स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी प्रवास (स्नेहल क्षत्रिय)

snehal kshatriya write article in saptarang
snehal kshatriya write article in saptarang

फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईसारख्या शहरात आलेल्या एका तरुणीची गोष्ट "गर्ल इन द सिटी' या वेब सिरीजमध्ये आहे. स्वप्नपूर्तीचा प्रवास सोपा कधीच नसतो. क्षणोक्षणी निर्णय घेत, मेहनत करत, भावनांची निरगाठ सोडवत स्वप्नं कशी प्रत्यक्षात आणायची हे सांगणारी ही सिरीज प्रेरणादायी आहे.

एखादं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण मेहनत घेतो; परंतु त्या मेहनतीला उत्तम विचारसरणीची जोड, जिद्द, क्षणोक्षणी लढण्याची हिंमत असेल, तर अशक्‍य काहीही नसतं. "गर्ल इन द सिटी' ही वेब सिरीज याच विषयावर नेमकं, अतिशय सुंदर आणि सकारात्मक भाष्य करते.

मीरा सेहगल (मिथिला पालकर) ही डेहराडूनमध्ये वाढलेली, 21 वर्षीय, उच्च मध्यमवर्गीय, फॅशन डिझायनर असलेली तरुणी. स्वप्नांच्या पंखांत बळ ओतण्यासाठी ती मुंबईचा रस्ता धरते. सुरवातीला पालकांचा विरोध असलेली मीरा त्यांना या गोष्टीसाठी राजी करण्यात यश मिळवते. तीन महिन्यांसाठी मुंबईतल्या एका "एम नाईन' या नामांकित फॅशन हाऊसमध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी मीराला मिळते. हटके, थोडीशी बिघडलेली बालमैत्रीण समीरा (स्वाती वत्स), हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत असलेला, निरागस, प्रामाणिक, आनंदी स्वभावाचा, स्वयंपाकात हुशार असलेला कार्तिक (रजत बरमेचा) आणि मीरा तिघंही एकत्र राहू लागतात. इथून मीराचा एक महत्त्वाकांक्षी प्रवास सुरू होतो. या सिरीजची मुख्य खासीयत म्हणजे अगदी लहानसहान गोष्टी, घटना, आजूबाजूची माणसं, रूममेट्‌ससोबत जगण्याचे विविध टप्पे, गंमतिशीर किस्से हे सारं तरुणांना अगदी "रिलेट' होत जातं आणि मनात एक विशिष्ट घर करतं. मीरा आणि समीरा या दोघींना चहादेखील करता येत नसल्यानं, सकाळीच पराठे करत असणारा कार्तिक त्यांना "सासरी जाऊन त्यांची पंचाईत होऊ शकते,' म्हणतो, तेव्हा पिढीमध्ये झालेले बदल लगेचच स्पष्ट होतात. जे स्वप्न इवल्याशा मुठीत घेऊन मीरा मुंबईच्या दिशेनं आलेली असते, अखेर त्या कथेला "एम नाईन' फॅशन हाऊसमध्ये सुरवात होते. स्वप्नांचा प्रवास वाटतो तितका साधा नसतो याची जाणीव मीराला होत असते, तरीही ते पूर्ण करण्याची तिची जिद्द प्रेरणादायी आहे. "ब्रॅंड न्यू इंटर्न' म्हणून रुजू झालेली बोलकी, हसरी, दिलखुलास मीरा एका उद्धट, स्वार्थी आणि तिटकारा उत्पन्न करणारी लेडी बॉस अवान हिच्या हाताखाली काम करू लागते. एका विचित्र महिला बॉसकडून वेळोवेळी होणारा अपमान पचवत मीरा तिच्या आयुष्याची शिडी चढत असते. मुळात हुशार आणि सर्जनशील असलेल्या मीराच्या कामाचं क्रेडिट घेणारी अवान या सिरीजमधल्या व्हिलनची भूमिका अगदी नेमकी साकारते. दरम्यान, कार्तिक आणि समीराच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना मीरा वेळोवेळी धावून जाते. नुकतेच कार्तिकसोबत आकर्षणाचे सूर जुळू लागलेल्या मीराला खोट्या आरोपाखाली फॅशन हाऊसमधून काढून टाकण्यात येतं. स्वतःला सिद्ध करण्यात अपयशी ठरलेल्या मीराला तिचे वडील डेहराडूनला परत बोलावतात. जाताना बॅग भरत सगळ्या जखमी झालेल्या स्वप्नांवर हळुवारपणे फुंकर मारत मीरा प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणते...पण नंतर काय घडतं? पूर्ण न झालेली स्वप्नं मीराला झोपू देत नसतात. त्या स्वप्नांचं काय होतं, हे त्या सिरीजमध्येच पाहणं योग्य.

