सरत्या सुगीच्या गोष्टी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरत्या सुगीच्या गोष्टी...
सरत्या सुगीच्या गोष्टी...

सरत्या सुगीच्या गोष्टी...

दिवाळी आता सरली आहे. ती आली तशी जाणारच असते. तिचं येणं रोखता येत नाही अन् जाणं अंमळ थांबविता येत नाही. दिवाळी म्हणजे सुगीचा सण असतो. आता ही सुगी कशाची? सुख मनातून आणि सुगी मातीतून उगवते. कष्ट मात्र दोघांसाठीही करावे लागतात. केवळ कामनेच्या ऊर्जेवर सुखही येत नाही अन् सुगीही. शिवारात फुलवलेल्या सुगीचे घरात येणं म्हणजे दिवाळी... नव्हाळीचं सगळं यावेळी घरात येणार असतं. दसऱ्याला सीतादही (खरेतर सीतादेही) केली जाते आणि मग कापूस वेचायला सुरुवात होते. इतरही पिकांबाबत जमिनीची अशी पूजा केली जाते अन् मगच पीक कापणीला सुरुवात होते. सीतादेहीच का? सीता जमिनीतून आली आणि जमिनीतच गडप झाली म्हणून. हे मोठं श्लेषात्मक आहे. त्याचे संदर्भ मनाच्या गाभाऱ्यात आणि संपन्न काळाच्या देव्हाऱ्यात शोधले तरच सापडतात. कुठलंही अपत्य असं जमिनीतून कसे काय सापडेल हो? सीता सापडली म्हणतात. राजा जेव्हा सोन्याच्या नांगराने भूमी नांगरतो तेव्हा भूमाताच प्रकट होते. याचे संदर्भ अगदी अलीकडच्या काळातही सापडतात. एका भावी छत्रपतीनेही असाच सोन्याच्या नांगराचा फाळ करून गुलामीत असलेली जमीन नांगरली आणि स्वराज्य भावनेची सीता गुलामीलाच जीवन समजू लागलेल्यांच्या मनात प्रकट झाली. एकदा ती प्रकट झाली की मग स्वराज्य दूर नसतं. एका महात्म्याने आपल्या अहिंसेने सोनं झालेल्या हातांनी मूठभर मीठ उचललं होतं अन् एका शतकाच्या जुलमी साम्राज्याचा पाया खचला होता. राजा जेव्हा जमीन, पाणी आणि हवा खुलेआम वाटून देण्याच्या बाता मारू लागतो, तेव्हा मग सीता जाते, स्वराज्यही संपतं अन् स्वातंत्र्यही लोप पावतं. स्वातंत्र्य म्हणजे सुख, सीता म्हणजे सुगी आणि संपन्नता म्हणजे साम्राज्य... या तिघांचीही वज केली नाही की मग ते तिघेही जमिनीत गडप होतात.

आता यांची वज करणं म्हणजे नेमकं काय? सीता म्हणजे क्रांती. बाबा आमटे म्हणाले होते की, क्रांती काळपुरुषाची वनवासात साथ देते आणि तो सिंहासनाधिष्ठित झाला की ती जमिनीत गडप होते... तिला व्हावंच लागतं तसं, कारण क्रांतीने सिंहासन हस्तगत करता येतं; मात्र सत्ता क्रांतीने नाही चालविता येत. उलट सत्तेला कुणाचीही क्रांती नको असते. सिंहासनावर बसला माणूस की तो भूपती झाला, असं त्याला वाटू लागतं. क्रांतीचं बीजच मुळी ‘भूमाता’ हा मंत्र आहे. भूमातेसाठीच आजवर क्रांती झालेली आहे. सत्तापुरुष स्वत:ला भूपती समजू लागतो. मातेचा कुणी कसा पती होईल? तो सेवकच असतो. काळाने हे वारंवार सिद्ध केलं आहे, की स्वत:ला सेवक म्हणण्याने ढोंग करत माणसं ‘पती’पण गाजवू लागतात आणि मग सारेच रसातळाला जात असते. राजवटी अशाच येतात आणि लयाला जातात. एखादाच राष्ट्रपिता असतो, जनक होतो. तो क्रांतीच्या श्रमाने जमिनीतून प्रकट झालेल्या सीतेला मर्यादापुरुषाला अर्पण करतो. मात्र, सीता म्हणजे सत्ता नाही, सीता म्हणजे सिंहासन नाही, हे कुणाच्याच आजवर लक्षात आलेले नाही. सत्तेच्या खेळात कुणालाच क्रांती करायची नसते, त्यांना शुचितेची सीताही नको असते. त्यांना केवळ सत्ता आणि त्यातले अधिकार हवे असतात. म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांची भाषा वरवर वेगळी वाटत असली तरीही ती सीतेची भाषा नसते. कारण सीता म्हणजे सत्य.

