ती तेव्हा तशी...

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? हा अनाहत आणि अव्याहत असा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता अवघे आयुष्य निघून जाते अन् तरीही हाती काहीच लागत नाही.
ती तेव्हा तशी...
Summary

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? हा अनाहत आणि अव्याहत असा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता अवघे आयुष्य निघून जाते अन् तरीही हाती काहीच लागत नाही.

माणूस निसर्गापेक्षाही स्वत:ला मोठं सिद्ध करायला निघालेला असतो. तो निसर्गाचंही पालकत्व स्वीकारण्याच्या बाता मारत राहतो म्हणून मग प्रजोत्पादनाची ती भूल, ते आकर्षण म्हणजेच प्रेम असे तो समजतो. देहाच्या पलिकडे प्रेमाचा शोध घेता घेता तो ऐहिक होतो. देहाशी अन् देहाच्या नैसर्गिक गरजांशी प्रेम नकळत जोडून टाकतो.

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? हा अनाहत आणि अव्याहत असा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता अवघे आयुष्य निघून जाते अन् तरीही हाती काहीच लागत नाही. वाहत्या पाण्यात हाताची ओंजळ घालून थंड, प्रवाही आणि म्हणून शुद्ध वाटणारं पाणी ओंजळीत भरून घ्यावं... ही क्रिया करताना पाण्याच्या ऊबदार गुदगुल्या हाताला अन् म्हणून अवघ्या अस्तित्वाला होत राहतात. माणूस आतबाहेरून मोहरून निघतो. पाणी म्हणजेच ती अनुभूती आहे असा समज होतो; अन् मग ते ओंजळभर पाणी जपून ठेवावं. पाणी घेऊन निघावं तर पाझरून जातं... हात ओले असतात काही काळ अन् मग तेही कोरडे होतात... प्रेमाचंही अगदी तसंच असतं. त्याच्या कविता होतात, कथा होतात, कहाण्या होतात... प्रेमाच्या अनुभूतीचा शोध घेण्याचा हा प्रयास असतो. काही काळानं ती निर्मिती हाताच्या रिकाम्या ओंजळीसारखी असते. त्यात जे सापडलं म्हणून मांडलेलं असतं ते प्रेम नव्हतंच हा सारांश काळ समोर सरकल्यावर आपल्या मन:पटलावर उद्धृत होत राहतो... एका साहित्यिकाला विचारलं, ‘प्रेम म्हणजे काय असतं?’ त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर होतं, ‘‘प्रेम ही निसर्गानं आपलं प्रजोत्पादनाचे कार्य काढून घेण्यासाठी जिवांना पाडलेली भूल असते.’

थोडं परखड, कोरडं अन् कोडगं वाटणारं हे मत आहे. वास्तव तसं असतं. इतर प्राणी निसर्गाच्या अधिक जवळचे अन् खऱ्या अर्थाने निसर्ग संतान असतात. माणूस निसर्गापेक्षाही स्वत:ला मोठं सिद्ध करायला निघालेला असतो. तो निसर्गाचंही पालकत्व स्वीकारण्याच्या बाता मारत राहतो म्हणून मग प्रजोत्पादनाची ती भूल, ते आकर्षण म्हणजेच प्रेम असे तो समजतो. देहाच्या पलिकडे प्रेमाचा शोध घेता घेता तो ऐहिक होतो. देहाशी अन् देहाच्या नैसर्गिक गरजांशी प्रेम नकळत जोडून टाकतो. माणसाने स्वत:च काही भास निर्माण केले आहेत; अन् त्या भासांचे सत्य शोधण्याचा तो प्रयत्न करतो. परमेश्वर हा तसाच भास. भक्ती ही भावनाच त्या भासातून निर्माण झालेली. त्यामुळे तिलाही तसले काही अस्तित्व नाही. माणसं जमिनीवर राहतात, मातीच्या जिवावर जगतात आणि करुणा मात्र आभाळाची भाकतात. आभाळ हा आभासच. त्याला अस्तित्व नाही. माणसाची दैवतं आभाळात राहतात... सत्याच्या शोधासाठी, दर्शनासाठी त्याने धर्म, पोथ्या, विचार, कर्मकांड यांचा बाजार मांडला; पण त्याचे सत्यही अस्तित्वाच्या पलिकडचे. आकारहिनाचा शोध घेण्यासाठी तो आकारात बांधलेल्या मूर्तींची पूजा बांधतो... प्रेमाचेही तसेच. ते जेव्हा त्याला सापडते तेव्हा मात्र तो घाबरून पळतो... तिनेही तेच केले!

