औषधांचा असाही लळा

पुस्तकांइतकाच त्याला औषधांचाही लळा. डॉक्टरांनी प्रीस्क्राईब केलेली अनेक औषधे तो लक्षात ठेवायचा अन् त्याचा संग्रह असायचा त्याच्याकडे.
Medicine
MedicineSakal
Summary

पुस्तकांइतकाच त्याला औषधांचाही लळा. डॉक्टरांनी प्रीस्क्राईब केलेली अनेक औषधे तो लक्षात ठेवायचा अन् त्याचा संग्रह असायचा त्याच्याकडे.

पुस्तकांइतकाच त्याला औषधांचाही लळा. डॉक्टरांनी प्रीस्क्राईब केलेली अनेक औषधे तो लक्षात ठेवायचा अन् त्याचा संग्रह असायचा त्याच्याकडे. वेळी-अवेळी कुणाला काही दुखलं-खुपलं तर लोक बिनदिक्कत त्याच्याकडे यायचे अन् हा त्यांना औषध द्यायचा. त्यांच्याकडे दुखल्या-खुपल्याला औषध मिळते हे हमखास माहिती होतं. त्यामुळे हा महिन्याला हजार-दीड हजाराची औषधे स्वत:च्या पैशांनी वाटायचा.

दत्तात्रय माधवराव घरात तसा खालून दुसरा. त्याच्यापेक्षा एक लहान भाऊ होता. (आहे अजून) त्या काळानुसार त्यांचा खटला मोठा. मध्यमवर्गीय; कधी निम्न-मध्यमवर्गीय गटात डुबकी मारणारे कुटुंब. रहाटगाडा चालवण्यासाठी जे चटके बसतात, ते अर्थातच समोर आघाडीवर असलेल्यांना बसतात किंवा जाणवतात तरी. त्या अर्थाने दत्तात्रय माधवराव तसा सुरक्षित राहिलेला. त्याला असे कुठले धक्के तेव्हा बसले नाहीत. त्यामुळेही असेल कदाचित, आणीबाणी वाटेल अशी स्थिती आली की हा हलून जायचा. मोठी जबाबदारी आली की चीडचीड करायचा. घाबरायचा. अगदी ते मग बहिणीचे लग्न असो, की आणखी काही.

मला त्याचे तसे ते घाबरणे आवडत नव्हते. नर्व्हस व्हायचा तो. खूप विचार करायचा एखाद्या गोष्टीचा. या जगात मीच काय तो बिचारा आहे, अशी सचिंत मुद्रा करून बसलेला असायचा खुर्चीवर पाय वर करून...

खरे तर त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे हे जाणवत राहायचं. मी दुरून ते बघत असायचो; पण त्याच्या जवळ मात्र कधी जाता आलं नाही. त्याच्या अस्तित्वाच्या अंतपुरात आम्हा भावंडांना जाताच आलं नाही. (जाऊ दिलंच नाही.) आता खूप उशिराने जाणवतंय, की त्याच्यात आणि आम्हा भावंडांत हे अंतर राहावं याची काळजी त्या दोघींनी नेणिवेच्या पातळीवर फार आधीपासून घेतली. आमच्यात कायमच भाबडा कौटुंबिक स्नेहभाव असल्याने आम्हाला ते तसे कधी जाणवले नाही. त्याच्या मायेच्या दुभत्यावर बहिणीचा अधिकारच राहावा यासाठी कायम प्रयत्न केले गेले... तीपण नकळत मानभावीपणे तसे प्रयत्न करायची. मोठ्या भावाचं पदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर तो मास्टर्स करत होता; मात्र त्याने आता नोकरीला लागावं, असं वातावरण तयार केलं गेलं. दत्तात्रय माधवरावचा स्वभाव डिप्रेस्ड मानसिकतेवर आधारलेला. त्यामुळे त्याच्या निवृत्तीला खूप वेळ असला तरीही याच्या घाबरटपणामुळे मोठ्याने आता नोकरी केली पाहिजे हे भिनवले गेले. बहीण मग सेकंड इयरला असतानाही कुणी आले, की ‘‘माझ्यासाठी नोकरी बघा ना... आता पदवीपर्यंत आले मी. त्यांच्या भरवशावर कुठवर राहायचं ना?’’ असं ती म्हणायची. बघा! मुलगी काम शोधते आहे अन् हा बघा कसा बसला आहे, असा विचार इंजेक्ट झाल्यावर हा मग मोठ्याकडे मोठ्ठे डोळे करून रागानं बघत राहायचा.

