पाझरणारा पाऊस

दिवस ओंजळभर पाऊस रात्रीच्या ओटीत टाकतो नि मग रात्र पावसाला जोजवत राहते. रात्रीनं कितीही अंगाई गीतं गायिली, तरीही पाऊस निजत नाही.
Rain
RainSakal
Summary

दिवस ओंजळभर पाऊस रात्रीच्या ओटीत टाकतो नि मग रात्र पावसाला जोजवत राहते. रात्रीनं कितीही अंगाई गीतं गायिली, तरीही पाऊस निजत नाही.

रात्री पाऊस कोसळायला लागला की, आसमंताच्या श्वासांवर हिरवी साय धरते. पाऊस अंगावर झेलायला मग हिरवं विखारी जग बाहेर पडतं. मागच्या श्रावणझडीत गावाबाहेरच्या मंदिरात नंदादीपाभोवतीच असलेल्या उजेडात त्याने तिचा चेहरा ओंजळीत भरून घेतला होता. त्याच्या मिठीत कोसळताना सांज टळून गेल्याचे तिच्या लक्षातही राहिले नाही. तिच्या ओठांच्या रेखीव वळणांवरून त्याचे अस्तित्व ओघळत गेले. त्यांचे देह पेटले तेव्हा नंदादीपानं फडफडत डोळे मिटून घेतले. तिच्या मिटलेल्या डोळ्यांतून तो आत आत पाझरत राहिला...

दिवस ओंजळभर पाऊस रात्रीच्या ओटीत टाकतो नि मग रात्र पावसाला जोजवत राहते. रात्रीनं कितीही अंगाई गीतं गायिली, तरीही पाऊस निजत नाही. रात्रीचाही मग डोळ्याला डोळा लागत नाही. पाऊस आपला संथगतीने रिपरिपत असतो. रात्रीचे सारेच सोबती मग पापण्या न लवता पावसाची बंडखोरी डोळाभर साठवत असतात. झाडं आपली थंडीची शिरशिरी अंगात भिनत असताना चिंब उभी असतात. झाडं मग पानांच्या पापण्यांवर पाणी तोलून धरतात. पाऊस असा पानांवर तोलून धरल्याने पाण्याचे मोती होत नाहीत, हे झाडांना अनुभवाने माहिती झालेलं असतं. मग अचानक जाग आल्याने पाय मोकळे करायला वारा सैरभैर फिरतो. वारा आला की झाडं पानांवरचा जलभार झटकून हलकी होतात. पाऊस तेव्हा थोडा मंदावला असतो.

पावसानं उसंत न घेता धावपळ सुरू ठेवली की, जमिनीच्या गर्भात ओलाव्याच्या सावलीत दडलेली बेडकं बाहेर निघतात. त्यांना रात्र कळत नाही. तसाही त्यांना अंधाराचाच सराव असतो. जमीन अंधार पोटात दडवून उजेडाच्या पालख्या वाहत असते. मग जमिनीची कूस उजवून बाहेर पडणाऱ्या हरेक जिवाला उजेडाचं आकर्षण असतं. बेडकंही रात्रीचा अंधार निसवून उजेड शोधत असतात. अचानक पानांवर ओघळणाऱ्या पाण्यानं त्यांना कंठ फुटतो. पाऊस या हाकेला ओ देतो आणि सर धावून येते.

घराच्या वळचणीला उभी गाय पावसापासून अंग चोरत केविलवाणं हंबरून घेते. तिचं लेकरू सयसंध्याकाळी कुठे उनाडलं ते तिलाच कळत नाही. त्याचा हा पहिलाच पाऊस. मातीच्या गंधानं ते उनाडलं होतं. गल्लीतली पोरं दिवसभर त्याच्याशी दंगा करीत होती नि ते वासरू उंडारत होतं. पण रात्रीचा पाऊस वेगळा असतो. रात्री पाऊस कोसळायला लागला की, आसमंताच्या श्वासांवर हिरवी साय धरते. पाऊस अंगावर झेलायला मग हिरवं विखारी जग बाहेर पडतं. लेकराच्या बाळशिंगांवर मान धरून गळा खाजविण्याची गाईला सवय झालेली. ती मग खरबरीत भिंतीलाच खाजवीत सुटते.

