करामत एका कुंचल्याची

सुहास भुसे
रविवार, 30 एप्रिल 2017

आळोखेपिळोखे देत चित्रकाराने कुंचला खाली ठेवला. कॅनव्हासवर भगवा, हिरवा, निळा, पिवळा सगळे रंग सुसंगत संगतीमध्ये येऊन एक सुंदर चित्र होऊ घातले होते. एकदा डोळे भरून त्याकडे पाहत त्याने चहाचा फेसाळता मग उचलला आणि बाहेर बागेत जाऊन बसला. चित्रकाराची पाठ वळताच चहा घेऊन आलेल्या उनाड चहावाल्या पोऱ्याने कॅनव्हासकडे बघत एक लबाड हास्य केले. हळूच कानोसा घेत त्याने कुंचला उचलला. सगळ्यात आधी भगव्या रंगाची डबी उचलली. भगवा रंग मूळचाच उष्ण रंग. त्यात थोडा लाल रंग मिसळत त्याला अधिक भडक केला आणि कॅनव्हासवर आडवेतिडवे यथेच्छ फराटे मारले.

आळोखेपिळोखे देत चित्रकाराने कुंचला खाली ठेवला. कॅनव्हासवर भगवा, हिरवा, निळा, पिवळा सगळे रंग सुसंगत संगतीमध्ये येऊन एक सुंदर चित्र होऊ घातले होते. एकदा डोळे भरून त्याकडे पाहत त्याने चहाचा फेसाळता मग उचलला आणि बाहेर बागेत जाऊन बसला. चित्रकाराची पाठ वळताच चहा घेऊन आलेल्या उनाड चहावाल्या पोऱ्याने कॅनव्हासकडे बघत एक लबाड हास्य केले. हळूच कानोसा घेत त्याने कुंचला उचलला. सगळ्यात आधी भगव्या रंगाची डबी उचलली. भगवा रंग मूळचाच उष्ण रंग. त्यात थोडा लाल रंग मिसळत त्याला अधिक भडक केला आणि कॅनव्हासवर आडवेतिडवे यथेच्छ फराटे मारले. कॅनव्हासवर बॅकग्राउंडला बऱ्यापैकी हिरवळ रंगवली होती; पण भगव्याच्या आक्रमक वापरामुळे हिरवा रंग कॅनव्हासच्या एका कोपऱ्यात अंग चोरून बसल्यासारखा दिसू लागला. काळा रंग आदिम, सनातन रंग. कोणत्याही रंगात न मिसळणारा. सगळ्या रंगांना डागळवणारा. चहावाल्या पोऱ्याने काळ्या रंगात बोटे बुडवत कॅनव्हासवर त्याचे मोठाले ठिपके ठेवून दिले. निळ्याची मूळ स्वभावप्रकृती शीत; पण पोऱ्याने त्यात सनातन काळ्या रंगाची शिडकवण करत त्याला भडक, उष्णवर्गीय निळा करून टाकला आणि कॅनव्हासवर हवा तिथे आडवातिडवा यथेच्छ वापरून घेतला. गुलाबी, पिवळा चित्रकाराने बॉर्डरवर ठेवले होते. चहावाल्याने त्या अलिप्तशा वाटणाऱ्या रंगांना कॅनव्हासवर मध्यभागी ओढले. कॅनव्हासवर रंगांचा एकच हलकल्लोळ उडवून देत चहावाल्या पोराने आपली रिकामी किटली उचलली आणि तिथून पोबारा केला. थोडा आराम करून चित्रकार जेव्हा आत आला, तेव्हा कॅनव्हासवर माजलेली धुमश्‍चक्री बघून मटकन खाली बसला. आता हे चित्र पूर्ववत करणे चित्रकाराच्या गुरूलाही शक्‍य होईलसे दिसत नव्हते!

Web Title: social media article write on suhas bhuse