आजारावर मात करणाऱ्या एका व्यापाऱ्याची यशस्वी कथा

lok biradari.
lok biradari.

आपण लहानाचे मोठे होत असताना आपल्या सोबत अनेक जण मोठे होत असतात. पण, त्यांनी आयुष्यात जे अति कष्टाने कमावले त्याचे महत्त्व आपल्याला लगेच लक्षात येत नाही. कारण आपल्यासाठी ती व्यक्ती नियमित भेटणारी असते म्हणून ती घरचीच वाटते. त्यांनी केलेला संघर्ष, मेहनत हे आपल्या लक्षात यायला बराच कालावधी लागतो.

अशाच एका भामरागड तालुक्‍यातील धडपड्या व्यक्तीची ही कथा आहे. संतोष सीताराम बडगे यांचा जन्म 1978 साली भामरागड तालुक्‍यातील मर्दमालिंगा या अति दुर्गम गावात झाला. हे गाव भामरागडपासून साधारण 20 किलोमीटर जंगलात आहे. पक्के रस्ते, वीज, मोबाईल नेटवर्क आजही त्या भागात नाही.

भामरागड तालुक्‍यातील गावांमध्ये आदिवासी बांधवांसोबत तेली समाजातील बरेच बांधव वर्षानुवर्षे या भागात वास्तव्यास आहेत. ते सर्व आदिवासी जीवनाशी एकरूप झाले आहेत. त्याच समाजातील संतोष आहे. संतोषचे बाबा सीताराम आणि आई गिरिजाबाई दोघेही निरक्षर आहेत. भाताची शेती हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. साधारण एकर जमीन त्यांच्याकडे आहे. सिंचनाची सोय नसल्याने भाताचे उत्पादन हे पावसावर अवलंबिले आहे. सोसायटीला धानाची विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह होतो. संतोषला एक मोठी बहीण, एक मोठा भाऊ आणि एक लहान भाऊ आहे. संतोषचे शिक्षण 12 वी पर्यंत भामरागडमध्ये झाले. आणि 2000 साली त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.

1992-93 मध्ये संतोष शाळेत शिकत असताना 6 व्या- 7 व्या इयत्तेत त्याला चालताना-खेळताना दम लागायला सुरुवात झाली. कालांतराने तो त्रास इतका वाढला की त्याचे सायकल चालवणे पूर्ण बंद झाले. त्याच्या वडिलांनी त्याला लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात ट्रीटमेंटसाठी आणले. डॉक्‍टरांनी त्याला तपासले. जन्मजात हृदयरोग असण्याची शक्‍यता डॉक्‍टरांना वाटली.

भामरागड तालुक्‍यात इलेक्‍ट्रीसिटी नव्हती. निदान पक्के करायला हेमलकसा येथील लोकबिरादरी दवाखान्यात ECG, एक्‍सरे, पॅथॉलॉजी लॅबसारख्या सुविधा त्या काळी उपलब्ध नव्हत्या. म्हणून डॉक्‍टरांनी त्यांना सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेजला संतोषला घेऊन जायला सांगितले. सोबत चिट्ठी दिली. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. पण, 20 दिवस सेवाग्राम मेडिकलला राहिल्यावर तेथील डॉक्‍टरांनी याचे हृदयाचे ऑपरेशन करावे लागणार आणि ते येथे शक्‍य नाही म्हणून सांगितले आणि याला मुंबईला घेऊन जा असा सल्ला देण्यात आला. हे ऐकल्यावर संतोषच्या वडिलांचे हातपाय गळाले. घरची गरिबी. मुंबईला जायचे कसे माहिती नाही आणि हृदयाचे ऑपरेशन म्हणजे लाखात खर्च येणार. तो खर्च आवाक्‍याबाहेरचा. म्हणून त्यांनी परतीचा मार्ग पत्करला. आणि परत ते लोकबिरादरी दवाखान्यात संतोषला घेऊन आले.

त्यानंतर दिवसेंदिवस संतोषची प्रकृती खालावत चालली होती. मग डॉ. प्रकाश आमटे यांनी संतोष आणि त्यांच्या वडिलांना घेऊन नागपूर गाठायचे ठरविले. स्वतः गाडी घेऊन ते संतोषला घेऊन नागपूरला गेले. नागपुरातील नावाजलेल्या सर्वोपचार सेवा देणाऱ्या सिम्स या हॉस्पिटलमध्ये संतोषला भरती केले. तेथे कार्यरत असलेले हृदयरोग शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. अशोक भोयर यांना भेटून परिस्थिती सांगितली. डॉ. भोयर यांनी आणि सिम्सने सामाजिक बांधीलकी दाखवून अतिशय कमी खर्चात संतोषचे हृदयाचे ऑपरेशन केले. जीवनदान होते हे. काही दिवस दवाखान्यात डॉक्‍टरांच्या देखरेखीमध्ये सिम्समध्येच उपचार झाले. मग पूर्ण बरा होऊन संतोष घरी परत आला. या आजारपणामध्ये त्याचे शिक्षणाचे 12 वी चे वर्ष वाया गेले.

