूपांतरण आणि संगीत; सौम्यता आणि उपासना. या वेदात ऋग्वेदाच्या ऋचांचं संगीतमय रूप आहे. सामवेद गीतात्मक, गीतरूप आहे. या वेदाला संगीतशास्त्राचं मूळ मानलं जातं. १८२४ मंत्रांच्या या वेदात ७५ मंत्र वगळता बाकीचे सर्व मंत्र ऋग्वेदातूनच घेतलेले आहेत. यात सविता, अग्नि आणि इंद्र या देवतांचा उल्लेख आढळतो. या मुख्य रूपानं तीन शाखा आणि ७५ ऋचा आहेत. सामवेदाची रचना ऋग्वेदातील मंत्र गाण्यायोग्य व्हावेत या हेतूनंच केली गेली आहे.

यात १८१० छंद आहेत. सामवेद तीन शाखांत विभागलेला आहे : कौथुम, राणायनीय आणि जैमिनीय. ‘भारताचं प्रथम संगीतात्मक पुस्तक’ होण्याचा मान सामवेदाला आहे. सामवेद गीत-संगीत प्रधान आहे. प्राचीनकाळी आर्यांद्वारे सामगान केलं जात असे. सामवेद चारी वेदांत आकारानं सर्वात छोटा आहे; पण याची प्रतिष्ठा सर्वाधिक आहे. हा एका तऱ्हेनं सर्व वेदांचं साररूप आहे, सर्व वेदांचे निवडक अंश यात समाविष्ट केले गेले आहेत. सामवेदसंहितेचे दोन भाग आहेत, आर्चिक आणि गान. पुराणात सामवेदाच्या एक सहस्र शाखा असल्याची माहिती आढळते. प्रपंचहृदय, दिव्यावदान, चरणव्यूह आणि जैमिनी गृहसूत्र बघितल्यावर १३ शाखा समजतात.

यात भक्तिमय व शांततामय प्रार्थना आहेत. मानसिक आणि आध्यात्मिक विकासात त्या मोठ्या मदतीच्या आहेत.ॠग्वेदातील ॠचांचं गायन कसं करावं याचं विवेचन सामवेदात आहे. सामवेदाला ‘भारतीय संगीताचा पाया’ असं म्हटलं जातं. यातील ७५ ऋचा ऋग्वेदाच्या ‘शाकल’ शाखेतून घेतलेल्या आहेत, तर इतर ७५ या ‘बाष्कल’ शाखेमध्ये मोडतात. या ऋचा - ज्यांना ‘सामगान’ असं म्हटलं जातं - त्या सूचित केलेल्या अशा विशिष्ट सुरांमध्ये गायल्या जातात.

सामगान गाऊन विशिष्ट विधी करताना विविध देवतांना प्रसाद पेयार्पण म्हणून दूध व इतर पदार्थांबरोबर सोम वनस्पतीचा रस अर्पिला जाई. ‘तांड्य’ किंवा ‘पञ्चविंश’, ‘षड्विंश’, ‘सामविधान’, ‘आर्षेय’, ‘देवताध्याय’, ‘उपनिषद्’ आणि ‘वंश’ ही सामवेदाची ब्राह्मणे आहेत.

सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील चार वेदांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा वेद आहे. साम म्हणजे ‘गायन’ आणि वेद म्हणजे ‘ज्ञान’ होय. हा वेद ब्रह्मदेवानं लिहिला आहे, असं मानलं जातं.

‘वेदा हि यज्ञार्थ अभिप्रवृत्ता:’ वेद हे यज्ञासाठीच प्रवृत्त झाले आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. यज्ञातील वेगवेगळी कर्मे करणारे ‘ऋत्विज’ वेगवेगळे असतात. त्यांना विशिष्ट नावं असतात. देवतांना संतुष्ट करण्यासाठी ऋचांचं गायन करण्याचे काम सामवेद्यांचं असतं. ते करणाऱ्या चार ऋत्विजांचा एक गट असतो.

त्यांच्या प्रमुखाला ‘उद्गाता’ असं म्हणतात. एखादं साम तयार झालं की त्याच्या गायनाचे पाच अवयव तयार होतात: १. प्रस्ताव, २. उद्गीथ, ३. प्रतिहार, ४. उपद्रव, आणि ५. निधन. सामगान करताना त्यातील ऋचांची आवृत्ती केली जाते, तिला ‘स्तोम’ असं म्हणतात. साम हे प्रामुख्यानं तीन ऋचांवर गायलं जातं आणि त्याचे तीन पर्याय (म्हणजे तीन आवृत्त्या) करतात.

