
- श्रीकृष्ण पुराणिक, saptrang@esakal.com
उपनिषद हा वेदांच्या अखेरच्या रचनेतील ग्रंथ. शब्दश: गुरूजवळ बसून मिळवलेली विद्या. उप=जवळ, निषद्=बसणं. ‘समीप उपवेशन’ किंवा ‘समीप बसणं’. कशासाठी आणि कुणी? तर ‘ब्रह्मविद्याप्राप्तीसाठी शिष्यानं (गुरूजवळ) बसणं’. कुणाजवळ बसावं किंवा गुरू कसा असावा? तर जो ब्रह्मप्राप्तीचं शिक्षण देऊ शकेल असा. जो आम्हाला ‘असत्’कडून ‘सत्’कडे घेऊन जाईल, अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाईल, मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जाईल असा गुरू. ‘उप’ हा शब्द, ‘नि’ हा उपसर्ग आणि ‘सद्’ हा धातू यांपासून उपनिषद् हा शब्द निर्माण झाला आहे.
उपनिषदात ‘सद्’ या धातूचे तीन अर्थ आहेत : (१) विनाश, (२) गती, अर्थात् ज्ञानप्राप्ती आणि (३) शिथिल करणं. अशा प्रकारे उपनिषदाचा अर्थ झाला : ‘जे ज्ञान (१) पापनाशन करतं, (२) सत्याचं ज्ञान करवतं अर्थात् आत्म्याचं रहस्य समजावतं आणि (३) अज्ञान शिथिल करतं ते उपनिषद.’ ज्या विद्येनं परब्रह्मसामीप्य प्राप्त होतं, तादात्म्य स्थापित होतं ती विद्या म्हणजे ‘उपनिषद’. उपनिषदात ऋषी आणि शिष्य यांच्यामध्ये वेदांचं मर्म सांगणारे खूप सुंदर आणि गूढ संवाद आहेत.
उपनिषद = ‘उप’+‘नि’+‘सद’ : जे ज्ञान व्यवधानरहित होऊन जवळ येतं, जे ज्ञान विशिष्ट आणि संपूर्ण असतं, जे ज्ञान केवळ सत्य असतं (ज्यानं खऱ्या अर्थानं सत्याची ओळख होते), ते निश्चितरूपानं उपनिषद आहे. ज्या ज्ञानाद्वारे ब्रह्मसाक्षात्कार होतो ते ‘उपनिषद’.
यालाच अध्यात्मविद्या असंदेखील म्हटलं जातं.
१. ईश, २. केन, ३. कठ, ४. प्रश्न, ५. मुंडक, ६. मांडूक्य, ७. तैत्तिरीय, ८. ऐतरेय, ९. छांदोग्य, १०. बृहदारण्यक, ११. श्वेताश्वतर ही प्रमुख उपनिषदं मानली जातात. वैदिक साहित्यात उपनिषदं ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असंही म्हटलं जातं. काही उपनिषदं गद्यात असून, काही पद्यात आहेत. उपनिषदं तत्त्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असंही म्हणतात.
या साहित्यात प्रामुख्यानं धर्म, सृष्टी आणि आत्मा किंवा परमात्मा यांविषयी चर्चा करण्यात आलेली आहे. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायानं होते? आत्मा म्हणजे काय? याविषयीची सविस्तर चर्चा या साहित्यात आहे. मोक्षकल्पना, नीतिकल्पना असे विषयही उपनिषद-साहित्यानं हाताळलेले आहेत. सुमारे १०८ च्या आसपास काही गौण उपनिषदं मानली गेली आहेत. अथर्वशीर्ष तसंच गीता यांनाही उपनिषद म्हणून गौरवण्यात आलं आहे.
