कहाणी देवगडच्या हापूसची (डॉ. कांचनगंगा गंधे)

डॉ. कांचनगंगा गंधे
रविवार, 5 मे 2019

आजमितीला आंब्याच्या हजारो जाती जगभरात आहेत; पणत सर्वच बाजूंनी सरस ठरला तो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गातल्या देवगडचा अल्फान्सो हापूस! त्याच्या जन्माची कहाणी तर वेगळी आहेच; पण त्याचा सुगंध, माधुर्य, गराचा स्वाद यात तो सर्व आंब्याच्या जातींत उजवा ठरला. या आंब्याचं वेगळेपण काय, त्याच्या जन्माची कहाणी काय आणि त्याची वैशिष्ट्यं काय आदी गोष्टींचा धांडोळा. 

आजमितीला आंब्याच्या हजारो जाती जगभरात आहेत; पणत सर्वच बाजूंनी सरस ठरला तो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गातल्या देवगडचा अल्फान्सो हापूस! त्याच्या जन्माची कहाणी तर वेगळी आहेच; पण त्याचा सुगंध, माधुर्य, गराचा स्वाद यात तो सर्व आंब्याच्या जातींत उजवा ठरला. या आंब्याचं वेगळेपण काय, त्याच्या जन्माची कहाणी काय आणि त्याची वैशिष्ट्यं काय आदी गोष्टींचा धांडोळा. 

कुसुमाकर वसंत ऋतूच्या रंग, गंधाच्या, भूल घालणाऱ्या सोहळ्याला प्रारंभ होतो तो मनाला तृप्त करणाऱ्या, आसमंतात दरवळणाऱ्या सुगंधी आम्रकुसुमाच्या बहरापासून! मधुमासाची सांगता होते ती सर्व फळांचा राजा असलेल्या आंब्याचा स्वाद, रंग आणि सुगंधामुळंच! 

आजमितीला आंब्याच्या हजारो जाती जगभरात आहेत; पण सर्वच बाजूंनी सरस ठरला तो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्गातल्या देवगडचा अल्फान्सो हापूस! त्याच्या जन्माची कहाणी तर वेगळी आहेच; पण सुगंध, माधुर्य, गराचा स्वाद यात तो सर्व आंब्याच्या जातींत उजवा ठरला! पोर्तुगीजांच्या काळातला, भारताचा दुसरा गव्हर्नर (1509 - 1515) ऍफोन्सो द अल्बुक्वेरकू यानं हापूसची जात निर्माण केली. तो दर्यावर्दी योद्धा असल्यामुळं सागरी प्रवासात इतर कामांबरोबर अनेक प्रकारच्या झाडांची रोपं गोळा करून, त्यावर कलमं करून झाडाची नवीन जात निर्माण करण्याचा त्याचा छंद होता. त्यानं ब्राझिलमधल्या आंब्याच्या फांदीचं कलम गोव्याच्या आंब्याच्या फांदीवर केल्याच्या नोंदी आढळतात. अनेक प्रयोगाअंती गोव्यात जन्म झालो तो अल्फान्सो हापूसचा! इंग्रजांनी ऍफोन्सोचा अल्फान्सो केला आणि तेच हापूसंचं नाव प्रचलित झालं! हापूसला विशेषतः दक्षिण कोकणातली हवा, जमीन, पाणी, आद्रता मानवली अन्‌ हापूस कोकणचा राजाच बनला! सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीमध्येही हापूस वाढायला लागला. प्रत्येकाची चव, प्रत, सुगंध हापूसचाच; पण प्रत्येक भागातली चव, सुगंध वेगवेगळा! 

