चित्रपटाची पटकथा हाच आत्मा

cinema
cinema

आपण सिनेमाच्या कथा कशा बदलतात हे बघितले. कथेला समाजाच्या सगळ्या घटकांचा संदर्भ असतो. त्याप्रमाणे त्या-त्या काळात कथा बदलत असतात. कारण शेवटी सिनेमा हा मनोरंजनाचा एक भाग असला तरी वास्तव आणि स्वप्न यांच्यातला मध्य साधून निर्माण झालेली एक कलाकृती असते ज्याला प्रत्येक प्रेक्षक स्वत:च्या आयुष्याशी जोडून बघत असतो. स्वत:ला त्यात बघत असतो म्हणून सिनेमाचा प्रभाव पटकन पडतो. पण, तो अखंड असतो का, ही शंका आहे. प्रत्यके कथेत एक संस्कार असतोच तो म्हणजे वाईट प्रवृत्तीचा पराभव आणि सत्याचा विजय. (जो नेहमी शेवटी असतो) कारण सत्याचा, प्रामाणिकपणाचा विजय सिनेमाच्या सुरवातीलाच दाखवला, तर मग पुढचा दीड तास सिनेमा काय दाखवायचा? आधी काहीतरी वाईट कृत्य, घटना दाखवली की, मगच त्याचे उत्तर शोधणे म्हणजे कथा विस्तार आणि हीच गंमत चित्रपट, सिरीअल्समध्ये असते. कथा, कथेची बीजे ही साधारणपणे दोन अडीच पानांवर मावणारी असतात. मग त्याचा विस्तार होतो. त्यालाच पटकथा म्हणतात. ही पटकथाच खरा आत्मा असतो. कारण त्याची भट्टी जमली की, कलाकृती उत्तम ठरते. म्हणजे सिनेमा किंवा सिरीअल्स सुरू करायचे असेल, तर मग आधी कथा लागते आणि मग पटकथा, मग कथा कशी निवडायची, हा प्रत्येक दिग्दर्शकाचा, निर्मात्याच्या आवडीचा प्रश्‍न. त्यांना कशी फिल्म, सिरीअल्स करायची हा त्यांच्या प्रश्‍न. पण, विषय कोणताही असो, तो डेव्हलप करताना किंवा पटकथा लिहिताना प्रथम आणि शेवटपर्यंत डोक्‍यात असतो तो प्रेक्षक. प्रेक्षकांचा विचार सुरुवातीपासून असतो म्हणून मग समाजात घडणाऱ्या सगळ्या घडामोडींचा विचार असतो; कारण या समाजाचा प्रत्येक घटक हा या कथेचा प्रेक्षक असतो.
आता कथा निवडताना खूप विचार केला जातो. समजा एखाद्या घटनेवर फिल्म करायची, तर त्याचे संदर्भ कोणते हे महत्त्वाचे ठरते. उदाहरण द्यायचे झाल्यास कारचे होणारे अपघात. नेहमी बातमी येते आणि ती आपण वाचून विसरतो; पण जर तोच अपघात सलमान खानच्या गाडीने झाला असेल, तर हीच स्टोरी असते. शेवटी सद्यपरिस्थिती ही कथेत येतेच. पहिला चित्रपट "राजा हरिश्‍चंद्र' आला. तेव्हाचा समाज आणि आता येणारे चित्रपट आणि त्यांच्या कथा हा बदललेल्या समाजाचे प्रतिबिंब आहे. गांधी विचार समजण्यासाठी आधी खूप प्रयत्न करावे लागले नाही; कारण समाज स्वातंत्र्यलढ्याच्या प्रभावात होता. त्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले. त्यामुळे Gandhi Thoughts हा पीएच.डी.चा विषय नव्हता. तो नंतर आला आणि आता समाजाच्या विचारांचा प्रवाह एवढा बदलला की, गांधी थॉट्‌स समजायला "मुन्नाभाई'ची गरज पडली. त्याच्या तोंडी बापू आया, बापू बोला, अपूनका बापू, अशी भाषा यावी लागली. हा समाजाचा, विचारांचा बदल झालाय आणि तो चित्रपटात आला. लोकांना भावलाही.
