सरणाऱ्या क्षणाचा हिशेब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonali Lohar writes about Calculation of moving moment year ending of 2022

वर्षअखेर आली की मनात नेहमीच एक हुरहूर सुरू होते, वाटतं किती लवकर संपलं हे वर्ष!

सरणाऱ्या क्षणाचा हिशेब

वर्षअखेर आली की मनात नेहमीच एक हुरहूर सुरू होते, वाटतं किती लवकर संपलं हे वर्ष! खरंतर वर्ष त्याच्या नेहमीच्या वेगानेच संपत असतं, सरणाऱ्या प्रत्येक क्षणाचा हिशेब ठेवायला जमलं नसतं ते आपल्यालाच.

- सोनाली लोहार

कसं जगतोय आपण? मनावर सतत कसला ना कसला ताण, कुठे ना कुठे पोहोचण्याची तगमग, न संपणारी भूक... कधी धनाची, कधी ताकदीची कधी सत्तेची, सततची जीवघेणी स्पर्धा... कधी जगाशी, कधी स्वतःशी. शांतपणे स्वतःत डोकावून बघणं हे विसरूनच गेलोय आपण. मुळात शांतता काय असते तेसुद्धा समजेनासं झालंय, इतका प्रचंड अंतर्बाह्य कोलाहल सुरू असतो. समाजमाध्यमांचंच उदाहरण घ्या... जिथे पाहावं तिथे शब्दच शब्द, गोंगाटच गोंगाट!

अशा कलकलाटात जिथे ‘स्व’ सापडणंही कठीण तिथे आजूबाजूच्या जीवांशी संवाद साधणं ही तर फार दूरची गोष्ट झाली. खूपदा आपण फक्त ‘बोलत’ राहतो, त्या गोष्टी मेंदूपर्यंत जरूर पोहोचतात; पण हृदयात मात्र उतरत नाहीत. डोळे मिटून दीर्घ श्वास घेताना तो छातीत खोल खोल आत कुठे पोहोचतोय हे समजण्याइतकं तादात्म्य त्या क्षणाशी असेल, तरच तो क्षण आपण जगलो. नाहीतर श्वास घेतला काय आणि सोडला काय, उरते फक्त एक यांत्रिक क्रिया.

ओशोंचं एक सुंदर वाक्य आहे, ‘स्वतःच्या एकांतात जिथे शब्द नाही, भाषा नाही, इतर कोणीही नाही, तिथे तुम्ही स्वतःच्या मूळ अस्तित्वाशी एकरूप होत जाता.’ स्वतःतला तो एकांत शोधता आला पाहिजे. नुकतंच पद्मश्री नाना पाटेकर यांच्या शेतावरच्या घरी जाण्याचा योग आला. वाडी जवळ येत गेली तसं शहर मागे पडत गेलं. भोंग्यांचे आवाज, रस्त्यांचे आवाज, मशीनचे आवाज, माणसांचे आवाज.. हळूहळू सगळं थांबत गेलं. नीरव शांतता या शब्दांमधल्या ‘नीरव’ या शब्दाची निखळ अनुभूती. तिथे आवाज नव्हतेच असं नव्हे... वाऱ्यावर नाचणाऱ्या पानांची सळसळ होती, पाटात वाहणाऱ्या पाण्याची झुळझुळ होती, मधूनच हंबरणाऱ्या गाईची साद होती, ‘आम्हीही आहोत बरं का’ हे सांगणारी श्वानांची सोबत होती. निळं स्वच्छ आभाळ आणि डोंगरांच्या कुशीत आबदार विसावलेलं हिरवगार रान... त्याचा ओलाशार गंध. रंध्रारंध्रात हळूहळू पसरत जाणारी ती गर्द शांतता, नकळत स्थिरावत गेलेला श्वास आणि सैलावत गेलेला मेंदूतला सगळा गुंता... एका क्षणी सगळेच शब्द थांबले आणि मग शांतता बोलायला लागली!

अंगणातल्या डेरेदार झाडावर एक काऊ येऊन बसला, काही बोलला. नानांनी प्रतिसाद दिला आणि क्षणार्धात त्या गप्पांमध्ये भाग घ्यायला कुठून तरी पंधरा-वीस काकमंडळीही आमंत्रण दिल्यासारखी येऊन बसली. बाजूच्याच शंभर फूट खोल विहिरीतलं ते कासव नानांची हाक ऐकून लगबगीने पाण्यावर येतं काय आणि त्यांच्यातही कितीतरी गुजगोष्टी होतात काय, सारच जगावेगळं!

त्या नीरवतेत तुमच्याही नकळत इथली फुललेली मधुमालती तुमच्याशी बोलायला लागते. हातातले दाणे अलगद चोचीने टिपणारा तुर्रेबाज कोंबडाही बोलतो, मांडीवर डोकं ठेवून लाड करून घेणारं श्वानही बोलतं, शेततळ्यात चमकणारी नाजूकशी मासोळी सळकन् हसून गुडुप होते. नुकतंच डोकं वर काढणारा गव्हाचा चिमुकला कोंबही जेव्हा बोलतो तेव्हा शब्दाविणा संवादाचा खरा अर्थ हळूहळू उमगत जातो. एकांताशी एकरूप होणं म्हणजे हेच असावं.

विचार केला तर लक्षात येतं की रोजच्या आयुष्यात किती बोलतो आपण, पण त्यातल्या किती संभाषणांना खरोखरच काही अर्थ असतो? बरेचदा तोंडून निघून गेलेले शब्दही इतके वरवरचे असतात, की मेंदू ते अल्पकालीन स्मृतीतही राखून ठेवण्यायोग्य समजत नाही. शब्दांनाच अर्थ नसेल, तर त्या शब्दांनी व्यापलेल्या क्षणांना तरी मग काय अर्थ उरतो!

अशा वेळी प्रतीकात्मक म्हणून मला आठवतो तो आपल्या सोशल मीडियावरील काही मंडळींकडून वारंवार विचारला जाणारा प्रश्न ‘जे1 झालं का?’ सभोवताल घुसमटवून टाकणाऱ्या कोलाहलाचंच हे एक प्रतीक... संपूर्णतः अर्थहीन! तो संवाद नव्हे.

या कोलाहलालाच आपलं आयुष्य समजणं हाच डोक्यातला फार मोठा गोंधळ आहे. थोडंफार ‘जिवंत’ राहायचं असेल तर तो संपवायलाच हवा. स्वतःमधला एकांत सापडला तरच तो संपेल आणि मग ‘जे1 झालं का’ हे विचारण्याची गरज भासणार नाही.