उत्पादनात नवनिर्मिती का व कशी?

श्रीरंग गोखले skg2743@gmail.com
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

प्रत्येक उत्पादनाचं आयुष्य किती आहे, याचं ठराविक गणित मांडता येत नाही; पण ठोकताळा मांडता येतो. १९७०च्या दशकात एखादं मॉडेल चार-सहा वर्षं सहज चालायचं. तो काळ १९८०च्या दशकात तीन वर्षांवर आला व १९९०च्या दशकात दोन वर्षांवर आला. कारण, ग्राहक चोखंदळ बनत असतो, तंत्रज्ञान बदलत असतं, प्रतिस्पर्धी ‘स्मार्ट’ होत असतो...

प्रत्येक उत्पादनाचं आयुष्य किती आहे, याचं ठराविक गणित मांडता येत नाही; पण ठोकताळा मांडता येतो. १९७०च्या दशकात एखादं मॉडेल चार-सहा वर्षं सहज चालायचं. तो काळ १९८०च्या दशकात तीन वर्षांवर आला व १९९०च्या दशकात दोन वर्षांवर आला. कारण, ग्राहक चोखंदळ बनत असतो, तंत्रज्ञान बदलत असतं, प्रतिस्पर्धी ‘स्मार्ट’ होत असतो...

उत्पादन (प्रॉडक्‍ट) या शब्दाचा अर्थ इथं अर्थातच व्यापक आहे. माझं योगदान रेडिओ-रेकॉर्डर असल्या वस्तूत झालं असलं, तरीही कुठलीही ग्राहकोपयोगी वस्तू उदाहरणार्थ : स्कूटर, टूथपेस्ट, औषध किंवा कारखान्याला लागणाऱ्या वस्तू (बॉलबेअरिंग, पंप, शाई, इत्यादी) इतकंच नव्हे, तर त्यांना लागणाऱ्या विशिष्ट वस्तू- ज्या त्यांच्या ड्रॉइंगप्रमाणे आहेत अशा सर्व वस्तू - यात अंतर्भूत आहेत. सेवाव्यवसाय करणाऱ्यांचं प्रॉडक्‍टही यात आलं उदाहरणार्थ : एखादं सॉफ्टवेअर, सल्ला, आराखडा वगैरे. अशा सर्व उत्पादननिर्मितीपूर्वी कोणते निकष लावावे लागतात, ते या लेखात पाहूया...
वस्तू निर्माण होताना ती वेगवेगळ्या प्रक्रियेतून जात असते. डिझाइन, विकसन (डेव्हलपमेंट), उत्पादन (प्रॉडक्‍शन), गुणवत्ता (क्वालिटी), विपणनव्यवस्था, विक्री व सेवा अशा ढोबळमानाने या पायऱ्या असतात. काही प्रसंगी डिझाइनचं आधी काही मूलभूत संशोधनसुद्धा करावं लागतं. डिझाइनमध्ये ड्रॉइंग, रिपोर्ट, मॉडेल असलं, तर विकसनकामी उत्पादनाला लागणारी टूल म्हणजे डाय, मोल्ड व उत्पादनासाठी लागणारी सामग्री यांचा समावेश असतो. वस्तुनिर्मितीच्या व्यवसायाचा आवाका सोबतच्या आकृतीतून सुलभपणे कळू शकेल.