अथर्ववेद : भारतीय संस्कृती-इतिहासात चतुर्थ वेद म्हणून मान्यता पावलेला; परंतु परंपरागत ब्राह्मणवर्गानं वेदत्रयीमध्ये समावेश करण्यास नाकारलेला असा हा अथर्ववेद. तो यज्ञीय धर्मसाधनेच्या दृष्टीनं ऋग्वेदाहून कमी महत्त्वाचा असला तरी भारतीय लोकसाहित्याचा ‘आद्य स्रोत’ यादृष्टीनं सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या तो ऋग्वेदाहूनही अधिक महत्त्वाचा आहे. ‘सर्वंकष समाजाभिमुखता’ हे अथर्ववेदाचे प्रमुख वैशिष्ट्य असून, समाजातील निष्कांचन ग्रामीण जनतेपासून उच्चपदस्थ राजा- महाराजांपर्यंतच्या समस्त वर्गांचा परामर्श या ग्रंथात आढळतो. अथर्ववेदांत अभिचारमंत्र आहेत. हा अथर्वन् लोकांचा वेद आहे. प्राचीन काशी,अग्नि-उपासक पुरोहितास ‘अथर्वन्’ असे म्हणत असत व हे नाव बहुतेक सरसकट सर्व उपाध्यायांना फार पुरातनकाळी लावूं लागले असावेत; कारण, हा ‘अथर्वन्’ शब्द पर्शूभारतीय काळचा आहे.

‘अवेस्ता’मधील अथर्वन् लोक व हिंदू अथर्वन् लोक यांच्यात बरेच साम्य आहे. ‘अग्निपूजक’ या नावानं प्रसिद्ध असलेल्या प्राचीन इराणी लोकांइतकंच प्राचीन भारतीयांच्या दैनंदिन कृत्यांत अग्निपूजेचं माहात्म्य असे. हे प्राचीन अग्निपूजक, अमेरिकेतील इंडियनांच्या वैद्यांप्रमाणे किंवा उत्तर आशियातील ‘शामन’ लोकांप्रमाणें जादूटोणा जाणणारेही होते. हे पुरातन अग्निपूजेचे उपासक जारणमारण विद्येचेही उपासक असत; म्हणजे एकाच व्यक्तीच्या ठिकाणी आचार्यत्व व अभिचारकत्व ही दोन्हीं असत. मध्य देशांतील अथर्वन् लोकांस ‘मगी’ (जादूटोणा जाणणारा अग्निपूजक) असं म्हणत. यावरून आचार्यत्व-अभिचार यांचं पुरोहितवर्गांत सह-अस्तित्व सिद्ध होतं; तसंच हेही उघड होतं की, अथर्वन् हे नांव अथर्वन् लोकांच्या किंवा ‘आचार्य-अभिचारकां’ च्या मंत्रांनांही (अभिचारांनाही) लावत असत.

भारतीय वाङ्मयात या वेदाचं अतिशय जुनं असं नाव म्हणजे ‘अथर्वांगिरस’. इतिहासास ज्ञात अशा कालापूर्वी अंगिरस् म्हणून एक अग्निउपासकांचा वर्ग होता व अथर्वन् या शब्दाप्रमाणेंच या शब्दाला ‘जारणमारणादी मंत्र’ हा अर्थ आला. तथापि, अथर्वन् व अंगिरस् हे दोन निराळे मंत्रवर्ग आहेत.

अशी एक कल्पना होते की, ब्राह्मणजातीचा उद्भव होण्यापूर्वी ज्या लोकांकडे भारतीयांचं पौरोहित्य होतं त्यांस ‘अथर्वन्’ हेच नाव असे. आणि असंही शक्य आहे की, ज्याप्रमाणें पर्शूंचे आचार्य परजातीय होते त्याप्रमाणे हिंदूंचे आचार्यही काहीसे परजातीय असावेत. निदान पररजातीय लोक यांच्या वर्गांत बरेचसे घुसले असावेत.

