विचारमंथनाला पर्याय नाही ! (श्रीरंग गोखले)

विचारमंथनाला पर्याय नाही ! (श्रीरंग गोखले)

एखाद्याला सुचणाऱ्या कल्पना, त्याच्या दृष्टीनं अगदी नवीन असल्या, तरी पूर्वी त्या कुणाला तरी, कुठं तरी सुचलेल्या असू शकतात. नवकल्पना या कालसापेक्ष, स्थलसापेक्ष व व्यक्तिसापेक्ष असू शकतात. दोन-तीन ज्ञात गोष्टींचं वेगळ्या कारणासाठी केलेलं एकत्रीकरण ही नवकल्पना असू शकते. जशी मूलभूत नवकल्पना ही स्तुत्य असते, तसाच एखाद्या कल्पनेचा किंवा साधनाचा वेगळ्या कारणासाठी उपयोग हीसुद्धा!

कल्पकतेची संकल्पना व व्याप्ती आणि विचारमंथन याविषयाचे काही पैलू या लेखमालेतून आतापर्यंत पाहिले. कल्पनाशक्तीला मारक अशा काही गोष्टी असतात. नको इतकी शिस्त, चाकोरीबाहेर जाणाऱ्यांना दूषण, धार्मिकता व संस्कृती यांचा अवाजवी पगडा या सगळ्या गोष्टी नाउमेद करणाऱ्या असतात. ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी,’ ‘अंथरुण पाहून पाय पसरावेत...’  असे कालबाह्य उपदेश हेही कल्पनाशक्तीला, कल्पकतेला नामोहरम करणारे ठरतात. मुक्त व चौकस बुद्धी वाढवणाऱ्या शिक्षणाऐवजी, पाठांतरावर भर देणारं शिक्षण असल्यानं नुकसानच होतं. कल्पक असावं; पण वाहवत न जाता कुठं थांबावं हे ज्यानं त्यानं आपली सद्‌सद्विवेकबुद्धी वापरून ठरवावं. कल्पनाशक्ती ही नुसती कल्पनेत न राहता कृतीत परावर्तित व्हायला हवी. हे फलित शाश्‍वत व समाजोपयोगी व्हायला हवं. ते नीतिमत्तेला धरून हवे. तसे तर काय दहशतवादी, गुंड, काळाबाजार करणारे यांच्याकडंही कल्पनाचातुर्य असतंच; पण तशी कल्पकता इथं अभिप्रेत नाही.
विचारमंथनात कल्पना सुचण्यासाठी मदत करणारी काही तंत्रं असतात. एखाद्या वस्तूत नवीन काय करता येईल, ही चर्चा सुरू असेल तर त्याच वस्तूचे अनेक उपयोग सुचवता येतात. त्यासाठी त्या वस्तूचे गुणधर्म, कार्य, साहित्य यांची मदत होते. एका कामासाठी विशिष्ट गोष्टीऐवजी दुसरं काही वापरू शकू का, याचाही कल्पक विचार करता येतो. काही वेळा मुद्दाम अगदी वेगळ्या गोष्टींचा संयोग करून काही सुचतं का ते पाहिलं जातं. टेपरेकॉर्डर व पक्षी यांचा एकत्रित विचार केल्यास काय होईल? यात पक्ष्यासारखा हलका संच, पक्षी हा पाणी झटकून झटकून सतत कोरडा होतो, तसा छोटा वॉटरप्रूफ संच, हवेत विहरणाऱ्या ध्वनिलहरी, पक्ष्याच्या आकाराचा संच, पक्ष्याच्या आवाजाच अलार्म असलेला क्‍लॉक रेडिओ इत्यादी... डॉ. अशोक निरफराके यांनी त्यांच्या ‘कल्पक बनू या’ या पुस्तकात संयोगक्रियेचं छान विवरण केलं आहे. खूप वर्षांपूर्वी ‘स्वराज्य’ साप्ताहिकानं ‘आपणाला कुठली यंत्रे हवीत?’ अशी वाचकस्पर्धा ठेवली होती. त्या वेळी ‘जिना चढणारं यंत्र’ (लिफ्ट नव्हे), ‘बर्फ न घालता उसाचा रस थंड करणं’ अशा सूचना आलेल्या आठवतात. अजूनही उंच इमारतींना बाहेरून रंग देण्यासाठी फळी व दोर वापरण्याऐवजी एखादं साधन, कुठलंही पाणी पिण्यायोग्य करणारी ‘पर्मनंट वॉटर बॉटल’ यांसारखे शोध हवे आहेतच. ‘जमिनीवर बसल्यावर पुन्हा उठायला मला त्रास होतो; त्यासाठी कुणीतरी एखादी सुविधा शोधून काढायला हवी,’ असं माझी आई मला एकदा म्हणाली असल्याचं मला आठवतंय.
एखाद्या वस्तूबद्दल किंवा घटनेबद्दल माहिती गोळा करताना ‘प्रश्‍न विचारणं’ या तंत्राची खूप मदत होते. त्या विषयावर खूप प्रश्‍न सुचणं ही कल्पकता. त्यांची उत्तरं मिळवून ती संकलित करणं हे ज्ञान. पाच W आणि एक H म्हणजे What- Why-When-Where-Who आणि How हे ते प्राथमिक पातळीवरचे प्रश्‍न. त्यानंतर संयुक्त प्रश्‍नांची आणखी भर पडते. ‘का?’ हा प्रश्‍न पाच वेळा विचारून एखाद्या प्रश्‍नाच्या खोलात शिरता येते.

