टेस्ट ट्यूब बेबीची कथा आणि व्यथा

Test-tube-baby
Test-tube-baby

वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ
टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे १ कोटी जोडप्यांनी मूल होण्याचा आनंद मिळवला आहे. साधारणपणे ५० वर्षांपूर्वी आपण शरीराबाहेर एखादा जीव निर्माण होईल, अशी कल्पनाही केली नव्हती. मला माझ्या ‘स्माईल फर्टिलिटी सेंटर’मधील २५ वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवतो. माझी पहिली पेशंट कविता तपासणीसाठी आली तेव्हाचे तिचे प्रश्न, शंका, भीती, उत्सुकता आणि मूल होणार नाही म्हणून झालेली अगतिकता आठवते. दोन्ही बीजनलिका बंद असल्यामुळे टेस्ट ट्यूब बेबी या उपचाराबद्दल माहिती घेण्यासाठी ती आली होती. तिच्या समुपदेशनासाठी दीड तास वेळ लागला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना समजवताना मला अक्षरशः घाम फुटला होता. त्या सर्व शंकांचे निरसन झाल्यावर तिच्या गर्भाचे लॅबमधील पिक्चर, तिला ते गोंडस बाळ देतानाच आनंद हे केवळ अविस्मरणीय होते. हे तंत्रज्ञान विकसित होत गेले, तशी ही उपचारपद्धती समाजात रुजत जाऊ लागली आणि पेशंट  स्वतःहून त्याची मागणी करू लागले. 

पर्याय उपलब्ध असले तरी नेमकी कोणती उपचारपद्धती कोणाला आणि कधी वापरायची, याचा निर्णय योग्य वेळी घेणे गरजेचे असते. पर्याय आहेत म्हणून वापरा, असा दृष्टिकोन ठेवून चालत नाही. कारण आत्तापर्यंत शोध लागलेल्या कोणत्याही पद्धतीने गर्भधारणा होण्याची किंवा बाळ होण्याची १०० टक्के हमी देता येत नाही. ती टक्केवारी जास्तीत जास्त ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत पोचू शकते. संपूर्ण जगात या तंत्रज्ञानाचे उद्देश व मूल्यमापन काळाप्रमाणे बदलत चालले आहेत. साठच्या दशकात ते प्रेग्नन्सी आहे किंवा नाही एवढेच होते, तर ८०व्या दशकात ते मूल जन्माला येणे म्हणजेच लाइव्ह बर्थ असे झाले. नव्वदाव्या दशकात ते बदलून सुदृढ बालक झाले,  तर नवीन शतकात ते सुदृढ प्रौढत्व (हेल्दी अडल्ट) झाले आणि गेल्या वर्षापासून ते सुदृढ पुढची पिढी असे झाले आहे. असे होत असताना याच उपचारपद्धतीचे बाजारीकरणही होऊ लागले. पैसे आणि त्याबरोबर पेशंटची मूल होण्याची अगतिकता यामुळे ठिकठिकाणी फसवेगिरी सुरू झाली. फेर्टीलिटी स्पेसिऍलिस्ट सोडून बऱ्याच नॉनमेडिकल उद्योगपतींनी यात उडी मारली व जीवघेणी शर्यत सुरू झाली. आपल्यावर कोणता फेर्टीलिटी स्पेशालिस्ट विचारपूर्वक उपचार करतो आहे, हे न पाहता बाहेरील जाहिराती आणि प्रलोभनाला पेशंट भुलत गेला. 

पेशंट, उपचारपद्धती आणि डॉक्टर यांमुळे विश्वास हा एकमेव धागा निखळून पडेल, अशी शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात या विज्ञानातील आविष्काराला सैरभैर होण्यापूर्वी मजबूत आणि विचारपूर्वक घट्ट कायद्याची चौकट येणे खूपच आवश्यक आहे. भारतामध्ये याबद्दलची एक रजिस्ट्री असावी, म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीच्या तंत्रज्ञानाचा व एग डोनर, सरोगसीचा गैरवापर होणार नाही. या उपचाराद्वारे जन्माला आलेल्या मुलांमध्ये पुढील काही वर्षांत काही विशिष्ट दोष तर आढळून येत नाहीत ना, याचा अभ्यास करणे शक्य होईल. या काळातील एक महत्त्वाचा आविष्कार ‘टेस्ट ट्यूब बेबी’ जपला जाईल व उत्तरोत्तर मानवी कल्याणासाठी प्रगती करेल.

गेल्या वर्षभरात आपल्याशी या सदरातून हितगुज केले. अनेक विषयांवर लिहिले. आपणा सर्वांनी प्रचंड प्रतिसाद दिला, भरभरून प्रेम दिले. आता यानंतर निरोप घेण्याची वेळ आली आहे. तुम्हा सर्व वाचकांचे, पेशंटचे आणि ‘सकाळ’चे मनःपूर्वक आभार मानते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com