दम्यानं बेजार म्हातारा डोळ्यांतला अंधार अंगठ्याने निपटून काढण्याचा प्रयत्न करीत उगाच बाहेर येतो. माणसं उचलून नेणारे हात केव्हाही आपली मानगूट धरतील, ही भीती त्याचे अस्तित्व व्यापून उरलेली. मधल्या खोलीत झोपलेल्या लेक-सुनेचे उसळते श्वास उगाच त्याला अस्वस्थ करतात. मिणमिणत्या डोळ्यांवर थरथरता हात धरतो आणि पावसाचे थेंब त्याच्या शरीरभर बोचू लागतात. त्याला भिंतीशी बसायचंय. तो एक दगड गाईच्या दिशेने भिरकावतो. पावसाच्या दोन थेंबात जितकं अंतर असतं, तितकं अंग आक्रसून घेण्याचा प्रयत्न करीत गाय पळते. उगाच झाडाला अंग घासते. थरथरत्या फांदीवरून पाणी गळतं. मग ती परत लेकराच्या आठवणीने व्याकूळ होते. तिच्या हंबरण्यात ओलावा दाटून आलेला. खोलवर अंधारातून प्रतिसाद येतो. खुरांनी अंधार तुडवीत ती दिसेनाशी होते. मग केवळ हंबरण्याचे थोराड व कोवळे आवाज ऐकू येत राहतात...

कुणीतरी ढग पिळून आभाळाच्या चाळणीतून पाऊस गाळीतच असतं. घरांच्या छतांवरून, निसरड्या झालेल्या झाडांच्या फांद्यांवरून आंधळा पाऊस जमिनीवर ओघळत राहतो. जमिनीचं अंग-प्रत्यंग व्यापून पाऊस मग साचत राहतो. कोस पांघरून बिळात दडून बसलेली पिवळीजर्द नागीण पाण्याच्या आगावूपणावर फुसकारत बाहेर पडते. कातडी चढलेल्या तिच्या डोळ्यांनी पावसाचे थेंब धूसर दिसतात. डांबरी रस्ता ओलांडण्यासाठी तिची जडावलेली वळवळ सुरू राहते. खरेतर तिला अंगावर चढलेलं हे कातडी कवच दूर सारायचंय, पण दिवस भरायचेत. त्यातच ही रिपरिपणारी ओलेती रात्र आलेली. जड अंगाची वेटोळी करून नागीण रस्त्यावरच पडून राहते. पंखात मान खुपसून पावसाचा निषेध करीत ढोलीत बसून असलेलं घुबड या सूक्ष्म हालचालींनी चाळवलेलं वातावरण टिपून घेतं. गर्रकन् डोळे फिरवीत तो हुंकार भरतो. झोपडीतील विधवा आपल्या लेकराला झोपेतच पोटाशी ओढते. मनोमन देवाला हात जोडते. हा अभद्र आवाज आला की, कुणाचं तरी सौभाग्य धुतलं जातं. पावसानं निसरडी झालेली रात्र आणि अशा दळभद्री आवाजानं तिच्या आयुष्यात कायम भळभळणारी जखम केलेली. गळत्या घरात खिडकीपाशी उभं राहून ती भरपावसात पेटत राहते. ढोलीतलं वखवखलेलं घुबड अगतिक नागिणीवर झडप घालण्याचा प्रयत्न करते. ती उसनं अवसान आणून फणा उगारण्याचा प्रयत्न करते. पावसाच्या थेंबातून ओघळणारा अंधार चिरत दूर कुठूनतरी दिवे चमकतात. कुठलेतरी वाहन धडधडत जाते. नागीण आचका देते. विदग्ध विधवा खिडकीशी उभ्याउभ्याच पेंगायला लागलेली. वळचण भेदून भिंतींवरून पाझरणारा पाऊस तिच्या केसांमधून वक्षात पाझरत जातो. पाऊस असा, नको त्याला, नको तेव्हा जाळत जातो. तिच्या काळजातल्या स्वप्नांची बाग हिरवी होते. पाऊस स्वप्नांच्या समाधीवरही हिरवळ फुलवितो. ती मात्र अशाच चिंब ओल्या रात्री उसळत्या गात्रांच्या रेशीमबंधातली धडपड आठवून धपापत्या उराने डोळ्यांत दाटलेल्या अश्रूंची वाफ होऊ देते. दूर कुठेतरी मंदिरात टाळ-मृदंगाचा ध्वनी क्षीण होत वाऱ्यावर पसरत असतो. पाऊसही मग अभंगात भिजण्यासाठी देऊळ जवळ करतो.

