वाट पायाशी अडखळली असताना...

आरस्पानी नजरेचा एक पांथस्थ भरदुपारी तिच्या दारी थांबला. त्यानं भुकेजली हाळी दिली. त्यातही काकुळती नव्हती. देहभान म्हणून तो सोपस्कार होता, याची जाण होती.
Road
RoadSakal
Summary

आरस्पानी नजरेचा एक पांथस्थ भरदुपारी तिच्या दारी थांबला. त्यानं भुकेजली हाळी दिली. त्यातही काकुळती नव्हती. देहभान म्हणून तो सोपस्कार होता, याची जाण होती.

आरस्पानी नजरेचा एक पांथस्थ भरदुपारी तिच्या दारी थांबला. त्यानं भुकेजली हाळी दिली. त्यातही काकुळती नव्हती. देहभान म्हणून तो सोपस्कार होता, याची जाण होती. ती दाराशी आली. तिच्या डोळ्यात रोखलेली त्याची नजर करुणेची होती. स्त्रीत्वाला बोचकारे काढणारे काहीही त्यात नव्हते.

नियतीकडे पाठ फिरवून चालता येतं का, असा प्रश्‍न एक नदी ओलांडून गावात शिरत असताना त्याला का पडावा? नदीच्या गुडघाभर पाण्यातून बाहेर पडल्यावर तो अंजनाच्या झाडाजवळ काही काळ थांबला. वस्त्रावरचे पाणी निथळू दिले. अंजनाच्या कोड पडल्यागत पांढऱ्या खोडावर काही काळ विसावला. नदीच्या प्रवाहाजवळ जाऊन परत तो पाणी ओंजळीत घेऊन प्यायला. चेहऱ्यावर पाणी शिंपळून तो तसाच ओल्या चेहऱ्याने शेतवाटेला लागला... आजकाल तो असाच चालत राहतो. पाण्याच्या संपर्कात आला, तर ओला होतो. उन्हाने कोरडा होतो. पायवाटांनादेखील त्याच्या पावलांची सवय व्हायला नको म्हणून तो त्याच वाटेला परत जात नाही. वाटांची ओळख वाढवत नाही. सलगी तर दूरच... वाटांशी सलगी करून कुणाची तरी वळणावर वाट बघणं त्यानं केव्हाच मागे टाकलं आहे.

वाटा तुमच्या कधीच नसतात. चालणाऱ्याला त्या हव्या त्या ठिकाणीच पोहोचवतातच असेही नाही... आजकाल असे शहाणपणाचे उद्गार त्याच्या मनात उमटतात. गुरुजींची ती वाणी नसते; पण अशा चिंतनांना त्यांच्या आशीर्वादाचा स्पर्श असतो. गावाच्या मठात दरवळणाऱ्या अपौरुषेय सुगंधासारखा, दरवळणारा मऊसुत स्पर्श...

गावात तो शिरला तेव्हा कुणीच त्याला भेटलं नाही. गावशिवारातील शेतांवरून त्यानं नजर फिरवली अन् त्याला जाणवलं, हे गाव वेगळं आहे. स्त्रियांचं करारी, घरंदाज नाजूकपण शेतातल्या हिरवाईवर दाटून आलं होतं. चिरेबंदी वाड्यातल्या आलमारीत स्वच्छ कपड्यांच्या नीट घड्या लावून ठेवाव्या तशी शेतात रोप उभी होती. गाव नीटनेटकं, देखणं होतं. तिथे माती होती; पण मूळ गाव कसं सारवल्यागत होतं. कुणीतरी रांगोळीत रेखाटावं तसं रेखीव होतं. रांगोळीतल्या सुबक ठिपक्यासारख्या घरासमोर तो उभा राहिला. घरातून एक देखणी तरुणी पुढ्यात येऊन उभी झाली.

‘मी एक फिरस्ता आहे. तेवढीच मी माझी ओळख देऊ शकतो. तुमच्या दारात भिक्षेसाठी उभा आहे.’’

‘आपण माझ्या डोळ्यात डोळे रोखून याचना करीत आहात...!’’

‘माझी याचना क्षुधेसाठी आहे. क्षोभासाठी नव्हे.’’

‘हे शब्दांचे खेळ झाले.’’

‘नाही, क्षुधा प्रांजळ असते. निष्पापही. नजर चोरावी लागते, चेहरा फिरवावा लागतो तेव्हा मनात पाप असतं... नितळ जिवांना पाप कळतं अन् जे जाणते असले की क्षुधादेखील..!’’

