गोष्ट श्रीलंकन ‘बे आऊल’ची

owl bird
owl birdsakal media

गोष्ट श्रीलंकन ‘बे आऊल’ची

‘श्रीलंकन बे घुबड’ शोधायला काळोख पार करत जंगलात दूरवर गेलो. अचानक किंचाळण्यासारखा आवाज आला. त्या दिशेने पुढे गेलो. अचानक किंचाळणे आमच्या टप्प्यात आले. समोरच्या झाडाच्या एका छोट्या फांदीवर विजेरीचा प्रकाश टाकला अन्‌ समोर ‘श्रीलंकन बे घुबड’ सापडले.

बहुतांश घुबडे निशाचर असल्याने त्यांच्या छायाचित्रणानिमित्त आम्ही देशातील अनेक दुर्मिळ प्रदेशात रात्रीची भटकंती केली आहे. विविध प्रदेशांत ३४ प्रजातींची घुबडे विखुरलेली आहेत. काही दुर्मिळ तर काही अत्यंत दुर्मिळ आहेत. या घुबडांबाबत अनेक गैरसमजुती प्रचलित आहेत. घुबड घरावर बसले त्या घरावर अरिष्ट येते, घुबड हे अशुभ असते वगैरे वगैरे... त्याचे कारण घुबडांचे आवाज विचित्र असतात. दिसणे इतर पक्ष्यांसारखे रंगबिरंगी नसते. डोळे, चेहरा मोठा व गोलसर. रात्री सक्रिय होतात. अशी समजूत आहे की रात्री केवळ अशुभ शक्ती सक्रिय होतात. धर्म शास्त्रात मात्र घुबडाला लक्ष्मी देवीचे वाहन मानले, जेणेकरून गैरसमजुतीमुळे घुबडांच्या हत्या बंद होतील.

२०१९ च्या एप्रिल महिन्यात केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील थत्तेकड पक्षी अभयारण्य परिसराच्या आसपास ‘श्रीलंकन बे घुबड’ शोधून छायाचित्रित करण्याचे ठरले. सोबत तीन समविचारी मित्र व आमचा मार्गदर्शक धनेश, ज्याला तो परिसर माहीत होता. हे घुबड दिवसादेखील दिसू शकते; परंतु रात्री शक्यता अधिक असते. त्यामुळे दिवसा इतर पक्ष्यांचे छायाचित्रण करून रात्री या घुबडाचा शोध घेण्याचे ठरले.

एर्नाकुलम जिल्ह्यात दमटपणा फारच अधिक. त्यातही एप्रिल महिन्यातील उकाडा. दिवसाच नाही, तर रात्रीही शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. कपडे घामाने ओले चिंब. थोडे अंतर चाललो तरी दमछाक. आमच्याकडे चार रात्र होत्या. पहिल्या दोन रात्री थत्तेकड अभयारण्य परिसर पिंजून काढला; पण त्याचा ठावठिकाणाच लागला नाही. तिसऱ्या रात्री अभयारण्याबाहेर असलेल्या गावाबाहेर शोध घेण्याचे ठरले. कॉल प्ले करून पाहिला... बऱ्याच वेळाने अत्यंत लांबून प्रतिसाद मिळाला. शीळ घालून पुढे किंचाळण्यासारख्या आवाजाने सुरुवातीला अंगावर काटा आला. त्या आवाजाच्या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. काही अंतर पुढे गेल्यावर ते घुबड आहे, याची खात्री करण्यासाठी पुन्हा कॉल प्ले केला. प्रतिसाद थोडा जवळून आला. ते असल्याची खात्री पटली व उत्साह वाढला. रात्रीच्या वेळी घुबडे शोधताना दमछाक होत होती. मोठी लेन्स, ट्रायपॉड व पाण्याची बाटली सांभाळत मिट्ट काळोखातून चालताना तारांबळ उडत होती. गाईडच्या हातात छोटी विजेरी होती, त्याच्या आधारे आम्ही रांगेत चालू लागलो. मोठी विजेरी घेतल्यास घुबड लांबूनच उडून जाण्याची भीती असते.

आवाज पुन्हा लांबून येऊ लागला. पुन्हा दिशा बदलून आवाजाच्या दिशेने सरकू लागलो. त्या रात्री खूप अंतर पार केले आणि अचानक किंचाळण्याचा आवाज अगदी जवळून येऊ लागला. घुबड टप्प्यात होते हे नक्की झाले. आम्हाला एका जागी थांबण्यास सांगून धनेश अचूक ठिकाण शोधण्यास गेला. दहा-बारा मिनिटांत धनेश परत आला, पटपट चला सांगतच... आम्ही त्याच्या पाठोपाठ भराभर निघालो. काटेकुटे, वेली, दगड पार केले. एका मोठ्या झाडासमोर आम्हाला थांबण्यास सांगून, तयार रहा असे धनेश म्हणाला. ट्रायपॉड, कॅमेरा सज्ज ठेवून धनेशच्या इशाऱ्याची वाट पाहू लागलो. त्याने इशारा केला व समोरच्या झाडाच्या एका छोट्या फांदीवर सोबत आणलेल्या दुसऱ्या मोठ्या विजेरीचा प्रकाश टाकला. समोर ‘श्रीलंकन बे घुबड’ बसले होते. आम्ही पटापट फोटो काढू लागलो. पाच-दहा फोटो काढले नाही, तोच ते घुबड उडाले. पुन्हा शोध सुरू... मात्र लगेचच सापडले. पुन्हा १०-१५ फोटो टिपले. आत्ता मात्र आमचे समाधान झाले होते. थोडे पाणी पिऊन माघारी परतायचे ठरवले आणि लक्षात आले या घुबडाचा मागोवा घेताना आम्ही खूप दूरवर जंगलात शिरलोय आणि रस्ता चुकलोय. पुढचा एक तास उलटसुलट फिरल्यावर एक खुणेचे झाड सापडले व त्यानंतर मात्र परतीचा मार्ग सापडला.

रिसॉर्टवर परतल्यावर आम्ही दमलेल्या अवस्थेत असतानाही कॅमेरे तपासून छायाचित्रे नीट टिपल्याची खात्री करून घेतली, कारण एकच रात्र उरली होती व पुन्हा नव्याने प्रयत्न करण्याचे त्राण उरले नव्हते. या श्रीलंकन ‘बे आऊल’चे छायाचित्र टिपून समाधानाने झोपी गेलो, नव्या दमाने नव्या घुबडाचे शोध घेण्याच्या ईर्षेनेच...

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com