जुनं आणि ‘नवं’ (सोशल मीडियावरचं गाजलेलं..)

विभावरी बिडवे vibhabidwe@gmail.com
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

अनेक मोठ्या सोसायट्यांमधे भाज्या-फळे घेऊन येणारे फेरीवाले वगैरे लोकांना आत यायला परवानगी नाही. मज्जा म्हणजे तिथले लोक व्हेजिटेबल पॅक्‍सची ‘होम डिलिव्हरी ऑर्डर’ करतात. त्यांना परवानगी आहे. पिझ्झावाले तर हक्काने येतातच. भंगारवाले येऊ न शकल्यामुळे एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ‘वेस्ट कलेक्‍शन’ किंवा ‘ई-वेस्ट मॅनेजमेंट’ म्हणून दोन तीन महिन्यांनी मोहीम राबवावी लागते. ज्यामध्ये ‘ई-वेस्ट’ गोळा केला जातो.

अनेक मोठ्या सोसायट्यांमधे भाज्या-फळे घेऊन येणारे फेरीवाले वगैरे लोकांना आत यायला परवानगी नाही. मज्जा म्हणजे तिथले लोक व्हेजिटेबल पॅक्‍सची ‘होम डिलिव्हरी ऑर्डर’ करतात. त्यांना परवानगी आहे. पिझ्झावाले तर हक्काने येतातच. भंगारवाले येऊ न शकल्यामुळे एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ‘वेस्ट कलेक्‍शन’ किंवा ‘ई-वेस्ट मॅनेजमेंट’ म्हणून दोन तीन महिन्यांनी मोहीम राबवावी लागते. ज्यामध्ये ‘ई-वेस्ट’ गोळा केला जातो. पहाटे गाणी म्हणत येणारे पिंगळे, वासुदेव, बहुरूपी, पोतराज तर आता दिसतही नाहीत फारसे; पण शाळेच्या ‘ऍन्युअल इव्हेंट’मध्ये हमखास मुलांना फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घ्यायला लावलं जातं किंवा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सादर केली जाते. अगदी विचारलंच मुलांनी तर एखादा यू-ट्यूब व्हिडिओ दाखवला जातो. दारावर येणाऱ्या बोहारणीला मी अनेक वर्षात पाहिलं नाही. लहानपणी ती आली, की आईची आणि तिची हुज्जत हा एक मनोरंजनाचा भाग असायचा आणि मग टाकून दिलेला एखादा फ्रॉक पुन्हा आपलासा वाटायला लागायचा. आता ‘माणुसकीची भिंत’ नावाने ‘सोशल वर्क’ सुरू करतात आणि तिथे सगळे कपडे अस्ताव्यस्त टाकून घरातला कचरा साफ करून टाकतात. लहानपणी सुऱ्यांना धार लावणारा यायचा. मध्यंतरी सुऱ्या कात्र्या घेऊन धार लावून आणावी लागायची. आता एक छोटं यंत्र मिळतं घरीच धार लावण्यासाठी.
मे महिन्यातली पत्ते खेळत असलेली दुपार आणि कुल्फीवाल्याच्या गाडीची घंटा या गोष्टी एकमेकांशी इतक्‍या मिसळून गेल्या आहेत, की त्या एकमेकांशिवाय पूर्णच होणार नाहीत असं वाटतं. पिक्‍चर्सच्या स्लाइड्‌स दाखवणारीही एक गाडी यायची. डोळे लावून अशी चित्र बघितल्याचं पण अंधुक आठवतं खूप लहानपणी. पूर्वी पितळेच्या वस्तू मेल्ट करून मूर्ती करून देणारे येत. आई-बाबांनी मनावर दगड ठेवून काही पितळी भांडी दिली आणि त्याची एक नटराजची आणि कृष्ण-अर्जुन रथ याच्या मूर्त्या करून घेतल्या होत्या. मोराच्या पिसांचा पंखा घेऊन, राख फुंकत फकीर यायचा. दारावर सायकलवरून येणारे खारीवालेही दिसत नाहीत खूप. दारात येऊन गोधड्या शिवून देणाऱ्या बायका आता काय करत असतील? मध्यंतरी घरापासून लांब एका ठिकाणी जाऊन घरातले कपडे देऊन जाजमांसारख्या शिवून घेतल्या. त्या एकदम ‘फाइन’ झाल्या आणि पैसेही तितकेच ‘फाइन’ झाले. पायपुसणी, झाडूपण आजकाल दुकानातूनच घेतले जातात. पूर्वी त्याही बायका यायच्या दारावर. ग्रहणानंतर ‘दे दान सुटे गिराण’ म्हणत बायका जोरजोरात ओरडत यायच्या. एका ठराविक कालावधीत पोस्टमनची आवर्जून वाट बघितली जायची; आता दिसत असेल, तरी जाणीवेने लक्ष नसतं. त्यामुळे त्याला कधी बघितलं हे आठवतंच नाहीय. नाही म्हणायला ‘फ्लिपकार्ट’, ‘जबोंग’ वगैरेकडून येणाऱ्या माणसांची वाट असते. दूधवाले अजून येतात; पण तेही पिशवीतूनच घेऊन येतात. पण नियमित येणारा पेपरच उरलाय बहुधा.
अशीच आठवण आली....हे सगळे लोक काय करत असतील? त्यांनी, त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी बदललं असेल ना स्वतःला?... बदल अपरिहार्य आहेत!

Web Title: social media famous poem