तो निवृत्त झाला तेव्हा त्याला आणखीच बिचारा करण्यात आलं. निवृत्तीच्या वेळी लेकीचं लग्न, मोठ्याला नोकरी व लग्न, घर आणि मला नोकरी लागलेली असं असतानाही त्याला मायलेकींनी बिच्चारा करून टाकलं. खरं तर पेन्शन बऱ्यापैकी होती. आम्हाला जेवढा पगार त्यापेक्षाही दुप्पट, तिप्पट त्याची पेन्शन होती. त्यानंतर मी लहान्याला माझ्याकडे घेऊन गेलो. त्याची जबाबदारी स्वीकारली. तोही कसाबसा नोकरीला लागला. त्यापेक्षा लहाना काम शिकत कमवत होता. तरीही तुम्ही निवृत्त झालात म्हणजे आर्थिकदृष्ट्या अपंगच झालात, अशी भावना करून देऊन, आता मुलांनीच तुम्हाला दरमहा रक्कम पाठवायला हवी, अशी धारणा करून देण्यात आली. मुलं आपापल्या मार्गाला लागली असताना अन् ती तुमच्याकडे अडचण असूनही कसलीच मागणी करत नसताना ‘निवृत्त बिचारा बाप’ करून याच्या मनात आमच्याविषयी दुरावा निर्माण करण्यात आला. याची मुलं नालायकच आहेत, अशीच धारणा बाळसे धरून सुदृढ झालेली.

त्यामुळे लग्नानंतर दिवाळीला घरी गेलं, की किमान आता तरी तुमचा खर्च तुम्ही करायला हवा, दिवाळीचा खर्च तरी तुम्ही करायला हवा, तुमच्या मुलांचे दूध तरी तुम्ही आणायला हवे, अशीच याची मानसिकता असायची. ‘निघ माझ्या घराच्या बाहेर’ हे चार दिवसही आपण माहेरपणाला (मुलांनाही माहेरपण असतं) गेलो असाताना याची टॅग लाईन झाली होती.

इतका साक्षेपी वाटणारा, प्रचंड वाचन असलेला, कमालीचा सुसंस्कृत असा हा इतका कसा काय कुणाच्या कह्यात जातो ते कळलंच नाही. त्याच्या पुस्तकाच्या अलमारीबद्दल मला कायम आस्था राहिली आहे अन् तिथवर पोहोचण्यात कुठली अडचण नव्हती, कारण अध्यात्मिक असल्याचे सोंग आणणाऱ्या ‘ती’ला साऱ्या‍ भौतिक बाबींचीच ओढ होती. पुस्तकांपर्यंत मी पोहोचायचो.

एकदा माय घरी नव्हती अन् बहिणीचे लग्न झाले असल्याने घराचा चार्ज माझ्याकडे. मी सांजेला एका ऑस्ट्रेलियन ऑथरचे सेक्सचा अभ्यास करून लिहिलेले पुस्तक वाचत असताना हा अचानक आला. मी भ्यायलो. हा म्हणाला, ‘‘वाच, पण त्याला कव्हर घालून घे...’’ अन् त्याने मला मग मास्टर अँड जॉन्सनचे ‘सेक्स अँड ह्युमन लव्हिंग’ हे पुस्तकही काढून दिले. या वयात वाचायला हवे, असे म्हणाला. त्याच्या वागणूक आणि निर्णयांतून एकलव्यासारखे व्यवहार आणि त्यातली सचोटी, सावधता आपसूक शिकायला मिळाली.

पुस्तकांइतकाच त्याला औषधांचाही लळा. डॉक्टरांनी प्रीस्क्राईब केलेली अनेक औषधं तो लक्षात ठेवायचा अन् त्याचा संग्रह असायचा त्याच्याकडे. तिकडे आमचं घर गावाबाहेरच्या कॉलनीत असल्याने वेळी-अवेळी कुणाला काही दुखलं-खुपलं तर लोक बिनदिक्कत त्याच्याकडे यायचे अन् हा त्यांना औषध द्यायचा. त्यांच्याकडे दुखल्या-खुपल्याला औषध मिळते, हे हमखास माहिती होतं. त्यामुळे हा महिन्याला हजार-दीड हजाराची औषधे स्वत:च्या पैशांनी वाटायचा.

त्याचे ते औषधांचे डबे आजूबाजूला पडलेले असत. लहान मुलं आली की याच्याकडे हमखास बिस्किटाचे पुडे किंवा चॉकलेटस् असत... इतकं आपण औषधाळलेलं व्हायचं नाही, पुस्तकं वाचण्यापेक्षा जिवंत माणसं वाचायची अन् अजिबातच घाबरायचं नाही, इतकं भयगंडाने पछाडलेपण आपल्यात येऊच द्यायचं नाही, असा ठाम निर्धार होता; मात्र आता माझा माझ्या घरी औषधांचा एक डबा आहे. आवडीने मी इतरांना साध्यासुध्या व्याधींवर औषधं सुचवतो. कारण नसताना काही औषधे व्हिटॅमिन म्हणून मी घेतो. बिस्किटांचे पुडे माझ्याहीकडे पडलेले असतात अन् पुस्तकं इतकी जमा केलेली आहेत, आता ठेवायला जागा नाही...

दत्तात्रय माधवराव माझ्यात असा भिनत गेला आहे. फक्त कुणाच्या चलाखीत येऊन आपल्याच लेकांमध्ये दुजाभाव करून आज तो जसा पश्चाताप करतो आहे, तशी वेळ मी माझ्यावर नक्कीच येऊ देणार नाही.

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com