उजेडाची पेरणी करणारी नव्वदी...

पुण्यातून सुरू झालेला ‘सकाळ’ मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर असा राज्याच्या कानाकोपऱ्यांत पसरला. ‘गोमंतक’च्या रूपानं ‘सकाळ’ परिवारात गोव्यातील भावंड सामील झालं.
उजेडाची पेरणी करणारी नव्वदी...
Summary

पुण्यातून सुरू झालेला ‘सकाळ’ मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर असा राज्याच्या कानाकोपऱ्यांत पसरला. ‘गोमंतक’च्या रूपानं ‘सकाळ’ परिवारात गोव्यातील भावंड सामील झालं.

आपला ‘सकाळ’ नव्वदीचा झाला आहे. ज्याचं नावच सामान्य वाचकांनी ठरवलं त्या ‘सकाळ’ नावाच्या, वृत्तपत्रांची दुनिया कायमची बदलून टाकणाऱ्या वर्तमानपत्राचा आणि त्यानिमित्तानं ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वाटचालीला ९० वर्षे पूर्ण होताहेत. या काळातील अनेक आव्हानं, अडचणींवर मात करत ‘सकाळ’ वाचकांच्या सेवेत अखंडपणे रुजू आहे. ‘सकाळ’च्या या खणखणीत आणि देदीप्यमान वाटचालीत निःसंशयपणे वाटा आहे तो आमच्या वाचकांचा. वाचकांचा अखंड स्नेह आणि साथीमुळं ‘सकाळ’ या टप्प्यावर उभा आहे. हा क्षण वाचकांप्रती कृतज्ञता प्रकट करण्याचा आणि वाचकहिताप्रती बांधिलकीचा पुनरुच्चार करण्याचा आहे, याची आम्हाला जाणीव आहे.

पुण्यातून सुरू झालेला ‘सकाळ’ मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर असा राज्याच्या कानाकोपऱ्यांत पसरला. ‘गोमंतक’च्या रूपानं ‘सकाळ’ परिवारात गोव्यातील भावंड सामील झालं. अनेक नियतकालिकं, प्रकाशनं असा एक प्रचंड व्याप या काळात तयार झाला. काळाच्या ओघात त्यात ‘साम टीव्ही’ आणि ‘ई-सकाळ’, ‘सरकारनामा’सह अनेक डिजिटल माध्यमांची भर पडली. ‘एक परिपूर्ण माध्यम समूह’ असं स्थान ‘सकाळ’नं मराठी जनांमध्ये तयार केलं. विचारी, विवेकी, चिंतनशील मराठी माणसानं ‘सकाळ’च्या या प्रवासात नेहमीच साथ दिली. ‘सकाळ’ सातत्यानं नवी क्षितिजं धुंडाळत वाटचाल करतो आहे. बदल नित्य आहे, हे ‘सकाळ’च्या वाटचालीचं सूत्र आहे. ‘सकाळ’ वर्तमानपत्रांच्या जगात आला तोच मोठ्या व्यापक बदलांचे नगारे वाजवत. मतपत्रांच्या दुनियेत आणि वृत्तपत्र काढणाऱ्याला काहीतरी सांगायचे तेवढंच मांडण्याचा प्रघात असल्याच्या काळात सामन्यांच्या सुख-दुःखांशी समरस होणारं वृत्तपत्र सुरू करणं हे धाडस होतं.

‘सकाळ’च्या वृत्तकेंद्री वाटचालीला नाकं मुरडणारे तेव्हा होतेच. त्यांना काळ आणत असलेल्या बदलांचा अदमास नव्हता. अशा शंकेखोरांना आणि बदलांसाठी टवाळी करणाऱ्यांना ‘सकाळ’नं स्वीकारलेल्या मार्गानंच जावं लागलं, हा काळाचा महिमा आणि ‘सकाळ’च्या दूरदृष्टीचा नमुनाही. नऊ दशकांच्या परंपरेचं ओझं न होता वाचकाच्या कालसापेक्ष अपेक्षांच्या कसोटीवर उतरलेला ‘सकाळ’ या काळात तमाम मराठी माणसाच्या जगण्याचा, सामूहिक आविष्कारांचा, बदलांचा साक्षीदार आणि साथीदारही बनला. ‘सकाळ’ला कधीच दिलेल्या आशयाच्या विश्‍वासार्हतेचा डंका पिटावा लागत नाही, याचं कारण ती कमावलेली, सिद्ध केलेली आहे. आज ज्या जमान्यात आपण वावरतो आहोत, तिथं निःशंकपणे कोणावर तरी विश्‍वास ठेवावा, ही फारच मोठी कमाई आहे. बातमीसाठी सत्याचा शोध ‘सकाळ’पाशी येऊन संपतो, यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता!

