धुक्यात गवसली वाट

सिंहगडाच्या वाटेवर ती जिप्सी गाडी मध्यम वेगानं धावत होती. गाडीमध्ये अनिल-सुनंदा (अनिल अवचट आणि सुनंदा अवचट) त्यांच्या मुली मुक्ता-यशो आणि मी... आमच्या सोबत त्या सहलीवर होती कमळी. हे अर्थातच तिचं खरं नाव नाही.
sinhagad fort travel muktangan rehabilitation center pune
sinhagad fort travel muktangan rehabilitation center puneSakal

- डॉ. आनंद नाडकर्णी

सिंहगडाच्या वाटेवर ती जिप्सी गाडी मध्यम वेगानं धावत होती. गाडीमध्ये अनिल-सुनंदा (अनिल अवचट आणि सुनंदा अवचट) त्यांच्या मुली मुक्ता-यशो आणि मी... आमच्या सोबत त्या सहलीवर होती कमळी. हे अर्थातच तिचं खरं नाव नाही.

पुण्यामध्ये आमचे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र सुरू होऊन जेमतेम दोन-अडीच वर्षे झाली असतील. स्त्रियांसाठीचा व्यसनमुक्ती विभाग, ‘निशिगंध’ पुढे अनेक वर्षांनी प्रत्यक्षात आला, तेव्हा सुनंदा आपल्यात नव्हती. तर त्या काळात कमळीच्या व्यसनाधीनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी तिला अनिल-सुनंदानं त्यांच्या घरीच ‘ऍडमिट’ केलं होतं.

सिंहगडाच्या मुख्य किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी पार्क करून आम्ही वर चढायला लागलो. माथ्यावर पोचलो तेव्हा पावसाळी हवा होती. ढग उतरले होते जमिनीवर... वारा वाहायचा, थांबायचा. ढग जमायचे, विलग व्हायचे. अनिल-सुनंदा आणि मुली एकत्र होते. मी आणि कमळी वेगवेगळे फिरत होतो. ढगांमुळे अंदाज नव्हता येत अंतराचा... कोण व्यक्ती कोणाच्या जवळ आहे किंवा लांब !

अनिल-सुनंदाच्या घरी राहायला येताना मोठ्या मेहनतीनं सामानात लपवलेली दारूची बाटली घेऊन कमळी आली होती. त्या वातावरणात तिची आसक्ती जागृत झाली होती. ढगांच्या त्या पडद्याआड लपून तिथं सफाईनं त्या बाटलीतल्या पेयाचे घोट घ्यायला सुरुवात केली आणि... वाऱ्याने ढग विस्कटले.

आम्ही सारे एकमेकांपासून दहा-बारा फुटांच्या अंतरावर होतो. कमळी ‘फ्रिज’ झाली होती. सुनंदा शांतपणानं पुढं गेली. तिच्या हातातली बाटली, सहजपणे घेतली आणि म्हणाली, “ चल जेवायला.” सुनंदानं त्यातलं रसायन फेकून दिलं.

जवळच्या पिशवीत बाटली टाकली आणि ती पुढं चालू लागली. मी कमळीकडे गेलो. तिनं माझा हात घट्ट पकडला. आम्ही दोघे सुनंदाच्या पाठीपाठी चालत होतो. ‘कमळी पळून गेली तर...’ माझ्या डोक्यात शंका आली. आणि मीही तिचा हात घट्ट पकडला.

पिठलं-भाकरी आणि मडक्यातलं घट्ट दही खाऊन आम्ही घरी परतेपर्यंत अनिल-सुनंदानं वातावरण अगदी खेळकर ठेवलं. त्यानंतर तासभर सुनंदा कमळीबरोबर बोलत बसली. त्यानंतर खूप वर्षांनी मी आणि कमळी भेटलो. तेव्हा ती व्यसनमुक्त होती.

या क्षेत्रातच काम करत होती. तेव्हा सुनंदा मात्र नव्हती. ‘‘ तो माझा एक ‘टर्निंग पॉइंट’ होता,’’ कमळी मला सांगत होती. “सुनंदा मला ओरडू शकत होती. माझ्याशी न बोलता स्वतःची नाराजी दाखवू शकत होती. पण तिनं यापैकी काहीच केलं नाही.

त्या संध्याकाळी आम्ही चर्चा केली माझ्या ‘Craving’ अर्थात आसक्तीवर. बाटली लपवून आणताना, संधी शोधताना, घोट घेताना माझ्या मनात आलेल्या विचारांवर... खरं सांगू, माझ्या मनाला ‘शुद्ध’ करणारा अनुभव होता तो.’’ कमळी सांगत होती.

व्यसनी व्यक्तींबद्दलचा विनाअट स्वीकार होता सुनंदाच्या मनात. त्याशिवाय ती असे ‘गृह’ उपचाराचे प्रयोग करायला धजली नसती. सुनंदाजवळच्या पिशवीला खूप खण असायचे. त्यातल्या एका खणात तिची पाण्याची चपटी बाटली असायची.

ती बाटली होती, एका उंची मद्याच्या ब्रँडची. मित्रपरिवारापैकी एका घरात ती रिकामी बाटली सुनंदाच्या नजरेत भरली होती. “ही माझ्या बॅगेच्या कप्प्यात छान फिट्ट बसेल” म्हणून तिने ती वापरायला घेतली.

पुढं एकदा, मी आणि सुनंदा मुक्तांगणमध्ये एकत्र पेशंट पाहत होतो. समोरच्या फाइलवर, पेनच्या विविध रंगांमध्ये ती सुबक नोट्स काढायची. समोरचा रुग्ण नुकताच ऍडमिट झाला होता. बोलता बोलता सुनंदाने पिशवीतून ‘ती’ पाण्याची बाटली काढली.

