धार्मिक सहिष्णुता जोपासण्यासाठी...

श्री श्री रविशंकर
गुरुवार, 6 जून 2019

प्रत्येक धर्माला मूल्ये, प्रतीके आणि उपासना हे तीन पैलू असतात.

चेतना तरंग
आपल्याला समाजात असे चित्र नेहमीच दिसते की जबाबदारी घेणाऱ्या व्यक्ती प्रार्थना करत नाहीत. त्याचप्रमाणे प्रार्थना करणाऱ्या व्यक्ती जबाबदारी घेत नाहीत. प्रत्येक धर्माला मूल्ये, प्रतीके आणि उपासना हे तीन पैलू असतात. जगातील सर्वच धर्मांमध्ये उपासना आणि प्रतीकांमध्ये विविधता दिसते. मात्र, सर्व धर्मांतील मूल्ये सारखीच आहेत. जगभरात कट्टरतावाद, मूलतत्त्ववाद आणि अहिसष्णुता वाढत आहे. लोक मूल्ये विसरून केवळ उपासना, रुढीपरंपरेत अडकले आहेत, हे त्याचे खरे कारण होय. परमात्म्याला विविधताच आवडते. पृथ्वीवर केवळ एकाच प्रकारचे फळ किंवा लोक, एकाच प्रजातीचा प्राणी आढळत नाही. त्यामुळेच या परमात्म्याला एकच वेश परिधान करता कामा नये. आपण सर्वांनीच सर्वांचा आदर, प्रेम करत या निर्मितीतील वैविध्याचा आनंद लुटला पाहिजे. आपण धार्मिक सहिष्णुता ही संकल्पना नेहमीच वापरतो. आता हा शब्द अप्रचलित झाला, असे मला वाटते. तुम्ही प्रेम करत नाहीत, अशा गोष्टीच सहन करता. त्यामुळे प्रत्येकाने इतरांच्या धर्मावर आपला धर्म समजून प्रेम करण्याची वेळ येऊन ठेपलीय.

कोणताही धर्म तो माझा आहे म्हणून महान नसतो, तर त्याच्या अस्तित्वामुळे तो महान ठरतो. हे तत्त्व सर्व पुजारी, फादर, मौलवी आदींच्या मनात ठसायला हवे. तेच धार्मिक, आध्यात्मिक मार्गावर लोकांचे नेतृत्व करतात. आपल्या या सुंदर जगातील कट्टरतावाद यामुळेच संपुष्टात येईल. आपण सर्वांनी एकत्रितरीत्या लोकांना प्रत्येक धर्माबद्दल थोडीतरी माहिती समजून घेण्याचा ठरावच करायला हवा. जीवनविषयक दृष्टी व्यापक करण्याचा हेतू यामागे असेल. प्रत्येकाने स्वत:च्या धर्माची सखोल माहिती घ्यायला हवी, यात कुठलीच शंका नाही. त्याच वेळी आपल्या धर्माव्यतिरिक्त इतर धर्म समजून घेणेही आज आवश्‍यक बनलेय. अध्यात्माचा सार असलेल्या वैश्‍विक बंधुत्व आणि ध्यानाशिवाय धर्म केवळ एखाद्या फळाच्या बाह्य आवरणासारखा राहील. मी नेहमीच असे म्हणतो की, धर्म हा केळीच्या सालीसारखा आहे, तर अध्यात्म हे खरे केळी आहे. आपण आतील हे खरे केळी टाकून दिलेय आणि त्याची केवळ सालच पकडून ठेवलीय हेच आपल्या दु:खाचे कारण आहे. त्यामुळेच आपण आपल्या जीवनाचा आध्यात्मिक पैलू व्यापक करायला हवा. स्वत:मध्येच देव पाहणे हे ध्यान आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तींमध्ये देव पाहणे ही सेवा होय. ध्यान आणि सेवा एकाचवेळी हातात हात घालून चालतात. याआधीचे शतक हे सहकारी संघाचे होते. आता समान धर्मश्रद्धा, सलोख्याकडे आपण वाटचाल करूयात. या प्रार्थनापर शब्दांबरोबरच मी एकावेळी जबाबदारीही घेतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Sri Ravi Shankar article Religious tolerance