खात्रीशीर माहितीचा स्रोत

एकेकाळी लोकांना शक्‍य तितकी ताजी माहिती देणं, हे वृत्तपत्रांचं महत्त्वाचं काम होतं. आता माहितीचे असंख्य स्रोत उपलब्ध आहेत. मुद्दा माहिती मिळण्याचा... तीही तातडीनं मिळण्याचा उरलेला नाही, तर ती खात्रीशीर मिळण्याचा आहे. त्याबरोबर घडलेल्या घटनांच्या अलीकडं आणि पलीकडं काय, हे समजावून सांगण्याचा आहे. माहितीकडून ज्ञानाकडं जाण्याचा हा प्रवास आहे.

‘सकाळ’ तो सजगपणे करू पाहतो आहे. त्याचबरोबर माध्यमं जर समाजाच्या भल्याचा विचार करण्यासाठी असतील, तर हे भलं कशात?, याचा वेध घेणं आणि त्यासाठी आग्रही राहणं, हेही माध्यमांचं कर्तव्यच आहे, असं ‘सकाळ’ मानतो. माध्यमांकडे परंपरेनं जागल्याची भूमिका आहे, ती पार पाडायला हवी यात शंकाच नाही; मात्र बदलत्या काळात साऱ्या यंत्रणा अपेक्षापूर्ती करण्यात तोकड्या ठरत असताना माध्यमांनी प्रसंगी कर्त्याची भूमिका घ्यावी, हीदेखील काळाची गरज आहे. ‘सकाळ’ यासाठी अत्यंत जागेपणानं पावलं टाकतो आहे. केवळ घडलेल्या घटनांवर कॉमेंट्री करायची की जे घडायला हवं त्यासाठीची पायाभरणी करायची, असा हा मुद्दा आहे. म्हणूनच वृत्तपत्र आणि अन्य माध्यमांतून येणाऱ्या आशयापलीकडं ‘सकाळ’नं अनेक आघाड्यांवर प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केली आहे.

रचनात्मक सक्रियतेची जोड

जे बिघडलं आहे त्यावर केवळ आदळ-आपट करून काही फरक पडत नाही. सारं बिघडलं या कंठाळी सुरांनीही काही होत नाही. जे सावरता येणं शक्‍य आहे, जिथं दुरुस्ती केली पाहिजे, तिथं पुढं व्हावं, लोकांच्या साथीनं हवा तो बदल घडवायला सुरुवात करावी, हे ‘सकाळ’नं गेल्या काही वर्षांत अंगीकारलेलं सूत्र आहे. पत्रकारितेचे आयाम बदलणारं हे वळण आहे. नकारात्मकतेला फाटा देत पत्रकारितेला रचनात्मक सक्रियतेशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. ‘जर्नेलिजम टू पॉझिटिव्ह ॲक्‍टिव्हिजम’ असं आम्ही याला म्हणतो. माध्यमांचं परंपरेनं काम आहे माहिती देण्याचं, त्यापलीकडं समाजाची वकिली करण्याचं, चुकतं आहे त्यावर प्रहार करण्याचं, एक प्रकारे जागल्याचं. हे जागल्याचं काम तर आम्ही चोखपणे बजावतोच आहोत; मात्र त्यापलीकडं समाजात चांगलं घडवायचं तर प्रसंगी लोकांसह रस्त्यावर उतरण्याचं, एका अर्थानं कर्त्याची भूमिका निभावणारं कामही आम्ही स्वीकारलं आहे. मुद्दा सरपंचांना प्रशिक्षित करून गावगाडा सुधारण्याचा असेल, किंवा ‘स्टार्ट-अप’ला बळ देऊन तरुणांच्या नवकल्पनांमागं उभं राहण्याचा असो, की पावसाचा प्रत्येक थेंब अडवावा-जिरवावा यासाठीचा आटापिटा असो, की प्रदूषणाला भिडण्याचा... निरनिराळ्या आघाड्यांवर राज्याच्या वेगवेगळ्या भागांत ‘सकाळ’ एकाच वेळी काम करतो आहे.

