वाघीण आणि सिंह (श्रीमंत माने)

वाघीण आणि सिंह (श्रीमंत माने)

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकाच्या (४२ लोकसभा मतदारसंघ) पश्‍चिम बंगालची यंदाची निवडणूक पक्षांमधील नव्हे तर दोन फायरब्रॅंड नेत्यांमधली आहे. बंगालची वाघीण ममता बॅनर्जींपुढे गुजरातचा सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आव्हान आहे. एखादा अपवाद वगळता दक्षिण टोकावरील मेदिनीपुरा ते उत्तरेच्या दार्जिलिंगपर्यंत प्रचारात कुठेही उमेदवार चर्चेत नाहीत. ममता आणि मोदींभोवतीच निवडणूक फिरते आहे. ममतादीदींपासून फारकत घेऊन भाजपमध्ये दाखल झालेले मुकुल रॉय यांच्या मदतीने मोदी-शहा जोडी किती जागा जिंकणार हा पहिला आणि ममतादीदी किती जागा गमावणार हा दुसरा प्रश्‍न आहे. 

१९८४ मध्ये वयाच्या तिशीत जाधवपूरमध्ये दिग्गज डावे नेते सोमनाथ चटर्जींना हरवून ‘जाएंट किलर’ ठरलेल्या ममतादीदींच्या बंगालमधील करिष्म्याने अत्युच्च पातळी गाठली आहे. त्यामुळेच त्या २०११ मध्ये डाव्या पक्षांची ३४ वर्षांची राजवट संपवून मुख्यमंत्री बनल्या. ही निवडणूक त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे कार्य विरुद्ध मोदींनी प्रचारात आणलेला आक्रमक राष्ट्रवाद अशी आहे. 

ममतांचे निकटचे सहकारी सांगत होते, ‘मुकुल रॉय भाजपमध्ये गेलेत. पंतप्रधानांनी ४० आमदार संपर्कात असल्याचे सांगितले अन्‌ तृणमूलमधील काहींना भ्रष्टाचाराची चटक लागल्याने दीदींना प्रचारासाठी बाहेर पडावं लागलं. अन्यथा, त्यांनी इतकं काम केलंय, की घरी राहिल्या असत्या तरी दहा कोटी बंगालींनी त्यांच्या पदरात विजय टाकला असता’. शिक्षण, आरोग्य आणि सामान्य माणसांसाठी, कुटुंबासाठी ममतांनी राबवलेल्या योजनांबद्दल कोलकाता आणि परिसरातील लोक भरभरून बोलतात. गर्भवतींना अनुदान, मूल जन्मताच त्याच्या नावाने रोपटे देऊन भविष्याची बेगमी, कन्याश्री योजनेतील मुलींना शिक्षण, लग्नासाठी आर्थिक आधार, एक कोटी विद्यार्थ्यांना सायकली, सरकारी रुग्णालयांची सुधारणा, हॉस्पिटलच्या आवारात जेनरिक मेडिसिन स्टोअर्स, केंद्रकडून उपेक्षित ‘आशा’ स्वयंसेविकांना वाढीव मानधन, गरिबांना अंत्यसंस्कारासाठी सुलभ पद्धतीने दोन हजार रुपये अशा योजनांमुळे ममता घराघरांत पोचल्यात. 

मशिदीतल्या इमामांना दरमहा मानधनाच्या त्यांच्या घोषणेवर टीका झाली. हायकोर्टाने ताशेरे ओढले. पण ती रक्कम वक्‍फ बोर्डाच्या संपत्तीमधून देणे, मदरशांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठीही तो पैसा वापरतो, असे सांगत तृणमूलचे समर्थक बंगालमधील ३० टक्के मुस्लिम मतदारांवर भिस्त ठेवतात. ममतादिदींच्या कारकिर्दीला चालना मिळाली सिंगूर आणि नंदीग्रामच्या औद्योगिक भूसंपादन विरोधी आंदोलनामुळे. त्या घटनेनंतर त्यांना थेट परकी गुंतवणूक व कारखाने उभारणीची बाजू घेता येत नव्हती. तथापि, त्यांनी राज्यामधील पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले. गबाळे, बेंगरुळ वाटणाऱ्या कोलकत्याचे रुपडे पालटले. डमडम विमानतळापासून सेंट्रल ॲव्हेन्यूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यापर्यंतच्या झोपड्या, अस्वच्छता आता इतिहासजमा झाली आहे. 

