मला आई व्हायचंय

स्मिता जोशी
रविवार, 8 सप्टेंबर 2019

मी ३५ वर्षांची तरुणी आहे. माझ्या लग्नाला ७ वर्षं पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर पहिली दोन वर्षं मूल होऊ द्यायचं नाही, असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. त्यानंतर आम्ही अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणं सुरू ठेवलं.

मी ३५ वर्षांची तरुणी आहे. माझ्या लग्नाला ७ वर्षं पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर पहिली दोन वर्षं मूल होऊ द्यायचं नाही, असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. त्यानंतर आम्ही अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणं सुरू ठेवलं. परंतु, नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होत नसल्याने आम्ही वैद्यकीय सल्ला घेण्यास सुरवात केली. दोन वर्षं तसे प्रयत्न करूनही मूल झालं नाही. त्यानंतर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार ‘आययूआय’ आणि ‘आयव्हीएफ’ करून घेतलं. परंतु त्या प्रयत्नांमध्ये यश आलं नाही. आमच्या दोघांमध्ये कोणताही दोष नसताना, हे सर्व वैद्यकीय प्रयत्न करूनही मला गर्भधारणा होत नाही. मला आई व्हायचं आहे, त्यामुळे देवधर्म, कुळाचार जो जे सांगेल ते सर्व प्रयत्न करून मी थकले आहे. ‘आपल्याच आयुष्यात असं का?’ या विचारांनी मला झोप येत नाही. आपल्या जगण्यातच आता काहीही अर्थ राहिला नाही, असे विचार मनात येतात आणि आयुष्य संपवून टाकावं असं वाटतं. आई-वडिलांना माझ्या विचाराने त्रास नको म्हणून त्यांच्याजवळ मन मोकळं करता येत नाही. पतीला या सर्व गोष्टीचं कोणतंच गांभीर्य नाही. मी काय करावं मलाच समजत नाही. 
- प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ‘आई’ होणं ही खूप आनंददायी घटना असते आणि स्त्री त्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघत असते. परंतु, काही अडचणींमुळे मूल होऊ शकलं नाही तर आपल्या जीवनात काहीच अर्थ नाही हा विचार सतत करणं चुकीचं आहे. तुमच्या दोघांमध्ये कोणताही दोष नाही. तुम्ही वैद्यकीय उपचार आणि प्रगत तंत्रज्ञानानुसार मूल होण्यासाठी प्रयत्न केले; परंतु यश आलं नाही. हे सगळं खरं असलं तरी आता आयुष्यात कधीच ‘आई’ होता येणार नाही, हा विचारच तुम्हाला अधिक त्रास देत आहे. आई होण्यासाठी गर्भधारणा झालीच पाहिजे असं नाही. तुम्ही दोघांनीही पूर्ण विचार करून मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया समजावून घ्या. आपल्या आई-वडिलांचीही मानसिक तयारी करून घ्या. ज्या मुलाला आई-वडील मिळाले नाहीत, त्या मुलाचे आई-वडील तुम्ही होऊ शकता... ससून हॉस्पिटलजवळ ‘श्रीवत्स’ नावाची संस्था आहे, तेथे जाऊन तुम्ही याबाबतची संपूर्ण माहिती घ्या आणि तुमच्या दोघांची मानसिक तयारी झाली तर या मार्गाने तुम्ही ‘आई’ होऊ शकता. आयुष्यातला आनंद आपला आपणच शोधायचा असतो. नैराश्‍याचे विचार मनात येत असतात; पण ते वाढू द्यायचे नाहीत. नवीन मार्ग शोधत राहायचं. आयुष्यात जगण्यासारखं खूप आहे. फक्त आपण सकारात्मक राहणं गरजेचं आहे.

