जोगवा

सीतेनं लक्ष्मणरेषा ओलांडली तरी ती लक्ष्मणरेषा मग युगे युगे ऊर्मिलेच्या दारी आडवी पडून असते. असे असले तरीही त्या दोघीही स्त्रीत्वाची बलस्थाने असतात.
Aadimaya
AadimayaSakal

सीतेनं लक्ष्मणरेषा ओलांडली तरी ती लक्ष्मणरेषा मग युगे युगे ऊर्मिलेच्या दारी आडवी पडून असते. असे असले तरीही त्या दोघीही स्त्रीत्वाची बलस्थाने असतात. आदिमायेनं लक्ष्मणरेषा ओलांडली, की एका रावणाचा अंत नक्की असतो. आदिशक्तीचं हे असं सीमोल्लंघनाला निघणं सर्व स्त्री-जातीला बळ देऊन जातं. निदान बळ देऊन जावं, अशी तिची अपेक्षा असते.

कोवळेपणाला पुरुषी करडेपणाची झिलई चढलेल्या उन्हावर थंडी हळुवारपणे आपला अंमल प्रस्थापित करते, ते आश्विनातले दिवस असतात. कृष्णाने तुळशीला समर्पित भावाने पाणी घालावं, असेच हे दिवस असतात. म्हणून मग तुळशीला पाणी घालावं, फुलांच्या माळा कराव्यात अन् भल्या पहाटे फिरायला निघाल्यावर गवतावर नाचणाऱ्या फुलपाखरांना आपल्या हाताची ओंजळ द्यावी. असं केल्यानं एक होतं, कुठल्या पाखराला तुमचं अंगण परकं वाटत नाही. आपलं अंगण पाखरांच्या स्वाधीन करून आपणही आश्विन शुद्ध प्रतिपदेला सीमोल्लंघनाला निघावं. अंबामाताही याच वेळी सीमोल्लंघनाला निघत असते. आईचं घरात नसल्यावर लेकरांनी घराच्या मोहात पडण्याचं तसंही कारण नसतं. सभोवताली मोहक वातावरणाचं जाळं विणलं जात असताना निर्मोही होण्याचं हे दिवस सांगत असतात. दसऱ्याला म्हणजे दशमीला ती सीमोल्लंघनाहून परत येते. अंबामाय परत येते तेव्हा सुगीचे सर्व मोसम गावाबाहेरून तिच्यासोबत परत येतात.

अंबेचं सीमोल्लंघनाला निघणं म्हणजे सौंदर्यानं आपलं सामर्थ्य स्थापित करणं. आदिमाया आदिशक्तीनं आपलं अमर्यादत्व दाखवण्याकरिता हे निघणं असतं. धर्माच्या मर्यादा पाळण्यासाठी आदिसीता लक्ष्मणरेषा ओलांडते. सीतेनं लक्ष्मणरेषा ओलांडली, तरी ती लक्ष्मणरेषा मग युगे युगे ऊर्मिलेच्या दारी आडवी पडून असते. असे असले तरीही त्या दोघीही स्त्रीत्वाची बलस्थाने असतात. आदिमायेनं लक्ष्मणरेषा ओलांडली, की एका रावणाचा अंत नक्की असतो. आदिशक्तीचं हे असं सीमोल्लंघनाला निघणं सर्व स्त्री-जातीला बळ देऊन जातं. निदान बळ देऊन जावं अशी तिची अपेक्षा असते. तिच्या हातात शस्त्रासोबत शास्त्रेही असतात. मूर्तिमंत सौंदर्याच्या हातात नेहमी ती असावीतच. ही आदिमाया मोह पडावा इतकी देखणी, सौंदर्यवती आहे; पण तिचं वाहन म्हणजे सिंह. ही शस्त्र आणि शास्त्रसंपन्न मोहमाया सीमांच्या उल्लंघनासाठी निघते, तेव्हा रौद्र व क्रुद्ध सिंहावर ती आरूढ असते. त्यामुळं तिच्या सौंदर्याकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहूच शकत नाही. पाहणारे भक्तीनेच किंवा भीतीनेच तिच्याकडे बघतात. अंबा मग मोहाच्या सीमा ओलांडून विरक्तीच्या वनात प्रवेश करते. स्त्रीनं कसं असावं, हेच ती सांगत असते. अष्टभुजेच्या एका हातात कमळ; तर दुसऱ्या हातात सर्पसुद्धा असतो. ती अंहकारी पिशाच्चांच्या वधाला निघाली असते म्हणून तिला मग मोहासोबतच मायेच्या सीमासुद्धा ओलांडाव्या लागतात. अर्थातच मग आश्विनातल्या दिवसांवर तिच्या दिसण्याची आणि असण्याची सावली पडणं अपरिहार्य असतं.

