लयसौंदर्य

संगीताच्या सौंदर्यशास्त्रातील स्वरसौंदर्याच्या बरोबरीनं येणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘लयसौंदर्य’ अर्थात् लय.
Music
MusicSakal
Summary

संगीताच्या सौंदर्यशास्त्रातील स्वरसौंदर्याच्या बरोबरीनं येणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘लयसौंदर्य’ अर्थात् लय.

- शुभांगी बहुलीकर shubhangibahulikar@gmail.com

संगीताच्या सौंदर्यशास्त्रातील स्वरसौंदर्याच्या बरोबरीनं येणारा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘लयसौंदर्य’ अर्थात् लय.

मनुष्यप्राणी जन्माला आल्यापासून लय ही त्याला सोबत करत असते. लहानपणापासून; किंबहुना जन्मापासून मरेपर्यंत ही ‘लय’ आपल्यात असतेच असते. लहान मूल जन्माला आल्यावर डॉक्‍टर प्रथम त्याच्या नाडीचे ठोके (हार्टबीट्‌स) बघतात. ते जर नीट सुरू असतील तर, मूल नॉर्मल आहे, असं सांगतात. ते जर ठोके बरोबर वाटले नाहीत तर, त्या मुलात काहीतरी दोष आहेत, असं सांगतात. म्हणजे संगीताच्या भाषेत बोलायचं झालं तर हे नाडीचे ठोके एका लयीत नीट पडत असतील तर ते मूल निरोगी आहे, असं समजलं जातं. इतकी ही लय जन्मतःच आपल्याला सोबत करत असते. हे मूल वाढतं तेसुद्धा एका ठरवीक लयीतच. हळूहळू मुलाची वाढ होत असते, म्हणजे ठराविक लयीत ही वाढ होत असते. जेव्हा मनुष्य मरण पावतो तेव्हा डॉक्‍टर त्याची नाडी तपासूनच त्याला मृत घोषित करतात, म्हणजेच ठक ठक येणारे लयीचे ठोके थांबतात. याचाच अर्थ मनुष्य मृत पावतो हे आपल्याला कळतं. आपला सगळा लहानपणापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास हा लयीतूनच होत असतो. एखादी व्यक्ती चालतानादेखील लयीत चालत नसेल, झोकांड्या खात चालत असेल तर आपल्याला लगेच कळतं की ती व्यक्ती दारू पिऊन चालत आहे. कारण, त्या व्यक्तीची चालायची लय बिघडलेली असते.

मनुष्याच्या अंगात लय ही भिनलेलीच असते. मनुष्यप्राण्याप्रमाणेच निसर्गातही चराचरात लय ही असतेच असते. अगदी सूर्य उगवण्यापासून ते सूर्य मावळेपर्यंत निसर्गातली ही लय आपल्याला दिसत असते किंवा झाडांची वाढ, वेलींची वाढ, फुलं, पानं हेही एका लयीतच वाढताना दिसतात. टप्प्याटप्प्यानं ही वाढ आपल्याला होताना जाणवते. समुद्राची भरती-ओहोटी यातही आपल्याला एक ‘लय’ सातत्यानं दिसते. चित्रकार चित्र रेखाटताना रंग-रेषांच्या माध्यमातून चित्राला एक लय किंवा गती देत असतो. चित्रातील प्रत्येक कुंचल्याचा फटकारा किंवा स्ट्रोक लयीची ही जाणीव कागदावर घेऊन चित्र साकारत असतो असं आपल्याला दिसतं. नृत्याचा ‘लय’ हा प्राणच आहे.

नर्तकाच्या किंवा नर्तकीच्या अंगात लय ही भिनलेलीच पाहिजे, तरच त्याचा किंवा तिचा आविष्कार ‘नृत्य’ म्हणून स्वीकारला जातो. साहित्यातसुद्धा काव्यात आपल्याला ‘लय’ दिसते. गद्य साहित्यात अक्षरांतून भाववाही शब्दार्थातून ही ‘लय’ साधली जाते. संगीताचा ‘लय’ हा ‘प्राण’च आहे. संगीताची जेव्हा स्वर, शब्दांतून प्रकट होऊन कलाकृती सादर होत असते तेव्हा ती ‘लयविरहित’ असूच शकत नाही. ‘लय’ ही चराचरांत भरलेली आहे.