उपनिषदांची सूची: ऋग्वेदाच्या २१ शाखा, यजुर्वेदाच्या १०९, सामवेदाच्या १००० आणि अथर्ववेदाच्या ५० अशा एकूण ११८० शाखांगणिक असलेल्या उपनिषदांपैकी प्रमुख उपनिषदं १०८ आहेत, ती अशी -
१०८ उपनिषदं: ‘अष्टोत्तरशतस्यादौ प्रामाण्यं मुख्यमीरीतम्.’ अर्थात्, ही १०८ उपनिषदं प्रमाण, मुख्य मानली जातात; याशिवाय, इतरही उपनिषदं आहेत. १. ईशावास्य, २.केन, ३. कठ, ४. प्रश्न, ५. मुंड, ६. मांडुक्य, ७. तैत्तिरीय, ८. ऐतरेय, ९. छांदोग्य, १०. बृहदारण्य, ११. ब्रह्म, १२. कैवल्य, १३. जाबाल, १४. श्वेताश्वेतर, १५. हंस, १६. आरुणि, १७. गर्म, १८. नारायण, १९. परमहंस, २०. अमृतबिंदू, २१. अमृतनाद,
२२. अथर्वशिरस्, २३. अथर्वशिखा, २४. मैत्रायिणी, २५. कौषीतकी, २६. बृहज्जाबाल, २७. नृसिंहतापिनी, २८. कालाग्निरुद्र, २९. मैत्रेयी, ३०. सुबाल, ३१. क्षुरिका, ३२. मंत्रिका, ३३. सर्वसार, ३४. निरालंब, ३५. शुकरहस्य, ३६. वज्रसूचिका, ३७. तेजोबिंदू, ३८. नादबिंदू ३९. ध्यानबिंदू, ४०. ब्रह्मविद्या, ४१. योगतत्त्व, ४२. आत्मबोधक, ४३. नारदपरिव्राजक, ४४. त्रिशिखिब्राह्मण ४५. सीता, ४६. योगचूडामणि, ४७. निर्वाण, ४८. मंडलब्राह्मण ४९. दक्षिणामूर्ती, ५०. शरम, ५१. स्कंद, ५२. महानारायण, ५३. अद्वयतारक, ५४. रामरहस्य, ५५. रामतपन, ५६. वासुदेव, ५७. मुद्गल, ५८. शांडिल्य, ५९. पिङ्गल, ६०. भिक्षुक, ६१. महा, ६२. शारीरक, ६३. योगशिखा, ६४. तुर्यातीत, ६५. संन्यास, ६६. परमहंसपरिव्राजक, ६७. अक्षमालिका, ६८. अव्यक्त, ६९. एकाक्षर, ७०. अन्नपूर्णा, ७१. सूर्य, ७२. अक्षिक, ७३. अध्यात्म,
७४. कुंडिका, ७५ सावित्री, ७६. आत्म, ७७. पाशुपत, ७८. परब्रह्म, ७९. अवधूतक, ८०. त्रिपूरतापन, ८१. देवी, ८२. त्रिपूर, ८३. कठरुद्र, ८४. भावना, ८५. रुद्रहृदय, ८६. योगकुंडली, ८७. भस्मजाबाल, ८८. रुद्राक्ष, ८९. गणपती ९०. श्रीजाबालदर्शन, ९१. तारसार, ९२. महावाक्य, ९३. पञ्चब्रह्म, ९४. प्राण-अग्निहोत्र, ९५. गोपाल (पूर्वतापिनी-उत्तरतापिनी), ९६. कृष्ण, ९७. याज्ञवल्क्य, ९८. वराह, ९९. शाठयानीय, १००. हयग्रीव, १०१. दत्तात्रेय, १०२. गरुड, १०३. कलिसंतराण, १०४. जाबाली, १०५. सौभाग्यलक्ष्मी, १०६. सरस्वती-रहस्या, १०७. बव्हृच आणि १०८. मुक्तिकोपनिषद.
