अंधारातले कवडसे

प्रशांत आर्वे चंद्रपूर Prashantarwey250@gmail.com
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी आपल्या वडिलांच्या प्रेरणेने हेमलकसा गाठलं आणि मग सृजनाचे कारंजे त्यांच्या हातांनी फुलत गेले. त्यांच्या परीसतत्त्वाचा स्पर्श तिथल्या मातीला झाला आणि तिथल्या मातीची कूस उजवल्या गेली. तेथील आदिवासी समूहाला आधार मिळाला. पण, यामागे आम्ही काहीतरी फार जगावेगळे करतोय असा दंभ कधीच नव्हता. केवळ होता तो याच मातीतील, परंतु परिस्थितीने मागे राहिलेल्या वंचित घटकाला हात देण्याचा.

काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचे पूर्व जिल्हाधिकारी आणि आमचे मित्र आशुतोष सलील यांच्यासोबत हेमलकसा येथे जाण्याचा योग आला. डॉ. प्रकाश आमटे तिथे नव्हते तरी आम्ही गेलो. कारण आम्हाला बोलायचे होते, ते डॉ. दिगंत आणि डॉ. अनघा, अनिकेत आणि समीक्षा आमटे यांच्यासोबत. दिगंत आणि अनिकेत यांच्याकडे समाजसेवेचा वारसा घरातून चालत आलेला. दोन पिढ्यांनी त्यांच्या आयुष्याच्या समीधा समाजसेवेच्या यज्ञकुंडात अर्पण केल्यानंतर स्वाभाविकपणे हे दोघेही याच कार्यात ओढले गेले. तरी त्यांना आपण शहरात जावे, सुखवस्तू जीवन जगावे असे का वाटू नये? पण अनिकेत आणि दिगंत या दोघांच्या मनाला हा विचार कधीच शिवला नाही. त्याहून आश्‍चर्य म्हणजे डॉ. अनघा दिगंत आणि समीक्षा अनिकेत या दोघींही या कार्यात अशा काही समरस झाल्या की त्या आमटे कुटुंबाच्या मुलीच वाटाव्या. डॉ.अनघा गोव्याच्या तर समीक्षा पुण्याच्या. परंतु, त्यांनी हेमलकसा मनापासून स्वीकारलं. नुसतंच स्वीकारलं नाही तर हेमलकसा वाढते राहण्यात यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. प्रकाश आमटे यांच्यामागे डॉ. दिगंत आणि अनघा यांनी हॉस्पिटल यशस्वीरीत्या सांभाळले आहे. येथे वर्षाकाठी 35,000 आदिवासींचा इलाज मोफत केल्या जातो. आजूबाजूच्या अनेक गावांत त्यांनी आरोग्यसेवा केंद्रे सुरू केली आहेत. अनिकेत आणि समीक्षा दोघेही या भागात आधुनिक शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहेत. समीक्षा स्वतः शिक्षक प्रशिक्षण, त्यांचे वर्ग आदी बघतात. या भागातला नक्षलींचा प्रश्न आपण सारेच जाणतो...या भागातला तरुण आधुनिक शिक्षण घेऊन पुढे गेला की त्याला या चळवळीतला फोलपणा कळायला मदत होईल. तो शस्त्र उचलणार नाही...अनिकेत यांनी शिक्षणासोबतच आजूबाजूच्या गावांमध्ये तलाव खोलीकरण, नव तलावांची निर्मिती असे प्रकल्प हाती घेतले आहेत. हे सारे या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने. हा आहे नवा भारत, ही आहे तरुण पिढी आदर्श घ्यावा अशी. डॉ. दिगंत, डॉ. अनघा, अनिकेत, समीक्षा हे असंख्य तरुणांसाठी अंधारातले कवडसे ठरले आहेत.
पन्नास वर्षांपूर्वी हेमलकसा आणि भामरागड या भागातील परिस्थिती काय असेल? कुणी तिथे जाऊन काम करू शकेल अशी कल्पना तरी केली असेल? पण, डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी आपल्या वडिलांच्या प्रेरणेने हेमलकसा गाठलं आणि मग सृजनाचे कारंजे त्यांच्या हातांनी फुलत गेले. त्यांच्या परीसतत्त्वाचा स्पर्श तिथल्या मातीला झाला आणि तिथल्या मातीची कूस उजवल्या गेली. तेथील आदिवासी समूहाला आधार मिळाला. पण, यामागे आम्ही काहीतरी फार जगावेगळे करतोय असा दंभ कधीच नव्हता. केवळ होता तो याच मातीतील, परंतु परिस्थितीने मागे राहिलेल्या वंचित घटकाला हात देण्याचा. विंदा आपल्याला फार छान सांगून गेले.