सत्ता सत्याच्या जवळ जाऊच शकत नाही, ती केवळ सत्याचा आभासच निर्माण करते... म्हणून सुगी आणि सुख काही काळासाठीच येत असते. दिवाळी म्हणजे सुगी आणि सुख दोघांचाही सुंदर, सुबक, सुरेल मिलाफ असते. सुगीची सूजच असते अलीकडे. कारण ज्याला आपण संपन्नता म्हणतो ती वास्तवात कचकड्याची श्रीमंती असते. श्रीमंती कधीच अक्षय नसते. संपन्नता भौतिक नसल्याने ती अविनाशी असते. सुगीची सूज उतरतेच. कारखान्यातून काय काय निर्माण करता आले असेल; पण माती नाही निर्माण करता आली. जमिनीची पैदास नाही करता आली. सुगीची सूज म्हणूनच उतरते आणि सुखाने स्वप्न दाखवून वास्तवाची टळटळीत सकाळ करून टाकली की दिवाळी संपत असते... आताही ती संपली आहे. वास्तवाच्या टळटळीत सकाळी अंगणात विस्कटलेल्या रांगोळ्या, भंगलेले किल्ले, फटाक्यांचा कचरा, कोमेजलेली फुलं असतात. प्लास्टर ऑफ पॅरिसची मातीचा जीव घेणारी लक्ष्मीची मूर्ती तुळशी वृंदावनात ठेवून दिलेली असते... बाजारातून आणलेल्या फराळाच्या सामग्रीचे पुडे सुक्या कचऱ्याच्या निळ्या डब्यात टाकले म्हणजे आम्हाला आम्ही स्वच्छतेचे नियम पाळल्याचं समाधानच काय ते मिळत असते. बाजारातल्या फराळाच्या जिन्नसांची किंमत असते आणि आईच्या हातच्या फराळाच्या पदार्थांना मूल्य असते. सत्याग्रह सोडून सत्यनारायण करणं म्हणजेच राष्ट्रकार्य, असा समज जाणीवपूर्वक रुजविला गेला आणि मग सत्याग्रहाच्या मार्गाने राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्म्याने या देशासाठी काय केले, असंही उद्दामपणे विचारू लागतो. असे विचारणारे मग सत्ताधाऱ्यांना आदरणीयही वाटू लागले.

दिवाळी म्हणजे फटाके, असे समीकरण निर्माण झाले ते त्यातूनच. दिवाळी निर्माण झाली तेव्हा कुठे होते हो फटाके? सुगी म्हणजे फटाके असतात का? जमिनीत बी पेरून बारूद निर्माण करता येत नाही. दिवाळी म्हणजे निर्मिती, कष्टाने केलेल्या निर्मितीचे उत्सवी स्वागत, कृषी लक्ष्मीचे स्वागत म्हणजे दिवाळी... बारूद विद्ध्वंस करते. जीव घेते. कारखान्यात माती नाही तयार करता येते, कारखान्यात बारूद निर्माण करता येते. मातीची आम्हाला गरज आहे, बारुदाची नाही. कारखानेवाले सत्ता निर्माण करतात. सत्ता लोकांची गरज पाहून निर्मिती करत नाही, स्वत:चा फायदा पाहून निर्माण करतात. त्यांनी जे काय निर्माण केले, त्याची नंतर गरज निर्माण केली जाते. त्यासाठी धर्माचा, भंपक फिलॉसॉफीचा वापर केला जातो. दडपशाहीचा उपयोग केला जातो. त्यासाठी लोकांचा नकाराधिकार नाकारला जातो. प्रश्न विचारूच दिले जात नाही. धर्म आणि कार्पोरेट कधीच प्रश्न विचारू देत नाही. दिवाळी म्हणजे प्रश्न विचारण्याचा अधिकारही असते...

हे सगळेच बदलले आहे. ऋतुचक्राच्या आवर्तात येणारा एक कालखंड म्हणजे सुगी नाही. आता पिकांच्या भावासाठी क्रांती करू पाहणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जाते. पिके येतील आणि पिकांचे, पिकविणाऱ्यांचे ‘मूल्य’ समजूनच घेतले नाही तर सुगीची सूजच दिसेल आणि दिवाळी नक्कीच सुखाची नसेल... म्हणून दिवाळी आता सरली आहे..!

pethkar.shyamrao@gmail.com

loading image
go to top