सर्व आरण्यकं ही ब्राह्मणग्रंथांची अखेरची प्रकरणं होत. आरण्यकांतील तत्त्वज्ञानप्रधान प्रकरणं उपनिषदं म्हणून विशेषतः निर्दिष्ट केली गेली आहेत. अगदी प्राचीन काळी आरण्यक व उपनिषद हे दोन्ही शब्द पर्यायवाचक शब्द होते. आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषदं ज्या आरण्यकांचे भाग आहेत, त्यांतील उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही उपनिषद ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली दिसते.
शतपथब्राह्मणाचा भाग असलेलं बृहदारण्यक म्हणजे मोठं आरण्यक, हेच बृहदारण्यकोपनिषद म्हणून निर्दिष्ट केलं जातं. आज प्रसिद्ध असलेल्या ऐतरेयोपनिषदाच्या पूर्वीचा ऐतरेयारण्यकाचा भागही त्या उपनिषदाचा भाग समजला जात होता. त्यावर आद्य शंकराचार्यांनी केलेलं भाष्य उपलब्ध आहे. जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणाचा केनोपनिषद हा भाग आहे. जैमिनीय उपनिषद्ब्राह्मण हे आरण्यक आहे व त्यालाच उपनिषद ही संज्ञा आहे.
पाणिनी व बुद्ध यांच्यापूर्वी (सुमारे इसवीसनपूर्व सहावं शतक) म्हणजे ब्राह्मणकालाच्या अखेरीस आरण्यकं व प्राचीन तेरा किंवा चौदा उपनिषदं निर्माण झाली याबद्दल बहुतेक संशोधकांचं एकमत आहे.
वानप्रस्थाश्रमी व संन्यासी यांनीच ही अरण्यात पठण करावीत अशी कल्पना उपनिषद्कालीच निर्माण झाली असली तरी औपनिषद तत्त्वज्ञानाची किंवा विचारांची चर्चा ग्रामांत व नगरांत होत होती, असं उपनिषदांतील चर्चाप्रसंगांच्या वर्णनांवरून लक्षात येतं.
उदाहरणार्थ : जनक राजानं भरवलेल्या वादसभेत झालेल्या अनेक ब्रह्मवेत्त्यांच्या चर्चेचा वृत्तान्त व जनकाच्या महालात झालेल्या चर्चांचाही वृत्तान्त बृहदारण्यकात (अध्याय ३ व ४) आलेला आहे. अश्वपती कैकेय याच्या राजमहालात झालेली अनेक ब्रह्मवेत्त्यांची आत्मा व ब्रह्म यांविषयीची चर्चा छांदोग्योपनिषदात (अध्याय ५) आली आहे.
आज प्रसिद्ध असलेली आरण्यकं सहा आहेत. ऋग्वेदाचं ऐतरेयारण्यक व कौषीतकी किंवा शांखायनारण्यक, कृष्णयजुर्वेदाचं तैत्तिरीयारण्यक, शुक्लयजुर्वेदाचं बृहदारण्यक, सामवेदाचं जैमिनीय उपनिषद्ब्राह्मण आणि कृष्णयजुर्वेदाच्या मैत्रायणीय शाखेचं मैत्रायणीयोपनिषद किंवा आरण्यक ही ती होत.
मैत्रायणीयोपनिषद फारसं प्राचीन नसावं; ब्रह्मसूत्रांच्या संदर्भात भाष्यकारांनी कुठंही त्याचा वचनोद्धार केलेला दिसत नाही; त्याचप्रमाणे त्यातील संसार दुःखमय आहे, हा प्रधान विचार व इतरही अनेक भाग बुद्धोत्तरकालीनतेचे निदर्शक आहेत; परंतु मॅक्सम्युलरनं याही उपनिषदाचं प्राचीन उपनिषदांच्या बरोबरच भाषांतर केलं आहे.