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे,
घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.
आपल्याला हा देणाऱ्याचा हात घेता आला पाहिजे. म्हणजेच देणारा हात होता आले पाहिजे.
याच भागातील आणखी एक उदाहरण म्हणजे देवाजी तोफा. हा माणूसदेखील असाच. लेखा मेंढाच्या आदिवासींना त्यांचा स्वर देत सुटलाय. आपली जमीन, जंगल आणि नैसर्गिक संसाधने केवळ सरकारची नसून त्याचे वर्षानुवर्षे जतन करणारे आदिवासी, तेथील ग्रामपंचायत यांचा त्यावर पहिला अधिकार आहे हे ते निक्षून सांगतात. महात्मा गांधी यांनी ग्राम स्वराज्यची कल्पना मांडली होती. त्याचे कृतिशील रूप समजून घायचे असेल तर लेखामेंढा समजून घ्यावे लागेल. आज लेखामेंढा ही श्रीमंत ग्रामपंचायत आहे. त्यांनी सरकारशी संघर्ष करून आपले हक्क मिळविले आणि ग्राम स्वराज प्रत्यक्ष साकारले. हा माणूसदेखील अशिक्षित, त्याच आदिवासी भागात राहणारा पण ध्येयवेडा. या देशाचे वाट्टोळे याच देशातील बुद्धिजीवी करीत असताना देवाजीसारखी साधी माणसे हिमालयासारखे काम करून समाजासमोर आदर्श निर्माण करीत सुटले आहेत.
आपल्याला दशरथ मांझी नावाचा माणूस आठवत असेल. तसे नाव लक्षात राहण्याचे कारण नाही. एक सामान्य मजूर माणूस. बिहारच्या गेह्लोर गावातला. त्याच्या गावाच्या समोर एक भला मोठा पहाड उभा होता. आणि याच पहाडामुळे आजूबाजूच्या सत्तर गावच्या लोकांना दवाखाने, शाळा आणि शहरात जायला सत्तर किमीचा रस्ता तुडवावा लागायचा. तो भला मोठा पहाड दशरथला वाकुल्या दाखवायचा. झाले, एकदिवस दशरथने छन्नी हातोडा घेतला आणि तो अख्खा पहाड फोडून काढण्याच्या कामी त्याने स्वतःला झोकून दिले. किती दिवस? एक दोन नव्हे तर तब्बल बावीस वर्षे. काय धाडस! किती चिकाटी! कुणासाठी? केवळ सामान्य माणसासाठी. आपल्यासारख्या असंख्य माणसांसाठी. मांझीने 360 फूट लांब आणि 30 फूट रुंद रस्ता खोदून काढला. जो आज अनेकांच्या कमी आला आहे. ज्यावेळी दशरथ मांझी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायला गेले; तेव्हा त्यांनी स्वतः उभे राहून आपली स्वतःची खुर्ची मांझी यांना बसायला दिली. हा त्या माणसाचा सन्मान होता.
आमच्या चंद्रपूरचा तरुण बंडू धोत्रे हादेखील असाच ध्येयवेडा. आपला वारसा, आपले शहर आपणच राखले पाहिजे म्हणून इको प्रो नावाचे संघटन उभे करून असंख्य कामाचा धडाका त्याने लावलाय, तो ही नि:स्वार्थपणे...किल्ला स्वच्छता अभियान गेले दोन वर्षे अव्याहतपणे सुरू आहे...
अशी असंख्य माणसे आपल्या अवतीभवती जीवाच्या आकांताने मानवी जीवन समृद्ध करण्यात गुंतली आहेत. ज्ञानोबा माउलीने दुरितांचे तिमीर जाओ अशी आकांक्षा उराशी धरली. माउलींच्या या ओळी प्रत्यक्ष जगणारे आपल्यात आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्या या माणसांना समाजाने बळ देण्याची गरज आहे. समाज तोडण्याच्या या काळात डॉ. आमटे, दशरथ मांझी, मेळघाटातील डॉ. कोल्हे दाम्पत्य या सगळ्यांनी आपले जगणे सुकर केले आहेच, परंतु या कोलाहलात तोच एक आशेचा किरण आहे.

प्रशांत आर्वे
चंद्रपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spark in darkness