उदाहरणार्थ ः रस्त्यावर यंदा खूप खड्डे पडलेत. का? डांबर कमी पडते. का? डांबर वाहून जाते. का? कंत्राटदाराची चलाखी. का? देखरेखीचा अभाव... इत्यादी
कल्पनाशक्तीच्या विकासासाठी पैशाचं पाठबळ हवं असतं का? तर काही ठिकाणी पैसा अनिवार्य असतो; पण सगळ्याच ठिकाणी नव्हे. पैशापेक्षा कल्पनाशक्ती आणि जिद्द बाजी मारून जाते. एखाद्या प्रकल्पात पैसा उभा करण्याचे मार्ग कल्पनाशक्तीच दाखवून देते. जिद्द, ध्यास हे घटक जास्त महत्त्वाचे. गावाकडच्या लोकांनी आहे तीच साधनं वापरून केलेल्या श्रम वाचवणाऱ्या कितीतरी साधनांकडं ‘जुगाड’ म्हणून आपण पाहतो. सायकलसारखं पेडल मारून श्रमशक्तीनं चालणारं वॉशिंग मशिन, स्कूटरच्या इंजिनवर गिरणी, अंगा-खांद्यावर वाहून नेण्यापेक्षा ‘रोलर’सारखं साधन वापरून लांबून पाणी आणण्याचं साधन इत्यादी. अत्यंत कल्पकतेनं, कमीत कमी पैशात, एखाद्या यंत्रज्ञासारखं केलेलं डॉ. विकास आमटे यांचं काम पाहून थक्क व्हायला होतं.
‘कल्पनाशक्तीचा विकास’ याचं प्रशिक्षण देताना ‘एका वस्तूचे अनेक उपयोग’ असा विषय घेऊन विचारमंथन केलं जातं. उदाहरणार्थ ः  वीट. यात कल्पनांचा पाऊस पडतो. ‘डिझायनरला ‘नदीवर पूल बांधा’ असं कधी सांगू नका, त्याला नदी ओलांडायचा उपाय शोधायला सांगा,’ हे माझं एक आवडतं वाक्‍य आहे कल्पक अभियंता त्या जागेच्या सोईनुसार, उपलब्ध सामग्री, वेळ, पैसा याचा विचार करून अनेक उपायातून योग्य उपाय सुचवतो. टाकाऊ वस्तूंचे अनेक उपयोग सुचवणारे खेळ फार मनोरंजक होतात. याबरोबरच एका कामासाठी दुसरं साधन वापरणं अशा प्रकारचं विचारमंथनही खूप उपयुक्त ठरतं. या दोन्ही प्रकारच्या कल्पनांचा ओघ संख्यात्मक असू शकतो (खूप कल्पना सुचणं या अर्थानं) किंवा हा ओघ एकाच प्रकारच्या कल्पनांचाही असू शकतो. पाण्याच्या बाटलीचं मूळ कार्य ‘साठवणं’ हे आहे. मग टाकाऊ बाटल्या धान्य साठवायला, पेनस्टॅंड म्हणून, माती भरून झाड लावायला... या ‘एकदिशा’ कल्पना झाल्या; पण काही कल्पना या ‘कल्पनेपलीकडच्या’ही असू शकतात. उदाहरणार्थ ः बाटल्या चपट्या करून, त्या चेपून सपाट करून त्यांच्या सपाता बनवणं. चाकोरीबाहेरच्या कल्पना शोधायला सर्वांना उद्युक्त करणे आवश्‍यक असतं.