‘गीतं वाद्यं तथा नृत्यं तालवर्ज्य न शोभते’ असा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. गायन-वादन-नर्तन या तिन्ही कला लयीशिवाय, तालाशिवाय होऊच शकत नाहीत. लयीलाच इंग्लिशमध्ये ऱ्हिदम (Rhythm) हा शब्द वापरला जातो. लय म्हणजे प्रवाहित्व, पुढं पुढं जाणं, सातत्य. संगीतातील प्रमाण दाखवणं अथवा माप सांगणं हे लयीचे काम असतं. संस्कृत धातू ‘ली’ म्हणजे लीन होणं, मिसळून जाणं. त्यापासूनच ‘लय’ हा शब्द अस्तित्वात आलेला आहे. लयहीन स्वर हे बेमाप अथवा बिनहिशेबी असतात. किशोरी आमोणकर यांनी लयीबद्दल म्हटलं आहे, ‘संगीतातील प्रत्येक स्वर हा लयीसोबतच जन्माला येतो.’ स्वराची लयविरहित निर्मिती होणं अशक्‍य आहे, असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. गायकाच्या श्‍वासाची लांबी, वादकाचे स्ट्रोक्‍स, घसीट इत्यादींमुळे लय ठरते. या घटकांमुळे स्वरांचं लघुत्व-दीर्घत्व ठरण्यास मदत होते आणि त्यातून संगीताला लय प्राप्त होते.

गायक आपल्या श्‍वासावर नियंत्रण ठेवतो व लयीचे वेगवेगळे स्तर आपल्या प्रस्तुतीकरणात निर्माण करत असतो. ही लय कमी-जास्त केल्यानं वेगवेगळ्या रसांची निष्पत्ती होते. दोन स्वरांमधील अंतर जितकं जास्त तितकी लय धीमी किंवा सावकाश आणि त्यामुळे त्यातून निर्माण होणारी रसनिष्पत्ती भक्तिरस, करुण रस अशा रसांना उपयोगी ठरते. मध्य लयीत शृंगाररस, तर द्रुत किंवा जलद लयीत वीररस, रौद्र रस अशी वेगवेगळ्या रसांच्या उत्पत्ती ‘लयी’मुळे होत असते.

ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक-वादक गजाननबुवा जोशी यांच्या मते, ‘संगीताचं शरीर म्हणजे स्वर, तर लय त्याचा आत्मा किंवा प्राण. लयीशिवाय संगीताचं प्रकटीकरण म्हणजे पॅरॅलिसिस झाल्यासारखं वाटेल. लयहीन स्वर खूप वेळ लांबवल्यास तो मोटारीचा हॉर्न बिघडल्यासारखा वाटेल.’

प्रसिद्ध सौंदर्यशास्त्रज्ञ सुझान लॅंगर यांनी लयीबद्दल म्हटलं आहे, ‘The essence of rhythm is tension and resolution.’ याचा अर्थ, पुढं येणाऱ्या आघातासंबंधी उत्कंठा, तो आघात आल्यावर त्या उत्कंठेचं, ताणाचं विसर्जन हा ‘लयीचा गाभा’ होय. क्रिया व विराम यांतील सातत्य म्हणजे ‘लय’ होय. ही गती जेव्हा कालकृत नियत विरामांनी प्रकट होते तेव्हा येणाऱ्या संकलित (Cumulative) अनुभवाला ‘लय’ असं म्हणतात. ‘दोन मात्रांमधील समान अंतर म्हणजे लय.’

या लयीचे तीन प्रकार आहेत....त्याविषयी पुढील (ता. आठ मे) भागात...

(सदराच्या लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तील ललित कलाकेंद्राच्या संगीत विभागाच्या माजी प्रमुख आणि सौंदर्यशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com