

Grandchild birth travel story
sakal
सारिका चाटुफळे-कुलकर्णी
एका मोठ्या शहरात एक म्हातारी बाई राहते; पण स्वतःला म्हातारी अजिबात समजत नाही. दर महिन्याला पार्लरलमध्ये जाऊन चेहरा ताजातवाना ठेवते. रोज जिममध्ये जाऊन स्वतःला तंदुरुस्त ठेवते; पण वय पुष्कळ असल्याने ती म्हातारीच! आपण त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणूया.
अशा या आजीबाईला एकदा जायचे होते दूर देशातील लेकीकडे. म्हातारीला खरे तर जायचे नव्हते. आजीबाई इकडे ज्येष्ठ नागरिक संघात रमलेल्या होत्या. रोजचा हास्यक्लब, योगा क्लासेस, कराओके क्लासेस या सगळ्यात खंड पडला असता. शिवाय ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहली, स्नेहसंमेलन हे सगळे सोडून जायचे आजीबाईंच्या जीवावर आलेले होते; पण काय करणार लेकीचे बाळंतपण होते. आपली नोकरी-चाकरी सोडून लेकीला इकडे बाळंतपणासाठी यायला वेळ नव्हता. लेकीच्या सासूने आणि म्हातारीने तीन तीन महिने वाटून घेतले. लेकीने डिझीगो कंपनीच्या विमानाचे तिकीट काढून पाठवले. इथल्या सगळ्या मैत्रिणींना, ज्येष्ठ नागरिक संघाला सोडवून म्हातारीला बाहेरच्या देशात जाववेना. तिने लेकीचे मन वळवण्याचा पुष्कळ प्रयत्न केलेला होता; पण लेकीपुढे तिचे काही चालेना. लेक म्हणाली, ‘‘आई, तुला बदलाची गरज आहे. तुझी तब्येत खूप खराब झालेली आहे. तू माझ्याकडे ये, छान सॅलड्स, पिझ्झा रोटी खा. जाडजूड हो. मग जा.’’ लेक आपली काळजी करते या भावनेने म्हातारीला आनंद झाला.