रानवाऱ्याचा गारवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Village
रानवाऱ्याचा गारवा

रानवाऱ्याचा गारवा

गावाला वेढा घालून बसलेली एक नदी आहे. तिच्या वळणांवर धुकं नाचू लागलं की, ती अंतर्बाह्य थरारते. नदी आता एकटी आहे. काही वर्षांपूर्वी गच्च रानानं तिच्यावर सावली धरली होती. गाव आणि रान यांच्यात नदीची सीमारेषा होती. गाव नदी ओलांडून रानात जात नव्हते. मग रानातले वारेच तेवढे नदीवरून गारवा घेऊन गावात शिरायचे...

निवडुंगालाही कधी कधी फुलं येतात. नेमक्या ऐन थंडीत. तरीही फुलं ही काही निवडुंगाची ओळख नसते. मोगरा म्हटलं की फुलच डोळ्यासमोर येतं आणि श्वास आरक्त होतात. गुलाब म्हटलं तरी काटे मनातही येत नाहीत; पण निवडुंग म्हटलं की, जाणिवेच्या पातळीवर फुलं येतच नाही. निवडुंगाचे फुलणे हे कौतुक आणि कुतुहलाचे असते. हिवाळा म्हणजे निवडुंगालाही फुलविणारा ऋतू आहे. फुलणे ही निवडुंगाची ओळख नसली, तरी ती हिवाळ्याची चाहूल मात्र आहेच. हेमंतानं कड पालटला अन् पारा थोडा खाली घरंगळला की निवडुंग फुलतो. ते त्याच्या हातचं नसतं. पण निवडुंगाचं असं फुलणं शिशिरातल्या पानगळीला वाकुल्या दाखविणारं असतं. हिव एव्हाना माजघरात पोहोचलं असतं. अवघं घर गारठलं असताना धुक्याचा पातळ पडदा बाजूला सारून घरात येणारी उन्हाची तिरीप आपली वाटू लागते. हेमंत आता सरतो आहे की शिशिराला सुरुवात होते आहे, हे अगदी नेमकं सांगता येणार नाही. तसं ते कुठल्याच ऋतूबाबत नेमकं सांगता येत नाही. ऋतूंच्या आपल्या खाणाखुणा असतात, पण त्यांचे चेहरे मात्र सारखेच असतात.

ऋतूंचे असे संपणे आणि नव्या ऋतूचे सुरू होणे, पंचांगात दाखविता येईल नेमके; पण ऋतूंची गळाभेट होऊन ते सोबत बागडू केव्हा लागले, ते मात्र सांगता येत नाही. थंडीच्या अंगावर केव्हा काटा आला अन् कुठल्या झाडाचे पान आधी गळले, हे सांगता येत नाही. एकतर पानगळीची नोंद झाडं ठेवत नाहीत. पानंही फांदी सोडताना कुठल्याच खाणाखुणा मागे ठेवत नाहीत. पिकलेलं पान शिशिराची वाट बघत नाही; पण हेमंतात निवडुंगाला फुलं येतात अन् शिशिरात पानं पिकतात, असं मात्र म्हणता येतं. थंडी अंगभर पेटते आहे, तेव्हा लवकरच पानगळ सुरू होईल. झाडं आता सावध झाली आहेत. निश्चल, निर्विकार मृत्यूची बातमी अंधाऱ्या खोलीतून केव्हाही पाझरेल म्हणून उभ्या असलेल्या आप्तांसारखी झाडं शहारली आहेत. पण नेमस्त आहेत. कारण पानगळ ही मृत्यूइतकीच अटळ असते, हे झाडांना सांगावं लागत नाही. मग नेमक्या कुठल्या क्षणी कोणत्या झाडाचं पान हलकेच गळून तळ गाठेल, याची भविष्यवाणी करता येत नाही. शिशिर आला की झाडं विनातक्रार पानं गाळत बसतात. उन्हालाही न जुमानणारी पानं थंडीत मात्र गळून पडतात. थंडी कडाडली की संवेदना बोथट होतात. मग गळून पडण्याच्या वेदना पानाला आणि फांदीलाही होत नसाव्यात. ऋतूंची भाषा झाडांना नेमकी कळते. ते ऋतूंशी त्याच भाषेत बोलतात. उन्हाळ्यात मुळाशी सावली धरतात अन् हिवाळ्यात पानं गाळून मुळांना उन्हं देतात. म्हणूनच गळत्या पानाच्या कविता होतात. झाडांनी गाळलेल्या पानांवरच्या कविता, वारा गावात आणतो. गाव त्याची गाणी करतं...

गावाला तशीही या वेळी गाण्यांचीच गरज असते. वर्षातले सण संपले की, गावाला संक्रमणाचे वेध लागतात; तरीही गावातले उत्सव संपलेले नसतात. उत्सव गाण्यांशिवाय होत नाहीत. गाणी फुलारलेल्या निवडुंगाची असो की पर्णहीन वृक्षांची असोत, पण नवी हवीत. ‘तालेवार’ हवीत. कवितेचा अर्थ सुरांच्या तालावर नाचू लागला की गाणी तालेवार होतात. सुगीच्या वासानं गावात येणारे कलावंत एकेकट्याने येऊन गेलेले, पण मग त्यांची जत्रा भरते. उत्सवाला उत्साहाचं निमित्त लागतं. मग गावात हागोडबाबाचीही जत्रा भरते.