आताच आलेला "छपाक' ऍसिड फेकणाऱ्या विकृत प्रवृत्तीवर होता; पण तेवढा प्रतिसाद नाही मिळाला. समाजातील ज्वलंत विकृती असताना याची कारणे ढोबळमानाने दीपिका पदुकोण JNU ध्ये गेली म्हणून असे देतात; पण ते कारण अगदी दोन तीन टक्केच असेल, तर असेल. त्याचं अजून एक मुख्य कारण म्हणजे दीपिकाच्या बहुतांश सिनेमात विद्रुप चेहरा आहे. तुम्ही म्हणालं असं कसे..? कारण समाजाची विकृती कितीही मोठी असली, तरी ती कलेच्या माध्यमातून कशी मांडतो, यावर खूप फरक पडतो. कारण वास्तव जसे आहे तसे मांडताना खूप अडचणी असतात. त्याची जाणीव कथेत करावीच लागते. पटकथा थोडी पचनी पडेल अशी तयार करून वास्तवाचे डोस देता येतात. "छपाक'मध्ये दीपिका मुख्य भूमिकेत आहे. तिचे ग्लॅमर लोकांना भावले; पण संपूर्ण चित्रपटात तो चेहरा लोकांनी स्वीकारला नाही. ते सत्य असूनसुद्धा ऍसिड हल्ल्यामुळे स्त्रीचा चेहरा विद्रुप झाला; मन नाही. हे वास्तव चित्रपटातले. पण, मी जेव्हा चित्रपट बघायला जातो तेव्हा त्यात माझे मन रमेल, अशा घटना मी त्यात शोधत असतो. चित्रपटात वीस-पंचवीस मिनिटांनंतर तोच चेहरा प्रेक्षक म्हणून नाही स्वीकारत. ते भयाण सत्य असले तरी. कारण शेवटी मनोरंजन हा शब्द चित्रपटाला जोडला आहे. "मुन्नाभाई'मध्ये गांधी विचार प्रखरपणे मांडले; पण सतत गांधीजी दाखवले नाही त्यामुळे ते पटकन भावले. म्हणून मी म्हटले की, चित्रपटाची पटकथा हाच आत्मा ठरतो. संवाद नंतर देतात. पटकथा दमदार आणि सोबतीला तसेच संवाद असेल, तर चित्रपट आवडणारच. बरं सगळेच चित्रपट समाजाला काही देणे लागतात का? तर अजिबात नाही. उलट माझे मत असे आहे की, चित्रपट हे समाजाला काही देणे लागत नाही उलट समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचा आरसा असतो. चित्रपटाची कथा ही समाजात घडणाऱ्या, घडून गेलेल्या घटनांचा आरसा असतो. बाकी चित्रपट हा निव्वळ करमणूकप्रधान असतो. माणसे चित्रपट बघून तीन तास स्वत:ला विसरतात. आनंद देतात हेच माध्यमाच देणं आहे. सध्या तर प्रत्येक जण कॅमेरा घेऊन दिसतोय. स्वत:चा चित्रपट बनवतोय. रस्त्यावर एखादी घटना घडली की, लगेच फोन काढून शूट करणे आणि अपलोड करणे हेच चाललंय. या सवयीमुळे माणूस एखाद्या अपघाताचे शूटिंग करतो; पण त्या माणसाला मदत करत नाही. माणुसकी नसल्यासारखा वागतो. हेच वास्तव चित्रपटात कथेच्या रूपात येतं. हे खरं रूप कधी विनोदी अंगाने तर कधी गंभीरपणे पडद्यावर मांडता येते. पुन्हा तेच- कथा एक, बीज एक; पण मांडणी वेगळ्या रूपात. सिरीयल्समध्ये तर मूळ कथा पहिल्या काही भागांमध्ये असते मग सुरू होते पाणी भरणे. रोज काय दाखवणार? चांगली पात्र नाट्य निर्माण करू शकत नाहीत. मग वाईट स्वभावाची पात्र निर्माण करावी लागतात. आता तर तीच जास्त असतात मालिकांमध्ये. यामुळेच मालिका चालू शकतात वर्षानुवर्षे. नाहीतर कथा कधीच संपेल. सतत विध्वंसक, विकृत, नकारात्मकता बघून बघून माणूस आवेशात स्वार्थी, भांडखोर होत चाललाय. चित्रपट, मालिकांचा हा दोष नाही; पण एक वास्तव आहे की, सेन्स आणि व्हॉयलन्स लोकांना जास्त भावतं. अभिरुची बदलल्याचे हे लक्षण आहे. आधी एकांत हवा असायचा माणसाला. आता मोबाईलमुळे तो एकटाच राहायला लागलाय. हाच बदल चित्रपटात दिसतोय सध्या. समाजात मिसळायला चित्रपट हे एकमेव नकळतपणे एकत्र आणणारे माध्यम आहे. प्रेक्षक स्वत:चे पैसे खर्च करून एका ठिकाणी जमा होतात आणि एका कलेचा एकत्रितपणे आस्वाद घेतात. हीच सिनेमाची ताकद आहे. ती टिकवायची आणि वाढवायची जबाबदारी चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या प्रसंगाची आहे. तेवढेच समाजकारण... कथेच्या, चित्रपटाच्या माध्यमातून.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com