2000 साली कृषी डिप्लोमा केल्यावर संतोषला स्वतःचा ट्रॅक्‍टर असावा असे नेहमी वाटायचे. कारण या भागात त्याकाळी फक्त 3 ट्रॅक्‍टर होते. धानाची विक्री करायला बैलगाडी वापरायला लागायची. त्याला मेहनत आणि वेळ पण खूप लागायचा. नांगरणी-वखरणी अशा शेतीच्या मशागती पण हल्ले वापरून या भागात केल्या जातात. 2001 साली व्यवसाय करायचा म्हणून आणि स्वत:च्या शेतीसाठी त्याने कर्ज काढून ट्रॅक्‍टर, ट्रॉली आणि नांगर-वखर घेतले. तोपर्यंत संतोषचा मोठा भाऊ 12 वी पास होऊन जिल्हा परिषद शिक्षक झाला होता. त्यामुळे त्याच्या नावावर कर्ज काढता आले. ट्रॅक्‍टर आणि ट्रॉली असल्याने शेतातील माल वाहणे सोपे झाले. या भागात ज्यांना गरज भासेल त्यांना तो भाडेतत्त्वावर वेगवेगळ्या कामासाठी ट्रॅक्‍टर द्यायचा. त्यातून उत्पन्न मिळवायचा. तसेच शेतीला जोड धंदा म्हणून विटा बनवून विकायचा. पुढे त्याने ट्रॅक्‍टरवर चालणारे धान काढण्याचे मशीन घेतले होते. अनेक शेतकरी त्याची मशीन भाड्याने घेऊन जायचे. थ्रेशर मशीनमुळे कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये धान काढून व्हायचे.

भामरागड तालुक्‍याच्या ठिकाणी स्वतःचे ऑफिस असावे अशी त्याची इच्छा होती. ट्रॅक्‍टरसाठीचे कर्ज फेडून झाल्यावर त्याने भामरागड येथे एक रूम ऑफिससाठी म्हणून विकत घेतली. पण, ती घेतल्यावर त्याचा विचार बदलला आणि त्याने त्या ठिकाणी 2011 मध्ये संतोष हार्डवेअर नावाने हार्डवेअरचे दुकान टाकले. दुकानामध्ये सिमेंट, गिट्टी, लोहा, बांधकामासाठी लागणारे सर्व सामान, पेंट, पत्रे इत्यादी सर्व सामान विक्री त्याने सुरू केली. त्याच्या मेहनतीने आणि सभ्यतेने व्यवसाय करीत असल्याने त्याला खूप चांगले यश मिळाले. कुठल्याही प्रकारचे वाईट व्यसन त्याला नाही.
अल्ट्राटेकसारख्या मोठ्या कंपनीने सिमेंट विक्रीमध्ये कंपनीला चांगला फायदा मिळवून दिल्याबद्दल संतोषला तब्बल 6 देश कंपनीने मोफत फिरवून आणले. कंपनीच्या खर्चाने दुबई, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, रशियासारख्या देशात जाऊन आलेला या भागातील संतोष हा पहिलाच व्यापारी असेल. 2012 मध्ये त्याने बीज भांडारचे लायसन्स घेतले होते आणि 2015 ला त्याचेसुद्धा दुकान टाकले. विविध प्रकारचे बीज आणि रासायनिक खतांची विक्री या दुकानातून होते. 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या स्वतःच्या लहान भावाला भामरागडमध्येच किराणा दुकान टाकून द्यायला संतोषने बरीच मदत केली.

भामरागडमध्ये व्यापारी संघटना आहे. सध्या संतोष त्या संघटनेचा मुख्य पदाधिकारी आहे. भामरागड मध्ये JCB मशीन कोणाचकडे नव्हती. यावर्षी मे 2020 मध्ये त्याने 25 लाखांचे JCB मशीनसुद्धा विकत घेतले.

संतोषचे लग्न लाहेरी येथील माया कोठारे यांच्याशी 2001 मध्येच झाले. संतोषची एक मुलगी 12 वी मध्ये आहे. दुसरी 10 वीत आणि मुलगा सध्या 7 वी मध्ये शिकतोय. लहानपणापासून मी त्याच्या आयुष्यातील चढउतार बघितले आहेत. परिस्थितीपुढे हार न मानता संतोषचा हा प्रवास अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com