केवळ शेतीला वाहिलेलं दैनिक सुरू करायचं धाडस करणारा ‘सकाळ’ हा एकमेव माध्यम समूह आहे. ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेलं हे दैनिक लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आणतं आहे. केवळ शेतीविषयक माहितीच नाही, तर उत्पादन वाढवावं कसं आणि ते विकावं कसं, कुठं यापर्यंतचं मार्गदर्शन करतानाच राज्यातील सुमारे पावणेतीन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम ‘सकाळ’नं राबवला, ही आमच्यासाठी रचनात्मक सक्रियता. याच भूमिकेतून राज्याच्या निरनिराळ्या भागांतील कित्येक प्रश्‍नांना ‘सकाळ’ भिडतो आहे. मग ते प्रश्‍न नद्यांच्या प्रदूषणाचे असोत, आरोग्यव्यवस्था सुधारण्याचे असोत, सरकारी शाळांत गुणवत्ता वाढवण्याचे असोत, वारसास्थळं जपण्याचे असोत, की मुलींना गर्भातच मारण्याच्या विरोधातील लोकसंघटन असो किंवा सणासुदीला डॉल्बीच्या आवाजाविरोधात सामन्यांचा आवाज बुलंद करणं असो... सर्वदूर ही उपक्रमशीलता आणि त्यातून साकारणारी समाजाप्रतीची बांधिलकी लख्खपणे दिसेल.

ज्या प्रकारच्या परिवर्तनाचं स्वप्न आपण पाहतो आहोत, त्यात माध्यमातून व्यक्त होण्यापलीकडं लोकांची साथ मिळवणारं संघटन साथीला हवं, या विचारातून समाजातील निरनिराळ्या घटकांसाठीचं संघटन ‘सकाळ’नं साकारलं. तनिष्का हे महिलांसाठी, ‘यिन’ हे युवकांसाठी, अशी नेटवर्क आज राज्याच्या कानाकोपऱ्यांत उभी आहेत. या माध्यमातून एक रचनात्मक चळवळ उभी राहते आहे. विकासाच्या मुद्द्यांवर माध्यमांत खूप चर्चा होते. ती मांडणी आम्ही करतोच, मात्र त्यात लोकांचा सहभाग असावा ही भूमिका आग्रहानं मांडतो आहोत. आर्थिक विकास हवाच, मात्र तो आपल्या गरजा, आपल्या आकांक्षा, आपली संस्कृती आणि मूल्यव्यवस्थेशी सुसंगतही असला पाहिजे, हे भूमिकेचे सूत्र आहे. साधारणतः विकासाच्या कल्पना दिल्लीत ठरतात, मुंबईत ठरतात, वरून खाली हुकूम सुटतो आणि त्या कल्पना अमलात आणायची धडपड सुरू होते. असा ‘वन सोल्यूशन फिट टू ऑल’ हा प्रयत्न फसतो. वरून खाली असा ॲप्रोच न ठेवता बोर्डरूम टू ग्रासरूट कनेक्‍ट असा सर्वांना सहभागी करून घेणारा, सर्वांच्या कल्पनांना वाव देणारा म्हणूनच सर्वमान्य ठरू शकणारा दृष्टिकोन हवा, यासाठी ‘सकाळ’ माध्यम म्हणून आपलं सामर्थ्य लावतो आहे. सरकारलाही हे पटवून देतो.

सकारात्मकता

रचनात्मकता सकारात्मकता हा ‘सकाळ’च्या पत्रकारितेचा गाभा आहे. म्हणून भूमिका घेताना वाईट मोडण्यासाठी तुटून पडताना ‘सकाळ’ कधी कमी पडला नाही. समाजातील व्यंग-विकृतीवर प्रहार करताना ‘सकाळ’ची लेखणी कचरली नाही. अशा भूमिका घेताना पडेल ती किंमत मोडायची तयारीही ‘सकाळ’नं नेहमीच दाखवली. स्वातंत्र्याआधी इंग्रज सरकारनं जाहिराती बंद केल्या किंवा नंतरही असेच प्रयोग झाल्यानं ‘सकाळ’नं भूमिका सोडल्या नाहीत. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा देणारा ‘सकाळ’च होता. गुटख्यासारख्या सामाजिक विकृतीच्या विरोधात उभं राहताना गुटख्याच्या जाहिराती छापणार नाही, या भूमिकेसाठी कोट्यवधींचा महसूल ‘सकाळ’नं सोडला.

