मुलं हवीत की ‘रील स्टार’?

सोशल मीडियावर स्टार असलेल्या एका चिमुकलीला नुकताच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. कमी वयातील तिचं मोठ्यांसारखं बोलणं-वागणं नेटकऱ्यांना खटकलं.
Childrens
Childrenssakal

सोशल मीडियावर स्टार असलेल्या एका चिमुकलीला नुकताच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. कमी वयातील तिचं मोठ्यांसारखं बोलणं-वागणं नेटकऱ्यांना खटकलं. तिचं बालपण तिच्यापासून हिरावून घेतलं जात असल्याचीही टीका अनेकांनी केली. त्यातून एक मुद्दा पुढे येतो तो म्हणजे, आपलं मूल गोंडस आहे, बडबड करतं आणि सांगू ते हुबेहूब सादर करतं याचा अर्थ त्याला काहीही करायला सांगावं, असा असतो का? लहान मुलींच्या मादक हालचाली मनोरंजनाचा भाग कसा काय असू शकतो? मुलांना मूल राहू देण्याचीच गरज आहे...

मुलांचे रील्स हा सोशल मीडियावरचा अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे. मुलांच्या रील्सना प्रचंड प्रेक्षक असतो, त्यामुळे अर्थातच त्याचं अर्थगणित किफायतशीर असतं. अनेक मुलं स्वतःच किंवा पालकही मुलांचे रील्स बनवत असतात. मुलं जेव्हा इन्फ्लुएन्सर होतात तेव्हा त्यांचा कन्टेन्ट आणि सोशल मीडिया खाती मोठ्या माणसांकडूनच चालवली जातात. मग ते त्यांचे आई-वडील असतील, इतर कुणी मोठेच असतील किंवा एजन्सीज असतील... मॅनेजर्स असतील.

आपल्याकडे बालकलाकारांची परंपरा बरीच मोठी आणि जुनी आहे. त्यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात लहान मुलं असतातच. पूर्वी ती नाटक-सिनेमात असायची, मग सीरिअल्समध्ये दिसायला लागली आणि आता रील्सवर. आजच्या काळात अजून एक महत्त्वाचा मुद्दा यात आहे तो म्हणजे कुणीही मूल, घरच्या घरी रील्स बनवून, ट्रेंडिंग होऊन प्रसिद्धी आणि पैसे कमावू शकतं. त्यासाठी नाटक, सिनेमात जाण्याची की सीरियल करण्याची गरज आज उरलेली नाही. त्यामुळे नाटक-सिनेमात मुलं चालतात; पण रील्समध्ये नकोत, अशी भूमिका घेता येणार नाही.

मुलांच्या बाबतीत नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका असोत नाही तर रील्स किंवा यू-ट्युब चॅनल्स... मुद्दा असतो तो मुलांकडून कशा प्रकारच्या कन्टेन्टची अपेक्षा केली जाते, त्यांना काय करायला भाग पाडलं जातंय हा! हल्ली अनेकदा मुलांचे रील्स हा काळजीचा विषय असतो; कारण त्यातली मुलं मुलांसारखी वागत नाहीत. रोमँटिक गाण्यांवर किंवा आयटम साँग्सवर मुलाला मुलींची मादक हावभाव करणारी गाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

याचाच अर्थ असा होतो की कुठे तरी लहान मुलांना ‘सेक्शुअलाईज’ केलं जातंय आणि बघणारे कसलाही विचार न करता ते ‘एन्जॉय’ करत आहेत. बनवणारे आई-बापही त्याचा विचार करत नाहीत. सगळ्यांना फक्त व्ह्युजर्सची पडलेली असते आणि पुढच्या कोलॅब्रेशनची; पण या सगळ्यात आपण मुलांना मूल राहू देत नाही, हे कुणीच लक्षात घेत नाही. मुलं हे ना पैसे कमावण्याचं साधन असू शकतात ना मनोरंजनाचं.

साधी गोष्ट आहे, पाहुणे आले की घरातले मुलांना विविध गुणदर्शनाला उभं करतात. हे करून दाखव, ते करून दाखव... मुलांना ते आवडतं का? त्यांना करायचं आहे का? त्यांना मजा येणार आहे का? याचा कसलाही विचार पालक करत नाहीत. पालकांनी सांगितलं, की मुलांनी ते बरहुकूम करून दाखवायचं हा शिरस्ता असतो अनेकदा. आपल्या मुलाला काय काय येतं, ते किती स्मार्ट आहे हे जगाला कळावं, असा हेतू त्यामागे असतो, तसं कौतुक असतं.