या प्रश्नाचं विवेचन ‘ब्राह्मणजातीचा उदय’ या प्रकरणात पुढं-मागं सविस्तरपणे करता येईल. अथर्वन् मंत्र सुखकारक व पवित्र आहेत, तर याच्या उलट अंगिरस् हे मंत्र अघोर, पीडाकर आहेत. याचं उदाहरण म्हणजे, अथर्वन् मंत्रामध्यें रोगनिवारक विधी आहेत, तर अंगिरस् मंत्रांमध्यें आपले द्वेष्टे, शत्रू, दुष्ट, मायावी लोक व इतर तशाच प्रकारची मंडळी यांना शाप देण्याचे विधी सांगितलेले आहेत. अथर्ववेदात मुख्यतः अथर्वन् व अंगिरस् हे दोन प्रकारचे मंत्रविधी आहेत व म्हणून या वेदाचें जुने नाव ‘अथर्वांगिरस’ असं आहे. अथर्ववेद हे नाव नंतरचं आणि ‘अथर्वांगिरसवेद’ या नावाचं संक्षिप्त रूप आहे.

अथर्ववेद संहितेच्या एका प्रतीत एकंदर ७३१ सूक्ते व अंदाजे सहा हजार ऋचा आहेत. या वेदाचीं वीस कांडे आहेत व यांपैकीं विसावं कांड तर बरेच अलीकडे जोडलेलं आहे. एकोणिसावं कांडसुद्धा पूर्वी या संहितेत नव्हतं. विसाव्या कांडातील बहुतेक सर्व सूक्ते ऋग्वेदसहितेतूनच घेतलेलीं आहेत. याखेरीज अथर्ववेद संहितेचा अंदाजे १/७ भाग ऋग्वेदावरूनच घेतलेला आहे. ऋग्वेद व अथर्ववेद या दोहोंत सापडणाऱ्या ऋचांतील निम्म्यांहून अधिक ऋचा ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळात दिसून येतात व बाकी राहिलेल्या बहुतेक ऋचा त्याच्या पहिल्या व आठव्या मंडळात सापडतात. अथर्ववेदाच्या मूळ अठरा कांडांतील सूक्तांची रचना पद्धतशीर व फार काळजीपूर्वक केलेली दिसून येते. पहिल्या सात कांडांत पुष्कळ लहान लहान सूक्ते आहेत.

पहिल्या कांडांतील सूक्ते सामान्यतः चार चार ऋचांची, दुसऱ्यातील पांच ऋचांची, तिसऱ्यातील सहांची, चौथ्यातील सातांची असा क्रम दिसतो. पाचव्या कांडातील सूक्तांच्या ऋचा कमीत कमी आठ व जास्तीत जास्ती अठरा आहेत. सहाव्या कांडांत बहुतेक तीन ऋचांची अशी एकंदर १४२ सूक्ते आहेत व सातव्या कांडांत एक किंवा दोन ऋचांची अशी ११८ सूक्ते आहेत. आठ ते चौदा कांडे आणि सतरावे व अठरावे कांड यांत दीर्घ सूक्ते आहेत. या वरील कांडमालिकेंतील सर्वांत लहान सूक्त (एकवीस ऋचांचं) म्हणजे आठव्या कांडातील पहिले व सर्वांत दीर्घ सूक्त (८९ ऋचांचं) म्हणजे अठराव्या कांडांतील शेवटचं (चवथं). पंधरावं कांड पूर्ण व सोळाव्या कांडांतील बराचसा भाग एवढाच मध्ये गद्यात्मक आहे. यातील भाषा व धाटणी ब्राह्मणग्रंथांप्रमाणे आहे.

वरील सर्व गोष्टी पाहिल्या म्हणजे संहिताकारांची बाह्यरचनेवर व ऋचांच्या संख्येवर विशेष दृष्टी होती असं दिसतं; पण आंतर्रचनेतसुद्धा त्यांनी हेळसांड केलेली नाहीं. दोन, तीन, चार किंवा अधिक एकाच विषयावरील सूक्ते बहुतेक एका ठिकाणी घातलेलीं आढळून येतात. कधी कधी कांडांतील पहिल्या सूक्तास ते स्थान देण्याचं कारण त्यांतील विषय असावा असं दिसतं. उदाहरणार्थ : दुसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सातव्या कांडाच्या सुरवातीला ब्रह्मविद्याविषयक सूक्ते घातलेली आहेत, ती निःसंशय सहेतुक घातलेली आहेत. तेरा ते अठरा यांपैकीं प्रत्येक कांडांत बहुतेक एकेक स्वतंत्र विषय आहे. चौदाव्या कांडांत नुसती विवाहवचने आहेत, तर अठराव्या कांडांत फक्त अंत्यविधीबद्दलच्या ऋचा आहेत, यावरून वरील विधानाची सत्यता पटेल.

(लेखक अध्यात्मक्षेत्राचे गाढे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com