आवर्तन...

संगीताच्या भाषेत ‘एखाद्या तालाच्या ठराविक लयीमध्ये समेपासून सुरुवात करून पुन्हा ती ‘सम’ येईपर्यंतचा मात्राकाल म्हणजे आवर्तन’.
circulation
circulationsakal
Updated on

- सोनाली लोहार, sonali.lohar@gmail.com

संगीताच्या भाषेत ‘एखाद्या तालाच्या ठराविक लयीमध्ये समेपासून सुरुवात करून पुन्हा ती ‘सम’ येईपर्यंतचा मात्राकाल म्हणजे आवर्तन’. ‘अंतरंग’ या सदराचंही एक आवर्तन आज पूर्ण होतंय. सगळंच गवसलं असं म्हणता येणार नाही; पण काही प्रश्न मांडता जरूर आले. अत्युच्च क्षणाची आनंदप्राप्ती आणि समाप्तीची हुरहुर या दोहोंचा सुंदर मिलाफ म्हणजे ही सम...

‘अंतरंग’ हा स्वतःत आणि सभोवतालात डोकावून बघण्याचा एक प्रवास होता. सगळंच गवसलं असं म्हणता येणार नाही; पण काही प्रश्न मांडता जरूर आले. वाचकांकडून सातत्याने मांडल्या गेलेल्या प्रश्नांनी आणि त्या विचारांनीही वैचारिक स्तरावर समृद्धच केलं. या प्रवासात व्यक्तिशः ठळकपणे उमजलेले काही मुद्दे :

१. वाढत्या वयाबरोबर आयुष्याचे अतिशय मोलाचे असे क्षण निघून जाणार आहेत, हे गृहीत धरूनच प्रत्येक क्षणाचा विनियोग ठरवून करायला हवा. तो क्षण अर्थपूर्ण कसा होईल आणि खऱ्या अर्थाने जगता कसा येईल, याचा सतत ध्यास हवा.

२. जग काय म्हणेल, मला झेपेल का, आता वेळ निघून गेली, या अशा नकारात्मक भावनांमुळे खूप काही करायचं आणि अनुभवायचं राहून जातं. ज्या छोट्या-मोठ्या निर्मळ कृतींनी आनंद आणि समाधान मिळेल, ते सगळं करायलाच हवं! गुडघे दुखतील म्हणून डोंगर चढायचा राहून जातो, बेढभ दिसू म्हणून फिटिंगचे कपडे घालायचं राहून जातं, पोटात दुखेल म्हणून रस्त्यावरची पाणीपुरी खायचं राहून जातं, सर्दी होईल म्हणून पावसात भिजायचं राहून जातं, इंग्रजी बोलता येणार नाही म्हणून संभाषणात भाग घ्यायचा राहून जातो, कोणाचा गैरसमज नको म्हणून एखाद्या मित्राला गळाभेट देणंही राहूनच जातं! किती घाबरायचं, कोणाला घाबरायचं, कशाला घाबरायचं? छोटंसं आयुष्य, त्याचे हे छोटे छोटे आनंद, का मुकायचं आपण त्यांना!

३. इंग्रजीत ‘स्पार्क’ हा शब्द आहे, म्हणजेच ‘ठिणगी’, जी प्रत्येक मनुष्यात असतेच! ती आपल्यात आहे याची जाणीव असायला हवी आणि एखाद्याला नसेलच तर त्याच्या आयुष्यातल्या कोणीतरी ती करून द्यायला हवी. बरेचदा आपण ‘माझ्यात विशेष असं काहीच नाही’ हा न्यूनगंड घेऊन सगळं आयुष्य काढतो. पण ‘सामान्यातलं असामान्यत्व’ सिद्ध झालेली लाखो उदाहरणं आज डोळ्यासमोर आहेत.

शालेय शिक्षिका म्हणून काम केलेल्या द्रौपदी मुर्मु या भारताच्या राष्ट्रपती आहेत. सर्पमित्र म्हणून ओळखले जाणारे तमिळनाडूचे मासी सैदियान हे यावर्षीचे पद्म विजेते आहेत. २०२२ साठीचा ‘लॉरेन्स नाइटिंगेल’ हा पुरस्कार मिळालेल्या सुजाता तुस्कान या पालघर प्राथमिक आरोग्य केंद्रात सहायक परिचारिका आहेत. या मंडळींना ती ठिणगी गवसलीय, आपल्यालाही गवसेलच; पण शोध घेणं आवश्यक.

४. मनुष्याची निर्मिती करताना निर्मात्याने प्रत्येकाला रंग, रूप, आकार, स्वभाव सगळंच वेगळं दिलंय. ते वेगळेपण मान्य करून ‘माझ्या भावना आणि माझे विचार एखाद्याला कदाचित समजणार नाहीत, पटणारही नाहीत’ हे सत्य मी स्वीकारायलाच हवं. विरुद्ध विचार आणि विरुद्ध प्रकृती अस्तित्वात असणं हे निसर्ग नियमाला धरूनच आहे आणि संवादानेच बरेच प्रश्न सुटतातही; परंतु जात, धर्म, सामाजिक स्तर यांसारखे घटक मात्र संपूर्णतः मनुष्यनिर्मित आहेत आणि ‘त्या मनुष्यनिर्मित विशिष्ट वेगळेपणाला’ आपण किती महत्त्व द्यायचं, त्यात किती वाहवत जायचं, हे मात्र आपली वैचारिक बैठक किती मजबूत आहे, त्यावरच ठरतं.

५. सर्वच स्तरावर ‘व्यक्त होणं’ अतिशय गरजेचं. सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी आपल्या मेंदूने दिलेली एक प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया असते. अतिवेगवान आयुष्यात ती ऐकण्याचा आपल्याला अवसरच नसतो. ‘जोवर एखाद्या गोष्टीचा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर काही परिणाम होत नाही, तोवर मी त्यावर विचार करण्याची गरज नाही,’ ही भावना हळूहळू सगळ्याच संवेदना बधिर करत जाते.

मग कोणाचा खून होवो, बलात्कार होवो, अपघात होवो, नाहीतर भ्रष्टाचाराचा कळस होवो, प्रकरण जोवर माझ्या दारापर्यंत येत नाही, तोवर मी हळहळणारही नाही, पेटणारही नाही आणि व्यक्तही होणार नाही! हीच धारणा व्यक्ती आणि समाज पोकळ बनवत जाते. कालचीच एक बातमी, १७ वर्षांची लेक जेव्हा वडिलांनी आणि त्यांच्या मित्रांनी वारंवार बलात्कार केला होता हे गर्भवती राहिल्यावर स्वतःच्या आईला सांगते, तेव्हा कळते व्यक्त होण्याची किंमत! हे वाचून जीव कळवळलाच तर समजूया की आपण अजून ‘जिवंत’ आहोत..

‘अंतरंग’ची आजची ही भैरवी समस्त सुजाण वाचकवर्गाला समर्पित...

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com