बदलत्या क्षणांसोबत आणि जिवाच्या भावविश्वासोबत रूप बदलणं म्हणूनच तिला जमतं. ती परत येते तेव्हा लक्ष्मीरूपात सुगीचे सुख घेऊन येते. महामायेचं हे श्रीमंत रूप अर्थ-कामातून मोक्षाला जाण्याचा मार्ग दाखवण्यासाठी असतं; पण साधकाच्या जातकुळीवर ते अवलंबून असतं. साधना सत् आणि असत् ची असते. साधकाची कामनाही अर्थ-कामाची असू शकते आणि मोक्षाचीही. सीमा ओलांडून तिच्या जाण्याचा नि परत येण्याचा अन्वयार्थ कळला, तर मग साधकाचा सत्पुरुष होतो. कारण सीमोल्लंघनाच्या तिच्या एका टोकावर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असतात अन् दुसऱ्या टोकाला अमर्याद शक्तीनं मदांध झालेला रावण असतो. हे एवढं कळलं, की अंबेच्या या विविध आणि त्रिविध स्वरूपांना विवेकाच्या पूजेनं बांधून ठेवता येतं. अशी पूजा करता आली की माणूस संयमी होतो. माणूस संयमी झाला, की कुठल्याही ऋतूंचे हल्ले परतवून लावणं फार सोपं होतं. तिचं सीमेपलीकडे जाणं आणि परतणं संदर्भासह समजावून घेतलं पाहिजे. जाते का नि परतते कशासाठी... सुकाळात आणि दुष्काळात पुरुषार्थाला सारखीच संधी असते. युद्धात आणि शांतिपर्वातही पराक्रमाला फार जागा असते. अंधारात आणि उजेडातही ज्ञानाला सारखीच जाणीव असते. महामायेच्या रूपात सीमोल्लंघन करताना आणि लक्ष्मीच्या रूपात सीमोल्लंघनाहून परत येताना त्या आदिशक्तीला हे सारेच आपल्या आदिपुत्रांना समजावून सांगायचं असतं.

हे समजून घेण्यासाठी उपासनेची गरज असते. त्यासाठी साधकाने ती दृढतेने चालवली पाहिजे. विशेष म्हणजे त्यासाठी साधकाने विरक्तीच्या वनात जाण्याची गरज नसते; पण गावातही विरक्तीचं वन निर्माण करता यायला हवं. त्यासाठी ऋतू आणि मासांचं भान असणं गरजेचं असतं. साधकाला साध्यापर्यंत पोहोचण्याची अनेक साधनं असतात. साधने साधली, की मग सारंच सहज होतं; पण शक्तिरूपिणीच्या सीमोल्लंघनाचे अर्थ समजून घेण्यासाठी पूजा हे अगदी सहज साधन आहे. आदिमायेला समजून घेण्यासाठी पूजा करायची असते. सारे संदर्भ जाणून घेण्यासाठी प्रार्थना करायची असते. पूजा आणि प्रार्थना म्हणजे विवेकाने केलेले चिंतन. पूजा पंचद्रव्यांनी करण्यापेक्षा पंचप्राणांनी करावी. कारण पंचद्रव्य हा अखेर पंचप्राणांचाच एक आविष्कार असतो. प्रार्थना मेंदूत अर्थगंभीर झालेल्या अक्षरांनी न करता हृदयात अंतर्भूत असलेल्या भावनेनं केली पाहिजे. अशी पूजा आणि प्रार्थना आपल्याला जमली, की त्या आदिमायेनं आपल्याला जन्माला घालून स्वत:ला वासनेच्या भोवऱ्यात आणि आपल्याला जीवनचक्राच्या गतीवर का सोडून दिलं असावं याचं ज्ञान होतं. सीमोल्लंघनाच्या फेऱ्यात एका टोकाला जीवन आणि दुसऱ्या टोकाला मृत्यू का असतो, हे मग आपोआप कळतं. हे ज्ञान आपल्याला व्हावं म्हणून त्या वेदप्रतिपाद्येने किती विविध स्त्री रूपांत जन्माला येऊन किती अनंत लोक जन्माला घालण्याच्या यातना स्वीकारल्या याची जाणीवही होते. ही जाणीव होण्याचा महिना म्हणजे आश्विन. खरं तर मोहाच्या सीमा ओलांडून विरक्तीच्या वनात गेलेल्या त्या श्रीशक्तीला परत श्रीमंत लक्ष्मीचं रूप घेऊन परत येण्याचं प्रयोजनच काय? तर त्याचं उत्तर आहे- तिच्या अनंत पुत्रांचे कल्याण! आश्विन हा कल्याणाचासुद्धा महिना आहे. आश्विन हा कल्याणाचा, चिंतनाचा, पूजेचा, प्रार्थनेचा महिना आहे.

अशा या पूजेच्या, चिंतनाच्या, ज्ञानाच्या महिन्यात शक्तीनं अशिवतेकडे, पाशिवतेकडे न जाता शिवाकडे गेलं पाहिजे. विचारांनी विवेकाकडे गेलं पाहिजे. वासनांनी विकाराकडे न जाता शृंगाराने सौंदर्याकडे गेलं पाहिजे. श्रमाने कनिष्ठतेकडे न जाता वरिष्ठतेकडे गेलं पाहिजे. नेमकं कुठं जावं आणि कशासाठी जावं, हे सांगण्यासाठीच सीमोल्लंघन असतं. हे सारं चातुर्मासातल्या या एका आश्विन महिन्यात शिकता आलं, तर कुठल्याही माणसाला घराचं दार न ओलांडताही सीमोल्लंघन घडू शकतं. कारण, आश्विन हा शेवटी औषधांचा आणि उपचाराचा महिना आहे...

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com