शुंग-कण्व काळातले स्तूप (भाग १)

शुंग-कण्व काळाचा (इसवीसनपूर्व १८५ ते इसवीसनपूर्व २८) मागोवा घेताना त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे.
shunga kanva era historical significance Architecture
shunga kanva era historical significance ArchitectureSakal

- विजय टिपुगडे

शुंग-कण्व काळाचा (इसवीसनपूर्व १८५ ते इसवीसनपूर्व २८) मागोवा घेताना त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे. या काळातल्या वास्तुकलेचा विचार करता स्तूपनिर्मितीचा उल्लेख अपरिहार्य. स्तूप म्हणजे एखाद्या महापुरुषाची विशिष्ट आकाराची समाधी.

मात्र, पुढं गौतम बुद्धांचा संदेश, तसंच त्यांचं जीवन स्तूपांच्या रूपानं जनतेसमोर सतत राहावं, या मुख्य उद्देशानं स्तूपांची निर्मिती झाली. या स्तूपांमधून तत्कालीन वास्तुकलेचं आणि शिल्पकलेचं दर्शन घडतं.

सम्राट अशोकांच्या मृत्यूनंतर मौर्यसत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. त्यांच्यानंतर गादीवर आलेले मौर्य राजे दुर्बळ होते. त्यामुळं साम्राज्यातले लहान विभाग स्वतंत्र झाले. मौर्य वंशाचा शेवटचा राजा बृहद्रथ याची,

त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग यानं - सैन्याची पाहणी करत असताना - हत्या घडवून आणली. त्यानंतर पुष्यमित्र स्वत: मगध देशाचा राजा झाला. शुंग वंशाचं राज्य पाटलीपुत्र इथून सुरू झालं. शुंग हे ब्राह्मण समुदायाचे होते. त्यांनी वैदिक धर्माचा पुरस्कार केला.

पुष्यमित्र हा शूर आणि पराक्रमी सेनानी होता. त्यानं प्रसिद्ध परकीय ग्रीक आक्रमक सेनापती मिनॅंडर याचा पराभव करून त्याला भारताबाहेर पिटाळलं व एका मोठ्या साम्राज्याची स्थापना केली. त्याचं साम्राज्य नेपाळपासून नर्मदेपर्यंत व जालंधरपासून बंगालपर्यंत पसरलेलं होतं.

तो लोकप्रिय होता. आपलं सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी त्यानं वैदिक प्रथेनुसार अश्वमेध यज्ञही केला होता. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अग्निमित्र यानं विदर्भ जिंकून साम्राज्याची आणखी वाढ केली. शुंग वंशाचं राज्य इसवीसन पूर्व १८५ ते इसवीसन पूर्व ७३ पर्यंत असं एकूण ११२ वर्षं चाललं. शुंग वंशातला शेवटचा राजा देवभूती हा व्यसनी होता. त्याच्या कर्तृत्वशून्यतेमुळं त्याचा ब्राह्मण प्रधान वासुदेव कण्व यानं त्याची हत्या करून कण्व वंशाची सत्ता प्रस्थापित केली.

या कण्व वंशाचं राज्य अत्यल्प काळ, म्हणजे केवळ ३६ वर्षं, टिकलं. इसवीसनपूर्व २८ मध्ये सातवाहन राजानं मगधावर स्वारी केली व कण्व वंशातला शेवटचा राजा सुशर्मा याची हत्या केली. एकूण, या कालखंडात वर्चस्वाची लढाई झालेली दिसून येते.

शुंग आणि कण्व हे राजे वैदिक धर्माचे अनुयायी होते. त्यांनी आणि सातवाहन राजांनी अश्वमेध यज्ञ करून यज्ञाची प्रथा पुन्हा सुरू केली. तरीही बौद्ध-जैन या धर्मांचा प्रभाव जास्त असल्यामुळं यज्ञासाठी हिंसा करणं ही बाब तत्कालीन जनतेला आवडत नव्हती.

परकीयांच्या स्वाऱ्यांमुळे आलेल्या नवीन धर्मकल्पना, भक्तिपंथाचा उदय, वैदिक व नास्तिक मतांचा प्रभाव यामुळे वैदिक धर्माचं स्वरूप बदलणं आवश्यक होतं. याच्याच परिणामस्वरूप जुन्या वैदिक धर्माचं नवीन, सर्वसमावेशक अशा हिंदू धर्मात परिवर्तन झालं.

परकीयांनाही या धर्मात सामावून घेण्यात आलं. शैव, वैष्णव या पंथांत गणपती, दुर्गा, शक्ती, सूर्य, ब्रह्मा इत्यादी देवतांच्या भक्तिपंथाची भर पडली. जातिसंस्था रूढ झाल्या. ब्राह्मणांना सर्वाधिक महत्त्व प्राप्त झालं. विविध जातींचे आचार-विचार नियमन सांगणारे स्मृतिग्रंथ याच कालखंडात निर्माण झाले.