मुलांमध्ये चारचौघात सादरीकरणाचा आत्मविश्वास यावा ही भावना असतेच; पण तरीही मुलांच्या कलागुणांचं हे जे प्रदर्शन मांडलं जातं ते दरवेळी त्यांना आवडतंच असं नाही. दरवेळी त्याने मुलं फुलतात असं नाही. काही वेळा कोमेजून जाऊ शकतात. खरं तर मुलं इतकी भन्नाट असतात की त्यांना एखादी गोष्ट कुणाला दाखवायची असेल तर ते गाऊन, नाचून, जोक सांगून मोकळी होतात, ते आई-बाबांच्या परवानगीची वाट बघत नाहीत; पण हे जे स्वातंत्र्य मुलांना हवं असतं तेच अनेकदा दिलं जात नाही; कारण मुलं पालकांचा ‘स्वाभिमान’ असतात आणि पालक म्हणून असलेल्या ‘इगो’ला चुचकारणं पालकांना आवडतं.

आता यासाठी घरी पाहुणे येण्याची किंवा वर्षातून एकदा होणाऱ्या गॅदरिंगची वाट बघण्याची गरज नाही. स्मार्ट फोन्स, सोशल मीडिया आणि रील्समुळे जी गोष्ट क्वचित कधी तरी घडत होती ती आता रोज उठून घडू लागली आहे. घडवता येऊ लागली आहे. स्वतःचं सजग पालकत्व ते मुलांचे कलागुण दाखवण्याची एक विचित्र चढाओढ सोशल मीडियावर दिसायला लागली आहे.

मग ते अगदी चिमुरड्या मुलींच्या मादक लावण्या असोत की दहावी-बारावीच्या मुलांच्या मार्कशीट्स शेअर करणं असो... आपण हे सगळं का करतोय, याचा विचार प्रत्येक पालकाने करणं गरजेचं आहे. विशेषतः मुलांना मूल राहू न देता मोठ्यांसारखं वागायला, बोलायला, नाचायला भाग पाडणं, त्याचे व्हिडीओ बनवणं आणि त्यावर भरपूर व्ह्यूज घेऊन स्वतःची पाठ थोपटणं हे आपण का करतोय, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

आपण आपल्या मुलांचं शोषण तर करत नाही आहोत ना? मुलांना मुलांसारखं जगू न देणं हेही शोषणच आहे. अनेक यूट्युबर मुलं जी आता प्रौढ म्हणजे १८+ झालेली आहेत ती त्यांच्या नासवल्या गेलेल्या बालपणाबद्दल उघड बोलू लागली आहेत. मग त्यात ‘सिस वर्सेस ब्रो’मधले रोनाल्ड आणि करीना असतील किंवा अजून अनेकही.

व्ह्यूजसाठी मुलांवर प्रॅन्क करणाऱ्या पालकांवर कारवाई झालेली आहे, मुलांची कस्टडी काढून घेण्यापर्यंत गोष्टी घडलेल्या आहेत. हल्ली मराठीतही मुलांवरचे प्रॅन्क प्रकारातले रील्स बघायला मिळतात. मुलांना घाबरवायचं, ते घसरून पडले की जोरजोरात हसणारे व्हिडीओ बनवायचे.

लोकही त्यावर दात काढायला पुढे असतात; पण हे सगळं घडत असताना त्या मुलांना काय वाटत असेल, नंतरही त्या मुलांवर त्याचा काय मानसिक परिणाम होईल, याचा विचार केला जातोय का? मुलं म्हणजे हाताशी आलेली उपयोगी वस्तू नाहीये, पाहिजे तशी वापरायला! हे इतकं संतापजनक आहे; पण व्ह्यूजच्या नादात पालकांच्या या गोष्टी लक्षातही येत नाहीत.

आपण मुलांचे डिजिटल फूटप्रिंट्स तयार करतोय आणि ते त्यांच्याबरोबर आजन्म राहणार आहेत, याचं भान पालकांना नाहीय. आपलं मूल गोड आहे, गोंडस आहे, बडबड करतं, सांगू ते हुबेहूब सादर करतं याचा अर्थ त्याला काहीही करायला सांगावं असा असतो का? आठ आणि दहा वर्षांच्या मुलींचे आयटम साँग्स बनवणारे आणि ते बघून खूश होणारे सगळेच मोठे त्या मुलांचे गुन्हेगार आहेत.