स्निग्ध निळा प्रकाश पाझरत राहिलेला त्या कक्षात. ‘कोऽहम्?’चा शोध घेण्याची साधना करण्याचं ते ठिकाणं. त्यासाठी माणसानं धर्म, अध्यात्म निर्माण केलं. त्याचेच मग खूप सारे पंथ निर्माण झाले. त्या पंथ, संस्था, अध्यात्मिक गुरूंनी अंतिम सत्याचं दर्शन घेतल्याचा त्यांचा दावा अन् मग आम्ही सांगतो तेच अंतिम सत्य म्हणत त्यांना गवसलं भासात. तेच सांगण्याचे नव्हे, थोपविण्याचे अनेक मार्ग... कुणाला करुण म्हणजेच सत्य वाटतं, कुणाला सेवा म्हणजे सत्य वाटतं, कुणाला अहिंसा म्हणजेच सत्य वाटतं, कुणाला बलिदान हेच सत्य वाटतं... अशाच एका मार्गाचा उद्‌घोष करणारी तीही संस्था. त्या संस्थेच्या त्या शाखेची ती प्रमुख. तरुण, आकर्षक, सुंदर, लुब्ध व्हावं अशीच ती. ती आता तिच्या खळखळत्या झऱ्याच्या प्रवाहाच्या झुळझुळत्या स्वरात आदेश देत होती. ‘‘डोळे बंद करा. आत आत पाहा तुमच्या...’ प्रत्येक शब्द ती माणकांसारखा तोलून हळुवार उच्चारत होती. हळू आवाजातली धमकी जास्त परिणामकारक असते. तिच्या आदेशांचा परिणाम होत गेला आमच्यावर. ‘आता आजूबाजूचे आवाज टिपा... हळूहळू ते आवाज विसरा. आता निरव शांतताच आहे सगळीकडे...’’ असं काय काय ती सांगत होती. माझ्या सोबत तो होता. मित्र. घडीव शरीराचा. पुरुषी सौंदर्य असलेला. कुरळ्या केसांचा. साऱ्यांनी परमेश्वराच्या दर्शनासाठी डोळे मिटलेले. तिचेही डोळे मिटलेले अन् मिटल्या डोळ्यांची ती प्रेममय सौंदर्याची पुतळाच भासत होती. तो मात्र उघड्या डोळ्यांनी आपल्या परमेश्वराने दर्शन घेत असलेला. जिथे प्रेम असते तिथे परमेश्वर असतो, असे म्हणतात. तो तिच्यात ते पाहात होता. तिचे डोळे मिटले असले तरीही त्याचे तिच्याकडे पाहणे इतके आर्त प्रेमाचे की तिला ते बंद डोळ्यांच्या आतही जाणवत राहिले असावे. हे असे रोजचेच. त्याच्यासाठी मलाही तिथे जावे लागायचे, नाहीतर आम्ही तसेच मुलुखाचे नास्तिक. मात्र, तो आता त्याला तिच्यात आस्था असल्याने आम्ही त्या ध्यानधारणेच्या प्रयोगांना हजेरी लावू लागलेलो.

तिला त्याचे ते तसे असणे आवडत असावे. ध्यानानंतर प्रार्थना अन्‌ पूजा झाल्यावर ती प्रसाद वाटायची. सा‍ऱ्यांना तेव्हा तिने त्याला लडिवाळ दटावले होते, ‘‘संजयजी, ध्यान आँखे बंद कर के किया जाता है!’’ नंतर त्याला मी समजावले. एकतर प्रेम करण्याची ती जागा नाही अन् प्रेमात पडावे, अशी ती व्यक्ती नाही. कारण अंतिम सत्याच्या दर्शनाच्या मार्गाची एक पांथस्थ म्हणून तिने ऐहिक जीवनाचा त्याग केलेला... तो म्हणाला, ‘‘तिचे डोळे बंद असूनही माझे पाहणे तिला कळते, याचा अर्थ लक्षांत नाही का आला तुझ्या?’’ ती अंतिम सत्याच्या दर्शनासाठी आतूर आहे अन् प्रेम हेच अंतिम सत्य आहे, असाही याचा युक्तिवाद.

