धडपड्या सुरेशची प्रेरणादायी कथा

Devraiartvillage
Devraiartvillage

१४ जानेवारी २००१ पासून सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे स्थायिक झालेला सुरेश चंद्रा पुंगाटी हा भामरागड तालुक्यातील कोईनगुडा गावातील रहिवासी. सुरेशचा जन्म लोक बिरादरी दवाखान्यात १९८२ ला झाला. त्याची पत्नी सुरेखा कियर गावची. वडील चंद्रा हे १९७८-७९ ला लोक बिरादरी प्रकल्पाच्या शाळेमधील जेवणाच्या मेसमध्ये स्वयंपाक्याचे काम करायचे.

चंद्रा हे कब्बड्डी उत्तम खेळायचे. चंद्रा हे उत्तम आर्टिस्ट आहेत. बांबू क्राफ्ट, मेटल क्राफ्ट उत्तम करतात. पुढे १९९२ मध्ये प्रकाश आमटे यांनी त्यांना सहपरिवार आनंदवनमध्ये पाठविले. येथील अंध -अपंग -मूकबधिर शाळेच्या जेवणाच्या मेसमध्ये स्वयंपाकी म्हणून शासकीय नोकरी लागली.

सुरेशला लहानपणापासून आर्ट आणि क्राफ्ट आवडायचे. त्याचे वडील त्याची प्रेरणा आहेत. ७ पर्यंत सुरेशने लोक बिरादरी आश्रमशाळेत शिक्षण घेतले. पुढे आनंदवन येथील आनंद निकेतन कॉलेजमध्ये कला शाखेत त्याने पदवी घेतली. शाळेत शिकत असतानाच वडिलांचे काम बघून त्याने विविध प्रकारच्या बांबूच्या वस्तू बनविण्याचे काम सुरु केले.

जन्मजात त्याच्या हातात कला होतीच. पुढे आनंदवनमध्ये शिकत असतांना वडिलांनी त्याला मेटल क्राफ्ट - ढोकरा आर्ट, पितळ वापरून त्याचे कास्टिंग कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले. मग वडील आणि मुलगा यात विविध प्रकारच्या बांबू आणि मेटलच्या वस्तू बनवण्याची शर्यत लागायची. वस्तू बनल्यावर त्यावर दोघे चर्चा करायचे. त्यातून कल्पनाशक्ती वाढायला चालना मिळाली. कॉलेजमध्ये शिकत असतांना पुणे येथे आदिवासी विकास विभागाने भरविलेल्या आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शनात सहभाग नोंदवला. त्यात पहिले बक्षीस मिळाले. त्यानंतर दिल्ली - गुवाहाटी येथे प्रदर्शनात सहभाग घेतला. त्यानंतर देशभर अनेक ठिकाणी आर्ट आणि क्राफ्ट प्रदर्शनात सहभाग घेतला आहे आणि ते अविरत सुरु आहे.

२००० साली महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागामार्फत इंग्लंड येथील एडिनबर्ग फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तेथेही ब्रिटिश सरकारने बेस्ट क्राफ्टमन पुरस्कार देऊन गौरव केला. १२०० पाऊंडचा हा पुरस्कार होता. २१ दिवस इंग्लंडमध्ये राहायला आणि फिरायला मिळाले. त्यानंतर अनेक पुरस्कार महाराष्ट्रात मिळाले. झी न्यूज चॅनेलने पहिल्यांदा मुलाखत घेतली.

पाचगणी येथील संजीवन विद्यालयाच्या शशीताई ठकार यांनी सुरेशला क्राफ्ट टिचरची ऑफर दिली. संजीवन विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शिरीष कठाळे यांनी आनंदवन मध्ये येऊन सुरेशची भेट घेतली आणि शशीताई ठकार यांचा निरोप दिला. सुरेशने ती नोकरी स्वीकारली. नव्या आयुष्याला सुरवात झाली.

२००२ मध्ये बांबू पासून बनवलेली आदिवासी बांधवांच्या 'माता मूर्ती' चा राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात पहिल्या १० मध्ये नंबर लागला.
२००८ मध्ये सुरेशने पाचगणीत राहणाऱ्या मंदाकिनी माथूर (फिल्म मेकर) यांच्या मदतीने देवराई आर्ट व्हिलेज नावाने ट्रस्ट स्थापन केला. नोकरी सोबत स्वतःचे काम करायला सुरवात केली. पन्नास हजाराचे कर्ज घेतले. छोट्या झोपडीत विविध प्रकारच्या मेटल क्राफ्ट आणि बांबू क्राफ्टच्या वस्तू बनवायला सुरवात केली. २००८ मध्येच पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये क्राफ्टचे प्रदर्शन भरविले. त्यात उत्तम विक्री झाली. पुढे २०११-१२ मध्ये मुंबई येथील प्रसिद्ध कालाघोडा फेस्टिवलमध्ये देवराई आर्ट व्हिलेजने आपला स्टॉल लावला. त्यांच्या क्राफ्टला तुफान प्रतिसाद मिळाला. अनेक लोकांनी विविध वस्तूंच्या ऑर्डर्स दिल्या.