असंच एक अनोखं तंत्र म्हणजे मार्फोलॉजिकल ॲनालिसिस. याला सविस्तर विश्‍लेषण म्हणता येईल. यात वस्तूंचे पैलू वेगळे केले जातात. मटेरिअल, कार्य, गुणधर्म वगैरे. यातल्या महत्त्वाच्या चार-पाच पैलूंची यादी बनते. यातल्या प्रत्येक पैलूला पर्याय शोधले जातात. एखाद्या शोभिवंत टेबललॅम्पचं उदाहरण घेऊ या. याचे मुख्य पैलू हे स्टॅंड, लॅम्पशेड, उजेडाचा स्रोत, ऊर्जेची व्यवस्था, स्विच असे असतील. आता स्टॅंड किंवा बेस हा लोखंड, लाकूड, प्लॅस्टिक, पितळ असा असू शकतो. लॅम्पशेड ही ॲल्युमिनियम, टेराकोटामाती, काचेची, कागदी अशी असेल, तर उजेडासाठी बल्ब, एलईडी, सीएफएल किंवा ज्योत असू शकेल. ऊर्जा ही इलेक्‍ट्रिसिटी, बॅटरी, सोलर, मेण यापैकी कुठलीही एक असू शकते. बटण साधं खटक्‍याचं, दोरी ओढून काम करणारं, टाळी वाजवून ऑन-ऑफ होणारं किंवा ‘गरजच नाही’ असं असेल. आता यातल्या प्रत्येक पैलूतला एकेक वेगळा पर्याय घेऊन त्या संयोगानं वेगवेगळे दिवे बनवले जाऊ शकतात. काही अव्यवहारिक संयोग सोडून दिले, तरी खूप प्रकार यातून उपलब्ध मिळतात. एका कल्पक उत्पादकानं कृतीत उतरवलेलं हे उदाहरण आहे. हे सगळं कोष्टकाप्रमाणे मांडून विचार करणं सुलभ ठरतं.

रेडिओ व रेकॉर्डर जेव्हा प्रस्थापित झाले, तेव्हा बॅंडप्रमाणे रेडिओचे दोन किंवा तीन प्रिंटेड बोर्ड, टेप+ॲम्प्लिफायरचे पॉवरप्रमाणे तीन प्रकार, तीन चार वेगवेगळे स्पीकर, नुसतं प्लेबॅक, रेकॉर्डिंगचे व वॉकमनचे असे तीन प्रकाची टेप-डेक, तीन चार प्रकारचे पॉवर सप्लाईज्‌ यांनी भरलेली एक सूटकेस आम्ही तयार केली होती. नवीन उत्पादनाच्या चर्चेच्या वेळी या सूटकेसमधल्या विविध घटकांतून वेगळी वेगळी जुळणी करून वेगळेवेगळे संच बनवता येत असत.

वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं का? तर ग्राहकाला निवडीचं स्वातंत्र्य मिळतं, तसंच ग्राहकांचेही अनेक प्रकार असतात. त्यातल्या प्रत्येकासाठी तुमच्याकडं उत्तर असतं. असायला हवं. हे प्रकार म्हणजे स्री-पुरुष-मुलं, सुशिक्षित-अशिक्षित, तरुण-वृद्ध, गरीब-श्रीमंत वगैरे. आमच्या वस्तूंसाठी मुख्यतः शहरी-ग्रामीण, तरुण-प्रौढ, चोखंदळ-काटकसरी असे प्रकार असत.
व्यवहारात अनेक ठिकाणी ही सविस्तर विश्‍लेषणाची प्रणाली वापरली जाते. एखाद्या हॉटेलचा मेनू खूप विस्तृत असतो. त्यातल्या पदार्थांचा पैलू घेतला तर ग्रेव्ही, घटकपदार्थ, मसाले व करण्याची पद्धत (परतणं, शिजवणं, भाजणं, नुसतं मिसळणं आदी) या प्रत्येकाचे पर्याय तयार करून व वेगवेगळ्या संयोगानं मेनू वाढवलेला असतो.

याच प्रणालीचा वेगळा विचार करून आम्ही ‘स्मार्ट डिझाईन’ असा नवा विचार तयार केला होता. नवीन वस्तू बाजारात आणताना ती लवकरात लवकर आणण्यासाठी डिझाईनचा वेळ कमी करावा लागतो. कुठलीही वस्तू स्टॅंडर्ड हार्डवेअर, स्टॅंडर्ड रचना व विशेष डिझाईन यांच्या संयोगानं बनते. स्टॅंडर्ड हार्डवेअर म्हणजे स्क्रू, रिव्हेट, स्प्रिंगा, वॉशर, पिना इत्यादी. तुम्ही काही रचना परत परत वापरता. उदाहरणार्थ ः टेपडेक, सीडी ड्राईव्ह, बॅटरी कम्पार्टमेंट, ट्यूनिंग ड्रम, बॅटरी डोअरचा खटका इत्यादी. या सगळ्याचं संगणकावर रेखाटन करून ठेवलेलं असे. या प्रस्थापित रचना व स्टॅंडर्ड हार्डवेअर वापरल्यानं डिझाईनचं जवळपास ७० टक्के काम पूर्ण होतं. डिझाईनचा वेळ व प्रयत्न मुख्यत्वे शेवटच्या विशेष भागासाठीच लागे. परत जुन्या, तावून-सुलाखून केलेल्या रचना असल्यानं गुणवत्ता आपोआप सुधारे, वेळ वाचे. इंडिका कार व इंडिगो हे याचं उत्तम उदाहरण आहे.

कल्पकतेचा मी उपयोजित वापर केला तरी, या विषयामागच्या तत्त्वज्ञानाचं आकलन होण्यासाठी प्रशिक्षण घेतले होतं. यात बुद्धीला चालना देणारे अनेक खेळ असत. सहभागी व्यक्तींनी एकमेकांशी ओळख करून देण्याची सुरवात नावीन्यपूर्ण प्रकारांनी होई. एका वस्तूचे अनेक उपयोग, समस्या सोडवणं, प्रत्येकानं एका वाक्‍याची भर घालून समूहानं गोष्ट रचणं, सक्तीनं शब्द-संयुग करून आलेल्या कल्पना रंगवणं, नावीन्यपूर्ण जाहिरात वगैरे. वातावरण खेळीमेळीचे असे; पण प्रत्येकजण आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या घेऊन आल्यानं ग्रुपनं त्यांची केलेली उकल व त्यावरून कृती आराखडाही करावा लागे.

