पत्नीच्या प्रेमप्रकरणाला वैतागले आहात?; वाचा आवर्जून

डॉ. सुचेता कदम
रविवार, 23 जून 2019

'सकाळ'च्या 'पुणे टुडे'तील 'मोकळे व्हा' पुरवणीतील 'समस्यांवर बोलू काही' या सदरात बिनधास्त विचारा आपले प्रश्न, आपल्या समस्या... तज्ञांच्या मतांतून, उत्तरांतून आपल्याला मिळेल उपाय... 

पत्नीच्या प्रेमप्रकरणाला वैतागलोय 
प्रश्‍न - आम्ही दोघे शिक्षक. विवाहाला 17 वर्षे झाली आहेत. आम्हाला दोन मुली. एक दहावीत तर दुसरी पाचवीत शिकत आहे. पत्नीचे वय 45 वर्षे. व्हॉट्‌सऍपवर पत्नीचा टी.वाय.बी.ए.चा ग्रुप एकत्र आला. ग्रुपवर संदेशाची देवाणघेवाण सुरू झाली. ग्रुपमधील एकाने पत्नीला वैयक्तिक मेसेज पाठवण्यात सुरवात केली. कॉलेजमध्ये असताना त्यांचे प्रेमप्रकरण होते. पत्नीचा फोन तपासला त्या वेळी त्याच मित्रासोबत प्रेमाचे संदेश, चॅटिंग त्यात पत्नीचीही साथ असल्याचे दिसून आले. याबाबत पत्नीला जाब विचारला असता शपथेवर पुन्हा चॅटिंग अथवा संपर्क करणार नाही, असे सांगितले. परंतु, मी घरात नसताना तासन्‌तास फोनवर बोलणे, चॅटिंग चालूच आहे. पत्नीला समजावून सांगून त्या व्यक्तीचा नंबर ब्लॉक केला. परंतु, पत्नीच्या फोनवर अनोळखी नंबर वारंवार दिसून येतात. मला संशय येऊ नये, यासाठी चॅटिंग डीलिट केले जाते. पत्नीच्या फोनवर अनोळखी कॉल दिसले की, माझ्या मनात संशय येऊ लागतो. आत्महत्येचे विचारही मनात येतात. हा प्रश्‍न कसा सोडवावा? की पत्नीला घटस्फोट द्यावा? 

उत्तर - तुम्ही व्यवसायाने शिक्षक आहात. तसेच दोन लहान मुलींची जबाबदारीही तुमच्यावर आहे. संसारात निर्माण झालेल्या वादळाला खंबीरपणे तोंड देण्यासाठी स्वतःचे मनस्वास्थ टिकवून ठेवणे सर्वप्रथम महत्त्वाचे आहे. आत्महत्येचे विचार मनात आल्यानंतर हे कमकुवतपणाचे लक्षण आहे, असे स्वतःला समजावून असे नकारात्मक विचार प्रथम दूर करण्याचा प्रयत्न करा. विवाहबाह्य संबंध पत्नीला स्वतःच्या नवरा व मुलींपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत का? याबाबत तिच्याशी पुन्हा चर्चा करा. तुमच्या मनात अनोळखी नंबरमुळे निर्माण होणारा संशय तिच्याकडे व्यक्त करा. याबाबत त्यांचे काय स्पष्टीकरण आहे हे पहा. शपथेवर पुन्हा चॅटिंग करणार नाही, असे त्या म्हणाल्या, म्हणजेच त्यांना स्वतःच्या वर्तनातील चूक, अयोग्य वर्तन याची जाणीव असावी. त्या स्वतःहून पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करतात की त्यांचा मित्र अनोळखी नंबरवरून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे, याची सत्यता तपासून पहावी लागेल. बदलत्या जीवनशैलीचा भाग हा कायद्यापेक्षाही दिसून येतो. परस्पर संमतीने घटस्फोट मिळू शकतो. अशक्‍य नाही. परंतु 2 मुली व 17 वर्षांचा संसार टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही दोघांनीही एकमेकांचा स्वीकार करणे शक्‍य आहे का, हे ही प्रयत्न करणे कुटूंबाच्या हिताचे ठरू शकते. 

नवरा माझा पगार वापरतो 
प्रश्‍न - मी 38 वर्षांची विवाहिता असून मला 6 वर्षांची मुलगी आहे. प्रेमविवाह असून माझ्या आईवडिलांचा लग्नाला विरोध असल्या कारणाने त्यांच्या मनाविरुद्ध विवाह केला. नोकरीनिमित्त दोघेही पती-पत्नी पुण्यात राहतो. दोघांचेही नातेवाईक, आईवडील गावी असतात. लग्नाला सात वर्षे झाली. दोघांनाही चांगला पगार मिळतो. तीन वर्षांपूर्वी नवऱ्याने वडील व बहीण यांच्या नावे जमीन खरेदी केली. जमीन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जामध्ये त्यांचा पगार पूर्णपणे संपतो. माझा पूर्ण पगार येथील घरखर्च, गाडीचा हप्ता, मुलीची शाळेची फी व आम्ही बाहेरगावी गेलो किंवा हॉटेल खर्च यासाठी खर्च होतो. आजपर्यंत माझे स्वतःचे असे फारशी बचत किंवा प्रॉपर्टी नाही. 2-3 वर्षांपासून आम्हा दोघांमध्ये घरखर्च, त्याचे आई-वडील, बहीण यांच्याशी असलेले आर्थिक व्यवहार यावरून वारंवार वाद, भांडणे होतात. यातच त्याचे इतर मुलींशी असलेले प्रेमाचे चॅटिंग मला आढळले. याबाबत त्याचे उत्तर टाईमपास आहे प्रत्यक्ष काही नाही. परंतु, मला हे पटत नाही. माझा पगार संपूर्णपणे वापरता यावा यासाठी हा माझ्यासोबत राहतो का? असे विचार मनात येतात. घरातील कामात कोणतीही मदत नसते. मला त्याच्या सोबत राहणे अशक्‍य वाटत आहे. त्याने घरातून निघून जावे यासाठी मला काय करावे लागेल? 