रात्र अधिक काजळी धरते. पाण्यानं तट्ट फुगलेल्या दूर रानातल्या झोपडीच्या कुडाशी बिलगून जळत राहते. पाऊस मग ओळींची आरास मांडतो. झोपडी चहुबाजूंनी पाझरत जाते. गळणाऱ्या झोपडीत मांडून ठेवलेली भांडीदेखील ओसंडून वाहू लागलेली. तापानं फणफणलेल्या लेकराचा गोळा कोपऱ्यात ठेवून डोळ्यांत प्राण आणून माय-बाप पाऊस चुकवीत उभे. रात्र डोळ्यांत जळू लागलेली. डोळ्यांच्या कड्यावरून कोसळणाऱ्या धारांनी पदर चिंब झालेला. पावसाने पाऊलवाट तुडवून टाकल्याने गाव एकटं सापडलेलं. एकाकी गावावर पावसाने उभ्या रात्री संततधार धरलीय्. लेकराच्या असह्य कण्हण्यानेही पावसाला पाझर फुटत नाही. झोपडी चिखलात फसत जाते. दोन्ही हात बांधून माय आभाळाची करुणा भाकते. असहायपणे बाप कंदिलाच्या आडोशाने लांबलेल्या उदास सावलीत उभा राहतो. आर्द्र कपड्यांत लपटलेला तो जीव पावसाने करपलेला. रान उसवणीला आलेलं. पहिल्या पावसाच्या येण्यानं जमिनीची भूक वाढते. उफाणलेली जमीन वाफलेल्या काळजाला बी मागते. बी पडतं. रुजतं. कोवळा कोंब आभाळ कवेत घेण्याचे नखरे करतो अन् रागावलेल्या वऱ्हाड्यांसारखा पाऊस मंडप सोडतो. जमिनीशी नातं तोडतो. पोपटी जीव ओठात धरून बाहेर पडलेलं रोप मान टाकतं. अवघा हंगाम त्याच्या डोळ्यांतून बरसू लागतो. जमीन बी मागते. बी पैसा मागते. माना टाकलेली पिवळीजर्द कोवळीक पाऊस कुजवून टाकतो. अवघ्याची माती होते. मातीत लोळलेलं तापल्या अंगाचं लेकरूही मातीत मिसळण्याची वाट बघत बसलेलं. जमिनीचे अन् त्या लेकराचे मायबाप मात्र मुठीत आभाळ लपवून हिरवी स्वप्नं बघत असतात...

पाऊस रात्रभरात यमुनेचा डोह तुडुंब भरून टाकतो. भरल्या डोहाकाठच्या थोरल्या झाडाखाली बसून भरपावसात ती दिवे सोडीत असते. अशाच कोसळत्या रात्री तो परत येईल, असा तिचा विश्वास आहे. मागच्या श्रावणझडीत गावाबाहेरच्या मंदिरात नंदादीपाभोवतीच असलेल्या उजेडात त्याने तिचा चेहरा ओंजळीत भरून घेतला होता. त्याच्या मिठीत कोसळताना सांज टळून गेल्याचे तिच्या लक्षातही राहिले नाही. तिच्या ओठांच्या रेखीव वळणांवरून त्याचे अस्तित्व ओघळत गेले. त्यांचे देह पेटले तेव्हा नंदादीपानं फडफडत डोळे मिटून घेतले. तिच्या मिटलेल्या डोळ्यांतून तो आत आत पाझरत राहिला... आपल्या अस्तित्वाची पाऊलवाट तिच्या उदरी पेरून तो निघून गेला. कृष्णकमळाची फुलं लेवून ती पाऊस कोसळत्या रात्री डोहात दिवे सोडत बसते. एक एक दिवा विझत जातो आणि तिला वाटतं, तो अधिक जवळ आलाय. सारे दिवे निजतात. अंधार होतो आणि अशा अंधारात नेणिवेच्या पातळीवर त्याचे स्पर्श तिला वेड लावू लागतात. तेव्हा रात्र तरुण आणि पाऊस ज्वान झालेला असतो...

pethkar.shyamrao@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com