बरीच माणसं आपल्या घरी येतात. त्यांचं आगत-स्वागत करून आपण त्यांना घरी बसवतो. चहा-पाणी देतो, काहींना जेवणाचा आग्रह करतो, पण काही माणसं फक्त आपल्या दारापर्यंतच येतात. म्हणजे आजही दारावर येणारा दूधवाला, वृत्तपत्र टाकणारा, झोमॅटो, पिझ्झावाला, सेल्समन झालच, तर भंगारवाला यांच्याबद्दल नाही बोलत आहे मी! या व्यतिरिक्त खूप लोक पूर्वी आपल्या घरापर्यंत यायचे.
डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात टाळ, कमरेला पावा अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा सुंदरसा वेश धारण केलेला वासुदेव यायचा, दान-दक्षिणा स्वीकारून ‘दान पावलं’ म्हणत नमस्कार करत निघून जायचा.