वास्तुकला या काळातल्या वास्तुकलेचा विचार करता स्तूपनिर्मितीचा उल्लेख करावा लागेल. स्तूप म्हणजे एखाद्या महापुरुषाची विशिष्ट आकाराची समाधी. इतिहासपूर्वकाळात मृत व्यक्तीच्या शरीराचं दफन किंवा दहन केल्यानंतर त्या अवशेषावर मातीचा किंवा दगडांचा ढिगारा करण्याची प्रथा होती. तिच्यामधूनच स्तूपाचा विशिष्ट आकार उत्क्रान्त झाला.

जैनधर्मीय लोक स्तूप उभारत असत. मात्र, सम्राट अशोकांनी भव्य स्तूप बांधून त्यांना भेटी देण्याचा प्रकार सुरू केला. लोकांना तीर्थयात्रा सुलभ व्हावी या उद्देशानं स्तूप विविध नगरांत मुख्य रस्त्याजवळ उभारण्यात आले.

गौतम बुद्धांचा संदेश, तसंच त्यांचं जीवन स्तूपांच्या रूपानं जनतेसमोर सतत राहावं, हाच स्तूप उभारण्यामागचा प्रमुख उद्देश होता. सम्राट अशोकांनी अनेक स्तूप बांधले. त्यांपैकी सर्वात महत्त्वाचा सांची इथला महास्तूप होय.

सांचीच्या स्तूपाच्या पूर्वतोरणावरच्या ‘कपिलवस्तूकडं पुनरागमन’ या उठावशिल्पावरून तत्कालीन नागरी वास्तूची कल्पना येते. अनेक मजली इमारती, गच्ची व कठडे, त्यांच्यावरचं चैत्यकमानींचं आलंकरण आदी गोष्टी वास्तुकलेतली प्रगती स्पष्टपणे दर्शवतात.

याशिवाय, सम्राट अशोकांनी प्रोत्साहन दिलेल्या स्तूपबांधणीचा विकास या काळात झाला हे प्रकर्षानं जाणवतं. सांचीचा स्तूप उभारण्यात आला, तसंच भरहुत, बुद्धगया, अमरावती, नागार्जुनकोंडा इत्यादी अनेक महत्त्वाच्या स्तूपांची उभारणी झाली.

स्तूपाचं मूळ स्वरूप समाधीचं होतं. गौतम बुद्ध किंवा त्यांचे महान शिष्य वा भिक्षू यांच्या अस्थी, रक्षा, केस इत्यादी पार्थिव अवशेष एखाद्या कलशात ठेवले जात व तो कलश जमिनीखाली ठेवून त्यावर स्तूपाची वास्तू बांधण्यात येई.

सर्वात खाली चौरस किंवा दंडगोलाकार पाया बांधला जाई. या पायावर एक अर्धगोलाकार अंडाकृती घुमटासारखी रचना असे. खालच्या पायाला मेंढी किंवा दंड म्हणत, तर वरच्या अर्धगोलाकार भागाला अंड अशी संज्ञा आहे.

या वर्तुळाकार भागाच्या मध्यावर एक छोटा चौरसाकृती मंडप असे. त्याला ‘हार्मिका’ असं म्हणतात‌. हार्मिकेच्या मध्यावर एक खांब किंवा यष्टी उभी करून तिच्यावर एक किंवा तीन छत्र्या असत. या रचनेला ‘छत्रावली’ असं नाव आहे.

स्तूपाचा पायाही अंडाकृती व संपूर्णपणे भरीव असे. आतला भाग कच्च्या विटांनी बांधून त्यावर बळकटपणासाठी पक्क्या विटांचे थर व चुन्याचा गिलावा केला जाई. स्तूपाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ‘प्रदक्षिणापथ’ असे. त्याच्या बाहेर कठडे उभारले जात. आत प्रवेश करण्यासाठी या कठड्यांच्या चार दिशांना भव्य अशी आलंकृत प्रवेशद्वारं असत.

त्यांना ‘तोरण’ असं संबोधलं जातं. कठड्यांना ‘वेदिका’ असं म्हणतात. काही मोठ्या स्तूपांच्या ठिकाणी मेंढीवर दुसरा एक प्रदक्षिणापथ बांधलेला आढळतो. त्याच्याही बाहेरच्या बाजूला कठडा असतो. सुरुवातीला कठडे व तोरणं लाकडी असत. मात्र, शुंगकाळात ते संपूर्णत: दगडाचे तयार करण्यात आले.

(लेखक हे चित्रकार, स्तंभलेखक, कलाभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com