वैशिष्ट्यपूर्ण कथानक, वास्तववादी पात्रं, यत्किंचितही नसलेला अभिनिवेश या सगळ्याची योग्य गुंफण म्हणजे ही सिरीज. यातली अजून एक विशेष गोष्ट म्हणजे मीराचे आईवडील टिपिकल पालक असले, तरी काही अंशी मॉडर्न विचारसरणीचेही असतात. त्यामुळं मीराला ते आवश्‍यक तिथं वेळोवेळी आधार देतात. कर्णमधुर पार्श्वसंगीताचं एक अप्रतिम कोंदण या वेब सिरीजला लाभलंय. संयुक्ता चावला शेखनं लिहिलेले संवाद हलकेफुलके आहेत. पात्रांमध्ये असलेला उत्साहीपणा ते अधोरेखित करतात. समर इकबालचं दिग्दर्शन उत्तम असून, कथेला ते एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातं. मीराची व्यतिरेखा साकारणारी मिथिला पालकर एका लहान शहरातून आलेल्या मुलीचं व्यक्तीमत्त्व पडद्यावर योग्य रीतीनं उभी करते. इतर सहकलाकार हे आपल्या आजूबाजूला असलेली जिवंत पात्रं बनून योग्य भूमिका बजावताना दिसतात.

दुर्दम्य अशी इच्छाशक्ती असलेल्या मीराला नियती हरवू शकत नाही, याचा प्रत्यय हळूहळू येत जातो. घरी सुरू असलेला लग्नाचा विषय, मनासारखं न जगता येणारं आयुष्य याही गोष्टी येतात. मुंबईत एका नामांकित फॅशन हाऊससाठी चांगल्या पदावर काम करण्याची संधी तिच्यापर्यंत चालून येते आणि पुन्हा सुरू होतो अर्धवट राहिलेला सोनेरी स्वप्नांचा एक प्रवास; पण आता यावेळी मीरा यशस्वी होते का, आधीपेक्षाही जास्ती अडचणी तिच्या वाटेत येतात का, या सगळ्यांची उत्तरं म्हणजे या वेब सिरीजचा पुढचा भाग- म्हणजेच "गर्ल इन द सिटी चाप्टर 2.'

"कट्टी बट्टी' चित्रपट, "माझा हनिमून' लघुपट, "लिट्‌ल थिंग्ज' नावाच्या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडणारी मिथिला पालकर या सिरीजमध्येही उत्तम अभिनय करताना दिसते. समोर आलेल्या अडचणींवर मात करण्याची मीराची पद्धत तरुणांवर निश्‍चितच एक अनोखी छाप पाडते. कामाच्या ठिकाणी असलेलं राजकारण, दबाव आणि या सगळ्यांना झुगारून काम करण्याची तयारी असलेल्या मेहनती हातांना ही वेब सिरीज एक प्रेरणादायी मार्ग दाखवते. ती प्रेरणा घेण्यासाठी ही सिरीज बघायलाच हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com