लग्नाच्या भीतीने पळून आले
मी पदवीधर तरुणी आहे. माझे वय २६ वर्षे आहे. माझ्या आई-वडिलांनी माझे लग्न ठरवले आहे. परंतु, मला ते लग्न करायचे नाही. माझे कोणावर प्रेम वगैरेही नाही. परंतु, मला लग्नच करायचे नाही. आई-वडील ऐकत नाहीत, म्हणून मी घर सोडून निघून आले आहे. मागील महिन्यापासून मी एकटी राहते आणि काही काम मिळवून माझी सोय करते. आई-वडिलांना कळवले आहे, माझा शोध घेऊ नका. माझी राहण्याची व्यवस्था कोठेही सुरक्षित ठिकाणी होऊ शकेल का? बाहेर फार वेगळे अनुभव येत आहेत. मला मार्गदर्शन मिळावे. 
- काही वेळेस आपल्या आयुष्याचे काही निर्णय आपण स्वतः घेऊन टाकतो, त्याच्या परिणामांचा विचार करीत नाही. आपल्याच विचारांवर ठाम राहून जगण्याचा प्रयत्न करतो. मग अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा वेळेस व्यावहारिक विचार करणे अधिक सोयीस्कर असते. ‘मला लग्नच करायचे नाही’ असे तू ठरवले आहे आणि त्याचप्रमाणे वागण्याचा तू प्रयत्न करते आहेस. या अट्टाहासामुळे तुला आज घर सोडून बाहेर पडावे लागले. पण समाजात एकटे राहण्यात सुरक्षितता नाही, हे तुझ्या अनुभवांमुळे तुझ्या लक्षात आलेले असेल. आपले घर आणि आपल्या कुटुंबापेक्षा कोणतीही सुरक्षित जागा आपल्याला मिळणार नाही. तुझी सध्याची अडचण लक्षात घेऊन तुला मी एका स्वयंसेवी संस्थेचा पत्ता देत आहे. तिथे अडचणीत असलेल्या स्त्रियांना सुरक्षित आसरा मिळेल. ‘स्नेहाधार’ - नारायण पेठ, पुणे. संपर्क क्रमांक ः ९०११०३३०११. या ठिकाणी तुझी तात्पुररती निवासाची सुरक्षित सोय होईल. तुझी निवासाची व्यवस्था झाल्यानंतर आई-वडिलांना तिथे बोलावून घे. या संस्थेमधूनही समुपदेशनाची सेवा तुला मिळेल. तुझ्या इच्छेविरुद्ध तुझे लग्न केले जाऊ नये, यासाठी तुझ्या आईवडिलांना समजावून सांगितले जाईल. तुला लग्न का करायचे नाही? लग्नाबाबत तुझे समज-गैरसमज काय? याचाही समुपदेशात विचार केला जाईल. तुझा कोणताही निर्णय असला तरी तो योग्य विचार करून तुला घेता येईल. घरातून निघून जाऊन, कुटुंबापासून बाजूला होऊन कोणतेच प्रश्‍न मिटवता येत नाहीत, त्यामुळे लवकरात लवकर तू तुझ्या कुटुंबात परत जाशील यादृष्टीनेच प्रयत्न होणे गरजेचे आहे.

मुलीचा संसार मोडू द्यायचा नाही
माझ्या मुलीच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी आणि जावई यांचं अजिबात पटत नाही. दोघेही एकमेकांना समजावून घेत नाहीत. सारखं भांडतात. दोघांनीही आता परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचं ठरवलं आहे. एक ‘बाप’ म्हणून मी मुलीचा संसार वाचवण्याचा खूप प्रयत्न करीत आहे. दोघांनाही समजावून सांगितलं. जावई आता माझं ऐकण्यास तयार नाही. मुलगीही ऐकत नाही. ‘बाईच्या जातीने थोडंसं अधिक समजावून घेतलं पाहिजे’, असं मी म्हटल्यावर तिला ते खूप खटकतं. तुम्ही तुमच्या जावयाची बाजू घेता, म्हणून ती माझ्याशी भांडते. कसंही करून मला मुलीचं मन वळवायचं आहे. दोन मुलं असताना तिचा घटस्फोट होऊ नये असं मला वाटतं. काय करता येईल? माझं काही चुकतंय का? 

- मुलीचा ‘बाप’ म्हणून तुम्ही जो विचार करता तो अगदी बरोबर आहे. आपल्या मुलांचा संसार मार्गी लागावा असं कोणत्याही आई-वडिलांना वाटतं. तुम्ही त्यासाठीच प्रयत्न करीत आहात. तुमचे प्रयत्न चुकीचे नाहीत, परंतु मुलीने माझं ऐकलंच पाहिजे हा अट्टाहास चुकीचा आहे. मुलीला तिचे निर्णय स्वतः घेऊ देत. पतीपासून घटस्फोट घ्यायचा की मुलांच्या भवितव्याचा विचार करून एकत्र राहायचं हा निर्णय घेण्यासाठी तिने सक्षम होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमची मुलगी आणि जावई यांच्यातील वादाचं मूळ कारण शोधून काढा. अशी कोणती गोष्ट आहे, की दोघं एकत्र राहूच शकत नाहीत? केवळ दोघांचे स्वभाव वेगळे आहेत एवढंच कारण असेल तर दोघांनाही पुढच्या गोष्टींच्या नियोजनाबाबत विचारा. घटस्फोट घेऊन दोघेही सुखी होणार आहेत का? मुलांच्या बाबतीत काय ठरवलं आहे? यावर तुम्ही चर्चा करा. एकत्र राहूनही अडचणी आहेत, विभक्त होऊन त्यापेक्षाही अधिक अडचणी आहेत. मग कोणत्या अडचणींना सामोरं जाणं अधिक सुसह्य होईल, याबाबत त्या दोघांनाच विचार करू देत. असे वाद मिटवताना बऱ्याच वेळा घरचा वैद्य उपयोगी पडत नाही म्हणूनच समुपदेशकांची मदत घेणंही योग्य ठरेल. बऱ्याच वेळा कसंही करून संसार वाचलाच पाहिजे, हा अट्टाहास करणंही योग्य नसतं, त्यामुळे त्या दोघांचं आणि त्यांच्या सततच्या भांडणामुळे मुलांचंही नुकसान होत असतं. त्यांच्यातील वादाचं कारण लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. त्या दोघांनीही समुपदेशन करून घ्यावं याबाबतीत तुम्ही त्यांना समजावून सांगा, त्यामुळे कोणता निर्णय घ्यायचा हे त्यांचं त्यांनाच ठरवता येईल. संपर्कासाठी : भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, कौटुंबिक समुपदेशन केंद्र, एरंडवणा, पुणे  फोन - ७०५८१०६६९१.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smita joshi article about married life issue