कालसुसंगत बदल

नव्वद वर्षांपूर्वी सामान्यांचं जगणं वृत्तपत्रांच्या केंद्रस्थानी आणण्याचा ‘सकाळ’चा प्रयत्न क्रांतिकारी होता. ही गरज कायम आहे तसंच काळानं अनेक नवे आयाम माध्यमांना जोडले आहेत. बदलत्या काळाचं हे भान ठेवत ‘सकाळ’चा प्रवास सुरू राहिला. एका संक्रमणाच्या काळात आपण वावरतो आहोत. हे संक्रमण तंत्रज्ञानातील सर्वंकष अशा बदलांनी आणलं आहे. उत्पादन आणि वितरणाच्या साखळीत चौथी औद्योगिक क्रांती असं ज्याला म्हटलं जातं, त्या तंत्रज्ञानातील क्रांतीनं मोठेच बदल आणले आहेत. पत्रकारिता, वर्तमानपत्रं त्यापासून बाजूला राहू शकत नाही किंबहुना या बदलाचा पहिला रेटा याच व्यवसायावर आदळतो आहे. हाच काळ प्रचंड उत्सुकतेचाही आहे, याचं कारण हेच तंत्रज्ञान देशांच्या, भाषा संस्कृतीच्या सीमा ओलांडून आपलं म्हणणं आपली अभिव्यक्‍ती सर्वदूर पोहचवायची संधीही देतं आहे. ‘फिजिकल टू व्हर्च्युअल’ हा प्रवास मोठ्या बदलांना निमंत्रण देणारा आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्‍स, ब्लॉकचेन, आयओटी यावर स्वार झालेली क्रांती नवी उद्योग आणि अर्थव्यवस्था साकारते आहे. त्याचा परिणाम अनिवार्यपणे जगण्याच्या सर्व क्षेत्रांत होणार आहे. माध्यमांमध्ये याचा वेग भोवंडून जावं असा आहे. माहितीची निर्मिती आणि वहन हेच पत्रकारितेचं सूत्र असेल, तर आता ज्याच्या हाती मोबाईल असा कुणीही हे काम करू शकतो. बातम्या समाजमाध्यमांतून पहिल्यांदा फुटतात आणि आता तर महत्त्वाची धोरणंही ट्विटरवर जाहीर व्हायला लागली आहेत. साहजिकच ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम हीसुद्धा पत्रकारितेची नवी साधनं बनताहेत. एका अर्थानं माहितीच्या वहनाचं आणि निर्मितिक्षमतेचंही लोकशाहीकरण होतं आहे.

त्याचसोबत अनेक अमंगल, अभद्र ट्रेंड या मोकाट सुटलेल्या माहितीच्या प्रवाहात दिसायला लागले आहेत. ही गदळघाण, विकृती लोकांचं जिणं उद्ध्वस्त करणारी, समाजस्वास्थ्याला चूड लावणारीही ठरते आहे. या माध्यमांतून व्यक्त होणाऱ्यांचा भर फॅक्‍टपेक्षा फिक्‍शनवर दिसतो आहे. फेक न्यूज हे असंच प्रकरण संपूर्ण पत्रकारिता ज्या पायावर उभी आहे, त्यालाच धक्का देऊ पाहतं आहे. पोस्टट्रुथचा जमाना आहे आणि भ्रामक सत्याची जे सत्य नाही पण असल्यासारखं दाखवलं जातं, अशा बनवेगिरीची चलती आहे. इथं मुद्दा येतो जबाबदार पत्रकारितेचा. नवमाध्यमांची अफाट ऊर्जा आणि पोहचण्याची प्रचंड क्षमता याचा वापर करतानाच पारंपरिक माध्यमांचा पोक्तपणा, विश्‍वासार्हता जपण्यासाठी गरजेचा बनतो. समाजमाध्यमातून खोटं सत्याचा पेहराव घेऊन वावरायला लागतं तेव्हा त्यावर विवेकाचा अंकुश ठेवण्याचं कर्तव्य पारंपरिक माध्यमांनीच पार पाडायला हवं, अशी आमची धारणा आहे. सत्य-असत्याची शहानिशा करणं हे कधी नव्हे इतकं महत्त्वाचं काम आता बनलं आहे. बदलत्या काळाच्या तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करताना हे भान ‘सकाळ’कडं आहे. म्हणूनच या नवमाध्यमांच्या लाटेवर स्वार होताना तिथंही विश्‍वासार्ह माध्यम म्हणून ‘सकाळ’ प्रस्थापित झाला आहे.

