मनोव्यापारांचा मनोहारी खेळ (स्नेहल क्षत्रिय)

स्नेहल क्षत्रिय kshatriyasnehal09@gmail.com
रविवार, 18 मार्च 2018

शिरीष कुंदर दिग्दर्शित "क्रिती' ही शॉर्टफिल्म मनोव्यापारांचा मनोहारी खेळ मांडते. लेखकाची सर्जनशीलता आणि त्याच्या मनःपटलावर उमटणारे तरंग या गोष्टी शिरीष अतिशय उत्तम प्रकारे या शॉर्टफिल्ममध्ये मांडतो आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

शिरीष कुंदर दिग्दर्शित "क्रिती' ही शॉर्टफिल्म मनोव्यापारांचा मनोहारी खेळ मांडते. लेखकाची सर्जनशीलता आणि त्याच्या मनःपटलावर उमटणारे तरंग या गोष्टी शिरीष अतिशय उत्तम प्रकारे या शॉर्टफिल्ममध्ये मांडतो आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

लेखक सर्जनशील असतो, त्याच्या विचारप्रक्रियेतून तो विविध कल्पनांना जन्म देऊन अखंड साहित्यनिर्मिती करत असतो. बऱ्याचदा लेखकांना "न्यूरॉटिक' असं संबोधलं जातं- कारण त्यांच्या डोक्‍यात चालणारे खेळ अवाक करून टाकणारे असल्यानं, लिखाणाचा संबंध बऱ्याचदा त्याच्या मानसिक अवस्थेशी जोडला जातो. "क्रिती' ही काहीशी गूढ शॉर्टफिल्म याच गोष्टीवर आधारित आहे. सपन नावाच्या लेखकाच्या जीवनाशी; तसंच त्याच्यासारख्या लेखकांच्या मानसिक स्वास्थ्याशी ती निगडित आहे. लेखकाच्या मनातल्या विविध कंगोऱ्यांची आश्‍चर्यचकित करणारी गुंफण, या सूत्राभोवती बांधलेली ही शॉर्टफिल्म.

"धक्का देणारा ट्‌विस्ट आणि सस्पेन्स बियॉंड इमॅजिनेशन' या एका शब्दात या सायकॉलॉजिकल थ्रिलरचं वर्णन करता येईल. "जानेमन' आणि "जोकर'सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक शिरीष कुंदरनं या शॉटफिल्मचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या बाजू सांभाळल्या आहेत. ही 19 मिनिटांची शॉर्टफिल्म खिळवून ठेवते. सुरवातीच्या पाच मिनिटांत एका विशिष्ट रेषेत प्रवास करणारी ही शॉटफिल्म नंतर आपल्या कल्पनाशक्तीमधल्या विविध डायमेन्शनना चॅलेंज करते. त्या पाच मिनिटांत रहस्याचा मुख्य धागा हाती लागला, की पुढं कोणतीही गुंतागुंत होत नाही आणि तसं नाही झालं तर धक्कातंत्र अनुभवण्याचा एक वेगळा आनंद मात्र मिळतो, यात तिळमात्रही शंका नाही. वास्तव आणि कल्पनारम्यता यांतली सीमारेषा पुसून टाकणारी, प्रेक्षकांची आकलनशक्ती तापसणारी ही शॉर्टफिल्म अतिशय क्रिएटिव्ह आणि आवर्जून बघावी अशी आहे.