मी काम करत होतो, ती कंपनी रकाना क्रमांक १ नुसार, सर्व प्रक्रिया स्वतःच करणारी होती. (Totally integrated factory) पण ‘रिबॉक’सारखी स्पोर्टस शूज बनवणारी कंपनी स्वतः फक्त डिझाइन, गुणवत्ता व मार्केटिंग आणि विक्री करणारी, म्हणजे इतर प्रक्रिया बाहेरून करून घेणारी (रकान्यातल्या २ प्रमाणे) असू शकते. एखादी औषध कंपनी मूलभूत संशोधन स्वतः करेल, फॉर्म्युला बनवेल, विपणनव्यवस्था व गुणवत्ता स्वतःकडं ठेवेल व इतर गोष्टी बाहेरून (३ प्रमाणे) करू शकेल. एखादा व्यवसाय उत्पादनाची नक्कल करून ते विकसित करण्यापासून सुरवात करेल (४). आमची काही उत्पादनं आम्ही दमणमधल्या काही व्यावसायिकांकडून फक्त उत्पादित करून घ्यायचो. असं केवळ उत्पादन करून देणारेही (जुळणी करणारे) असतात (५). नुसती सेवा देणारे एखाद्या ब्रॅंडशी निगडित व्यावसायिकही असतात (७), तर नुसतं संशोधन करून देणारी NCL सारखी संस्थाही असते (८) नव-उद्योजकांना व्यवसायात उडी मारताना छोट्या गोष्टींतून कशी सुरवात करता येईल, ते पाहण्यासाठी व मोठ्या उद्योगांना बाहेरून काय करून घेता येईल, याच्या अभ्यासासाठी हा तक्ता उपयोगी पडतो.
एकच एक उत्पादन असणं हे नुकताच व्यवसाय सुरू करण्याऱ्यासाठी ठीक असतं; पण विस्तार झाल्यावर, ब्रॅंड तयार झाल्यावर अनेक उत्पादनं असणं अपरिहार्य असतं. याचं कारण ग्राहकाला निवडीचं स्वातंत्र्य देणं व ग्राहकाचे सगळे प्रकार (Segments) आपल्या आवाक्‍यात ठेवणं महत्त्वाचं असतं. उत्पादनाचा विस्तार (Width) आणि प्रकार (Depth) यातून हे स्पष्ट होतं. आमच्या ऑडियो विभागात रेडिओ, रेकॉर्डर्स, ऑडियो सिस्टीम आणि ऍक्‍सेसरीज असा विस्तार होता आणि प्रत्येक विभागात काही उपप्रकारही होते. उदाहरणार्थ ः रेकॉर्डरमध्ये मोनो रेडिओ रेकॉर्डर, स्टीरिओ, रेडिओ रेकॉर्डर, डबल डेक, कॉम्बो किंवा नुसता टेपरेकॉर्डर इत्यादी. नेस्ले, हिंदुस्थान लीव्हर इत्यादी कंपन्यांच्या उत्पादनांचा विस्तार आणि उत्पादनांचे प्रकार यांचा अभ्यास उपयुक्त ठरतो.