२०११ मध्ये देवराई आर्ट व्हिलेजने एक नवीन क्राफ्टचा प्रकार शोधला. त्याला स्टोन आणि ब्रासचे फ्युजन क्राफ्ट म्हणतात. दगडावर ब्रासचे कास्टिंग केल्या जाते. प्रत्येक क्राफ्ट आर्टिकल युनिक असते. त्याचे पेटंट देवराई आर्ट व्हिलेज मिळवले आहे. ३ वर्ष प्रयोग केल्यावर त्यांना या नवीन क्राफ्ट प्रकारात यश आले.

देश विदेशातून विविध कमर्शिअल आर्ट कॉलेजमधील विद्यार्थी ४-४ महिन्यांच्या ट्रेनिंग करिता देवराई आर्ट व्हिलेज सातारा येथे येत असतात. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिझाईन अहमदाबाद, जे.जे. आर्ट मुंबई, एम. आय. टी. पुणे अशा कॉलेज मधून विद्यार्थी प्रशिक्षण आणि इंटर्नशीपसाठी नित्य नियमाने येत असतात.

देवराई आर्टचे काम बघून अनेक ठिकाणहून त्यांना क्राफ्टच्या ऑर्डर्स यायला लागल्या. कलाकारांची संख्या वाढवणे आवश्यक होते म्हणून गेल्या ९-१० वर्षात भामरागड तालुक्यातील साधारण २० आदिवासी कलाकारांना सुरेशने पाचगणी येथे नेले आहे. त्यांना तिथे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. क्राफ्टचे विविध प्रकार बनविण्यास त्यांना शिकविले आहे. त्यांच्या राहण्याची - जेवणाची सोय आणि मानधन देवराई आर्ट व्हिलेजच्या माध्यमातून केली जाते. इंटर्नशिपच्या माध्यमातून आलेल्या शहरातील विद्यार्थ्यांशी आदिवासी क्षेत्रातील व्यक्तींबरोबर संवाद व्हावेत आणि त्यांनी एकमेकांशी मैत्री करावी हा पण एक उद्देश आहे. पर्सनॅलिटी डेव्हलोपमेंटसाठी याचा उपयोग झाला आहे.

२०१५-१६ मध्ये देवराईला मोठा ऑर्डर मिळाला. हिंदू कॉलेज युनिव्हर्सिटी दिल्ली यांनी एका मोठा मेटलचा नंदी आणि एक मेटलचे फ्लाईंग फिगरची ऑर्डर देवराईला दिली. ८०० किलो वजनाचा ब्रास धातू मधील कुठलाही जोड नसलेला मोठा नंदी देवराईमधील कलाकारांनी कास्टिंग करून बनविला. या दोन ऑर्डर्स २१ लक्ष रुपयांच्या होत्या. त्यात त्यांना ९ लाखाचा फायदा झाला. अरुण जेटली यांच्या हस्ते या आर्टिकल्सचे उदघाटन झाले आहे. या उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यास देवराई येथील सर्व कलाकार आयुष्यात पहिल्यांदा पुणे ते दिल्ली विमानाने प्रवास करून गेले.

सेक्शन बर्ड, प्राणी, ज्वेलरी, स्कल्पचर, म्युरल, ड्रॉईंग - पेंटिंग, आयर्न क्राफ्ट, वूड क्राफ्ट, तुंबा आर्ट, मॉडर्न ज्वेलरी, स्टोन क्राफ्ट, ट्रॅडिशनल ज्वेलरी, बांबू क्राफ्ट इत्यादी विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू देवराई आर्ट व्हिलेज आज बनवत आहेत. पाचगणी - महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड असते. देवराईची मोठी आर्ट गॅलरी पाचगणीत आहे. तेथे विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अमेरिकेत ज्वेलरीची मागणी खूप आहे. कॉर्पोरेट कंपन्या नाविन वर्षाला किंवा दिवाळीला गिफ्ट आर्टिकल्सच्या मोठ्या ऑर्डर्स देत असतात. देवराई आर्ट व्हिलेज ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षांपासून गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साहाय्य केले जात आहे.

देवराई आर्ट व्हिलेजच्या माध्यमातून आता भामरागड येथे महाराष्ट्र शासनाच्या व केंद्रशासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या योजनेतून या भागातील आदिवासी बांधवांना विविध कलाकुसरीचे प्रशिक्षण दिले जात आहे. कोईनगुडा गावात सुरेश आणि गावकऱ्यांनी मिळून ग्राम ग्रंथालय सुरु केले आहे.

शाळेत शिकत असताना लोक बिरादरी आश्रमशाळेचे शिक्षक विलास तळवेकर यांनी सुरेशला नेहमी प्रोत्साहित केले. विनय वाचामी, सोमेश मडावी, देवाजी हबका, महेश पुंगाटी, वासुदेव आणि संपदा वाचामी, कु. सोनकी बंडू कतलामी आणि इतरही अनेकांनी या कार्यात सुरेशला सहकार्य केले आहे. या कार्यात पत्नी सुरेखाची भक्कम साथ त्याला आहे. त्यांना दोन मुली आहेत. दोन्ही पाचगणीत खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. धडपड्या सुरेशची ही कथा अनेकांना प्रेरणादायी ठरू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com