शॉर्टफिल्म सुरू होते, तेव्हा लेखक सपन (मनोज बाजपेयी) त्याच्यावर उपचार करणारी मानसोपचारतज्ज्ञ कल्पना (राधिका आपटे) म्हणजेच त्याच्या बालमैत्रिणीच्या क्‍लिनिकमध्ये बसलेला असतो. हे क्‍लिनिक काहीसं वेगळं आहे. थोडंसं रम्य, गूढ आणि अतिशय सुंदर. जाणूनबुजून कृष्णधवल रंग वापरून तयार केलेलं. क्‍लिनिकमध्ये या दोघांत अतिशय शांततेत महत्त्वपूर्ण संभाषण सुरू असतं. सपनच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी क्रिती (नेहा शर्मा) नावाची तरुणी आलेली आहे. जी त्याच्याप्रमाणंच एक लेखिका असून, आपण तिच्या प्रेमात असल्याचा सपनचा दावा आहे. शिवाय ते दोघं एकत्र राहत असतात, असंही तो कल्पनाला सांगतो. ते ऐकून कल्पनाला सपनच्या भूतकाळात त्याची रचना नावाच्या काल्पनिक तरुणीसोबत घडलेली प्रेमकहाणी आठवते. ती घटना त्याच्या मानसिक आजाराशी संबंधित असते, याची जाणीव कल्पनाला असल्यानं ती "प्रिकॉशन' म्हणून पुन्हा तसंच घडू नये यासाठी क्रितीच्या अस्तित्वाबद्दल काही प्रश्न सपनला करते. "ती खरंच आहे का', "रचनाप्रमाणंच तुझ्या कल्पनाशक्तीनं क्रितीला जन्म दिला आहे का' इत्यादी. अर्थात सपनला ते आवडत नाही आणि क्रितीला "ऍगोराफोबिया' नावाचा मानसिक आजार आहे ज्यात ती लोकांना घाबरते आणि लोकांना सामोरं जाऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण तो कल्पनाला देतो. इथं तो स्वतःचा बचाव का करताना दिसतो, याचं उत्तर कथा पुढं सरकत जाताना मिळतं. पुढं एक विचित्र घटना घडते आणि त्याचा शोध घेण्यासाठी इन्स्पेक्‍टर सृजन राणे (रिषी मानू) येतो. इथून पुढं कथा वळणं घेत जाते. ती शॉर्टफिल्ममध्येच बघणं इष्ट शिरीष कुंदरनं लिहिलेले संवाद सूचक असून, त्यानं दिग्दर्शन कौतुकास्पद आहे. कल्पनाच्या क्‍लिनिकमध्ये लावलेलं एका तरुणीचं क्रिएटिव्ह पेंटिंग अगदी सुरुवातीच्या काही सेकंदांत दिसतं आणि या सुंदर आणि रंजक शॉर्टफिल्मची पार्श्वभूमी काही अंशी स्पष्ट करून जातं. सपनच्या बंगल्यातलं भयभीत करणारं पेंटिंग, पुतळे भीतीत भर घालतात. सपनच्या नेमक्‍या आवडीनिवडींविषयी, मानसिकता याविषयी ते आपोआपच सांगून जातात. प्रत्येक टप्प्याला दिलेलं पार्श्वसंगीत त्या त्या प्रसंगांना लपेटून जाणारं आहे. एकेक छोट्याछोट्या गोष्टी शिरीष कुंदर टिपत जातो आणि कथेतले कंगोरे अधिक गहिरे करत जातो. सपनचा बंगला आणि त्याचं डिझाइन कथेला पूरक आहे.

राधिका आपटेनं मानसोपचारतज्ज्ञ आणि सपनची मैत्रीण असे दोन्ही कंगोरे असलेली भूमिका अगदी चोख आणि नेमकेपणानं साकारली आहे. मनोज वाजपेयी सायको लेखकाची व्यक्तिरेखा उत्तमरीत्या साकारतो. या भूमिकेच्या वेगवेगळ्या शेड्‌स तो अतिशय बारीकसारीक गोष्टींतून उभ्या करतो. निरागस क्रितीची व्यक्तिरेखा नेहा शर्मानं छान प्रकारे सादर केली आहे. पात्रांच्या नावांचाही रहस्यासाठी आणि कथेसाठी उत्तम पद्धतीनं वापर करून घेण्यात आला आहे. कथा पुढं सरकत जाताना मनात अनेक प्रश्न येतात. यातली सगळी पात्रं सपनच्या कल्पनेचा भाग आहेत, की त्यातलं काही अस्तित्वात आहे? नेमकं अस्तित्वात कोण आहे? लेखकाची भूमिका करणारा सपन "सायको' आहे, की त्याला जाणूनबुजून आभासी विश्वात रमायला आवडतं? अशी कोणती घटना घडते जी लेखक सपनचं "सायको' असणं किंवा नसणं ठरवते?...असे किती तरी प्रश्‍न. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शॉर्टफिल्म पुढं सरकत जाताना मिळत जातात. एकूणच मनोव्यापारांचा हा मनोहारी खेळ नक्की अनुभवावा असाच.

Web Title: snehal kshatriya write article in saptarang