नवीन उत्पादनं आणि विपणनव्यवस्था यांचं नातं अतूट असतं. या बाजारपेठेत ग्राहक, डीलर व आपले प्रतिस्पर्धी यांचा सहभाग असतो आणि म्हणून त्यांचा अभ्यास महत्त्वाचा असतो. प्राण्यांप्रमाणे उत्पादनालाही आयुष्य असतं. हे आयुष्य ग्राहकाची क्रयशक्ती, उत्पादनाचं जपलेलं वैशिष्ट्य, गुणवत्ता व बदलणारी फॅशन किंवा जीवनशैली यांच्याशी निगडित असतं. यात प्रतिस्पर्ध्यांचं चातुर्यही महत्त्वाचं ठरतं. हे वस्तूच्या आयुष्यरेषेचं (Product Life Cycle- PLC) एक तत्त्व आहे.
पहिलं वर्ष डिझाइनमध्ये गेल्यानं पैसा मिळत नाही, तर गुंतवावा लागतो. पुढची काही वर्षं त्या नव्या उत्पादनातून चांगला पैसा मिळतो, वाढ होते; पण मग प्रतिस्पर्धीही सजग होऊन त्यांची उत्पादनं बाजारात आणतात किंवा आहे त्या उत्पादनाला नवं रूप देतात. किंमत वाजवी ठेवतात. या अनेक कारणांनी उत्पादनाला ‘स्थिरत्व’ येतं व काही काळानं ते तोट्यात जातं. याच वेळी नवीन उत्पादनाचा विचार सुरू होतो. एकच बाजारपेठ व नेक प्रतिस्पर्धी अशा अवस्थेत नफा घसरत जातो. स्थिर अवस्थेत उत्पादनात छोटेसे बदल, प्रमोशन, किमतीचा फेरविचार अशा गोष्टी करून ती अवस्था वाढवली जाऊ शकते शकतो. आम्ही Facelift च्या नावाखाली अशा गोष्टी करत असू. प्रत्येक उत्पादनाचं आयुष्य किती आहे, याचं ठराविक गणित मांडता येत नाही; पण ठोकताळा मांडता येतो. १९७० च्या दशकात एखादं मॉडेल चार-सहा वर्षं सहज चालायचं. तो काळ १९८० च्या दशकात तीन वर्षांवर आला व १९९० च्या दशकात दोन वर्षांवर आले. कारण, ग्राहक चोखंदळ बनत असतो, तंत्रज्ञान बदलत असतं, प्रतिस्पर्धी ‘स्मार्ट’ होत असतो... 
अशा अनेक कारणांनी ग्राहकाभिमुख उत्पादनाचं (कंझ्युमर प्रॉडक्‍ट) आयुष्य कमी होत असतं. म्हणून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त संख्येनं विक्री करण्याचा कल वाढत आहे. पूर्वी वर्षानुवर्षं चालणारे चित्रपट आता एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रदर्शित केले जातात व काही आठवड्यांतच ते चांगला व्यवसायही करतात. PLC सारखीच Ansoff Matrix ही उत्पादन आणि बाजारपेठ यांचा विचार करताना उपयोगी पडते.
आडव्या अक्षावर बाजारपेठ व उभ्या अक्षावर उत्पादन आहे. या अक्षांचे परत सध्याची चालू स्थिती व नवीन स्थिती असे दोन भाग केलेले आहेत. यातून चार शक्‍यता निर्माण होतात. सध्याची वस्तू तुम्ही सध्याच्या बाजारपेठेत विकत असाल; पण ती बाजारपेठ तुम्ही पूर्णपणे व्यापली नसेल, तर तिथं अजून हात-पाय पसरू शकता हे (१) या चौकोनात दिसते. ही बाजारपेठ आता वाढ देत नसेल, तर सध्याचीच वस्तू नवीन बाजारपेठेत नेता येते. उदाहरणार्थ : तुमचा व्यवसाय फक्त पुण्यातच असेल, तर तो महाराष्ट्रात इतर ठिकाणी वाढवता येईल. निर्यातीची (Export) शक्‍यता इथंच येतं. हा क्रमांक (२) चा चौकोन आहे. वरील PLC च्या विचारानं जेव्हा लक्षात येतं, की सध्याच्या उत्पादनाचं नावीन्य संपलं आहे, तेव्हा नवीन वस्तू तयार करण्याकडं वळावं लागतं. तुम्हाला ज्या बाजारपेठेची जाण आहे, त्याच बाजारपेठेत ही नवीन वस्तू आणणं उचित असतं. नवीन वस्तू आणि प्रचलित बाजारपेठ हा तिसरा चौकोन आहे. बाह्य कारणं, स्पर्धा, व्यूहरचना, अर्थकारण यातून काही वेळा नवीन वस्तू (जी तुम्हाला एकदम अनोखी असेल) आणि एकदम नवीन बाजारपेठ अशा निर्णयाशी यायला लागतं. हा चौथा चौकोन Diversify चा सल्ला देतो. ITC या सिगारेट कंपनीनं बिस्किटं बनवायला किंवा विप्रोनं बल्ब बनवायला सुरवात केली ती यातूनच.
कंपनीत असताना आम्ही Ansoff Matfix किंवा PLC चा अगदी विश्‍लेषणात्मक वापर केला नाही. कारण, आमची ‘रेंज’ प्रस्थापित होती; पण या प्रणालींचं ज्ञान पार्श्वभूमीवर सतत असे. आमच्याच चालू उत्पादनासाठी मिलिटरी कॅंटीनची ऑर्डर मिळवताना किंवा क्‍लॉक रेडिओसारखं नवं उत्पादन सध्याच्याच बाजारपेठेत आणताना त्यामागं हाच विचार होता.
नवनिर्मितीसाठी आणखी पद्धतशीर विचार करण्यासाठी काही तंत्रं आहेत. अलीकडं ‘स्टार्टअप’साठी खूप मदत मिळत आहे. आतापर्यंत कुणीही विचार केला नसेल, अशी एखादी कल्पना मूर्त स्वरूपात आणणे यात फायदा असा असतो, की तुम्हाला स्पर्धेला लगेचच तोंड द्यावं लागत नाही व नफा कमावता येतो. सजग व कल्पक उद्योजकाला असं करायला नेहमीच आवडेल; पण दरवेळी हे जमतंच असही नाही. यात प्रयत्न व गुंतवणूकही खूप लागते. जेव्हा उदरभरणासाठी कुठंतरी सुरवात करावी लागते, त्या वेळी वस्तू 
१) अनुकरण २) बदल ३) काही वैशिष्ट्यांत भर घालणं ४) काही वैशिष्ट्यं कमी करणं ५) एखाद्या वैशिष्ट्याचा विस्तार किंवा ६) ग्राहकाच्या तक्रारीचा किंवा गैरसोईचा खुबीनं उपयोग... यांपैकी कुठलंही साधन वापरून नवनिर्मिती करता येते. 
१) अनुकरण : एकदम नवीन कल्पनेचा प्रयत्न करण्यापेक्षा सध्या बाजारपेठेत कुठल्या वस्तूची किंवा सेवेची चलती आहे, त्याचं अनुकरण करणं उपयुक्त ठरतं. 
२) बदल : अनुकरण करताना त्यात काही हुशारीनं बदल करणं हेही फायद्याचं ठरतं. हे बदल गुणवत्तेसाठी असतील किंवा ग्राहकाची गरज म्हणून आयात रेकॉर्डमध्ये आम्ही सुरवातीला आपल्या इथं डिझाइन केलेले ट्रान्स्फॉर्मर लावून गुणवत्ता व किंमत दोन्हींत फायदा मिळवला होता. आम्ही रेडिओची सेन्सिटिव्हिटी मुद्दाम वाढवायचो.
३) भर : खूप वेळा बाजारपेठेतल्या उत्पादनात त्रुटी आढळतात. त्यात सुधारणा करण्यापेक्षा एक-दोन वैशिष्ट्यं वाढवल्यानं वस्तूची उपयुक्तता एकदम वाढते. आम्ही रेडिओमध्ये रेकॉर्डर ऍड केला; त्यामुळं व्यवसाय किती वाढला ! शिवाय, ‘टू-इन-वन’ असा वाक्‍प्रचारही रूढ झाला. टूथब्रशच्या एका नामवंत कंपनीनं ‘प्लॅस्टिक हॅंड’मागं तीन उंचवट्यांच्या लाइन टाकल्या व त्याला वैशिष्ट्यपूर्ण नाव दिलं. मोबाईलमध्येही अशीच भरपूर भर घालता येईल.. ही अशी भर घालणं हे केवळ अमर्याद आहे.

