
गेल्या पन्नास वर्षापूर्वीचं ग्रामीण भागातील जिवंत चित्रण अनुभवायचं असेल तर बा. भ. पाटील यांचा ‘बदली आणि इतर कथा’ हा कथासंग्रह आवर्जून वाचायला हवा.
अस्सल गावरान मेवा
गेल्या पन्नास वर्षापूर्वीचं ग्रामीण भागातील जिवंत चित्रण अनुभवायचं असेल तर बा. भ. पाटील यांचा ‘बदली आणि इतर कथा’ हा कथासंग्रह आवर्जून वाचायला हवा. गावाकडील इरसाल आणि बेरकी मंडळी येथं ठायीठायी भेटतील. त्याचबरोबर साधीभोळी आणि मनानं निर्मळ असणाऱ्या माणसांचं ह्रदयस्पर्शी भावविश्वही लेखकानं उत्तमरीत्या उलगडलं आहे. प्रसंगनिष्ठ विनोद, अस्सल गावरान वातावरणनिर्मिती, खटकेबाज संवाद, नाट्यपूर्ण घडामोडी आणि धक्कातंत्राचा वापर करीत केलेला शेवट ही या कथासंग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. वाचकांना अस्सल गावरान मेव्याची चव यातून नक्कीच मिळते.
पाटील यांच्या निधनानंतर तब्बल ४१ वर्षांनी त्यांच्या पत्नी अनुराधा पाटील यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. उशिरा का होईना ‘बाभं’ चा मौलिक साहित्य ठेवा त्यांनी वाचकांसमोर आणला आहे, याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. मवाळ गुरुजींच्या बदलीचा फायदा लाटण्यासाठी सरपंच पलंगराव कुदळे यांनी टाकलेला फास आणि त्यात अडकत गेलेले गुरुजी आणि त्यांच्या पत्नीची होणारी ससेहोलपट ‘बदली’ या कथेत प्रभावीपणे मांडली आहे. सुरवातीपासून उत्कंठा वाढवणारी कथा शेवटच्या वळणापर्यंत रंगतदार झाली आहे.
गरीबी- श्रीमंतीमधील दरी दाखवणारी कथा म्हणजे ‘चोरावर मोर’ होय. आबासाहेब देशपांडे हे नेहमीच मारुती माळी यांना राबवून घेत होते. मात्र, वेळ येताच तेच ‘चोरावर मोर’ कसे झाले, हे समजून घेण्यासाठी ही कथा मुळातून वाचली पाहिजे. सरपंच किसनराव कुदळे हे गावातील विधवा राधावर डोळा ठेवून असत. ती व तिची संपत्ती आपल्या हाती यावी, यासाठी जंग जंग पछाडत होते. मात्र, राधानेच सरपंचांवर टाकलेल्या धोबीपछाड डावाची कथा म्हणजे ‘गावबोक्याची गोष्ट’ होय. ‘बाभं’नी अंधश्रद्धेच्या विरोधातही हलक्या फुलक्या शैलीत लेखन केले आहे. ‘स्टॉंग अंगारा’मध्ये शंकर शेलाराने अक्कलहुशारीच्या जोरावर बुवामहाराजांचे बिंग कसे फोडले, याची कहाणी वेगळ्या शैलीत मांडली आहे.
आपली मुलगी मोठ्या घरात जावी, अशी अनेक वधुपित्यांची अपेक्षा असते. नेमका याच परिस्थितीचा फायदा आबासाहेब इनामदारांनी उठवला. त्यासाठी त्यांनी काय ‘शक्कल’ लढवली व भक्कम हुंडा पदरात पाडून घेतला, हे समजण्यासाठी ‘शक्कल’ ही कथा मुळापासून वाचली पाहिजे. त्याचबरोबर `खुशीचा मामला’, ‘दौऱ्याचं त्रांगडं’, ‘मंत्र्यांचा मुक्काम’, ‘भावकी’, ‘सरपंच आणि पाखरू’, ‘देखण्या बाईची गोष्ट’, ‘खोकल्याचं औषध’, ‘लुंगी उडाली आकाशी’, ‘असली नकली’, ‘उचलबांगडी’, ‘कोर्टाची तारीख’ आदी कथांची भट्टी चांगली जमली आहे. संग्रहात एकूण २८ कथा आहेत. मनाचा ठाव घेणारी बोलीभाषा, समर्पक जुन्या म्हणी, ठसकेबाज उपमा यांच्यामुळे कथासंग्रहाची उंची वाढली आहे. त्याचबरोबर गुंतवून ठेवणारं कथानक आणि प्रसन्न करणारी विनोदी शैली यामुळं यातील कथा वाचकांच्या मनाला भिडतात.
Web Title: Sl Khutwad Writes Book Badli Aani Itar Katha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..