त्या गावात प्रथमच एका स्त्रीची नजर खाली वळली, कोवळी सलज्ज झाली. यावेळची भावनांची उलाघाल वांझ नाही, हे तिला जाणवलं. समोरच्या अभ्यागताशी बोलत राहावं, असं तिला वाटलं. असं वाटण्याचे अर्थ आणि परिणामदेखील त्या गावात वेगळे होते. तरीही तिनं मान वर केली; पण... पण तो निघून गेला होता. घराचा उंबरा तिला उगाच भकास वाटला.

तो मात्र सरळ निघाला. साधकाला असाध्य असं काहीतरीच वाटू नये, भेटूदेखील नये. त्याचा मार्ग वेगळा होता. या एकाच प्रसंगावरून भाकीत गाठावं असं काहीच नव्हतं; पण साधक सावधही असावा. त्याची साधना त्याच्या साध्यावरून ठरतात. तो आनंदाचा साधक होता. त्याचा आनंदही साधनेतच होता. महत्त्वाचे म्हणजे या फिरस्तेपणापलीकडे त्याला अद्याप दुसरा ‘आदेश’ आलेला नव्हता. तो वळला मात्र तिच्या अस्तित्वाचा दरवळ पाठीलाच लागून होता. त्या पाठशिवणीची मागणी काहीच नव्हती, मात्र दुसऱ्याचं ओझं वाहणाऱ्या हमालागत त्याला वाटलं. तिन्ही सांजा मिळाल्या तेव्हा तो नदीच्या पात्रात पाय घालून गुरुस्मरणात लीन झाला होता. ती तिथे आली. प्राजक्ताचं फूल टपटपावं तसं समर्पित भावानं त्याच्या शेजारी बसली.

‘भिक्षा घेतल्याशिवायच निघून आलात?’’

‘जिथे अडखळतील तिथे थांबायचं नाही, अशी पावलांना आता सवयच झाली आहे.’’

‘तुम्ही आहात कोण?’’

‘त्याचं उत्तर मला मिळालं की तुम्हालाही सांगता येईल...’’

‘यापूर्वी तुमची पावलं कुठे अडखळली होती?’’

तो नुसता हसतो. आवडतं त्यावर लगेच मालकी वाटू लागते. त्यातून असे प्रश्न निर्माण होतात.

‘तुम्ही अंतर्मुख झालात... त्या अर्थाने विचारले नव्हते मी... अडखळण्याचा अनुभव असला की निसटण्याचं कसब शिकवावं लागत नाही.’’

‘मी सावध असलो तरी सावज नाही.’’

‘मीदेखील शिकारी नाही. तशी या गावात परवानगीदेखील नाही.’’

‘कां?’’

‘गावात पुरुष देवतांची मंदिर आहेत. ऐतिहासिक पुरुषांचे पुतळे आहेत, त्यांच्या नावाचे उत्सवदेखील होतात. इतिहासातील पुरुषांचा आदर करतो. वर्तमानातले पुरुष हे केवळ साधन आहेत आमच्यासाठी. त्यातला एखादा आदर्श ठरू लागला की आम्ही त्याला संपवितो. म्हणजे ठारच मारतो अन् त्याचे पुतळे करतो...’’

पुढे ती बोलत राहिली. आपुलकीनं, पोटतिडकीनं.

आरस्पानी नजरेचा एक पांथस्थ भरदुपारी तिच्या दारी थांबला. त्यानं भुकेजली हाळी दिली. त्यातही काकुळती नव्हती. देहभान म्हणून तो सोपस्कार होता, याची जाण होती. ती दाराशी आली. तिच्या डोळ्यात रोखलेली त्याची नजर करुणेची होती. स्त्रीत्वाला बोचकारे काढणारे काहीही त्यात नव्हते. ती त्याच्या पायाशी बसली.

‘वाड्याला वारस हवाय, तुमच्याकडूनच...’

तो निघून गेला... जाताना एवढंच म्हणाला, बीज टाकून जाणं हे प्राक्तन असतं. ते वाढविणं हे जीवन. त्या अर्थाने तुम्ही जीवन असता. बीज टाकल्याची जाणीवही नसलेल्या पाखरांना एवढं महत्त्व का द्यायचं? वाढविणं तुमच्या हातात असताना? सामर्थ्यानं शौर्याचं दास्यत्व कशाला पत्करायचं? बीजाला शौर्याचं मूळ असलं तरी कूळ मात्र सामर्थ्याचंच असतं. तू समर्थ आहेस... मला शौर्य आणि सामर्थ्य यांच्या पलीकडे जायचं आहे. मी प्रवासीच आहे...

pethkar.shyamrao@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com