दोन घोट घेतले. मी पेशंटचा चेहरा पाहत होतो. त्यानं ती बाटली अगदी बरोब्बर ओळखली होती. सुनंदा त्याच्याकडं बघून मोकळेपणी हसली. बाटलीचं झाकण लावत म्हणाली, “तुझ्या जे मनात आहे ते आता या बाटलीत नाही... आपल्या दोघांना एकच बाटली आवडली... तुला ती अल्कोहोलनं भरलेली असताना भावली... मला रिकामी असताना आवडली.”

“सॉरी... मॅडम...” तो पुटपुटला.

“कशाबद्दल सॉरी? बाटली पाहता क्षणी तुझ्या मनातले जे नातं, जी जुळणी जागृत झाली ना त्यालाच आपण म्हणतो अनिवार इच्छा... आसक्ती.” सुनंदा बोलत गेली. रुग्णाबरोबरच्या प्रत्येक संवादाला, समुपदेशनाच्या कोणत्यातरी तत्त्वात कसं गुंफायचं हे सहजपणानं जमायचं तिला.

ती मला म्हणायची, “तू या पेशंटच्या औषधाचं बघ... मी बोलते.” माझ्या प्रिस्क्रिप्शनमध्ये ती बदल नाही करायची. उलट कौतुक करायची. मी तिच्याकडून हरक्षणी शिकायचो. पुढं तिला कॅन्सरबरोबर सामना करायला लागला. त्या काळानंतर तिच्यातलं सर्वदात्री ‘आईपण’ कसं बहरलं ते आम्ही सगळे अनुभवायचो.

तिच्या या स्टाईलच्या अगदी विरोधात भासणारी शैली होती, माझ्या एका सरांची. त्यांचे नाव डॉ. दिनशॉ डुंगाजी. पंचेचाळीस वर्षांपूर्वी मुंबईतले नामांकित तज्ज्ञ डॉक्टर्स, दर दिवसातले चार-पाच तास महानगरपालिकेच्या रुग्णालयांसाठी राखून ठेवायचे.

डुंगाजी सर हे मनोविकारशास्त्राचे असे ऑनररी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख. सरांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त. गोरापान रंग, भेदक डोळे, पांढराशुभ्र वेश आणि ‘पारशी’पणाची सारी गुणवैशिष्ट्यं ठासून भरलेली.

ओपीडी मध्ये पेशंट्स पाहतानाच त्यांना धूम्रपानाची हुक्की यायची. त्यांची खासगी प्रॅक्टिस भक्कम होती. उंची परदेशी सिगारेट ओढायचे. तर एकदा मी त्यांच्यासमोर, मद्यपाशात असलेल्या एका पेशंटची हिस्टरी सादर करत होतो. मनःपूर्वक ऐकताना त्यांचे डोळे किंचित बारीक व्हायचे. मान हलायची. माझं बोलणं संपवून आता सर बोलणार तसा समोरचा पेशंट त्यांना म्हणाला, “आप खुद सिगारेट पी रहे हो तो मुझे कैसे कह सकते हो शराब छोडने के लिए?”

माझे ठोके ठकाठक चुकले. सरांनी हातातली सिगारेट ॲश-ट्रे मध्ये आवेशानं चुरगाळली आणि त्याच्या डोळ्यात पाहत दोन-तीन भरभक्कम पारशी-इंग्रजी आणि पारशी भारतीय शिव्या घातल्या. “तू तिथं बसला आहेस आणि मी इथं... टेबलाच्या दोन विरुद्ध बाजूंना...

का ते ठाऊक आहे x x x? कारण मी सिगारेट जशी पेटवू शकतो तसा विझवू शकतो... आणि तू एकदा प्यायला सुरुवात केली तर टाईट झाल्यावरही पीतच राहतोस... कळलं?” हा संवाद पारशी-इंग्रजी-हिंदीमध्ये रूपांतरित करा तुम्ही. तो पेशंट अवाक झाला होता. मी त्याला घेऊन बाहेरच्या खोलीत आलो.

त्याला आम्ही ऍडमिट केले. सर त्याची नियमित विचारपूस करायचे. त्यानंतरच्या काळात तो बदलला. अल्कोहोलिक ॲनॉनिमसच्या बैठका नियमितपणे करू लागला. काही महिन्यानंतर ‘फॉलो-अप्’ला आला तेव्हा मी त्याला सरांकडे घेऊन गेलो.

आता सरांचं रूप वेगळंच होतं. त्यांच्या शिव्या कधीकधी शाबासकीचं रूप घेऊन यायच्या... “यू ब्लडी x x x ... करून दाखवला तू!” ते म्हणाले. “तुझा रिस्पेक्ट म्हणून मी तुझ्यासमोर स्मोक नाही करणार आहे.” तेवढ्यात आमचा वॉर्डबॉय प्रल्हादसिंह आम्हा डॉक्टरांसाठी देण्यात येणाऱ्या लिंबू सरबताचे ग्लास घेऊन आला.

“नो टोबॅको... नो अल्कोहोल... नो टी” असं म्हणत सरांनी त्याला सरबत पाजले. मी अवाक होऊन हा प्रसंग पाहत होतो. तो पेशंट अगदी खूश होऊन गेला. त्याच्या त्या आकृतीकडे पाहत सरांनी पुन्हा दोन-तीन शाबासकीच्या शिव्या प्रदान केल्या (हासडल्या नाहीत) आणि माझ्याकडं पाहत मिश्कीलपणानं म्हणाले, “मी दिसायला हत्तीसारखा आहे पण माझा मेंदूपण हत्तीसारखाच तीक्ष्ण आहे… नेक्स्ट!”

(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com