चौथी सोनोग्राफी कलर डॉपलर

Sonography
Sonography

वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ
प्रेग्नन्सीचे तिसरे ट्रायमेस्टर म्हणजे सहा महिने (२८ आठवडे) ते ९ महिन्यांचा (३८ आठवडे) कालावधी होय. २८व्या आठवड्यापासून प्रसूतीपर्यंत ही गर्भावस्थेची तिसरी तिमाही मानण्यात येते. मेंदू, यकृत आणि फुप्फुसे असे सर्व महत्त्वाचे अवयव आणि इंद्रिये पूर्णपणे विकसित होण्याचा हा काळ असतो. ३६व्या आठवड्यात गर्भाचे डोके गर्भाशय मुखाकडे येते. ३७व्या आठवड्यात गर्भाची वाढ पूर्ण झाल्याचे मानण्यात येते.

गर्भाचे वजन या सुमारास ३०००-३६०० ग्रॅम झालेले असते. मातेचे अपुरे पोषण आणि गर्भाशय लहान असणे, एकाऐवजी दोन गर्भ गर्भाशयात असण्याने (जुळे) कमी वजनाचा गर्भ विकसित होतो. म्हणूनच या शेवटच्या टप्प्याला फार महत्त्व आहे. त्याकरिता या कालावधीत प्रत्येक आठ दिवसांनी बाळाच्या वाढीची आणि गरोदर स्त्रीची तपासणी अत्यंत आवश्यक असते. कलर डॉपलर ही सोनोग्राफी याच कालावधीत करायला लागणारी आवश्यक तपासणी असून त्यामधील परीक्षणानुसार पुढील संभाव्य धोके टाळता येतात.

कलर डॉपलर : २८ ते ३२ आठवडे 
या सोनोग्राफीमध्ये आतापर्यंत झालेल्या बाळाच्या वाढीचा अंदाज येतो. तसेच बाळाचे वजन, गर्भजलाचे प्रमाण, बाळाची हालचाल, प्लॅसेंटाची मॅच्युरिटी आणि महत्त्वाचे म्हणजे बाळाचा रक्तपुरवठा याची सखोल तपासणी करता येते. त्यामुळे वजन किंवा गर्भजल कमी असणाऱ्या हायरिस्क प्रेग्नन्सीमध्ये, या सोनोग्राफीचे विशेष महत्त्व असते. त्याच्या निष्कर्षानुसार पुढील ट्रीटमेंट ठरवण्यासाठी ही सोनोग्राफी डॉक्टरांना मार्गदर्शक ठरते. 

डॉपलर सोनोग्राफी म्हणजे ध्वनिलहरींच्या माध्यमातून शरीरातील रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरण कलर मॅपद्वारे पाहण्यासाठी केलेली सोनोग्राफी होय. ही सोनोग्राफी अतिशय उपयोगी आणि निष्णात तज्ज्ञाकडून होणे आवश्यक आहे. ही सोनोग्राफी प्रेग्नन्सीमध्ये २८ ते ३२ आठवडेदरम्यान करतात. यामध्ये बाळाचा रक्तपुरवठा, गर्भाशय पिशवीचा रक्तपुरवठा आणि प्लॅसेंटाचा रक्तपुरवठा पहिला जातो. ही सोनोग्राफी नॉर्मल आणि जास्त जोखिमेच्या प्रेगन्सीमध्ये उपयोगी असते.   

बाळाची वाढ २९ आठवड्यांपासून झपाट्याने होते, तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येते. बाळाला अंगभर लव (बारीक केस) येतात, त्याला लॅन्युगो म्हणतात. बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव संपूर्ण अंगभर पसरलेला असतो, त्याला व्हर्निक्स म्हणतात. तो विशेषकरून बाळाच्या कातडीचे संरक्षण करतो. या काळात बाळाच्या मेंदूची तसेच फुप्फुसांची वाढ झपाट्याने होते. नाळेद्वारे माता जे सेवन करेल ते बाळापर्यंत पोचत असते. ३४ आठवडे पूर्ण होताना फुप्फुसांची वाढ पूर्ण झालेली असते. प्रसूती जवळ येते, तसे बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्यासाठी जागा कमी पडते. त्यामुळे बाळाची हालचाल थोडीफार मंदावते. म्हणूनच डॉक्टर १० किक काउंट ठेवावयास सांगतात. ३८ आठवड्याच्या वाढीचे बाळ पूर्ण वाढीचे मानले जाते. या टप्प्यामध्ये रक्तदाब जास्त असल्यास अथवा मधुमेह असणाऱ्या प्रेग्नन्सीमध्ये पाचवी सोनोग्राफी सुचवली जाते, ती फक्त शेवटच्या टप्प्यातील बाळाच्या प्रेझेंटेशन आणि गर्भजलाचे प्रमाण याचा अंदाज येण्यासाठी केली जाते. साधारण ४० आठवड्यांनी बाळाचा जन्म होतो. मग काय आनंदी, आनंद चोहीकडे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com