
रायन कूगलरचा ‘सिनर्स’ हा चित्रपट या वर्षाच्या सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या व जगभरात पाहिलेल्या चित्रपटांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. हा चित्रपट भयपटाच्या आकृतिबंधाच्या माध्यमातून अमेरिकेतील वांशिक द्वेषाचा इतिहास, कृष्णवंशीय व्यक्तींचा सांगीतिक इतिहास आणि श्वेतवर्णीयांनी त्या सांगीतिक परंपरेचे केलेले सपाटीकरण, असे मुद्दे मांडतो. चित्रपटाच्या गडद रंगसंगतीमधून केवळ त्यास पूरक अशा दृश्य प्रतिमा मांडल्या जात नाहीत, तर एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीकडे चालत आलेल्या संगीतमय शापाची कहाणी त्यातून उलगडते - एक असा शाप जो ब्ल्यूज संगीतामध्ये खोलवर रुजलेला आहे.