देवगडचा हापूस वाढतो तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या डोंगराळ किनारपट्टीलगतच्या देवगड तालुक्‍यातल्या कुणकेश्‍वर, मिठबाव, कटवनेश्‍वर, विजयदुर्ग, गिरये, देवगड, गोव्याच्या उत्तरेकडचा वेंगुर्ला अशा काही खेडेगावांत! इथला खडक कातळाचा, सहाजिकच जमीन कातळाची, तिचा पोत कडक; पण खडकाळ. जमिनीला थोडा उतार, जमिनीचा पृष्ठभाग लाल रंगाचा. कारण लोह, मॅगेनीज आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त, तर झिंक, तांबं, बोरॉन यांचं प्रमाण अत्यल्प! हवेतली आद्रता 60 ते 90 टक्के, वाऱ्याचा वेग ताशी सहा ते आठ किलोमीटर! अशा सगळ्या वातावरणामुळं देवगड तालुक्‍यातला हापूस कोकणातल्या इतर जिल्ह्यातल्या हापूसपेक्षा जोमानं तर वाढलाच; पण त्याचं माधुर्य, सुगंधामुळं जास्त सरस ठेवला. कोकणातला हापूस जांभा दगडात वाढतो; पण त्याची चव, सुगंध देवगडपेक्षा कमीच! 

फळधारणा झाल्यापासून आंबा तयार व्हायला म्हणजे आंब्याची काढणी 90 ते 120 दिवसात करावी लागते. कैरीचा आंबा तयार व्हायला लागला की फळाच्या देठाकडच्या दोन्ही बाजू फुगून देठाकडं समपातळीत येतात. फळाचा हिरवा रंग बदलून पोपटी आणि नंतर प्रथम देठाकडचा भाग तांबडट होतो. पिष्टमय पदार्थांचं रूपांतर हळूहळू फळ साखरेत होतं, इतर रासायनिक बदल, क्रिया घडतात, आकार बदलतो, फळातली गोडी वाढते. देठासकट तोडलेला आंबा हे देवगड हापूसचं एक वैशिष्ट्य. त्यामुळं अढीत फळ फुटत नाही, चीक ओघळत नाही- त्यामुळं टिकाऊपणा वाढतो अन्‌ चवही चांगली राहते. देवगड हापूस ओळखला जातो तो त्याच्या सुगंधामुळं! त्याचा सुगंध दूरवर पसरतो तो त्याच्यातल्या विशिष्ट रासायनिक घटकांच्या जास्त प्रमाणामुळं आणि त्यांच्या मिश्रणामुळं! फळाच्या गरात असलेल्या मेसिफ्युरॉनमुळे फळाचा वास (फ्रुटी ओडर) येतो, तर (झेड) ऍसिमेने या रसायनामुळं संत्रं- लिंबासारखा ताजंतवानं करणारा सुगंध येतो आणि अल्फा ऑक्‍टॅलॅक्‍टोनमुळं शहाळ्याच्या मगजासारखा वास येतो आणि गरही त्याच्यासारखा लुसलुशीत; पण त्याहीपेक्षा घट्ट असतो. या सर्वांच्या मिश्रणानं देवगडच्या हापूसचा सुगंध अवर्णनीय बनतो. या उलट रत्नागिरी हापूसमध्ये सुगंध आणि गर निर्माण करणाऱ्या रासायनिक घटकांचं प्रमाण कमी असतं, त्यामुळंच रत्नागिरीच्या हापूसचा वास मुद्दाम देठाच्या बाजूनं घ्यावा लागतो. पाडाला लागलेला आंबा (झाडावरच फळ पिकायला सुरुवात होते) काढला, तर तो नंतरही पिकत राहतो, कारण पिकण्यासाठी फळातच तयार झालेल्या एथिलिनचं प्रमाण वाढत राहतं, अशा रितीनं तयार झालेला आंब्याचा रंग हळूहळू बदलतो आणि त्याची सालही मऊ राहते. याउलट मुद्दाम पिकवलेला (रासायनिक द्रव्य, पूड वापरून उदाहरणार्थ- कॅल्शियम कार्बाईड) आंबा सर्वच बाजूंनी एकदम पिवळा होतो, त्याची साल जाड राहते; पण तो आतून चांगला पिकत नाही. 