उत्तर - बाणेदारपणे तोडण्याला धाडस लागतं, पण कौशल्य लागत नाही. नवरा ही निराळी व्यक्ती, बायको ही निराळी व्यक्ती. म्हणजे फरक हा असणारच. पण तरी दोघांनाही पटणारा मार्ग काढून जीवन जगणं यासाठी कौशल्य, मेहनत, प्रामाणिकपणा, मोकळेपणा हे सगळं लागतं. वैवाहीक आयुष्यात दोघांच्याही समजुतीने म्हणजे मध्य तडजोडीच्या मार्गानेच निर्णय होणार हे उघड आहे. विचारीपणे जगण्याची इच्छा असणाऱ्यांना हे कळायला हवे. दुसऱ्याच्या संमतीचा, भावनांचा, परिस्थितीचा विचार करायचा हा विवाहाचा खरा अर्थ आहे. परंतु नवीन पिढीतील पुरुषदेखील पत्नीला आपल्या मनाप्रमाणे हवे तसे वळवून घेऊ अशा भ्रमात वागत राहतात. यातून नातेसंबंधात टोकाचे तणाव निर्माण होतात. तुमच्या पतीचे वागणेदेखील तुम्हाला खूप गृहित धरुन होत असावे. जेणे करून त्याच्यासोबत राहणे तुम्हाला अशक्‍य होत आहे. कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करण्यापूर्वी वैवाहीक समुपदेशन केले जाते. तुमच्या अडचणी, भावनिक तणाव, आर्थिक बाबीबाबत साशंकता हे तुम्ही मांडल्यास नवऱ्याला तुमची मनस्थिती लक्षात येऊन वागण्यात बदल केला तर चांगलेच. अन्यथा तुम्हाला योग्य पद्धतीने कायदेशीर मार्गदर्शन मिळू शकेल. 

पत्नी आणि आईमध्ये मध्यस्थी कशी करावी 
प्रश्‍न - मी 35 वर्षांचा विवाहीत असून सध्या पत्नी मुलांसह वेगळी राहते. माझ्या घरात आईसोबत लग्नानंतर चार वर्षे राहिलो. परंतु आई व पत्नीची रोजच भांडणे होत होती. त्यामुळे पत्नी मुलांसह वेगळी राहते. मला आईला एकटे सोडणे शक्‍य नाही. आईचा स्वभावही विचित्र आहे. तिच्या वागण्याचा त्रास मलाही होतो. परंतु बायको निघून गेल्यानंतर ती शांत झाली आहे. बायको तिची नोकरी करून मुलाला सांभाळते. मी भेटायला गेल्यानंतर व्यवस्थित बोलते. माझ्या बायको व मुलासोबत माझे नाते चांगले रहावे, अशी माझी इच्छा आहे. त्यांच्यासोबत राहिलो नाही तर नाते कसे होईल ही भीतीही वाटते. आईचे वय 76 आहे. या वयात तिला त्रास देण्याची इच्छा नाही. काय करावे हे कळत नाही. 

उत्तर - दोन व्यक्तींच्या स्वभावातील फरक, दैनंदिन वागण्या बोलण्यातील पद्धत यामुळे वारंवार वाद, भांडणेच होत असतील तर अशा व्यक्तिंनी रोजचे आयुष्य सुसह्यपणे जगण्यासाठी स्वतंत्रपणे राहणे हादेखील योग्य पर्याय ठरू शकतो. आईला एकटे सोडणे अशक्‍य असल्यास त्यांच्यासोबत तात्पुरते राहण्यासाठी कोणाची मदत घेता येऊ शकते का? याबाबत विचार करा. दोन तीन दिवसांसाठी पर्यायी व्यवस्था करून तुम्ही पत्नी व मुलासोबत राहू शकता. आईच्या आवश्‍यक गरजेच्या वेळी तुम्ही तिची सर्व जबाबदारी घेत आहात व पुढेही घेणार याबाबत त्यांना बोलून समजावून सांगा. जेणेकरून त्यांना एकटेपणाची भीती वाटणार नाही. एकाकी वाटणे ही भावनिक समस्या अधिक असते. तसे त्यांना एकाकी वाटणार नाही, यासाठी तुमच्या मुलास, पत्नीस सणसमारंभात त्यांना घेऊन भेटण्यास जा. हळूहळू गैरसमज दूर होऊ शकतात. पत्नी व मुलालाही त्यांच्या हक्काचा वेळ, गरजेच्या वेळी मदत ही भूमिका ठेवल्यास नातेसंबंध दृढ होतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solution on wifes extra marital affair husband used your salary or how to handle wife and mom