लहान मुलींच्या मादक हालचाली हा मनोरंजनाचा भाग कसा काय असू शकतो? यात काहीतरी चुकतंय असं कुणालाच वाटत नाही यातच स्त्रीचं मग ती प्रौढ असो की बाल आपण आपल्या मनात-मेंदूत किती प्रचंड वस्तूकरण केलेलं आहे हे दिसून येतं. आता इथे हा मुद्दाही येऊ शकतो की मुलांच्या समोर सगळं आहे, तेही गाणी बघत आहेत, ऐकत आहेत तर मग त्यावर नाचली तर काय चुकलं?

तर मुद्दा हा आहे की त्यांचं त्यांनी ते करणं आणि मोठ्याच्या जगाने स्वतःच्या मनोरंजनासाठी त्यांना आयटम साँग्सवर नाचायला प्रवृत्त करणं, भाग पाडणं यात मूलभूत फरक आहे जो समजून घेतला पाहिजे. आज आयटम साँग, लव्ह साँग, रोमँटिक गाण्यांवर नाचाची, हावभाव करत रील्स करण्याची, बघण्याची मागणी करतोय... उद्या अजून काय मागणार आहोत त्या लहानग्यांकडून? हे किती बीभत्स आहे याचा विचार येतो का मनात कधी?

शिवाय ‘एआय’च्या जमान्यात या गोष्टी करणं अतिशय धोकादायक असू शकतं. असे मादक हावभाव असलेल्या एखाद्या लहान मुलाच्या-मुलीच्या व्हिडीओचं ‘एआय’च्या माध्यमातून किती भयानक विद्रुपीकरण होऊ शकतं याचा कधी विचार केला आहे का? ‘डीप फेक’सारखं तंत्रज्ञान काय फक्त मोठ्यांच्याच कन्टेन्टवर वापरलं जाऊ शकतं का? जे मोठ्यांबाबत घडतंय ते मुलांच्या कन्टेन्टबाबत घडणार नाही कशावरून?

इंटरनेटच्या जगात मोठ्या प्रमाणावर पेडोफिलियाग्रस्त व्यक्ती फिरत असतात. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात बेनेडिक्ट क्रे यांच्या लेखात जॉन हॉपकिन्स सेक्स अँड जेंडर क्लिनिकच्या डायरेक्टर डॉ. फ्रेड बर्लिन यांचे वक्तव्य नोंदवले आहे. त्या म्हणतात, ‘‘लैंगिक उत्तेजना कशातून मिळेल हे माणसं निवडत नाहीत; तर त्यांना त्या गोष्टीचा शोध लागतो.

असं मानलं जातं की प्रत्येक चार प्रौढ व्यक्तींपैकी एकाला लहान मुलांविषयी तीव्र लैंगिक आकर्षण असतं. ते पीडोफाईल असतात. ही आकडेवारी जगाच्या लोकसंख्येच्या संदर्भात लक्षात घेतली तर प्रचंड आहे आणि यातले बहुतांशी लोक ऑनलाईन जगात वावरत असतात. काही माणसांमध्ये अशा भावना का असतात याचा अभ्यास जगभर सुरू आहे; पण वास्तव गंभीर आहे आणि आपण आपल्या मुलांचे नको इतके डिजिटल फूटप्रिंट्स तयार करत सुटलेले आहोत. या सगळ्याचाच भानावर येऊन विचार करायला हवा आहे.’

आपल्याला मूल का हवंय? आपण मुलांना जन्म का देतो? याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. त्यांचा वापर करण्याकडे जर पालक जाणार असतील तर पालकांमधल्या या विकृतीवर तातडीने काम करण्याची गरज आहे. सायबरचं जग मोह घालतं, हे मान्य केलं तरीही मुलं पालकांवरच अवलंबून असतात. अशा वेळी पालकांची जबाबदारी शंभर पटीने वाढते.

सायबर पेरेंटिंग सोपं नाहीये... असे अनेक मोहाचे सापळे तिथे आहेत, त्यापासून स्वतःला आणि मुलांना वाचवत, माध्यम भान जपत पुढे जायचं आहे. नाही तर लहान असताना रील्सच्या जगात अडकलेली मुलं प्रौढ झाल्यावर त्यांच्या पालकांना माफ करणार नाहीत. ती वेळ कुणावरच येता कामा नये. प्रयत्न त्यासाठी हवेत. मुलांना जपण्यासाठी हवेत. मुलांना मूल राहू देण्यासाठी हवेत. मूल म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी हवेत..!

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका ‘सायबर मैत्र’च्या संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com