गावाला वेढा घालून बसलेली एक नदी आहे. तिच्या वळणांवर धुकं नाचू लागलं की, ती अंतर्बाह्य थरारते. नदी आता एकटी आहे. काही वर्षांपूर्वी गच्च रानानं तिच्यावर सावली धरली होती. गाव आणि रान यांच्यात नदीची सीमारेषा होती. गाव नदी ओलांडून रानात जात नव्हते. मग रानातले वारेच तेवढे नदीवरून गारवा घेऊन गावात शिरायचे. हेमंत वारे असे वाहू लागले की, पाणी शहारायचे अन् मासोळ्यांचे डोळे गारठायचे. त्या मग आपसूकच जाळ्यात सापडायच्या. काळाकभिन्न नागो अशा वेळी ऐन सांजेला नदीत जाळं सोडून काळ्या कातळासारखा निवांत बसून असायचा. चेहऱ्यावरून अवघी सांज निघून गेली की, अंधारात जाळे ओढून मासोळ्यांचा लखलखाट टोपल्यात भरायचा. बकऱ्यांसाठी पाला घेऊन येणारा गुराखी अन् नागो मग गावाकडे चालू लागायचे, तेव्हा त्यांच्यामागे बकऱ्या मंतरल्यागत चालत असायच्या. डोंगर उतरणीला हे चित्र मोठे बोलके अन् हमखास. गव्हाच्या हिरव्या गारव्यातून एखादाच कष्टकरी त्यांच्यात क्वचित मिसळायचा; पण कधी वेळा चुकतात. चुकलेल्या वेळेचे गणित मग पिढ्यान् पिढ्या जमवत बसतात. पाण्याचा तांब्या घेऊन नागो ऐन सांजेला भल्याथोरल्या दगडाआड गेला अन् वाघाने झडप घातली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना जाळ्यात थरथरून शांत झालेल्या मासोळ्या अन् नागोच्या हाताचा केवळ अंगठाच सापडला. हिवाळ्यातल्या वेदनांचेही उत्सव होतात. कधीतरी कुणी त्याच नदीच्या तीरावर नागोची समाधी बांधली. वाघाने असा घात करू नये म्हणून महादेवाचे मंदिरही...

गाव वाढत गेले. नदीची सीमारेषा पुसट झाली. अशा वेळी मंदिराचा आकार वाढतो. गावाने रान गमावलं की न दिसत्या ब्रह्मराक्षसाची भीती मानगुटीवर बसते. मग घरांना मंदिराची सुरक्षित ऊब हवी असते. हागोडबाबाचं मंदिर झालं, वाढलं अन् वाघ नेस्तनाबूत झाले. माणसांनीच मग कोंबड्या-बकऱ्या मारणे सुरू केले. जत्रा सुरू झाली. उत्साहाला निमित्त मिळालं अन् उत्सव सुरू झाला.

सण संपले की संक्रमणाआधी ही जत्रा भरते. पानगळीच्या साक्षीनं उत्साहाला उधाण येतं. जत्रेत झुले असतात अन् झुल्यांना लयबद्ध गाणी लागतात. पाटलाच्या वाड्याच्या परकोटात मैदानावर दंडारीची तालीम चालते. थंडीही जोर पकडू लागते. शेकोट्या पेटतात. पाटलाच्या गोठ्यातून सरपण आणून आग धगधगती राहते. डफ तापवून ताणले जातात. चहाचा रतीब सुरू असतो अन् मास्तर गाण्यांना चाली देतो. टिपऱ्या तालात निनादू लागतात. पावलं ठेका धरतात. डफ तडतडू लागले की, गोरखनाथाचा पिंपळ सैरभैर होतो. गोठ्यातली गुरं दावणीला हिसके देत घाबरत राहतात. दंडार घुमू लागते. थंडीच्या कडाक्यात शेकोट्या उबवीत गावगप्पा सुरू होतात. दंडारीची नाचरी पावलं गावात अन् गावोगावी जातात. मालकाच्या वाड्यावरही... वाड्याच्या गच्चीतून कोवळी मालकीण अदबशीर प्रतिसाद देते. दंडारवाल्यांचा उत्साह वाढतो. पाठीवर कौतुकाची थाप पडते अन् झोळ्या जडावतात. गावांच्या अंगात थंडीसोबत दंडारही भिनत जाते. गावची जत्रा दंडारीसह नाचू लागते. वसंत रंग उधळायला लागला की, दंडार ओसरू लागते. होळीच्या भल्यामोठ्या शेकोटीभोवती दंडार अखेरचं नाचून घेते.

झाडं पानापानांतून हसण्याआधी त्यांना पानगळ सोसावीच लागते. या पानगळीतच वसंताचे संदर्भ असतात. एक मात्र नक्की की, पानं गळून ओक्याबोक्या झालेल्या झाडाला विळखा घालून बसलेल्या वेलीची पानं मात्र गळत नाही. उघड्या अंगावर शाल लपेटावी तशी ती झाडं दिसतात. ऋतूंच्या संधिकाळाचं प्रतीकच. मग काही दिवसांनी वेलच गळून पडतो. पानं गाळली नाही की असं होतंच.

pethkar.shyamrao@gmail.com

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top