त्यांची ही समाधीसाधना बरेच दिवस सुरू राहिली. ती त्याला प्रसाद देताना नेमके काही बोलायची. आस्थेने चौकशी करायची. एकदा तर तिने प्रसाद स्वीकारताना एका हाताची ओंजळ कशी असली पाहिजे, हे त्याचा हात धरून त्याला समजावले... तिने त्याला केलेल्या स्पर्शाची त्याची अनुभूती पराकोटीची होतीच; पण पाहताना मलाही झिणझिण्या आल्या इतके ते सारे मधुरेने भरलेले होते. महिन्यातून एकदा ज्येष्ठ साधिका यायच्या. त्याच्या अनुभवी नजरेत हे सारेच आले. त्यानंतरच्या प्रसाद देण्याच्या वेळी ती त्याला म्हणाली, ‘‘उद्यापासून तुम्ही नका येत जाऊ साधनेला...’’ एवढेच म्हणून ती तडक निघून गेली. उरलेल्यांना तिने प्रसाद दिलाच नाही. असे पाठ फिरवून जाताना तिने आवंढा गिळल्याचे त्यालाच जाणवले...

मग आम्ही तिकडे जाणे बंद केले. एखादे व्यसन सोडल्यावर जसे आतुर अवघडलेपण येते तसेच त्याचेही झालेले. उन्हाळाही भडकू लागलेला. त्याच्या असोशीने कहर केला अन् मग त्याने तापच काढला. मी त्याच्यासाठीच तिकडे जायचो. त्यामुळे आता मला काही कारण नव्हते आश्रमात जाण्याचे... त्याचा ताप खूपच चढत गेला. काळजी वाटावी असा.

एक दिवस बाजारात गेलो असताना अचानक ती माझ्या समोर आली. ‘वो नही आतें तो आप भी नही आते...’ असे म्हणाली. हा प्रश्न होता की निमंत्रण ते मला कळले नाही. थोडे अडखळत, स्वत:ला विस्कटलेपण सांधत तिने विचारले, ‘वो... वो... आप के मित्र कैसे है?’’ त्याच्याबद्दल विचारताना तिचे डोळे लालसर झाले होते. घसा कोरडा पडल्यागत वाटत होता.

‘खूप ताप आहे त्याला... उतरतच नाही.’ असे मी नकळत बोलून गेलो. ती घायाळ नजरेने पाहात राहिली. तिला आणखी काही विचारायचे असावे; पण तितक्यात तिला त्या ज्येष्ठ साधिकेने हाक दिली. टळटळीत दुपार वैशाखातली. पारा पंचेचाळिशीच्या पार गेलेला. ती भेटूनही आता चार दिवस होऊन गेलेले. रखरखीत दुपार... एक रिक्षा थांबली. त्यातून ती उतरली. आमच्या वस्तीच्या प्रवेशालाच माझे घर असल्याने ती मला दिसली. उन्हाने कर्दावलेली. मी दिसताच तिला बरे वाटले. ‘कहां है उनका घर?’ मी तिला पाण्याबद्दल विचारत असताना तिने प्रश्न केला. तिला थोडाही उशीर व्हायला नको होता... मी तिला त्याचे घर दाखविले. घेऊनच गेलो तिला त्याच्या घरी.

ती त्याच्या आईच्या पाया पडली. आश्रम मे आतें है ना इसलिए... असं काहीसं पुटपुटली. मग त्याला भेटली. मी त्याच्या खोलीतून बाहेर आलो. ते दोघेच होते अर्धा तास तरी... तिला काही बोलून दाखविण्याचे कारणच नव्हते. तिचे येणे हेच तिच्या प्रेमाची कबुली होती.

तो बरा झाला. चालता-फिरता झाला अन् मग आम्ही त्या आश्रमात गेलो धारणेचे कारण काढून... कळले, तिचे स्थानांतर करण्यात आले होते की तिनेच ते दुसरे ठिकाण मागून घेतले होते..! तो येईलच कधीतरी याची खात्रीच असल्याने तिने त्याच्यासाठी चिठ्ठी ठेवली होती. ‘बस इतनाही था... हो सकता था!’, असे त्यात लिहिलेले!

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com