रॉय, अभिषेक बॅनर्जी फॅक्‍टर
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बंगालमध्ये ‘मिशन २३’चा नारा दिलाय. प्रभारी कैलास विजय वर्गीयांची मदार मुकुल रॉय यांच्यावर आहे. त्यांच्यातल्या संघटन कौशल्यावरच तृणमूल वाढल्याचे मानले जाते. त्यांच्या पक्षांतराने ममतांची दगदग वाढलीय हे नक्की. याशिवाय दीदींचे पुतणे, मावळते सर्वांत तरुण खासदार अभिषेक बॅनर्जी हादेखील फॅक्‍टर आहे. त्यांचे अनेक कारनामे ऐकायला मिळतात. दीदी देशाच्या राजकारणात ‘किंगमेकर’ बनल्या तर बंगालमध्ये त्यांचे उत्तराधिकारी हे डायमंड हार्बरचे खासदार होतील, ही बाब कष्टाने पक्ष उभारणाऱ्यांना आवडणार नाही, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.

भाजपची मदार ध्रुवीकरणावर
एक गोष्ट निश्‍चित, की भाजप पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूलनंतरची दुसऱ्या क्रमांकाची ताकद आहे. पंचायत निवडणुकीतही तेच दिसले. तृणमूलविरोधातील काँग्रेस आणि डाव्या आघाडीची हिंदू मते भाजपकडे सरकलीत. काँग्रेस व डावे दोन्ही पक्ष फारतर दोन-तीन जागा जिंकतील. धार्मिक ध्रुवीकरणात तृणमूल व भाजप हे दोन ध्रुव बनलेत. ममतादीदींवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करीत त्यांना हिंदूविरोधी ठरवण्याचा भाजपचा अजेंडा आहे. केलेल्या कामाच्या बळावर मुस्लिम वगळता अन्यधर्मीय विशेषतः हिंदू मते मिळवणे अशी ममतांची व्यूहरचना आहे. परिणामी डावे आणि काँग्रेस मुख्य प्रवाहाबाहेर ढकलले गेलेत. बंगालमधील निवडणुकीचा फैसला याच मुद्द्यांवर होईल. 

चिटफंड गैरव्यवहाराचे डाग
ममतादीदींच्या लोकाभिमुख कारभारावर मोठे डाग आहेत ते शारदा, नारद वगैरे नावाने देशभर गाजलेल्या चिटफंड गैरव्यवहाराचे. मदन मित्रा, कुणाल घोष आदी तृणमूल नेत्यांना  त्यामुळे अटक झाली. गोरगरिबांनी विश्‍वासाने गुंतवलेल्या हजारो कोटींच्या गैरव्यवहारामध्ये नाव आल्यानेच मुकुल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फसवलेल्या गुंतवणूकदारांचा राग तृणमूलच्या भ्रष्टाचारी नेत्यांवरच आहे. तर ममतादीदींनी सरकारी तिजोरीतून रकमा परत केल्याचा शहरी करदात्यांमध्ये राग आहे. दीदींचा यात थेट सहभाग नसला तरी त्यांच्या नजरेसमोर झालेले गैरव्यवहार विसरता येत नाहीत, असे अनेकांना वाटते.

मोदी-शहांचे कारपेट बॉम्बिंग
पाकिस्तानवर एअरस्ट्राइक करणाऱ्या मोदींची प्रतिमा पुढे करून भाजपने बंगालमध्ये ममतांच्या राजकीय साम्राज्यावर कारपेट बॉम्बिंग चालवलंय. दर दोन-चार दिवसांनी मोदी व शहा आलटून पालटून राज्यात सभा घेताहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून शहा चारदा बंगालमध्ये आले आणि अकरा सभा घेतल्या. मोदी एकूण पंधरा तर शहा २३ सभा घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com