देवगडचा हापूस रत्नागिरीपेक्षा गोलसर असतो. तो पूर्ण पिकला, तरी त्याचं देठ फळालाच चिकटलेलं असतं, देठाच्या दोन्ही बाजूचा भाग थोडा वर उचलला जातो आणि देठाकडचा भाग खोल जातो. देवगडचा हापूस रत्नागिरीच्या हापूसपेक्षा थोडा हलका असला, तरी आतला गर घट्ट, केशरी - भगवा असतो, तर रत्नागिरीचा पिवळा व रेषायुक्त असतो. देवगड हापूस एकदम गोड, तर रत्नागिरीच्या फळाला गोड स्वाद असला तरी तो थोडा तीव्र चवीचा असतो. रत्नागिरीच्या आंब्याची साल सहजी सोलता येते; पण देवगडच्या आंब्याची साल तुटते आणि आतल्या गरात साखरेचं प्रमाण जास्त असतं, आणि त्याच्या सालीवर सहसा लवकर सुरकुत्या पडत नाहीत. देवगड हापूस हा कापून फोडी करून खाण्याचा आंबा आहे. 

देवगडच्या आंब्याच्या कोयीची रोपं करून वाढवली, तर त्याला देवगड हापूसची चव येत नाही. देवगड हापूसची कलमं करायची झाल्यास त्याच्या झाडाच्या छोट्या डहाळ्या (ज्याच्यावर लहान पानं आणि डोळे असतील) छाटून त्या दुसऱ्या प्रकारच्या आंब्याच्या कोयीतून जी रोपं येतात (ती कमीत कमी 6 ते 8 इंच उंच व पेन्सिल एवढी तरी जाड पाहिजेत) त्यावर कलमं करावी लागतात. नंतर त्याची खूप काळजी घ्यावी लागते. प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीत तयार झालेली ही कलमं गार हवेत, सावलीत कमीत कमी चार वर्षं ठेवून मग टिनच्या पिपात वाढवतात. झाड पाच फूट उंच झाल्यावर खड्ड्यात लावण्यास योग्य होतात. पुढच्या तीन-चार वर्षांत झाडाची योग्य काळजी घ्यावी लागते, नाही तर कलमं जळून जाण्याची शक्‍यता असते. अनावश्‍यक फांद्या छाटाव्या लागतात- जेणेकरून सर्व झाडाला सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे. झाड आठ वर्षाचं झाल्यावर थोडा मोहोर यायला लागतो. फळ यायला झाडाटी पूर्ण नऊ वर्षं लागतात. याची फळंही एक वर्षाआड येतात. फळं पिकायला लागल्यावर झेल्याच्या साह्यानं झाडावरून काढून क्रेटमध्ये ठेवतात. ते क्रेट लगेचच थंड ठिकाणी ठेवले जातात, त्यावर सूर्यप्रकाश ऊन पडलं, तर मात्र आंबा काळा पडायला लागतो. नंतर प्रत्येक आंबा पारखला जातो, खराब आंबा काढला जातो. बाकीचे आंबे वजनानुसार वेगळे केले जातात. नंतर बुरशीविरोधी द्रावणात काही काळ बुडवून ठेवतात. नंतर पुन्हा क्रेट्‌स किंवा कोरुगेटेड बॉक्‍समध्ये वाळलेलं गवत घालून पिकण्यासाठी ठेवतात, नंतर देवगडचा हापूस बाजारात विकण्यासाठी पाठवला जातो. वसंतऋतूची सांगता होत असतानाच देवगडच्या हापूसची कहाणीही पूर्णत्वाला जात असते; पण सगळ्यांना तृप्त करूनच! 

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story behind the brand of Devgad Alphonso mango by Kanchanganga Gandhe