४) वजा : काही वेळा ग्राहकाला वस्तू खूप महाग वाटते व तीमधली सगळी फीचरही नको असतात. तेव्हा भर घालण्यापेक्षा ‘वजा करणं’ हे धोरण वापरावं लागतं. उदाहरणार्थ : वॉशिंग मशिनमधली वॉश-सायकल काढून टाकून नुसता ड्रायर बनवणं. मिडी सिस्टीममधला इतर सगळा फाफटपसारा काढून टाकून केवळ ऍम्प्लिफायर आम्ही बनवला होता.
५) मॅग्निफाय-मिनीफाय : एखाद्या वस्तूत, चालू फॅशनप्रमाणे बदल करून तिचं एखादं फीचर वाढवणं किंवा कमी करून पैसा वाचवणं. ‘सराउंड साउंड’ हे फीचर आम्ही खूप वाढवलं होतं. आज बहुतांश कॉस्मॅटिक उत्पादन ही ‘हर्बल’ व्हायच्या मागं लागलेली आहेत.
६) ग्राहकाची तक्रार : वस्तूबद्दल ग्राहकांच्या तक्रारींचा लगेच निपटारा करावा लागतो. काही वेळा या तक्रारीतूनच नवीन उत्पादननिर्मितीची कल्पना सुचत असते. ग्राहकाची तक्रार ही इष्टापत्ती समजली पाहिजे! ग्राहकांच्या तक्रारीचं रूपांतर एका सुसंधीत कसं केलं गेलं, हे पुढं कधीतरी ग्राहकाभिमुखतेविषयीच्या लेखात पाहूया.

Web Title: shriranga gokhale Writes about tecnology