नव्या क्षेत्रांची जोडणी

नवमाध्यमांतून पाझरणारा उठवळपणा हा त्या माध्यमांचा दोष नाही, तर तो वापरणाऱ्यांचा आहे. कोणीही व्यक्त व्हायला मुक्त आहे आणि फिल्टर करण्याची कसलीच यंत्रणा नाही, यातून आलेलं हे मोकाटपण आहे. त्यावर टीका करायची की त्यातलं सामर्थ्य वापरून तिथं सकारात्मकतेची रेष मोठी करायची, असा मुद्दा आहे. निव्वळ टीका करत राहिल्यानं या माध्यमांचं स्वरूप बदलण्याची शक्‍यता नाही. नवमाध्यमांना नाकारता येणार नाही, अशी समाजरचना नकळत आकाराला येते आहे. याचं कारण ज्यांना मिलेनियर्स किंवा स्क्रीन एजर्स म्हणतात, अशी एक पिढी सर्व क्षेत्रांतील नेतृत्व हाती घेण्याच्या टप्प्यावर आली आहे. त्यांचं व्यक्त होण्याचं माध्यम ऑनलाइन असेल तर केवळ माहितीचं आदानप्रदानच नव्हे तर संघटन, परिवर्तन, प्रबोधनासाठीही नवी पिढी जी माध्यमं वापरते, तिथंच काही द्यावं लागेल. म्हणूनच ‘सकाळ’नं केवळ समाजमाध्यमांतील दुष्प्रवृत्तींवर टीका करण्यापेक्षा त्याचा सकारात्मक वापर करण्याचा दुसरा मार्ग जाणीवपूर्वक स्वीकारला आहे. म्हणूनच शेतीमालाच्या प्रश्‍नांचे, दुष्काळाचे असे लोकांच्या जगण्या-मरण्याचे मुद्दे समाजमाध्यमांतून पुढं आणण्याचे प्रयत्न ‘सकाळ’ करतो आहे. माहितीच्या अफाट पसाऱ्यातलं नेमकं निवडक वेचून देणं हे आव्हान आहे. अशा क्‍यूरेटेड कंटेन्टचं आव्हान पेलण्यास ‘सकाळ’ सज्ज आहे. त्याचबरोबर माहितीचं विश्‍लेषण करणं, अन्वयार्थ लावणं, हेही जबाबदार पत्रकारितेचं काम आहे, असं आम्ही मानतो. मुद्दा आरोग्याचा असो, शिक्षणाचा, अर्थकारणाचा असो की सांस्कृतिक संपन्नतेचा... लोकांच्या आकांक्षा आणि त्यासाठी काय द्यायला हवं, याभोवती ‘सकाळ’चे सारे उपक्रम गुंफलेले असतील. नऊ दशकं ‘सकाळ’ला साथ देणारे वाचक आणि पुढच्या पिढ्यांची साथ यात हवीच.

आमच्या मते, माध्यमांचं व्यक्तित्व ती कोणाच्या बाजूनं उभी राहतात, काय करू इच्छितात यावर ठरतं आणि समाजाच्या भल्याचं तेच स्वीकारू हा ‘सकाळ’साठी शास्त्रकाटा आहे. या निकषांवर आम्ही इतरांहून वेगळे आहोत. महाराष्ट्रातील चोखंदळ, विवेकी वाचकांची बौद्धिक, सांस्कृतिक भूक भागवणारं ‘सकाळ’ हे दैनिक शतकाकडं घोडदौड करताना नव्या माध्यमांतही वाचकांच्या साथीनं उजेडाची पेरणी करणारा प्रवास करत राहील!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com