ऐतरेयारण्यकात ऐतरेयोपनिषद, शांखायनारण्यकात कौषीतकी उपनिषद, तैत्तिरीयारण्यकात तैत्तिरीय उपनिषद व महानारायणोपनिषद, जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणात केनोपनिषद अंतर्भूत आहेत; परंतु बृहदारण्यकोपनिषद व मैत्रायणीयोपनिषद ही सबंध आरण्यकंच होत. महानारायणोपनिषद हे सूत्रकालाच्या आरंभी तैत्तिरीयारण्यकाला जोडलेलं असावं, असा संशोधकांचा कयास आहे.
छांदोग्योपनिषदही तांड्य या ‘सामवेदीय ब्राह्मणा’चं आरण्यकच असावं, असं त्याच्या रचनेवरून दिसतं.
आरण्यक म्हणून निर्दिष्ट असलेली उपनिषद व इतर आरण्यकसमकालीन प्राचीन उपनिषदं पुढीलप्रमाणे होत : ईशोपनिषद हा शुक्लयजुर्वेदसंहितेचा अखेरचा अध्याय होय. ईश व इतर प्राचीन उपनिषदं म्हणजे केन, कठ किंवा काठक, प्रश्न, मुंडक, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक, कौषीतकी व श्वेताश्वतर ही उपनिषदं सर्व उपनिषदांमध्ये प्राचीन अर्थात् ब्राह्मणकालीन होत.
केन व प्रश्न यांत गद्य व पद्य अशा दोन्ही शैलींचे भाग आहेत. ईश, कठ, मुंडक व श्वेताश्वतर ही उपनिषदं प्रामुख्यानं श्लोकात्मक आहेत. पद्यात्मक उपनिषदं प्राचीन उपनिषदांतील गद्यात्मक असलेल्या बाकीच्या उपनिषदांपेक्षा आधुनिक असावीत असं काहींचं मत आहे.
गद्यात्मक उपनिषदांत काही श्लोकही आले आहेत; म्हणून पद्यात्मक उपनिषदं गद्योत्तरकालीन आहेत असं म्हणता येत नाही. श्लोकात्मक म्हणजे छंदोबद्ध रचना ही ऋग्वेदापासून चालत आलेली आहे; गद्य आधीचं होय असं म्हणता येत नाही; परंतु वरील पद्यात्मक काही उपनिषदं गद्योत्तरकालीन असण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढंच.
आद्य शंकराचार्यांचं उपर्युक्त श्वेताश्वतर उपनिषदाशिवाय अन्य उपनिषदांवर भाष्य आहे. त्याशिवाय मांडूक्योपनिषदावरही त्यांचं भाष्य आहे. मांडूक्योपनिषदाचा काल निश्चित नाही; परंतु त्याच्यावर गौडपादांच्या कारिका असल्यामुळे ते बरचसं प्राचीन असावं. शंकराचार्यांनी जाबालोपनिषदाचा ब्रह्मसूत्रभाष्यात उल्लेख केला आहे, त्यावरून तेही प्राचीन उपनिषद असावं असं म्हणता येतं.
त्याशिवाय परमहंस, सुबाल, गर्भ, अथर्वशिरस, वज्रसूची व मह हीदेखील उपनिषदं प्राचीन होत, असं काहींचं मत आहे; परंतु ब्रह्मसूत्रावरून हे सूचित होत नाही. ही प्राचीन उपनिषदं सोडून सुमारे दोनशे उपनिषदं उपलब्ध आहेत. सर्वसाधारणतः योग, संन्यासविधी, भक्ती, जप, विष्णूचे अवतार, शंकर, गणपती, देवी इत्यादिकांचा महिमा यांचं वर्णन या निरनिराळ्या उपनिषदांत आहे. यांतील बरीच उपनिषदं पौराणिक विषयांना वाहिलेली आहेत, म्हणून ती अर्वाचीन असावीत यात शंका नाही.
(लेखक अध्यात्मक्षेत्राचे गाढे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.