विचारमंथनातून उपयुक्त निष्कर्ष मी अनुभवले होतेच. रेकॉर्डमध्ये नावीन्य आणणं गरजेचं होतं. त्यांचे इतर काय काय उपयोग करता येतील, त्याअनुषंगानं आम्ही कल्पना लढवल्या होत्या. आज त्या कालबाह्य वाटतील; पण फटाक्‍याऐवजी वापर करणं, शेतात बुजगावणं म्हणून आवाज काढणं, वेगळ्या लांबीचे टेप वापरून ‘टायमर कॅसेट्‌स’, कॅसेट-लेटर असे अनेक उपयोग पुढं आले होते. उद्योजकांच्या एका मेळाव्यातली गोष्ट. एका महिलेचा चॉकलेट करायचा व्यवसाय होता. त्यांना खप वाढवण्यासाठी अनेक कल्पना आम्ही विचारमंथनातून दिल्या होत्या. कधीतरी हे तत्त्व आपण एकटे असतानाही वापरावं लागतं. त्याला ‘चेकलिस्ट’ म्हणतात. अचानक ऑफिसमध्ये पत्नीचा फोन आला, की आज एका स्नेह्याचा वाढदिवस आहे, तर येताना काही भेटवस्तू आणा. काय नेता येईल याची झटकन यादी बनवणं हे कल्पकतेचं फलित.

विचारमंथनाची उलटी पायरीही मला आवडायची. सरळ विचार करण्यापेक्षा काही प्रश्‍नांसाठी मानवी मन विरुद्ध बाजूचे विचार जास्त सुलभतेनं करू शकतं. मी एका कॉलेजमध्ये व्हॅल्यू इंजिनिअरिंगचा छोटासा अभ्यासक्रम शिकवीत असे. विचारमंथनाचे उदाहरण म्हणून मी ‘परीक्षेत कॉपी करण्याचे मार्ग’ असा विषय घेतला! शेवटी, मुलांची लेखी परीक्षा घेताना त्यांच्या अफलातून कल्पनांचा विचार करूनच मी प्रतिबंधक उपाय योजले होते.

आपल्याला सुचणाऱ्या कल्पना, आपल्या दृष्टीनं अगदी नवीन असल्या, तरी पूर्वी त्या कुणाला तरी, कुठं तरी सुचलेल्या असू शकतात. नवकल्पना या कालसापेक्ष, स्थलसापेक्ष व व्यक्तिसापेक्ष असू शकतात. दोन-तीन ज्ञात गोष्टींचं वेगळ्या कारणासाठी केलेलं एकत्रीकरण ही नवकल्पना असू शकते. (उदाहरणार्थ ः कोलाज-चित्र). जशी मूलभूत नवकल्पना ही स्तुत्य असते, तसाच एखाद्या कल्पनेचा किंवा साधनाचा वेगळ्या कारणासाठी उपयोग हीसुद्धा. दाब देऊन द्राक्षाचा रस काढणारं यंत्र पाहून गटेनबर्गला प्रिटिंग मशिनची कल्पना सुचली होती. सुरवातीच्या वॉशिंग मशिनमध्ये दोन टब असत. एक कपडे खळबळणारा व दुसरा सुकवणारा. याच मशिनचा वापर पंजाबात लस्सी व चक्का बनवणारं यंत्र म्हणून वापर व्हायचा.
कल्पकता (Creativity) हा सतत संशोधन होत असणारा मोठा विषय आहे. यात TRIZ सारख्या प्रमाणी, डी बोनो यांसारखे पर्यायी विचाराला चालना देणारे लेखक... असं खूप काही आहे. काही असलं तरी कृतीत परावर्तित होणारी लोकोपयोगी कल्पना हेच खरं फलित होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com